श्री. मिलींद केदार, सदस्य यांचे आदेशांन्वये. - आ दे श - (पारित दिनांक : 24/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल मंचासमोर दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, गैरअर्जदार संस्था ही मुदत ठेवी स्विकारुन परिपक्वता दिनांकास त्या परिपक्वता रकमेसह देण्याचे लोकांना अभिवचन देत असल्याने तिने गैरअर्जदाराच्या संस्थेत रु.50,000/- दि.17.07.2009 मुदत ठेवी अंतर्गत गुंतविले होते. सदर मुदत ठेव ही दि.17.08.2010 परीपक्व झाल्यानंतर तिने गैरअर्जदार संस्थेला रु.56,494/- ची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने अपूरा नीधी असल्याने नंतर येण्यास सांगितले. वारंवार परीपक्वता देण्याचे याप्रमाणे गैरअर्जदार टाळत असल्याने तक्रारकर्तीने पत्रे व स्मरणपत्रे पाठविली. परंतू गैरअर्जदारांनी प्रतिसाद न दिल्याने शेवटी मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन परीपक्वता रकमेची मागणी व्याजासह केलेली आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंचाला वारंवार लेखी उत्तर दाखल करण्याची परवानगी मागितली. मंचाने संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 2 हे मंचासमोर उपस्थितही झाले नाही किंवा त्यांनी लेखी उत्तरही दाखल केले नाही. म्हणून मंचाने गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर दि.12.01.2011 रोजी युक्तीवादाकरीता आले असता तक्रारकर्ती, गैरअर्जदार क्र. 1 व 2 गैरहजर असल्याने मंचाने सदर प्रकरण गुणवत्तेवर उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे निकाली काढण्याचे ठरविले. -निष्कर्ष- 4. दस्तऐवज क्र. 1 वर तक्रारकर्तीने मुदत ठेवीचे प्रमाणपत्र क्र.788 ची प्रत दाखल केलेली आहे. सदर प्रमाणपत्र हे गैरअर्जदाराने दिल्याचे सदर दस्तऐवजावरुन निदर्शनास येत असल्याने तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. 5. दस्तऐवज क्र. 1 प्रमाणे रु.50,000/- ही रक्कम तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडे दि.17.08.2009 रोजी 13 महिन्याकरीता गुंतविल्याचे निदर्शनास येते. तसेच सदर रकमेवर गैरअर्जदार हे 12 टक्याप्रमाणे व्याज तक्रारकर्तीला अदा करणार होते. मुदत ठेवीची परीपक्वता ही दि.17.08.2010 रोजीची असून परीपक्वता रक्कम रु.56,494/- दर्शविण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये शपथपत्रावर केलेले कथन हे सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. तसेच गैरअर्जदारांनी मंचासमोर हजर होऊन शपथपत्रासह व दस्तऐवजासह तक्रारकर्तीची तक्रार नाकारलेली नाही. 6. दस्तऐवज क्र. 2 व 3 ही तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना पाठविलेले पत्र व स्मरणपत्र आहे. सदर पत्रांमध्ये तक्रारकर्तीने परीपक्वता रकमेची मागणी केलेली आहे. सदर पत्रे गैरअर्जदारांनी स्विकारल्याचे या प्रतीवरुन दिसून येते. वारंवार मागणी करुन व तशी पत्रेही पाठविली असता गैरअर्जदारांनी परीपक्वता रक्कम देण्याबाबत काही पावली उचलल्याची किंवा कार्यवाही केल्याचे निदर्शनास येत नाही. म्हणून मंचाचे मते गैरअर्जदार क्र. 1 व 2 परीपक्वता रक्कम न देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे. तसेच तक्रारकर्तीने परीपक्वता रकमेची मागणी करुन तिला रक्कम न देता व रक्कम देण्याबाबत कोणतीही कार्यवाही न करता, तिच्या पत्रांना प्रतिसाद न दिल्याने गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केल्याचे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्ती सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्तीने परीपक्वता रकमेवर परीपक्वता दिनांकापासून 18 टक्के व्याजाची मागणी केलेली आहे. मंचाचे मते न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ती परीपक्वता रक्कम रु.56,494/- ही परीपक्वता दिनांकापासून म्हणजेच दि.07.07.2009 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. 8. तक्रारकर्तीने मानसिक व शारिरीक त्रासाच्या नुकसान भरपाईकरीता रु.20,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी अवास्तव असून तक्रारकर्ती न्यायोचितदृष्टया व कायदेशीरदृष्टया सदर त्रासाच्या भरपाईकरीता रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. उपलब्ध दस्तऐवजांवरुन व उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला परीपक्वता रक्कम रु.56,494/- ही परीपक्वता दिनांकापासून म्हणजेच दि.07.07.2009 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी मानसिक व शारिरीक त्रासाच्या नुकसान भरपाईकरीता रु.5,000/- तक्रारकर्तीला द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्तीला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे 30 दिवसाचे आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |