नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 186/2010 नोंदणी तारीख – 9/8/2010 निकाल तारीख – 27/10/2010 निकाल कालावधी – 78 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ धिरज निवृत्ती शिंदे रा.गोरेगाव, वांगी ता.खटाव जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एस.जे.सावंत) विरुध्द मॅनेजर श्री किरण बी.बोबे नॅशनल इन्शुरन्स कं.लि. गणेशचंद्र चेंबर्स, 2 रा मजला, 172-क, रविवार पेठ, पोवई नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री विजय कारंडे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे वर नमूद पत्त्यावरील कायमचे रहिवासी असून त्यांचा मोबाईल क्रेनचा व्यवसाय आहे. दि.7/7/2010 रोजी मौजे शेंद्रे गावचे हद्दीत ट्रकचा अपघात झालेला होता, त्या ट्रकमधून एक लोखंडी जॉब रोडवर पडलेला होता. तो काढण्याचे काम अर्जदार यांचे क्रेनद्वारे करीत असताना क्रेन पलटी होवून तिचे नुकसान झाले. सदरचे क्रेनचा विमा अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला होता. सदरचे क्रेनचे दुरुस्तीचे एस्टिमेट अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे दिले. तसेच जाबदार यांनी सर्व्हेअर नेमून वाहनाची पाहणी करण्यासाठी अर्जदार यांनी क्लेमफॉर्म भरुन दिला. तदनंतर अर्जदार यांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करुनही जाबदार यांनी अर्जदार यांचा क्लेम डॅमेज रिझल्टींग फ्रॉम ओव्हरटर्निंग असे कारण देवून नाकारला आहे. वस्तुतः अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून सर्वसमावेशक पॉलिसी घेतली आहे. सदर पॉलिसीमध्ये विशिष्ट स्वरुपाचा हप्ता भरणे जरुरीचे आहे असा कॉलम मूळ पॉलिसीमध्ये नसतानाही अर्जदार यास कोणतीही नुकसान भरपाई देवू लागू नये म्हणून जाबदार यांनी अर्जदार यांचा क्लेम नाकारला आहे. सबब क्रेन दुरुस्तीसाठी येणारा खर्च रु.1,87,419/- व्याजासह मिळावेत, शारिरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदारने अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे अपूर्ण आहेत. क्रेनचा अपघात कसा व कोणत्या कारणामुळे झाला याबाबत काहीही कथन केलेले नाही. तसेच प्रथम वर्दी रिपोर्ट दाखल करण्याचे अर्जदारने टाळलेले आहे. सदर कागद रेकॉर्डवर येणे जरुरीचे आहे. विमा पॉलिसीच्या अटीनुसार ओव्हरटर्निंगमुळे झालेले नुकसान मागणेसाठी त्याचे प्रिमियम भरल्याशिवाय ते मिळत नाही. तसा प्रिमियम अर्जदार यांनी भरलेला नाही. सदरचा अपघात व नुकसान ओव्हरटर्निंगमुळे झालेले आहे. अर्जदारने ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले नाही. तक्रारदारास अपघाताचे वेळी क्रेन चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसेन्स होते हे तक्रारदाराने शाबीत करावे. वादातील क्रेनचे काय नुकसान झाले याचा सर्व्हे रिपोर्ट तक्रारदाराने दाखल केला नाही. पंचानाम्याप्रमाणे रु.70,000/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारदाराने विमा पॉलिसीतील अट शर्त क्र.47 चा भंग केला आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे वकील श्री सावंत यांनी व जाबदारतर्फे वकील श्री कारंडे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.19 ला पाहिला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची व नि.16 सोबतची कागदपत्रे, नि.13 चे प्रत्युत्तर, नि. 14 चे शपथपत्र पाहिले. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 11 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 12 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. तक्रारदार यांचे मालकीच्या फिरत्या क्रेनचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला होता. सदरचे विमा पॉलिसीचे कालावधीत संबंधीत क्रेनला अपघात होवून क्रेनचे नुकसान झाले. अपघात कशा प्रकारे झाला, क्रेनद्वारे उचलण्यात येणा-या वस्तूचे वजन किती होते याबाबत तक्रारअर्जदार यांनी तक्रारअर्जात काहीही नमूद केलेले नाही. तसेच अपघाताचे वेळी सदरची क्रेन कोण चालवित होते, सदरचे वाहनचालकाकडे कोणत्या प्रकारचे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती होती याबाबतही तक्रारअर्जात काहीही नमूद केलेले नाही. ओव्हरटनिंगसाठी आवश्यक तो विमा हप्ता तक्रारअर्जदारने जाबदार यांचेकडे भरलेला नाही. वाहन चालवितेवेळी तक्रारदाराकडे मोटारसायकल वुईथ गिअर, लाईट मोटार व्हेईकल व ट्रान्स्पोर्ट व्हेईकल या वर्गातील वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती होती. ओव्हरटनिंगमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यास जाबदार जबाबदार नाहीत या कारणास्तव जाबदार यांनी अर्जदार यांचा विमादावा नाकारलेला आहे. 7. प्रस्तुत तक्रारअर्ज प्रकरणी महत्वाची बाब पाहणे जरुर आहे ती अशी की, तक्रारअर्जदार यांचे अपघातग्रस्त झालेले मोटार वाहन हे कोणत्या स्वरुपाचे आहे ? तक्रारअर्जातील कथनानुसार अर्जदार यांचे मोटार वाहन हे फिरते क्रेन (मोबाईल क्रेन) आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार सदरची फिरती क्रेन चालविण्यासाठी चालकाकडे ट्रॅक्टर या वर्गातील मोटार वाहन चालविण्यासाठीची अनुज्ञप्ती असणे जरुर आहे. तथापि, प्रस्तुत घटनेमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा संबंधीत फिरती क्रेन अपघातग्रस्त झाली तेव्हा त्या क्रेनचालकाकडे ट्रॅक्टर या वर्गातील मोटार वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती नव्हती व त्यातही महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारअर्जातील अर्जदार यांची कथने बारकाईने पाहिली असता असे कोठेही नमूद केलेले नाही की, जेव्हा संबंधीत मोटार वाहन फिरती क्रेन अपघातग्रस्त झाली, तेव्हा त्या क्रेनच्या चालकाकडे ती क्रेन चालविण्याची कायदेशीर अनुज्ञप्ती होती. अशा या पार्श्वभूमीवर जाबदार यांनी त्यांचे नि.10 मधील म्हणणेचे कलम 6 मध्ये नमूद केलेप्रमाणे संबंधीत चालकास फिरती क्रेन चालविण्याची अनुज्ञप्तीच नसले कारणामुळे, संबंधीत फिरत्या क्रेनच्या जाबदारतर्फे उतरविण्यात आलेल्या विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाला व त्यामुळे जाबदार विमा कंपनीने अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचे नाकारले. सदरची नुकसान भरपाई नाकारण्याचा जाबदार यांचा निर्णय हा योग्य व कायदेशीरच आहे असे म्हणावे लागते. सबब तक्रारअर्जदार यांचा प्रस्तुतचा तक्रारअर्ज सकृतदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत झालेले आहे. 8. तक्रारअर्जदारतर्फे नि.16 सोबत अनुक्रमांक 1 ला तक्रारअर्जदार यांनी स्वतःचे अनुज्ञप्तीची झेरॉक्सप्रत सादर केली आहे. तक्रारअर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज नि.1 मधील कलम 1 मध्ये अपघातसमयी संबंधीत मोटार वाहन क्रेन काम करीत असताना ती कोण चालवित होते हे स्पष्टपणे नमूदच केलेले आहे. अर्जदार स्वतः वाहन चालवित होता किंवा अर्जदारतर्फे इतर कोणी चालक वाहन चालवित होता याबाबत कोणताही सुस्पष्ट खुलासा नि.1 मध्ये अर्जदार यांनी केलेला नाही. अशा या