:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर मा.सदस्या)
(पारीत दिनांक–17 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री रमेश बळीराम भुरे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा रोहणा, तालुका- मोहाडी, जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-788 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती दिनांक-31/12/2015 रोजी शेतावर जात असताना रानडुकरांनी धडक दिल्याने डोक्यावर पडून गंभिर जख्मी झाला आणि पुढे वैदकीय उपचारा दरम्यान दिनांक-03/01/2016 रोजी त्याचा मृत्यू झाला. तिचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-07/04/2016 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. असे असताना विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विमा दाव्या संबधात दिनांक-11/01/2017 रोजी पत्र पाठवून त्यामध्ये विमा प्रस्ताव वाहन परवाना नसल्याने नामंजूर करण्यात येतो असे कळविले. विरुध्दपक्ष विमा कंपनीला तिचे पतीचा पोलीस दस्तऐवजा वरुन विमा दावा फेटाळता येणार नाही कारण तक्रारकर्तीचे पतीचा अपघात आणि वाहन परवाना यांचा काहीही संबध येत नाही. अशाप्रकारे तिचा विमा दावा नाकारुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिला दोषपूर्ण सेवा दिली. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्दपक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-07/04/2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव मृतका जवळ अपघाताचे वेळी वाहन परवाना नव्हता या कारणावरुन दिनांक-11/01/2017 रोजीचे पत्रान्वये नामंजूर केला होता, बाब मान्य केली. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने संपूर्ण पोलीस दस्तऐवजांची शहानिशा केल्या नंतर तक्रारकर्तीचा मृतक पती श्री रमेश बळीराम भुरे हा घटनेच्या दिवशी नेरी ते एकलारी रोडवर त्याचे जिजाजीची मोटरसायकल स्वतः चालवित असताना त्याचे मोटासायकला डुकरांचे कळपाने धडक दिल्याने तो गंभिर जख्मी झाला आणि पुढे सामान्य रुग्णालयात वैद्दकीय उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक हा घटनेच्या वेळी मोटर सायकल चालवित असताना त्याचे जवळ वैध वाहन परवाना नसल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून विमा दावा नामंजूर केला, यात त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांना मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिलेत वा त्यांनी कोणतेही लेखी निवेदन मंचा समक्ष सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्द एकतर्फी तक्रार चालविण्याचा आदेश मंचा तर्फे प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 08 नुसार एकूण-07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, विमा दावा फेटाळल्या बाबत विमा कंपनीचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू बाबत पोलीस दस्तऐवज, शव विच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 63 वर तिचे शपथपत्र दाखल असून, पृष्ट क्रं -68 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्या दाखल पान क्रं- 65 वर शपथपत्र दाखल केले.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री व्ही.एम.दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. या मधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात व शपथपत्रात संपूर्ण पोलीस दस्तऐवजांची शहानिशा केल्या नंतर तक्रारकर्तीचा मृतक पती श्री रमेश बळीराम भुरे हा घटनेच्या दिवशी नेरी ते एकलारी रोडवर त्याचे जिजाजीची मोटरसायकल स्वतः चालवित असताना त्याचे मोटासायकला डुकरांचे कळपाने धडक दिल्याने तो गंभिर जख्मी झाला आणि पुढे सामान्य रुग्णालयात वैद्दकीय उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता असे नमूद आहे. मृतक हा घटनेच्या वेळी मोटर सायकल चालवित असताना त्याचे जवळ वैध वाहन परवाना नसल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे अधिन राहून विमा दावा नामंजूर केल्याचे विरुध्द पक्ष 2 चे म्हणणे आहे.
09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्रातील कथना नुसार पोलीस स्टेशन वरठी, उपविभाग भंडारा यांनी नोंदविलेल्या अकस्मात मृत्यू सुचना यामध्ये फीर्यादी डॉ.श्री अतुल टेंभूर्णे यांनी दिलेल्या मौखीक रिपोर्ट प्रमाणे मृतक श्री रमेश बळीराम भुरे हा त्याचे जिजाजीचे मोटरसायकलने दिनांक-03/01/2016 रोजी मौजा नेरी ते ऐकलारी रोडने जात असताना अचानक जंगली डुकरांचे कळपाने त्याचेवर हल्ला केल्याने मोटरसायकलसह तो खाली पडल्याने त्याचे डोक्याला गंभिर मार लागलेला असल्याने त्याला सामान्य रुग्णालय, भंडारा येथे वैद्दकीय उपचारार्थ भरती करण्यात आल्याचे नमुद आहे. पोलीसांचे गुन्हयाचे तपशिला मध्ये सुध्दा मृतकाचा मृत्यू डुकराने मारल्याने झाल्याचे नमुद आहे. सामान्य रुग्णालय भंडारा यांचे शव विच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण हे “Death is due to Head injury” असे नमुद केलेले आहे. त्यावरुन मृतक हा घटनेच्या वेळी त्याचे जिजाजीची मोटर सायकल चालवित असताना त्याचे जवळ वैध वाहन परवाना नसल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला असल्याचे नमुद केले.
