:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक–17 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे मृत्यू संबधात विमा दावा फेटाळल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती दामोदर साधुजी तितरमारे हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची मौजा कोडामाह, तालुका- जिल्हा- भंडारा येथे भूमापन क्रं-105/1 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती दिनांक-17/04/2016 रोजी शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना किटकनाशक त्याचे नाका व तोंडात गेल्याने बेशुध्द झाला व पुढे दवाखान्यात वैद्दकीय उपचार करीत असताना दिनांक-20/04/2016 रोजी त्याचा मृत्यू झाला. तिचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-02/08/2016 रोजी विमा दावा प्रस्ताव दाखल केला आणि विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. असे असताना विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विमा दाव्या संबधात दिनांक-11/01/2017 रोजीचे पत्र पाठवून त्यामध्ये विमा प्रस्ताव मृतकाने विषप्राशन केल्यामुळे नामंजूर करण्यात येतो असे कळविले. तक्रारकर्तीचे पतीने विषप्राशन केल्या बाबत कोणताही पुरावा नाही. अशाप्रकारे तिचा विमा दावा नाकारुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिला दोषपूर्ण सेवा दिली. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्दपक्षांकडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-02/08/2016 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्तीचा पती दिनांक-17/04/2016 रोजी शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना किटकनाशक त्याचे नाका व तोंडात गेल्याने बेशुध्द झाला व पुढे दवाखान्यात वैद्दकीय उपचार करीत असताना दिनांक-20/04/2016 रोजी त्याचा मृत्यू झाला होता ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्तीचे पतीचा विमा दावा हा त्याने विषप्राशन केल्याचे कारणा वरुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने नामंजूर केला होता, बाब मान्य केली. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्तीचा पती याचा अपघाती मृत्यू झालेला नसून त्याने स्वतः विषप्राशन करुन आत्महत्या केली असल्याने झालेला आहे आणि ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीने संपूर्ण पोलीस दस्तऐवजांची शहानिशा केल्या नंतर लक्षात आल्याने त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीने नियम व अटीचे आधिन राहून विमा दावा नामंजूर केला, यात त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्यू बाबत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-05/08/2016 रोजी दाखल केल्या नंतर त्यांनी त्रृटी पुर्तता करुन सदर विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-08/08/2016 रोजी सादर केला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी तो प्रस्ताव बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग लिमिटेड यांचेकडे सादर केला व पुढे तो विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात सादर करण्यात आला. पुन्हा मा.जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालय भंडारा यांचे दिनांक-18/08/2016 रोजीचे पत्रा नुसार त्रृटींची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाने दिनांक-04/03/2017 रोजी सादर केलेले आहे. विमा दावा प्रस्तावातील त्रृटी संबधाने त्यांनी वेळोवेळी तक्रारकर्तीशी पत्रव्यवहार करुन त्रृटीची पुर्तता केली. त्यांनी तक्ररीकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 08 नुसार एकूण-09 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, विमा दावा फेटाळल्या बाबत विमा कंपनीचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, शेतीचे कागदपत्रे, तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू बाबत पोलीस दस्तऐवज, शव विच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, मृतकाचा वयाचा दाखला अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 73 वर तक्रारकर्तीचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं- 78 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्या दाखल पान क्रं- 75 वर शपथपत्र दाखल केले.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री व्ही.एम.दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. या मधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने मंचा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात व शपथपत्रात तक्रारकर्तीचा पती दिनांक-17/04/2016 रोजी शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना किटकनाशक त्याचे नाका व तोंडात गेल्याने बेशुध्द झाला व पुढे दवाखान्यात वैद्दकीय उपचार करीत असताना दिनांक-20/04/2016 रोजी त्याचा मृत्यू झाला होता ही बाब नामंजूर केली
09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्रातील कथना नुसार तिचे पतीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची बाब पोलीसांचे मर्ग खबरी मध्ये मृतकाला दिनांक-17.04.2016 रोजी किटकनाशक प्राशन केल्याने सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले असता त्याला नागपूर येथे उपचारार्थ रेफर करण्यात आले, त्यानुसार ग्रीनसिटी हॉस्पिटल नागपूर येथे भरती केले व उपचारा दरम्यान त्याचा दिनांक-20/04/2016 रोजी मृत्यू झाल्याचे नमुद आहे. पोलीस स्टेशन, लाखनी, उपविभाग साकोली, जिल्हा भंडारा याचे अकस्मात मृत्यू सुचने मध्ये मृतकाने स्वतःचे राहते घरी दिनांक-17.04.2016 रोजी सायंकाळी 17.00 वाजताचे सुमारास किटकनाशक प्राशन केल्याने त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले व त्यानंतर पुढे नागपूर येथे वैद्दकीय उपचाराचे दरम्यान दिनांक-20.04.2016 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे नमुद आहे. मेडीकल कॉलेज, नागपूर येथील निवासी डॉक्टरांचे दिनांक-20/04/2016 रोजीचे शवविच्छेदन अहवालात Stomach and its contents- 200 cc brownish fluid present with insecticide like smell mucosa hemorrhagic at places असे नमुद असून मृत्यूचे कारण Opinion reserved असे नमुद असून पुढे Viscera has been preserved. It may please be stated immediately whether examination by the Chemical Analyzer is necessary or it is to be destroyed असे नमुद आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या नुसार पोलीस दस्तऐवजावरुन त्यांनी तिचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले.
