जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रकरण क्रमांक 278/2010
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL
सदस्या - सौ. सुवर्णा देशमुख.
तक्रार दाखल दिनांकः- 15/12/2010
तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010
तक्रार निकाल दिनांकः- 04/07/2012
कालावधी 01वर्ष. 06महिने.18दिवस.
अर्जदारः- श्री.कृष्णराव सखारामपंत शेळगांवकर.
रा.बालाजी नगर (महेंद्रनगर) परभणी.
विरुध्द
गैरअर्जदार श्री.नरेंद्र सुरेशचंद्र देशमुख कॉन्ट्रॅक्टर.
रा.नाथनगर,परभणी.
अर्जदार यांचे वकिलः- अड.एम.जे.शेळगांवकर.
गैरअर्जदार यांचे वकिलः- अड.एस.एन.वेलणकर.
निकालपत्र
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ. सुवर्णा देशमुख. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुवर्णा देशमुख.सदस्या.)
अर्जदार हे सेवानिवृत्त असून परभणी येथे घर बांधण्यासाठी त्यांनी बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट गैरअर्जदार कॉन्ट्रॅक्टर नरेंद्र सुरेशचंद्र देशमुख यांना 04/11/2008 रोजी दिली. अर्जदाराचे घराचे बांधकाम सप्तपदी मंगल कार्यालया जवळील बालाजी नगर मध्ये सिटी सर्व्हे नंबर 4411 प्लॉट नंबर 72 या ठिकाणी होते.अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये दिनांक 04/11/2008 रोजी बांधकाम करुन देण्याबाबत करारपत्र ठरले होते.सदरील करारपत्र अर्जदाराने आपल्या अर्जासोबत जोडलेले आहे.या करारपत्रा प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार यांना किती रक्कम द्यायची, केव्हा द्यायची हे सर्व ठरलेले होते करारा प्रमाणे अर्जदाराने एकुण रक्कम 5,64,000/- एवढी देणे गरजेचे होते, पण अर्जदाराने त्या पेक्षा जास्त रक्कम देवुनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे घराचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करुन दिलेले नाही म्हणून अर्जदाराने वारंवार विनंती करुन सदरील बांधकाम पूर्ण करुन देणे विषयी गैरअर्जदारास विनंती केली.त्यानंतर दिनांक 02/03/2010 रोजी गैरअर्जदार यांनी पुन्हा एक हमीपत्र अर्जदार यांना दिले ज्यामध्ये अर्जदार यांच्याकडून गैरअर्जदार यांना 5,70,000/- रु. रक्कम मिळालेली आहे तसेच वाढीव रक्कम 40,800/- ही देखील मिळालेली आहे व राहिलेली उर्वरित रक्कम 10/04/2010 पर्यंत पूर्ण करुन देणे विषयी गैरअर्जदार यांनी अर्जदारास हमीपत्र दिले.या कालावधीत जर बांधकाम पूर्ण झाले नाही तर गैरअर्जदार अर्जदारास दर महिन्यास रु.50,000/- ही दंडात्मक रक्कम गैरअर्जदार यांनी देण्याचे कबुल केले असे असून देखील गैरअर्जदार यांनी 10/04/2010 पर्यंत अपूर्ण राहिलेले काम पूर्ण केले नाही.दिनांक 20/04/2010 रोजी अर्जदार याने गैरअर्जदार यांना वकिला मार्फत नोटीस पाठविली व ती त्यांना 22/04/2010 रोजी मिळाली गैरअर्जदाराने या नोटीसचे उत्तर दिलेले नाही.व त्यामुळे अर्जदार यांना सदरील तक्रार घेवुन मंचापुढे हजर व्हावे लागले.अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून रु.2,04,275/- द्यावे,तसेच हमीपत्रा मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 10/04/2010 ते 30/10/2010 पर्यंत प्रत्येक 30 दिवसासाठी रु.50,000/- प्रमाणे रु.3,00,000/- दंड म्हणून द्यावी. अशी मागणी केलेली आहे.
अर्जदाराने आपल्या अर्जासोबत परिशिष्ट अ आणि ब मध्ये तसेच क आणि ड मध्ये गैरअर्जदाराकडे जमा केलेल्या रक्कमेचा तपशिल बांधकामातील अपूर्ण कामे वाढीव कामासाठी म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेल्या रक्कमेचा तपशिल तसेच परिशिष्ट इ मध्ये अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशिल त्यानंतर रंगाचे साहित्य मिस्त्रीचे काम फायब्रोप्लास्ट दरवाजे व कोटींग मिस्त्रीचे काम यासाठी आलेला 2,04,295/- रु.खर्चाचे हिशोब दिलेले आहे.तसेच काही साहित्य खरेदीचे पावत्याही जोडलेल्या आहेत.
दिनांक 28/03/2011 रोजी अर्जदाराने आपला लेखी युक्तिवाद सादर केला व त्यानंतर दिनांक 05/04/2011 रोजी गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी त्यांचे विरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द करुन प्रकरण मांडण्याची संधी मंचाकडून मागुन घेतली त्यानंतर दिनांक 07/01/2012 रोजी अर्जदार व गैरअर्जदार यांनी मिळून एक संयुक्त निवेदन दिले व तडजोडीची प्राथमिक बोलणी केली व ती अंतिम टप्प्यात आहे.त्यांनी 14/02/2012 रोजी अंतिम तडजोड करण्याचे ठरले.दिनांक 05/03/2012 या तारखेचा रु.1,50,000/- चा चेक गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिला पण काही वैयक्तिक कारणास्तव सदरचा चेक बद्दलचा व्यवहार पूर्ण झाला नाही.म्हणून 05/06/2012 ही अंतिम तारीख देण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली पण आज पावेतो गैरअर्जदारानी कुठलेही व्यवहार पूर्ण केलेले नाही उलटपक्षी गैरअर्जदारानी दिलेला 1,50,000/- चा चेक अर्जदाराने कॅश करण्यासाठी दिला असता सदरील चेक न वटता ( बाऊंस) वापस आला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय
2 गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेत त्रुटी आहे
हे अर्जदाराने सिध्द केले आहे काय ? होय
3 अर्जदार हे नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहेत काय ? होय.
4 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 चे स्पष्टीकरण
अर्जदार हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत म्हणजेच ते वयोवृध्द असून त्यांच्याकडून काम होत नसल्यामुळे त्यांनी आपले घर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट गैरअर्जदार यांना दिले हे उघड आहे. दिनांक 04/11/2008 रोजी अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये घर बांधकामाचा करार नियम व शर्ती सहित झाला करारात ठरल्या प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रु.5,70,000/- जमा केले खरे तर बांधकामाचा अंदाजित खर्च रु.5,64,000/- इतकाच होता तरी देखील वाढीव खर्च म्हणून अर्जदाराने पुन्हा 40,800/- रु. गैरअर्जदार यांच्याकडे जमा केले अर्जदाराने वारंवार विनंती करुन देखील गैरअर्जदार यांनी करारा प्रमाणे त्यांचे काम करुन दिले नाही हा एक मोठा मानसिकत्रास गैरअर्जदाराकडून अर्जदारास झालेला आहे.सतत विनंती करुन व चकरा मारुन झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिनांक 02/03/2010 रोजी पुन्हा एक हमीपत्र लिहून दिले ज्यामध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना 5,70,800/- एवढी रक्कम दिलेली आहे हे त्यांना मान्य आहे तसेच राहिलेले बांधकाम दिनांक 10/04/2010 पर्यंत पूर्ण करुन देण्याची हमी त्यांनी घेतली आहे.असे जर नाही केले तर म्हणजेच काम अपूर्ण राहिले तर काम पूर्ण होई पर्यंत मानसिकत्रासापोटी दर 30 दिवसांसाठी 50,000/- रु. हि दंडात्मक रक्कम देण्याचे ही कबुल केले मिळालेल्या रक्कमे व्यतिरिक्त कोणतीही जादा रक्कम न आकारता घराचा बांधकाम पूर्ण करुन देण्याचे हमी त्यांनी घेतली पण 10/04/2010 पर्यंत काम अपूर्णच राहिले त्यांनी ते पूर्ण केले नाही उलटपक्षी अर्जदारास प्रचंड मानसिकत्रास झाला दिनांक 20/04/2010 रोजी अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदार यांना नोटीस दिली व 22/04/2010 रोजी ती त्यांना मिळाली त्यानंतर गैरअर्जदार यांनी काम पूर्ण करण्याची तसदी घेतली नाही म्हणून अर्जदारास दुसरा माणूस लावुन व पुन्हा जास्तीचे खर्च करुन काम पूर्ण करुन घ्यावे लागले. व त्यामुळे अर्जदारास मचांत केस दाखल करावी लागली ही सर्व परिस्थिती पाहता घर बांधून देणे हे सेवेचा भाग आहे व ते एक दोन पक्षामध्ये ठरलेला कॉन्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण न करुन गैरअर्जदार यांनी अर्जदार हे ग्राहक असतांना देखील त्यांच्यासोबत केलेले करार पूर्ण केलेले नाही हे उघड सत्य मंचापुढे स्पष्ट आहे या नंतरही केसचा निकाल लागते वेळी गैरअर्जदार यांनी त्यांचे विरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द करुन केस पूढे चालवण्याची विनंती करुन देखील केस पुढे 2-3 संधी देवुन केस पुढे चालवली नाही यावरुन गैरअर्जदार यांचा व्यवहार मंचापुढे स्पष्ट होतो.
दिनांक 05/03/2012 रोजी 1,50,000/- चेक तडजोड म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिला होता यावरुन अर्जदाराची तक्रार गैरअर्जदारांनी एक प्रकारे मान्यच केली होती असा यातून अर्थ निघतो.गैरअर्जदारांनी तडजोडीपोटी दिलेला चेक न वटताच वापस आला यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली. हे सिध्द होते.अर्जदार यांनी मागणी केल्या प्रमाणे घर बांधण्याचा खर्च गैरअर्जदार यांना दिलेला असतांना त्यांनी तो व्यवहार अपूर्ण ठेवला होता म्हणून अर्जदारास दुसरे कॉन्ट्रॅक्टर लावुन काम करावे लागले त्यासाठी रु. 2,04,295/- रु.खर्च आला होता ती रक्कम अर्जदारास मंजूर होत आहे.तसेच 10/04/2010 पासून ते दिनांक 30/10/2010 पर्यंत प्रत्येक 30 दिवसांसाठी रु.50,000/- पर्यंत रु.3,00,000/- रक्कम दंडात्मक रक्कम म्हणून अर्जदाराने मागणी केलेली आहे. म्हणजे की, गैरअर्जदार यांनी करारपत्रकातून मान्य केलेले होते.पण नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने रु.50,000/- ही रक्कम जास्त होत असल्यामुळे अर्जदारास दर 30 दिवसासाठी रु.5,000/- प्रमाणे 30,000/- रक्कम इतका दंड गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे.या निर्णया पर्यंत हे मंच आलेले आहे.
तसेच तक्रार खर्च म्हणून रु.2,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे.वरील सर्व रक्कम निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या आत गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावी.
आ दे श
1 अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार यांनी रु.2,04,295/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे.
3 गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिकत्रासा पोटी दंड रक्कम रु.30,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे. तसेच तक्रार खर्च म्हणून रु.2,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे.असे न केल्यास संपूर्ण रक्कमेवर 2,04,295/- + 30,000/- + 2,000/- असे एकुण रु. 2,36,295/- रक्कमेवर 9 टक्के व्याज रक्कम फिटे पर्यंत द्यावे लागेल.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
सौ. सुवर्णा देशमुख. श्री. सी.बी. पांढरपट्टे
सदस्या अध्यक्ष