जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य - श्री.सी.एम.येशीराव.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 184/2010
तक्रार दाखल दिनांक – 05/06/2010
तक्रार निकाली दिनांक – 29/05/2012
श्री.प्रदिप आनंदा रणदिवे. ----- तक्रारदार
उ.वय. 32, धंदा- व्यापार.
रा.अजंग,ता.जि.धुळे.
विरुध्द
ब्रँच मॅनेजर, नॅशनल इन्शुरन्स कं.लि. ----- विरुध्दपक्ष
धुळे शाखा,नाशिककर शॉपिंग कॉम्प्लेक्स,
राणा प्रताप चौक,धुळे 424 001.
कोरम
(मा.श्री.डी.डी.मडके – अध्यक्ष)
(मा.श्री.सी.एम.येशीराव – सदस्य)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.आर.कुचेरिया.)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.सी.पी.कुलकर्णी.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – तक्रारदार यांचा विमा दावा विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन नाकारुन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष नॅशनल इन्शोरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडून मारुती ओमनी क्र.एम.एच.18 टी-250 या गाडीचा विमा उतरवला होता. त्याचा कालावधी दि.09-04-2009 ते 08-04-2010 असा आहे. तक्रारदार यांची गाडी दि.18-07-2009 रोजी सकाळी 10.30 वाजता अजंग गावाचे शिवारात धुळे पारोळा रोडवर जात असतांना मालट्रक क्र.एम.एच.34 एम-8236 च्या चालकाने हलगर्जीपणे वाहन चालवून तक्रारदाराचे गाडीस धडक दिली व त्यात गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
(3) तक्रारदार यांनी सदर घटनेची माहिती विमा कंपनीस दिली. त्यानुसार कंपनीने सर्व्हेअर यांचेकडून सर्व्हे करुन घेतला. विमा असल्यामुळे क्लेम फॉर्म भरुन नुकसान भरपाईची मागणी केली. विमा कंपनीने दि.25-03-2010 रोजी वाहनात 17 प्रवासी होते असे कारण देऊन विमा नाकारला. सदर वाहनात 17 प्रवासी प्रवास करत नव्हते. तसेच सदर अपघात ट्रक चालकाच्या चुकीमुळे झालेला आहे. सदर वाहनात जादा प्रवासी होते व त्यामुळे अपघात झाला असा कोणताही आरोप तक्रारदारांविरुध्द पोलिसांनी केलेला नाही. असे असतांना विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी केली आहे.
(4) तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व सदर रकमेवर 12 टक्के दराने व्याज, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
(5) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.4 वर शपथपत्र तसेच नि.नं.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.5/1 वर विमा दावा नाकारल्याचे पत्र, नि.नं.5/2 वर फीर्याद, नि.नं.5/3 वर घटनास्थळ पंचनामा, नि.नं.5/4 वर विमा पॉलिसीची प्रतीक्षा इत्यादी कागदपत्रे आहेत.
(6) विमा कंपनीने आपली कैफीयत नि.नं.10 वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार त्यातील म्हणणे व मागणे खोटे आहे, विमा कंपनीने सेवेत त्रृटी केलेली नाही, त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
(7) विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, विमा कंपनी जेव्हा विमा पॉलिसी देते तेव्हा ती ठराविक अटी व शर्तीच्या अधिन राहून देते. त्यापैकी कुठल्याही अटीचा भंग झाल्यास विमा कराराचा भंग ठरतो व अशा परिस्थितीत विमा कंपनी विमाधारकास भरपाई देण्यास जबाबदार राहत नाही. तक्रारदार यांच्या वाहनाची नोंदणी खाजगी वापरासाठी म्हणून करण्यात आलेली आहे त्यामुळे भाडे घेऊन प्रवासी वाहतुक करता येत नाही. खाजगी वाहनाचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी केल्यास तो कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा ठरतो व पॉलिसीच्या अटीचाही भंग ठरतो.
(8) विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, परिवहन अधिका-यांकडील नोंदीनुसार तक्रारदाराच्या वाहनाची प्रवासी क्षमता 4 + 1 आहे. परंतु पोलिस पेपर्स व कंपनीचे चौकशी अधिकारी यांच्या अहवालानुसार अपघाताचे वेळी वाहनात 17 प्रवासी होते. त्यामुळे चालकाला वाहन चालवणेही शक्य होऊ शकत नाही. तसेच चौकशी अधिका-यांच्या अहवालानुसार वाहनात भाडे घेऊन प्रवासी बसवले होते असे नमूद आहे. सदर कृतीमुळे विमा पॉलिसीतील अटींचा भंग झालेला आहे व विमा कंपनी कुठलीही रक्कम देण्यास जबाबदार राहत नाही. त्यामुळे विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी केलेली नाही.
(9) विमा कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, अपघातामुळे झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यात आले आहे व सर्व्हेअर यांनी आपला अहवाल दि.02-10-2009 रोजी सादर केला आहे. श्री.रविंद्र अलुरकर यांचे अहवालानुसार वाहन दुरुस्त केल्यास दुरुस्तीसाठी रु.1,15,000/-, टोटल लॉस बेसीसवर रु.1,19,000/- व नेट लॉस बेसीसवर रु.79,000/- अशा रकमा देय होऊ शकतात असे म्हटले आहे. या तीन पर्यायापैकी तक्रारदाराने नेट लॉस बेसीसवर रु.79,000/- स्वीकारण्याचा पर्याय मान्य केला आहे व तसे पत्र तक्रारदाराचे वडील श्री.आनंदा रणदिवे यांनी विमा कंपनीस दिले आहे. त्यामुळे विमा क्लेम देय असता तर तक्रारदार हे रक्कम रु.79,000/- मिळण्यास पात्र ठरले असते. विमा पॉलिसीनुसार गाडीची किंमत रु.1,19,509/- असतांना तक्रारदार यांनी रु.2,00,000/- ची मागणी केली आहे. विमा कंपनीने शेवटी तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती केली आहे.
(10) विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.11 वर शपथपत्र तसेच नि.नं.15 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.15/1 वर क्लेम प्रोसेस शीटची प्रत,नि.नं.15/2 वर चौकशी अधिका-याचा अहवाल, नि.नं.15/3 वर प्रदीप पाटील यांचा जबाब, नि.नं.15/4 वर क्लेम फॉर्मची प्रत, नि.नं.15/5 वर सर्व्हे रिपोर्ट, नि.नं.15/6 वर नोंदणी प्रमाणपत्र, नि.नं.15/7 वर फीर्याद आणि नि.नं.15/8 वर अंतिम सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे.
(11) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षाचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी आहे काय ? | ः होय. |
(ब) तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? | ः खालील प्रमाणे |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(12) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे वाहन मारुती ओमनी क्र.एम.एच-18-टी-250 चा विमा कालावधीत दि.18-07-2009 रोजी अपघात झाला व त्यात त्यांच्या वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म भरुन नुकसान भरपाईची मागणी केली असता विमा कंपनीने विमा दावा नाकारला आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारला आहे. तर विमा कंपनीने योग्य विचार करुन विमा दावा नाकारला आहे असे म्हटले आहे.
(13) तक्रारदार व विमा कंपनीचे म्हणणे पाहता विमा कंपनीने विमा दावा नाकारण्याची जी कारणे दिली आहेत ती पाहणे आवश्यक ठरते. विमा कंपनीचे सदर पत्र नि.नं.5/1 वर दाखल आहे. त्यात पुढील प्रमाणे मजकुर आहे.
I.V”s register seating capacity is 4 + 1. As per police report & Adv.A.M.Hatekar- Investigator report at the time of accident 17 passengers seating in the I.V.
In view of the same the claim does not fall within the purview of the policy terms and condition
Hence your O.D. Claim is repudiate.
(14) तक्रारदार तर्फे अॅड.कुचेरिया यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सदर वाहनाचा जो अपघात झाला तो समोरुन येणा-या ट्रकच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. सदर चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्या गाडीत जादा प्रवासी होते हे अपघाताचे कारण नाही. तसेच वाहनातील प्रवासी हे त्यांच्या शेतात कामासाठी जात होते त्यांच्याकडून भाडे घेण्यात आलेले नाही, त्यामुळे विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारला आहे व सेवेत त्रृटी केली आहे असे म्हटले आहे.
(15) विमा कंपनीतर्फे अॅड.सी.पी.कुलकर्णी यांनी आमचे लक्ष फीर्याद व चौकशी अधिकारी यांच्या अहवालाकडे वेधून अपघात समयी वाहनात 17 प्रवासही होते त्यामुळे वाहनाचे चालकास वाहन चालविणेही शक्य नव्हते, त्यामुळे अपघात झालेला आहे. तसेच परिवहन अधिका-यांच्या नोंदीनुसार वाहनात फक्त 4 + 1 प्रवासी बसण्यास मुभा असतांना जादा प्रवासी बसविण्यात आले. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटींचा भंग झाला आहे व विमा कंपनी त्यामुळे कुठलीही रक्कम देण्यास जबाबदार नाही असा युक्तिवाद केला. विमा कंपनीने सर्व कागदपत्रांच्या आधारेच विमा दावा नाकारला असल्यामुळे सेवेत त्रृटी केली असे म्हणता येणार नाही, असेही पुढे म्हटले आहे.
(16) आम्ही नि.नं.5/2 वरील फीर्यादीचे व इन्व्हेस्टीगेटर अॅड.श्री.हातेकर यांच्या अहवालाचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यावरुन असे दिसून येते की, अपघाताचे वेळेस सदर वाहनात 17 प्रवासी होते तसेच वाहनामध्ये फक्त 4 + 1 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटींचा भंग झाल्याचे दिसून येते. परंतु सदर अपघात जो झाला त्यासंदर्भात पोलिसांनी ट्रक चालका विरुध्द गुन्हा नोंद केल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर अपघातास तक्रारदाराच्या वाहनात जादा प्रवासी बसले होते हे कारण असल्याचे फीर्यादीत कुठेही नमूद नाही.
(17) तक्रारदार तर्फे अॅड.श्री.कुचेरिया यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाने B.V.Nagaraju V/s M/s Oriental Insurance Co. Ltd. [Citation : 1996 (2) T.A.C.429 (SC) ] या प्रकरणात दिलेला न्यायीक दृष्टांत दाखल केला आहे. त्यात वाहनातील प्रवाशी हे अपघाताचे कारण नसेल तर विमा दावा नाकारु नये असे तत्व विषद करण्यात आले आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(18) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून रक्कम रु.2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, व सदर रकमेवर 12 टक्के दराने व्याज, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
(19) विमा कंपनीने आपल्या म्हणण्यात अपघातामुळे झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यात आले आहे व सर्व्हेअर यांनी आपला अहवाल दि.02-10-2009 रोजी सादर केला आहे. श्री.रविंद्र अलुरकर यांचे अहवालानुसार वाहन दुरुस्त केल्यास दुरुस्तीसाठी रु.1,15,000/-, टोटल लॉस बेसीसवर रु.1,19,000/- व नेट लॉस बेसीसवर रु.79,000/- अशा रकमा देय होऊ शकतात असे म्हटले आहे. या तीन पर्यायापैकी तक्रारदाराने नेट लॉस बेसीसवर रु.79,000/- स्वीकारण्याचा पर्याय मान्य केला आहे व तसे पत्र तक्रारदाराचे वडील श्री.आनंदा रणदिवे यांनी विमा कंपनीस दिले आहे. त्यामुळे विमा क्लेम देय असता तर तक्रारदार हे रक्कम रु.79,000/- मिळण्यास पात्र ठरले असते.
(20) आमच्या मते तक्रारदार यांनी नेट लॉस बेसीसवर रक्कम मान्य केलेली असल्यामुळे, तक्रारदार रक्कम रु.79,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.25-03-2010 पासून रक्कम अदा करे पर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यासही ते पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
(21) मुद्दा क्र. ‘‘क’’ - उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कं.लि. यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत...
(अ) तक्रारदारास वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.79,000/- (अक्षरी रु.एकोणएंशी हजार मात्र) दि.25-03-2010 पासून ते रक्कम अदा होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी.
(ब)तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) दयावेत.
धुळे
दिनांक – 29-05-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.