10. या संदर्भात तक्रारकर्तीचे वकीलांनी पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली. मंचा तर्फे त्या निकालपत्रांचे काळजीपूर्वक
अवलोकन करण्यात आलेत व त्यातील संक्षीप्त निरिक्षणे नोंदविण्यात आलीत,
ती निरिक्षणेखालील प्रमाणे आहेत-
- IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्याचे कायद्दा नुसार भक्कम पुरावा आहे असे म्हणता येणार नसल्याने पोलीसांचे दस्तऐवजाचा विरुध्दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
- 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
3) III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh Khanduja & Anr.”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
4) 2016 (4) CPR-783 (NC) “United India Insurance Co.-Versus-Shankar Lal & Ors.”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, जरी शव विच्छेदन अहवालात मृतकाने विष प्राशन केल्याचे नमुद असले तरी प्रयोगशाळा परिक्षणात मृतकाचे व्हिसे-यात विष आढळून आलेले नसल्याने मृतकाने विष घेतल्याचा निष्कर्ष निघत नसल्याचे मत नोंदविले.
*****
5) IV (2015) CPJ 307 (NC)-“United India Assurance Co.Ltd.-Versus-Saraswatabai Balabhau Bharti”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, मृतकाने विष प्राशन केले होते या संबधाने पुरावा आलेला नसल्याने त्याने आत्महत्या केली होती असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
6) Order of Hon’ble State Commission Maharashtra in First Appeal No.-A/06/231 “Branch Manager, United India Insurance Co-Versus-Smt.Subhadra Gaike” Order dated-21/09/2011
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी मृतक हा शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करीत असल्याने श्वासोश्वासाव्दारे नाका तोंडातून विष शरिरात गेल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखल पुराव्यां वरुन सिध्द होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कथना नुसार मृतकाने आत्महत्या केली होती या संबधी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, त्यामुळे मृतकाचा अपघात झालेला असल्याने त्याचे मृत्यू पःश्यात जनता शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभ मिळण्यास मृतकाचे वारसदार पात्र असल्याचे मत नोंदविले.
*****
11. मंचा समोरील हातातील प्रकरणात उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले न्यायनिवाडयातील तत्व (Ratio) लागू पडतात. मा.राज्य ग्राहक आयोग मुंबई यांनी First Appeal No.-A/06/231 “Branch Manager, United India Insurance Co-Versus-Smt.Subhadra Gaike” Order dated-21/09/2011 पारीत केलेल्या निवाडयातील वस्तुस्थिती आणि हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती ही एकमेकांशी जुळत असून सदरचा निवाडा हा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
12. विरुध्दपक्ष विमाकंपनी ज्या दस्तऐवजावर आपली भिस्त ठेऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे, त्या पोलीसांचे मर्ग खबरी मध्ये मृतकाला दिनांक-17.04.2016 रोजी किटकनाशक प्राशन केल्याने सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले असता त्याला नागपूर येथे उपचारार्थ रेफर करण्यात आले, त्यानुसार ग्रीनसिटी हॉस्पिटल नागपूर येथे भरती केले व उपचारा दरम्यान त्याचा दिनांक-20/04/2016 रोजी मृत्यू झाल्याचे नमुद आहे. पोलीस स्टेशन, लाखनी, उपविभाग साकोली, जिल्हा भंडारा याचे अकस्मात मृत्यू सुचने मध्ये मृतकाने स्वतःचे राहते घरी दिनांक-17.04.2016 रोजी सायंकाळी 17.00 वाजताचे सुमारास किटकनाशक प्राशन केल्याने त्याला सामन्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले व त्यानंतर पुढे नागपूर येथे वैद्दकीय उपचाराचे दरम्यान दिनांक-20.04.2016 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे नमुद आहे.
13. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयानीं दिलेले निवाडे, त्यामधील वस्तुस्थिती आणि दिलेले तत्व (Ratio) पाहता सदर न्यायनिवाडे हे हातातील तक्रारीशी जवळपास जुळतात, विशेषतः मा.राज्य ग्राहक आयोग मुंबई यांनी First Appeal No.-A/06/231 “Branch Manager, United India Insurance Co-Versus-Smt.Subhadra Gaike” Order dated-21/09/2011 या प्रकरणात पारीत केलेल्या निवाडयात असे नमुद केलेले आहे की, मृतक हा शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करीत असल्याने श्वासोश्वासाव्दारे नाका तोंडातून विष शरिरात गेल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखल पुराव्यां वरुन सिध्द होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कथना नुसार मृतकाने आत्महत्या केली होती या संबधी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, त्यामुळे मृतकाचा अपघात झालेला असल्याने त्याचे मृत्यू पःश्चात जनता शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभ मिळण्यास मृतकाचे वारसदार पात्र असल्याचे मत नोंदविले. हातातील प्रकरणात सुध्दा मृतकाने विष प्राशन केल्याने आत्महत्या केल्याचे जे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे व त्या कारणास्तव त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, त्या संबधात त्यांनी कोणताही भरभक्कम पुरावा (Substantial & Cogent evidence) मंचा समक्ष दाखल केलेला नसल्याने केवळ पोलीस दस्तऐवजाचे आधारे मृतकाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला, जो उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवरुन चुकीचा असल्याचे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे जवळ कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीपुरावा (Eye witness) नसताना मृतकाने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून विनाकारण तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्याने त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- तक्रार दाखल दिनांक-17/05/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-17/05/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.