10. या संदर्भात तक्रारकर्तीचे वकीलांनी पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली. मंचा तर्फे त्या निकालपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आलेत व त्यातील संक्षीप्त निरिक्षणे नोंदविण्यात आलीत,
ती निरिक्षणेखालील प्रमाणे आहेत-
- IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्याचे कायद्दा नुसार भक्कम पुरावा आहे असे म्हणता येणार नसल्याने पोलीसांचे दस्तऐवजाचा विरुध्दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
- 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचातर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
11. मंचा समोरील हातातील प्रकरणात उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले न्यायनिवाडयातील तत्व काही अंशी (Ratio) लागू पडतात. परंतु हातातील प्रकरणात वादाचा मुद्दा असा आहे की, अपघाताचे वेळी मृतका जवळ वैध वाहनचालक परवाना नसल्याने विमा दावा देय नसल्याची भूमीका विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेली आहे. या संदर्भात तक्रारकर्तीने दाखल केलेल्या शपथपत्रात व लेखी युक्तीवादात घटनेच्या वेळी तिचे पतीला जंगली डुकरांनी धडक दिलेली आहे, त्यामुळे सदर अपघाताचा व वाहन परवान्याचा परस्पर थेट संबध नसल्याचे नमुद केलेले आहे.
12. विरुध्दपक्ष विमाकंपनीने पोलीस दस्तऐवजावर आपली भिस्त ठेऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे.
13. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले निवाडे, त्यामधील वस्तुस्थिती आणि दिलेले तत्व (Ratio) पाहता सदर न्यायनिवाडे हे हातातील तक्रारीशी काही अंशी जुळतात, परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या नुसार मृतक हा घटनेच्या वेळी मोटर सायकल चालवित असताना त्याचे जवळ वैध वाहन परवाना नसल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून विमा दावा नामंजूर केल्याचे म्हणणे आहे. या उलट तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे तिचे पतीला जंगली डुकरांनी धडक दिलेली आहे, त्यामुळे सदर अपघाताचा व वाहन परवान्याचा परस्पर थेट संबध नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की, अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचा पती मोटरसायकल चालवित असताना त्याचा कोणताही निष्काळजीपणा नसताना अचानक रानडुकरांचे कळपाने त्याचे मोटर सायकलला धडक दिल्याने तो पडल्याने त्याचे डोक्याला गंभिर दुखापत झाली व पुढे वैद्दकीय उपचाराचे दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर बाब अभिलेखावरील दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. विरुध्द पक्षाने देखील त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्तीचा पतीवर रानडुकरांचे कळपाने हल्ला केल्याने डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यु झाल्याचे नमूद केले आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निवाडयां मध्ये वाहनचालकाचा वाहन चालवित असताना कोणताही दोष नसताना अपघात होऊन मृत्यू झालेल्या प्रकरणात घटनेच्या वेळी मृतका जवळ वैध वाहनचालक परवाना नसल्याची अट पुढे करुन विमा कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही असे प्रतिपादीत केलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणांत विमा कंपनीने केवळ शासन निर्णयात नमूद अटीनुसार वाहन परवाना नसल्याचे कारणांवरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारणे योग्य नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण सदर शेतकरी विमा योजनेचा मुळ उद्देश हा शेतक-यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या असाह्य कुटूंबास आर्थिक सहाय्य करणे हा आहे. तक्रारकर्तीचा पती देखील शेतकरी होता व त्याचा अपघाती मृत्यु झाला यात वाद नाही . असे असतानां केवळ अपघाताचे वेळी मृतकाकडे वाहन परवाना नव्हता या कारणाने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारणे ही विरुध्द पक्ष विमा कंपनीचे सेवेतील त्रृटी आहे या निष्कर्षाप्रत मंच येते, म्हणून तक्रारकर्तीचा तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-17/05/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.