::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 31/12/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. वि.प. क्र. 1हे टि.व्ही विक्रेता आणि वि.प. क्र. 2 हे विमा कंपनी आहेत. तक्रारकर्त्याने दि. 29/07/2014 रोजी व्हिडीओकॉन कंपनीचा 40 इंची एल.ई.डी. टि.व्ही. वि.प.क्र.1 यांचेकडून रु.35,000/- ला विकत घेतला. सदर एल एडीचा मॉडेल क्र.VKC 40 FH-ZMA व SR. NO. 110414110133600698 हा आहे. सदर L.E.D ची 3 वर्षांची वॉरंटी होती. वि.प.क्र.2 यांचे अभिकर्ता वि.प.क्र.1यांचे दुकानात होते व त्यांनी पॉलिसीबाबत माहिती दिल्यामुळे तक्रारकर्त्याने उपरोक्त एलइडी दिनांक 27/7/2017 ते दिनांक 29/7/2019 या कालावधीकरीता प्रिमियम जमा करून वि.प.क्र.2 यांचेकडे विमाकृत केला होता.
3. उपरोक्त टि.व्ही. मध्ये दिनांक 18/10/2017 रोजी बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.यांना दुरध्वनीवरून सुचीत केले असता वि.प.क्र.1 ने सांगितले की सदर टि.व्ही. वि.प.क्र.2 कडे विमाकृत केलेला असल्यामुळे त्यांचे सर्व्हीस सेंटरला सदर बाब कळविली व सदर बिघाड हा विमा कालावधीत उद्भवला असल्यामुळे दुरूस्त करून देण्याची मागणी केली. त्यानंतर वि.प.2 चे मेकॅनिकने तक्रारकर्त्याचे घरी येऊन टिव्हीची पाहणी केली व फोटो काढले आणी दुरूस्ती करून देण्याचे आश्वासीत केले. परंतु वि.प.क्र.2 यांनी दि.2/7/2018 चे पत्रान्वये उपरोक्त टि.व्ही. विमाकृत नसून एल जी कंपनीचाच टि.व्ही. विमाकृत आहे व सदर टि.व्ही. विमाकृत नसल्यामुळे दुरूस्त करून देण्यांस नकार दिला. तक्रारकर्त्याला मिळालेल्या विमा दस्तावेजांमध्ये व्हिडिओकॉन कंपनीचे टिव्हीचाच उल्लेख आहे. तरीसुध्दा वि.प.क्र.2 ने खोटे कारण देऊन विमादावा नाकारला. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर बाब वि.प.चे सर्व्हीससेंटरला कळविले. परंतु त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही. वि.प.क्र.1 नेसुध्दा तक्रारकर्त्यास वि.प.क्र.2 शी संपर्क साधण्यांस सांगितले. यावर तक्रारकर्ता वि.प.क्र.2 कडे गेला असता त्यांनी सर्व दस्तावेज ठेवून घेतले. तसेच इ.एम.आय.कार्ड बंद करण्याकरीता पत्र दिले असता सदर कार्ड बंद करण्यांत आल्याचे सांगितले मात्र पोचपावती देण्यांस नकार दिला. तक्रारकर्त्याने वि.प.यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर काहीही कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्त्याने 23/1/2019 ला कस्टमरकेअर वर सर्व दस्तावेज पाठवून तक्रार नोंदविली. परंतु वि.प.नी सदर टि.व्ही.दुरूस्त करून न दिल्यामुळे तक्रारकर्ता सदर टि.व्ही.चा उपभोग घेवू शकला नाही व त्याला अन्य लोकांकडे टी.व्ही.बघण्यासाठी जावे लागून त्याला शारिरीक व मानसीक त्रास झाला.सदर टि.व्ही. हा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधीकडूनच दुरूस्त करून घ्यावा लागतो मात्र त्यांनी तो दुरूस्त करून न दिल्यामुळे त्याने टि.सि.ए. कंपनीचा नवीन टिव्ही घेतला. वि.प. यांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत त्रृटी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षां विरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्याला वि.प. यांनी टि.व्ही. दुरूस्त करून वा बदलवून न दिल्यामुळे टिव्हीची विमादावा रक्कम रु. 35,000/- व त्यावर द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला द्यावे तसेच तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 50,000/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.10,000/- वि.प. क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली.
4. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. परंतु वि.प. क्र. 1 ला नोटीस प्राप्त होवून देखील प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि. 12/9/2019 रोजी निशानी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आले. व वि.प. क्र.2 यांना पाठविलेला नोटीस घेण्यांस नकार या शे-यासह परत आल्यामुळे वि.प.क्र.2 यांचेविरुद्ध दि. 22/8/2019 रोजी निशानी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
5. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याचे तक्रारीतील मजकुर व दस्तावेजांनाच तक्रारकर्त्याचा शपथपत्र पुरावा व लेखी युक्तीवाद समजण्यात यावे अशी अनुक्रमे नि.क्र.10 व 11 वर पुरसीस दाखल, तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारीतील कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्दपक्ष क्र.1यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? नाही
3) विरूध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? : होय
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत :-
6. तक्रारकर्त्याने दि. 29/07/2014 रोजी व्हिडीओकॉन कंपनीचा क्र.VKC 40 FH-ZMA व SR. NO. 110414110133600698 या मॉडेलचा 40 इंची एल.ई.डी. टिव्ही वि.प.क्र.1 यांचेकडून रु.35,000/- ला विकत घेतला व सदर एल.इ.डी.टि.व्ही. दिनांक 29/7/2017 ते दिनांक 28/7/2019 या कालावधीकरीता प्रिमियम जमा करून वि.प.क्र.2 यांचेकडे विमाकृत केला होता. या संदर्भात तक्रारकर्त्याने निशानी क्र.5 वर दस्त क्र. 1 व 2 खरेदी पावती तसेच विमा पॉलिसी दाखल केली आहे. यावरून तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. 2 व 3 बाबत :-
7. उपरोक्त टि व्ही मध्ये दिनांक 18/10/2017 रोजी बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.यांना दुरध्वनीवरून सुचीत केले असता वि.प.2 यांचे मेकॅनिकने तक्रारकर्त्याचे घरी येऊन टिव्हीची पाहणी केली व फोटो काढले आणी दुरूस्ती करून देण्याचे आश्वासीत केले. परंतु वि.प.क्र.2 यांनी दि.2/7/2018 चे पत्रान्वये फक्त एल जी कंपनीचा टिव्ही विमाकृत असल्यामुळे व तक्रारकर्त्याकडील सदर टि.व्ही विमाकृत नसल्यामुळे दुरूस्त करून देण्यांस नकार दिला. तक्रारकर्त्याला मिळालेल्या टि.व्ही.रसिदा तसेच विमा दस्तावेजांमध्ये व्हिडिओकॉन कंपनीचे टिव्हीचाच उल्लेख आहे. शिवाय तक्रारकर्त्याकडील टि.व्ही.देखील एल.जी. कंपनीचा नसून व्हिडिओकॉन कंपनीचाच आहे मात्र असे असूनही वि.प.क्र.2 यांनी खोटे कारण देऊन विमादावा नाकारला असे तक्रारकर्त्याने वि.प.क्र.2 ला लिहिलेल्या दिनांक 23/1/2019 चे पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. सदर पत्राची प्रत तसेच पत्र पाठविल्याची पोस्टाची पावतीदेखील प्रकरणात दस्त क्रं. 5 व 6 वर दाखल आहेत. वि.प.क्र.2 यांनी तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीवर काहीही कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्त्याने कस्टमरकेअर वर सुध्दा सर्व दस्तावेज पाठवून तक्रार नोंदविली. परंतु वि.प.क्र. 2 यांनी विमा पॉलीसी अंतर्गत सदर टि.व्ही.दुरूस्त करून दिला नाही. या सर्व बाबी तक्रारकर्त्याने शपथेवर कथन केल्या असून त्यापुष्टयर्थ दस्तावेज प्रकरणात दाखल केले आहेत. मात्र विरूध्द पक्षांनी प्रकरणात उपस्थीत राहून आपला कोणताही बचाव दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रास्त असल्याचे मंचाचे मत आहे. टि.व्ही.दुरूस्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता सदर टि.व्ही.चा उपभोग घेवू शकला नाही व त्याला अन्य लोकांकडे टि.व्ही.बघण्यासाठी जावे लागले व त्यामुळे त्याला शारिरीक व मानसीक त्रास झाला. सदर टि.व्ही.हा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधीकडूनच दुरूस्त करून घ्यावा लागतो मात्र त्यांनी तो दुरूस्त करून न दिल्यामुळे सदर टि.व्ही. तसाच उपयोगाशिवाय ठेवून देवून तक्रारकर्त्याला टि.सि.ए. कंपनीचा नवीन टिव्ही नाईलाजास्तव विकत घ्यावा लागला. उपरोक्त टि.व्ही हा वि.प.क्रं.२ यांच्याकडे विमाकृत असून सदर टि.व्ही मध्ये विमा पॉलीसीच्या वैधता कालावधीमध्ये बिघाड निर्माण होऊनही वि.प.क्र.2 यांनी सदर टि.व्ही. विमा पॉलीसी अंतर्गत दुरुस्त करुन न देऊन तक्रारकर्त्याप्रती न्युनतापुर्ण सेवा दिली. त्यामुळे मंचाच्या मते प्राप्त परिस्थितीत तक्रारकर्त्याला सदर टि.व्ही. विमा पॉलिसीअंतर्गत दुरूस्त करून देण्याबाबत वि.प.क्र. 2 ला निर्देश देणे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचीत होईल. मात्र टिव्हीतील दोष हा टि.व्ही.निर्माता कंपनीचे वॉरंटी कालावधीत उद्भवलेला नसल्याकारणाने यासंदर्भात वि.प.क्र.1 यांचेवर जबाबदारी निश्चीत करता येत नाही. सबब, मुद्दा क. 2 व 3 चे उत्तर त्याप्रमाणे नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. 4 बाबत :-
8. मुद्दा क्र. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. ग्राहक तक्रार क्र. 95/2019 अंशतः मान्य करण्यात येते.
2. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याकडील विवादीत एलईडी टि.व्ही. विमा पॉलिसीअंतर्गत दुरूस्त करून द्यावा.
3. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई दाखल रू.10,000/- तसेच तक्रारखर्चापोटी रू.5000/- द्यावेत.
4. वि.प.क्र.1 यांचेविरूध्द कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.