जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५७/२०११
तक्रार दाखल दिनांक – १२/०८/२०११ तक्रार निकाली दिनांक – २७/०८/२०१४
श्री.प्रशांत लोटन पाटील
राहणार – प्लॉट नंबर ४४, राजेंद्र नगर,
गोंदूर रोड, देवपूर धुळे, ता.जि.धुळे - तक्रारदार
विरुध्द
श्री. नरेशकुमार नोतनदास मिरचंदानी,
राहणार - ६२, मित्रकुंज हौसिंग सोसायटी,
साक्री रोड, धुळे, ता.जि.धुळे - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.व्ही.एस. भट)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.आर.सी. शिंदे)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी घर खरेदी करून देतांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि सदोष सेवा दिली या कारणावरून तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, सामनेवाले यांनी मौजे वलवाडी येथील सर्व्हे नं.३२/१+२+३ पैकी प्लॉट नं.४४ क्षेत्र २७० चौ.मी. ही जागा विकसित करून त्यावर ‘’केशव बंगलोज’’ नावाने चार रहिवासी घरे बांधून त्यांची विक्री केली. त्यापैकी घर नं.१ हे तक्रारदार यांनी दिनांक १७/१२/२००८ रोजी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे रूपये ४,५०,०००/- देवून विकत घेतले. हे घर घेतांना सामनेवाले यांनी तेथे इतर आवश्यक सुविधांसह सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतंत्र शोषखड्डा कुंपण भिंतीच्या बाहेर जमिनीत केला आहे असे सांगितले होते. तथापि, तक्रारदार राहण्यास आल्यानंतर सुमारे पाच ते सहा महिन्यांनी चारही घरांसाठी त्यांच्या कुंपण भिंतीच्या आत एक सामायिक शोषखड्डा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे जमिनीतून सांडपाणी बाहेर येवू लागले व त्यातून दुर्गंधीही येवू लागली. त्यामुळे तक्रारदार यांना अखेर सामनेवालेंकडे तक्रार करावी लागली. मात्र त्यातून मार्ग निघाला नाही. सामनेवाले यांनी दखल न घेतल्याने तक्रारदार यांनी स्वखर्चाने नविन शोषखड्डा तयार करून घेतला. या खड्डयातील सांडपाणी सध्या रस्त्यावर वाहत असून त्यामुळे इतर रहिवाश्यांना त्रास होत आहे. इतर तीन घरांचे सांडपाणी तक्रारदार यांच्या घरासमोरील शोषखड्डयात सोडण्याचे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, तक्रारदार यांनी केलेल्या नविन शोषखड्डयाचा खर्च रूपये ७,५००/- सामनेवाले यांच्याकडून मिळावा, मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी रूपये ७५,०००/-, तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- सामनेवालेंकडून मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत तक्रारदार यांनी खरेदीखत, सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाले यांच्याकडून नोटीसीला मिळालेले उत्तर, छायाचित्रे दाखल केली आहेत.
४. सामनेवाले यांनी वरील तक्रारीवर आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार मान्य नाही. चारही बंगले मिळून एक शोषखड्डा आहे आणि तो तक्रारदार यांच्या हद्दीत आहे, हे तक्रारदार यांना खरेदी करून देण्यापूर्वीच सांगितले होते. बंगल्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच तक्रारदार यांनी खरेदी केली. त्यामुळे तक्रारीत केलेले कथन पूर्णपणे खोटे आहे. भविष्यातील दुरूस्ती आणि व्यवस्था पाहण्याची जबाबदारीही मालमत्ता खरेदी करून घेणा-याची असते. तक्रारदार हे त्यांची जबाबदारी सामनेवालेंवर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. खुलाशासोबत सामनेवाले यांनी प्रतिज्ञापत्र आणि लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा, लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे
ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? होय
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ – तक्रारदार यांनी रूपये ४,५०,०००/- एवढी रक्कम देवून सामनेवाले यांच्याकडून ‘’केशव बंगलोज’’ या विकसित मालमत्तेतील घर क्र.१ खरेदी केले होते. त्याचे नोंदणीकृत खरेदीखत त्यांनी दाखल केले आहे. त्याबाबत सामनेवाले यांचे काहीही म्हणणे नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याचे सिध्द होते. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब ’- तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ‘’केशव बंगलोज’’ या विकसित मालमत्तेतील घर क्र.१ रूपये ४,५०,०००/- एवढी रक्कम देवून खरेदी केले. त्याचे नोंदणीकृत खरेदीखत तक्रारदार यांनी दाखल केले आहे. हे घर खरेदी करतांना सांडपाण्याच्या निच-यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आली आहे, असे सामनेवाले यांनी सांगितले होते, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तर चारही घरांसाठी एकच शोषखड्डा करण्यात आला आहे आणि तो तुमच्याच हद्दीत आहे, असे तक्रारदार यांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी नोंदणीकृत खरेदीखत दाखल केले आहे. त्याच्या पान क्र.४ वरती पुढीलप्रमाणे उल्लेख आहे, ‘हाऊस नं.१, ग्राऊंड फ्लोअर २ रूम व फर्स्ट फ्लोअर २ रूम, दरवाजे खिडक्या, संडास, बाथरूम, इलेकट्रीक वायर, जिना, वॉलकंपाऊंड, नळ कनेक्शन, तसेच तिच्या अंगभूत सर्व मटेरीअलसह आज रोजी तुम्हांस आज दिनमानाने रूपये ४,५०,०००/- मात्रला ओनरशिप बेसिसने कायम खरेदी दिलेली असून .........’ असा उल्लेख आहे.
तक्रारदार यांनी संबंधित घटनास्थळाची छायाचित्रे दाखल केली आहे. त्यात त्यांच्या हद्दीतील सांडपाणी रस्त्यावर पसरलेले दिसत आहे.
घर खरेदी करतेवेळी प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शोषखड्डयाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सामनेवाले यांनी सांगितले होते. असा मुददा तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केला. तर चारही घरांसाठी एकच शोषखड्डा असून तो तुमच्या हद्दीत आहे असे तक्रारदार यांना सांगण्यात आले होते, असे सामनेवाले यांच्या वकिलांनी युक्तिवादात सांगितले.
घर खरेदी करून घेण्यापूर्वीच तक्रारदार यांना सामायिक शोषखड्डयाची कल्पना देण्यात आली होती असे सामनेवाले यांचे म्हणणे असले तरी त्याबाबतचा कोणताही पुरावा त्यांनी मंचासमोर आणलेला नाही. नोंदणीकृत खरेदीखतामध्ये काही बाबींचा आर्वजून उल्लेख करण्यात आला आहे. मात्र शोषखड्डयाबाबतचा उल्लेख खरेदी खतात दिसत नाही.
‘’केशव बंगलोज’’ या मिळकतीत म्हणजे एकाच गट क्रमांकात चार स्वतंत्र बंगले बांधण्यात आले आहे. हे चारही बंगले निरनिराळया चार कुटुंबांना विक्री करण्यात आले आहे. एकाच मिळकतीत किंवा एकाच गट क्रमांकावर हे बंगले बांधण्यात आले असले तरी प्रत्येक बंगल्याचे अस्तित्व निराळे असल्यामुळे इतर सुविधा आणि आवश्यक गरजांसोबत प्रत्येक बंगल्यासाठी सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था स्वतंत्र असणे आवश्यक होते. प्रत्येक बंगल्यासाठी ती स्वतंत्र गरज आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी सांडपाणी निच-याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असेल, असे खरेदीदार यांनी गृहीत धरले होते, असे उपलब्ध कागदपत्रे आणि युक्तिवादावरून स्पष्ट होते. मात्र सामनेवाले यांनी प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शोषखड्डयाची व्यवस्था केलेली नव्हती, हे तक्रारदार सदर घरात रहायला गेल्यानंतर उघडकीस आले. त्यामुळे त्यांना नविन शोषखड्डा करावा लागला आणि इतर रहिवाशांचा रोषही ओढवून घ्यावा लागला. हे सगळे सामनेवाले यांच्यामुळे घडले असे सदर तक्रारीतील दाखल कागदपत्रे आणि तक्रारदार यांच्या वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केलेल्या मुद्यांवरून दिसून येते. याच कारणामुळे सामनेवाले यांनी ‘केशव बंगलोज’ या मिळकतीमधील घर विकतांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि तक्रारदार यांना सदोष सेवा दिली असे आमचे मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क ’- वरील सर्व मुद्यांचा आणि विवेचनाचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत इतर तीन सदनिकाधारकांचे सांडपाणी तक्रारदाराच्या घरासमोरील शोषखड्डयात सोडणे कायमस्वरूपी बंद करण्याचा व पर्यायी व्यवस्था करण्याचा सामनेवाले यांना आदेश द्यावा अशी प्रमुख मागणी केली आहे. तथापि, सामनेवाले यांनी सदर घरांचे बांधकाम करतांना अधिकृत प्राधिकरणाकडून बांधकामासाठी परवानगी घेतली असेल असे दाखल कागदपत्रांवरून दिसते. ही परवानगी घेतांना सामनेवाले यांना बांधकामाचा आराखडा सादर करावा लागला असेल. त्यानंतरच संबधित प्राधिकरणाने बांधकामासाठी परवानगी दिली असेल. याचाच अर्थ सामनेवाले यांनी संबंधित प्राधिकरणानाकडून बांधकामाचा आराखडा मंजूर करून घेतला असेल. तक्रारदार यांच्या घराच्या हद्दीत जो शोषखड्डा आहे तोसुध्दा या आराखड्याचाच आणि त्याला मिळालेल्या परवानगीचाच एक भाग आहे. तक्रारदार यांनी केलेल्या मागणीबाबत विचार करावयाचा झाल्यास त्या आराखडयाला आणि संबंधित ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीला बाधा पोहचू शकते. म्हणूनच तक्रारदार यांच्या वरील मागणीबाबत या मंचाला आदेश करण्याचा अधिकार नाही असे आमचे मत आहे.
तक्रारदार यांनी जो नविन शोषखड्डा तयार केला त्यासाठी त्यांना रूपये ७,५००/- एवढा खर्च आला. तो खर्च सामनेवाले यांच्याकडून मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे. मुददा क्र.’ब’ मधील विवेचनाचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे स्पष्ट आहे. याच कारणामुळे तक्रारदार यांना सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी नविन शोषखड्डा तयार करावा लागला. सामनेवाले यांच्या कृतीमुळेच तक्रारदार यांना हा त्रास आणि खर्च सोसावा लागला. त्यामुळे त्याची भरपाई सामनेवाले यांच्याकडून मागण्याचा त्यांना हक्क पोहचतो असे आम्हांला वाटते. तक्रारदार यांनी केलेला खर्च त्यांना सामनेवालेंकडून मिळायला हवा हे न्यायोचित ठरेल. त्याचबरोबर सामनेवाले यांच्या कृतीमुळेच तक्रारदार यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि त्यामुळेच या मंचात सदरची तक्रार दाखल करावी लागली आहे. त्याचाही खर्च त्यांना सामनेवाले यांच्याकडून मिळणे योग्य ठरेल असे आम्हांला वाटते. म्हणूनच आम्ही वरील सर्व मुद्यांचा सारासार विचार करून पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- या आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
- नविन शोषखड्डयासाठी तक्रारदार यांनी केलेला खर्च रूपये ७,५००/- देण्यात यावा.
ब) मानसिक त्रासापोटी रूपये २०००/- व तक्रारीचा खर्च रूपये १०००/- देण्यात यावा.
- उपरोक्त आदेश २(अ) मधील रक्कम मुदतीत न दिल्यास त्यानंतर संपूर्ण रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याज देण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्यावर राहील.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.