पार्श्वभूमीवर तक्रारअर्जदार यांनी स्वतःचे अनुज्ञप्तीची दाखल केलेली नि.16/1 ची झेरॉक्सप्रत पुराव्यामध्ये आजिबात वाचता येणार नाही. खेरीज सदरच्या झेरॉक्सप्रतीमध्ये असे दिसते की, तक्रारअर्जदार यास मोटार सायकल गिअरसह लाईट मोटार व्हेईकल नॉन ट्रान्सपोर्ट, ट्रान्स्पोर्ट व्हेईकल (पुढील मजकूर अवाचनीय) अशा स्वरुपाची अनुज्ञप्ती आहे व हा भाग बारकाईने पाहिला असता असे दिसून येते की, स्वतः अर्जदाराकडेही ट्रॅक्टर चालविण्याची कोणतीही अनुज्ञप्ती नव्हती. तक्रारअर्जदार यांनी त्याची मूळ अनुज्ञप्ती याकामी सादर करणे जरुर होते परंतु ती सादर केलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर तक्रारअर्जदार यांचे लेखी युक्तिवाद नि.19 मधील कलम 3 मधील कथन की ट्रॅक्टरचे वजन 7500 पेक्षा कमी असलेने ते लाईट मोटार व्हेईकल हलके वाहन आहे परंतु 7500 पेक्षा जास्त वजन असणारी सर्व वाहने हेवी व्हेईकल (जड वाहने) आहेत, संबंधीत क्रेनचे वजन 9800 किलो असलेचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये नमूद आहे त्यामुळे अर्जदारचे जड वाहन हेवी व्हेईकल प्रकारात मोडते इ. असंबंध्द स्वरुपाची कथने केली आहेत. परंतु सदरचा अर्जदार यांचा युक्तिवाद हा निरर्थक असून तो प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंजूर करण्यास पूरक ठरणारा नाही. 9. तक्रारअर्जदार यांनी याच मंचामध्ये जाहीर केलेल्या मूळ तक्रारअर्ज क्र.394/08 चे कामातील न्यायनिर्णय व सदरच्या न्यायनिर्णयावर राज्य आयोगाने पारीत केलेला आदेश अशा दोन्हींच्या प्रती व 1) 1995(1) टीएसी 177 आंध्र प्रदेश 2) 2008 (1) टीएसी 812 सुप्रीम कोर्ट 3) 2010 (2) टीएसी पान नं.661 ओरिसा उच्च न्यायालय यामध्ये जाहीर केलेले न्यायनिर्णय प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंजूर करण्यासाठी वाचनात घ्यावेत असे युक्तिवादात नमूद केलेले आहे तथापि तक्रारअर्जदार यांचे प्रस्तुत तक्रारअर्जातील घटना व तक्रारअर्जदार यांनी दाखविलेल्या निरनिराळया न्यायनिर्णयातील घटना या भिन्न स्वरुपाच्या असल्यामुळे सदरचे निवाडे प्रस्तुत प्रकरणास लागू होत नाहीत. सबब तक्रारअर्जदार यांचा प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंजूर करता येणार नाही. 10. प्रस्तुत तक्रारअर्जकामी घडलेल्या घटना पाहिल्या असता असे दिसून येते की, तक्रारअर्जदार यांची क्रेन या वाहनाद्वारे दुस-या अपघातग्रस्त झालेल्या मोटार वाहन वा त्या वाहनातील प्रामुख्याने किती वजनाचा माल उचलला जात होता यासाठी तक्रारअर्जाचे कामी सुस्पष्ट खुलासा करणे जरुर आहे. थोडक्यात तक्रारअर्जदार याचे संबंधीत क्रेनला किती वजनाचा माल उचलण्याची क्षमता आहे व त्या क्षमतेचाच माल उचलत असताना अपघात झाला आहे हे दाखविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. या पार्श्वभूमीवर जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये नमूद केलेले आहे की, अर्जदार यांचे संबंधीत मोटार वाहन क्रेन हे ओव्हरटनिंग करतेवेळी अपघातग्रस्त झालेले आहे व ओव्हरटनिंग करण्यासाठी आवश्यक विशिष्ट स्वरुपाच्या विमा हप्त्याची वेगळी रक्कम तक्रारअर्जदार यांनी याकामी त्यांचे क्रेनचा विमा उतरवितेवेळी भरलेली नाही व या कारणास्तव अर्जदार यांनी क्रेनचे नुकसानीपोटी केलेली मागणी नाकारलेली आहे हा जाबदार यांचा निर्णय योग्य व कायदेशीरच आहे असे या मंचाचे मत आहे. 11. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 27/10/2010 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |