SACHIN HANMANT SHIVTHARE filed a consumer case on 11 Feb 2015 against NANDKISHOR R LAHOTI in the Satara Consumer Court. The case no is CC/13/113 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 113/2013.
तक्रार दाखल दि.8-7-2013.
तक्रार निकाली दि.11-2-2015.
श्री. सचिन हणमंत शिवथरे,
रा.मु.कळंभे, पो.सर्जापूर, ता.वाई,जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
नंदकिशोर आर.लाहोटी,
दर्शन साडी आणि ड्रेस मटेरियलकरिता-
व्यवस्थापक.
रा.109/110, राजपथ, सातारा .... जाबदार
तक्रारदार- स्वतः
जाबदारातर्फे- अँड.एम.एस.सारडा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कळंभे, पो.सर्जापूर, ता.वाई, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत तर जाबदार यांचा कापड दुकान व साडी व ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदारानी जाबदारांचे दुकानातून दि.30-4-2013 रोजी रक्कम रु.1,650/- व रक्कम रु.435/- या किंमतीच्या दोन साडया खरेदी केल्या आहेत. त्याचा बिल क्र.डी.एस.एम.18652 असा आहे. प्रस्तुत साडया खरेदी केल्यानंतर त्याच दुकानातून सदर रक्कम रु.1,650/- चे डॉलर पॅटर्नचे साडीतील ब्लाऊज पीस कट करुन घेतला. त्यानंतर ब्लाऊज शिवून मिळालेनंतर तक्रारदाराचे पत्नीने साडी नेसतेवेळी साडी 6 मीटरऐवजी 4.5 मीटरच असलेचे लक्षात आले. त्यामुळे जाबदाराने फसवणूक केलेचे लक्षात आले. त्यावेळी तक्रारदारानी जाबदाराचे दुकानात जाऊन साडी बदलून देणेबाबत विनंती केली असता जाबदाराने साडी बदलून देणेस नकार दिला व तुम्हाला काय पाहिजे ते करा साडी बदलून देणार नाही अशी उध्दट भाषा वापरली व सदर साडीही बदलून दिली नाही व रक्कमही परत केली नाही त्यामुळे तक्रारदारास जाबदाराने सदोष सेवा दिली असलेने जाबदाराकडून साडीची किंमत मिळावी किंवा साडी बदलून त्याच किंमतीची नवीन साडी तक्रारदाराला मिळावी यासाठी सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदाराकडून वादातीत साडी बदलून त्याच किंमतीची दुसरी साडी तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावेत किंवा प्रस्तुत साडीची किंमत रक्कम रु.1,650/- तक्रारदारास परत करणेबाबत जाबदारास आदेश करणेत यावा, तक्रारअर्जाचा खर्च रक्कम रु.2,500/-, व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- तक्रारदारास जाबदाराकडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 चे कागदयादीसोबत साडी खरेदीची मूळ पावती, तक्रारदारानी जाबदाराला दिलेले पत्र व कुरियरची पावती, जाबदाराने तक्रारदाराला दिलेले उत्तर, नि.15 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.19 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. जाबदाराने सदर कामी नि.11 कडे म्हणणे/कैफियत, नि.12 कडे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे नि.13/1 चे कागदयादीसोबत जाबदाराचे दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-याच्या फुटेजवरुन केलेल्या छायाचित्रांच्या मुळ प्रती, नि.13/2 कडे निरीक्षक वैधमापनशास्त्र, सातारा विभाग सातारा यानी तक्रारदाराचे तक्रारीबाबत कळवले निर्णयाची प्रत, नि.16 कडे जाबदाराचे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.18 चे कागदयादीसोबत जाबदाराचे दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यामध्ये वाद घटनेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचे चित्रीकरण डी.व्ही.डी., नि.21 कडे जाबदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.22 कडे जाबदाराचा युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने मे.मंचात दाखल केलेले आहेत. जाबदारानी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की,
1. जाबदाराला तक्रारअर्जातील कथन मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने जाबदाराचे दुकानातून खरेदी केलेली साडी ही योग्य व आवश्यक मापाची होती. वास्तविक कोणतेही कापड विक्री करणेपूर्वी माप बरोबर आहे का हे तपासूनच दिले जाते.
2. जाबदाराने तक्रारदारास खरेदी दिलेल्या साडीची तक्रारदार व त्याचे पत्नीसमोर मोजणी करुन सदरची साडी ब्लाऊजपीससहित 6 मीटर लांबीची असलेची खात्री करणेत आली होती. प्रस्तुत साडीसोबत असलेले मॅचिंग ब्लाऊज पीस ग्राहकाने साडी खरेदी केलेनंतर त्याचे विनंतीवरुन कापून दिले जाते. तक्रारदाराने खरेदी केलेल्या साडीतील ब्लाऊजपीससुध्दा तक्रारदार व त्यांचे पत्नीचे विनंतीवरुन जाबदारानी कापून स्वतंत्र करुन दिले जाते त्यानुसार जाबदाराने साडीतील ब्लाऊजपीस कापून स्वतंत्र करुन दिला व त्यानुसार तक्रारदाराचे पत्नीने ब्लाऊज शिवून घेतले अशी प्रांजळ कबुली तक्रारदाराने दिली आहे. मात्र तक्रारदाराने तक्रारअर्जात जाबदाराने ब्लाऊजपीस स्वतंत्र करुन न देताच साडी कापली अशी तक्रारदाराची तक्रार नाही.
3. जाबदाराचे दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-याचे फुटेजवरुन तक्रारदाराला सर्व रेकॉर्डींग दाखवून जाबदाराने कोणतीही फसवणूक केली नसलेबाबत सांगितले आहे. परंतु तक्रारदाराने जाबदाराविरुध्द फसवणुकीचे लबाडीचे आरोप केले. सर्व वस्तुस्थिती लक्षात आल्यावर जाबदाराने सी.सी.टी.व्ही. वरील रेकॉर्डींग पाहून तक्रारदारालाही दाखवले. त्याचप्रमाणे सदर साडीत पिकोफॉल करतेवेळी तक्रारदाराचे शिंप्याकडून गफलत अगर घरी साडी वापरताना खराब झालेची शक्यता असलेची जाणीव जाबदाराने तक्रारदारास दिली. सदर बाब तक्रारदाराला पटलेनंतर जाबदाराने त्याचे दुकानातील दुसरा कापडाचा मॅचिंग तुकडा साडीला जोडून दिला आणि तसा शेराही जाबदाराने तक्रारदाराचे बिलावर लिहून दिला. चूक मान्य करुन तक्रारदार साडी घेऊन तक्रारदार निघून गेला. त्यानंतर पुन्हा दि.28-5-13 रोजी तक्रारदार जाबदाराचे दुकानात येऊन अकारण वाद घालू लागला व मला ही साडी नको मला दुसरी साडी दया नाहीतर मला पैसे परत दया अशी मागणी करु लागला. परंतु तक्रारदाराच्या चुकीमुळे खराब झालेली साडी बदलून देणे शक्य नाही असे जाबदाराने तक्रारदारास सांगितले आणि तक्रारदाराने साउी खरेदी करते वेळचे सी.सी.टी.व्ही.फुटेज तक्रारदारास दाखवले. तक्रारदाराचे साडीचा जो भाग कमी आहे अशी तक्रारदाराची तक्रार आहे तो भाग सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये दिसून येत आहे याची खात्री जाबदाराने तक्रारदारास करुन दिली, त्यामुळे तक्रारदाराने चिडून जाऊन साडी दुकानात टाकून निघून गेला. त्यानंतर दि.28-5-13 रोजीचे तक्रारदाराचे पत्रास जाबदाराने उत्तर दिले आहे व या उत्तरामध्ये साडी तक्रारदारास दुकानातन घेऊन जाणेस सांगितलेने तक्रारदार जाबदाराकडे येऊन साडी घेऊन गेला. या सर्व बाबीचा उल्लेख तक्रारदाराने जाणीवपूर्वक तक्रारअर्जात केलेला नाही. जाबदाराना त्रास देणेसाठी तक्रारदाराने सातारा येथील वजनमाप व मूल्यांकन कार्यालयातही जाबदाराविरुध्द तक्रार नोंदवली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने संबंधित कार्यालयातील अधिक्षकांमार्फत पूर्वसूचना न देता अचानकपणे जाबदाराचे दुकानातील मालाची पहाणी तपासणी व पडताळणी करुन जाबदाराचे दुकानात तपासणीमध्ये कोणताही आक्षेपार्ह माल/ घटक न आढळल्याने संबंधित अधिका-यांनी जाबदाराना निर्दोष दाखला दिला आहे. तक्रारदाराने जाबदाराविरुध्द खोटी तक्रार दाखल केलेने तक्रारदाराकडून जाबदाराचे नावलौकिकास नुकसान होईल अस कृत्य झाल्याने तक्रारदाराकडून रक्कम रु.25000/- जाबदाराना मिळणेबाबतचे आदेश तक्रारदाराला करणेत यावेत. अशा प्रकारे कैफियत/म्हणणे जाबदारानी दाखल केले आहे.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. तकारदाराला जाबदाराने सदोष सेवा पुरवली आहे काय? नाही.
3. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी दि.30-4-2013 रोजी रक्कम रु.1,650/- व रक्कम रु.435/- अशा दोन साडया खरेदी केल्या आहेत. प्रस्तुत खरेदीचे बिल तक्रारदाराने नि.3 चे कागदयादीसोबत दाखल केलेले आहे यावरुन तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा देणार असल्याची बाब सिध्द होते. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने जाबदाराचे दुकानातून साडी खरेदी केलेनंतर जाबदाराकडून ब्लाऊजपीस कट करुन घेतला तसेच जाबदार तक्रारदारानी व त्यांचे पत्नीने साडी खरेदी करताना घडलेला सर्व घटनाक्रम जाबदाराचे दुकानातील सी.सी.टी.व्ही. रेकॉर्डींग मध्ये रेकॉर्ड झालेला असून तक्रारदारानी खरेदी केलेल्या साडीचा जो भाग कमी आहे अशी तक्रारदराची तक्रार आहे तो साडीचा भाग सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये दिसून येत आहे हे तक्रारदाराने दाखल केलेल्या सी.सी.टी.व्ही. रेकॉर्डींगवरुन नि.18/1 वरुन तसेच नि.13/1 कडील फोटोग्राफ्सवरुन दिसून येते म्हणजेच प्रस्तुत साडीचा भाग तक्रारदाराचे चुकीमुळे किंवा टेलरचे चुकीमुळे कापला असावा या निष्कर्षाप्रत हे मंच येते, तसेच तक्रारदारानी प्रस्तुत जाबदाराविरुध्द सातारा येथील वजन मापन व मूल्यांकन कार्यालयातही तक्रार नोंदवली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने जाबदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रस्तुत वजने मापे अधिक्षकांतर्फे जाबदाराचे दुकानात अचानक जाऊन दुकानातील मालाची तपासणी व पडताळणी केली असता सदर तपासणीत जाबदारांचे दुकानातील मालामध्ये कोणतेही आक्षेपार्ह बाब आढळली नसल्याने प्रस्तुत अधिका-यानी तसा निर्दोष दाखला जाबदाराला दिलेला आहे. प्रस्तुत दाखला जाबदारानी नि.13 चे कागदयादीसोबत नि.13/2 कडे दाखल केला असून त्यावरुन जाबदार हे निर्दोष असलेचे दिसून येते. प्रस्तुत दाखल्यात सदर वजनेमापे कार्यालयातील अधिका-यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, जाबदाराचे मे.दर्शन साडी सेंटर सातारा येथे डॉलर प्रकारची साडी अचानक तपासणी करुन साडीची लांबी तपासली असता ती बरोबर आढळली व याबाबतची कल्पना तक्रारदारास दिलेली आहे म्हणजेच प्रस्तुत जाबदार हे निर्दोष असून जाबदारानी तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, तसे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदाराने तक्रारदाराला जाबदाराची काही चूक नसतानाही सदर साडीला मॅचिंग कापड जोडून दिले आहे हे प्रस्तुत बिलावर नमूद आहे. सदर कामी जाबदारानी दाखल केलेल्या सर्व पुराव्यांचा विचार करता जाबदाराने तक्रारदाराना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
3. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.11-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.