निकाल
(घोषित दि. 07.03.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केली.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे. तक्रारदार हा शेतकरी असून स्वतःच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह शेती करुन करतो. तक्रारदार याची शेती मौजे सावरगाव भागडे ता.जि.जालना येथील गट क्र.38 मध्ये आहे, त्याचे एकूण क्षेत्रफळ 1 हेक्टर 11 आर आहे त्या बाबतचा 7/12 उतारा व 8 नमुना दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र.1 ही बियाणे उत्पादीत व मार्केटिंग कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 हे बियाणे विक्रेते असून गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादीत केलेल्या बियाणाचे विक्रेते आहे. तक्रारदार याने दि.07.01.2016 रोजी रोजी गैरअर्जदार क्र.2 कडून टोमॅटो पिकाचे बियाणाचे वाण एन एस-629 लॉट क्र.1406-03-05 रक्कम रु.1,000/- ला विकत घेतले. सदर बियाणाची वैधता ही दि.15.05.2016 पर्यंत होती. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांचे उत्पादीत बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून खरेदीकेल्यामुळे तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये ग्राहकाचे नाते आहे. त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी टोमॅटो बियाणाची जी बॅग दिली त्याचेवर उज्वल भविष्य के लिए उत्तम बीज अशी हमी दिली आहे. तक्रारदाराने स्वतःच्या शेतजमीनीमध्ये एकूण क्षेत्र 0.10 हेक्टरमध्ये गट क्र.38 मध्ये 120 X 45 से.मी. नुसार सदर बियाणाची लागवड केलेली आहे, त्यासाठी खत, औषधी, फवारणी, वेळोवेळी खुरपणी, वखरणी केलेली आहे. तक्रारदार याने ए3 मामार, रिजेंट, इसाबियॉन, विपुल इत्यादी आवश्यकतेनुसार पिकाला रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केलेलाआहे. सदर खरेदी केलेल्या औषधांची पावती तक्रारदार याने तक्रारीसोबत दाखल केलेली आहे.
दि.09.02.2016 रोजी तक्रारदार यांनी मलचींग बेड पध्दतीने टोमॅटो बियाणाची लागवड केली. लागवड केल्यानंतर अडीच महिन्याच्या कालावधीनंतर सदर टोमॅटोपिकाच्या झाडांची उंची चार ते साडेचार फुट झालेली होती परंतू सदरील झाडांना कोणत्याही प्रकारे फळधारणा झालेली नव्हती. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. दि.25.04.2016 रोजी तक्रारदार याने उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे व कृषी विभाग जिल्हा परिषद यांचेकडे सदर झाडाला फळधारणा झाली नाही म्हणून लेखी तक्रार दाखल केली आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती यांनी दि.11.05.2016 रोजी तक्रारदाराचे शेतावर स्थळपाहणी केली व त्याबाबतचा पंचनामा सादर केलेला आहे. सदर स्थळपाहणी करताना गैरअर्जदार क्र.1 यांच्या कंपनीतर्फे प्रतिनिधी मंगेश श्रीकांत चंदनशीव व गैरअर्जदार क्र.2 यांचे प्रतिनिधी परमेश्वर छबुराव शिंदे स्वतः उपस्थित होते. पिकास फळधारणा झाली नाही म्हणून उत्पादनापेक्षा 90 टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले. टोमॅटोचे उत्पादन हे तक्रारदारास 40 क्विंटल होणे अपेक्षित होते. परंतू 40 किलो उत्पन्न सुध्दा येऊ शकले नाही. त्यामुळे तक्रारदार याचे एकूण रु.1,50,000/-चे नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या सेवेमध्ये कमतरता केलेली आहे.दि.11.05.2016 रोजीच्या पाहणी पंचनाम्यानंतर तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.2 याला दि.28.06.2016 रोजी विधिज्ञामार्फत नोटीस पाठविलेली आहे, सदर नोटीसचे कोणतेही उत्तर गैरअर्जदार क्र.2 यांनी दिले नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन न दिल्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रारदाखल करुन नुकसान भरपाई रक्कम रु.1,50,000/- व इतर खर्च रु.5000/- असे एकूण रु.1,55,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
गैरअज्रदार क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी लेखीनिवेदन नि.11 अन्वये दाखल केले आहे. लेख्ंी जबाबासोबत गैरअर्जदार क्र.1 तर्फे संदीप साहेबराव भागवत यांचे शपथपत्र दाखल केले व गैरअर्जदार क्र.2 तर्फे अतुल ब्रिजमोहन लढढा यांचेशपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून बियाणे विकत घेतल्याबददलची बाब मान्य आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारीतील उर्वरीत मजकुर स्पष्टतः नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांचे अधिक कथन की, गैरअर्जदार हे नामधारी सीडस प्रा.लि. या नावाचे बेंगलोर येथे बियाणे उत्पादीत कंपनीकडून सदर बियाणे विक्री करण्याचा व्यवसाय करतात. सदर बियाणे हे सीडस अॅक्टनुसार उत्पादीत करुन व प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर विक्री करतात. तक्रार अर्जामध्ये नमुद केलेल्या टोमॅटो बियाणाचे वाण ब-याच शेतक-यांना विक्री केलेले आहे. तालुका तक्रार निवारण समितीचा दि.11.05.2016 चा अहवाल व पंचनामा पाहता अहवालातील परिच्छेद क्र.18 मधील निष्कर्षामध्ये तक्रारदार यांनी टोमॅटो वाणाची लागवड शेडनेटमध्ये केली असल्याकारणाने तक्रारदाराचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी गैरअर्जदार हे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदोष बियाणे दिलेले आहे असे अहवालामध्ये कुठेही नमुद नाही. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. गैरअर्जदार यांनी तैय्यार केलेले टोमॅटो बियाणे पाकीटावर सदर बियाणे शेडनेटमध्ये लावावे अशा प्रकारची कोणतीही सुचना किंवा माहिती दिलेली नाही. असे असताना सुध्दा तक्रारदाराने सदर टोमॅटोच्या बियाणाची लागवड शेडनेटमध्ये केलेली दिसून येते. त्यासाठी गैरअर्जदार हे जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामी शपथपत्र याचे अवलोकन केले. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले पुराव्याकामीचे शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद लक्षात घेतला. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? नाही.
2) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदार यांच्या वकीलांनी युक्तीवाद असा केला की, तक्रारदाराने एनएस 629 या वाणाचे टोमॅटोचे बियाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादीत केलेले गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून विकत घेतले.दि.09.02.2016 रोजी सदर बियाणाची लागवड केली. लागवडीनंतर सदर पिकाच्या झाडाची उंची चार ते साडेचार फुटपर्यंत झालेली होती परंतू सदर झाडास फळधारणा झाली नाही त्यामुळे तक्रारदार याने दि.25.04.2016 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देऊन तक्रारदार यांच्या शेतात लागवड केलेल्या टोमॅटो पिकाची स्थळपाहणी करण्याकरता विनंती केली. त्यानुसार दि.11.05.2016 रोजी तालुका तक्रार निवारण समितीने तक्रारदार यांच्या शेतास भेट देऊन पंचनामा व अहवाल दिला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास चांगल्या प्रतीचे बियाणे नदिल्यामुळे तक्रारदार याच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कमतरता केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच युक्तीवाद करत असताना असे सांगितले की, तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 याने उत्पादीत केलेले टोमॅटो या पिकाचे वाण गैरअर्जदार क्र.2 कडून विकत घेतले ही बाब मान्य आहे. तक्रारदाराने सदरील पिकाची लागवड कशी करावी याबाबत कधी विचारणा केली नाही. तसेच त्याकरता उपयुक्त अशा खत व औषधीबाबत विचारणा केली नाही. दि.11.05.2016 रोजीचा तालुकास्तरीय निवारण समितीचा अहवाल व पंचनामा यामध्ये तक्रारदार याने टोमॅटो बियाणाची लागवड शेडनेटमध्ये केली आहे. सदर लागवड पध्दत तक्रारदार यानी स्वतःच्या मर्जीने व चुकीच्या पध्दतीने केली आहे त्यामुळे तक्रारदार हा स्वतःच जबाबदार आहे. त्याकरीता गैरअर्जदार हे जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली नाही. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद आम्ही लक्षात घेतला. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व पुराव्याकामी शपथपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार यानी लागवड केलेल्या टोमॅटो या भाजी पिकाच्या झाडास फळधारणा झाली नसल्यामुळे तक्रारदार याचे आर्थिक नुकसान झाले का? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादीत केलेले एनएस 629 हे टोमॅटो बियाणाचे वाण गैरअर्जदार क्र.2 कडून विकत घेतले आहे. बियाणे विकत घेतल्याची पावती तक्रारदार याने मंचासमोर दाखल केली. सदरील बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. यावरुन तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारदार याने दाखल केलेल्या 7/12 उता-याचे अवलोकन केले. त्यावरुन तक्रारदार हा शेतकरी आहे व त्याचे नावे सावरगाव भागडे ता.जि.जालना येथे गट क्र.38 मध्ये शेतजमीन नोंदलेली आहे. 7/12 उता-यावर तक्रारदार याने टोमॅटो या पिकाचे उत्पन्न घेतल्याबाबतची नोंद नाही. परंतू सदरील बाब ही गैरअर्जदार यांना मान्य आहे. तक्रारदार याने खरेदी केलेल्या टोमॅटो बियाणाचे वाण हे खरीप, रब्बी, उन्हाळी लागवडीकरता उपयुक्त आहे असे तक्रारदाराने दाखल केलेल्या बियाणे पाकीटवरुन निदर्शनास येते. तसेच तक्रारदार याने दाखल केलेल्या खतपाणी व औषधीच्या पावत्या हया तक्रारदार याने बियाणाची लागवड केल्याआधीच विकत घेतल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सदरील पावत्या ग्राहय धरता येणार नाही.
तक्रारदार याने टोमॅटो या बियाणाच्या एनएस 629 या वाणाची दि.07.01.2016 रोजी खरेदी केलेली आहे. तदनंतर दि.09.02.2016 रोजी तक्रारदार याने मलचींग बेड पध्दतीने लागवड केली आहे. दर चार दिवसांनी खतपाणी व औषधीची फवारणी केली. तक्रारदार यांच्या टोमॅटो या पिकाच्या झाडांची उंची चार ते साडेचार फुट असल्याचे नमुद केले. दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उलटून सुध्दा सदरील झाडास फळधारणा झाली नसल्यामुळे तक्रारदार याने दि.25.04.2016 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी जालना यांचेकडे लेखी तक्रार देऊन स्वतःच्या शेतजमिनीमध्ये टोमॅटो या पिकाची स्थळपाहणी करण्याकरता विनंती अर्ज केला होता. सदर अर्जाची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दि.11.05.2016 रोजी तक्रारदार यांच्या शेतात भेट देऊन टोमॅटो या पिकाची स्थळपाहणी करुन पंचनामा व अहवाल सादर केला, सदर अहवालावर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी गैरअर्जदार क्र.1 यांच्या कंपनीचे प्रतिनिधी व गैरअर्जदार क्र.2 यांचे प्रतिनिधी व स्वतः तक्रारदार यांची सदर अहवालावर स्वाक्षरी आहे. सदर अहवालाचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारदार याने टोमॅटो या बियाणाची लागवड केल्यानंतर दर चार दिवसांनी अडीच किलो 19 : 19 : 19 ड्रीपद्वारे तसेच 30 ते 60 दिवसापर्यंत दर चार दिवसांनी 0:52:34 व 12:61:0 या खताचा वापर केल्याचे निदर्शनास येते. मंचाच्या मते 19 : 19 : 19 या खताचा वापर साधारणतः एक एकर क्षेत्राकरता एक किलो वापरण्यात येते. तक्रारदार याने सदरील खताचा वापर 0.10 हेक्टर एवढया शेताकरता केले असल्याचे दिसून येते. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने टोमॅटो या पिकासाठी सदर खताचा जास्त प्रमाणात वापर केला आहे. 12:61:0 या खतामध्ये नत्राचा (युरीया) प्रमाण जास्त असल्यामुळे सदर खताचा वापर केल्यानंतर फूल गळ होण्याची शक्यता असते. 0:52:34 हे खत पिकाचे वजन वाढविण्यासाठी व फळाला मजबुत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे असे दिसून येते. तक्रारदार याने तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे रिजेंट व यडमायर या औषधीचा वापर केला आहे. सदरील औषध हे High power चे आहे. सदरील औषधीचा वापर केल्यामुळे सुध्दा फूल गळ होण्याची शक्यता आहे. सदरील औषध हे पिकावर रोग असताना किंवा लाल कोळी झाल्यास किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास उपयुक्त आहे. परंतू तक्रारदार याने तक्रारीत पिकावर रोग पडले असल्याचे कुठेही नमुद केले नाही.
तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे निष्कर्ष पाहता तक्रारदार याने टोमॅटो एनएस 629 या वाणाची लागवड शेडनेटमध्ये केली असल्याने व शेडनेटमधील नियंत्रीत वातावरण (वाढीव तापमान व सापेक्ष आर्द्रता) यामुळे फूल धारणा व फळधारणावर परिणाम झाल्याचे दिसून येते त्यामुळे शेतक-यांचे अपेक्षित उत्पादन 90 ते 95 टक्के घट झाल्याचे दिसून येते. पंचनामा अहवालानुसार तक्रारदाराने टोमॅटोची लागवड शेडनेटमध्ये केली असल्याचे निदर्शनास येते. परंतू सदर बाब ही तक्रारदाराने तक्रार अर्जात कुठेही नमुद केली नाही. तक्रारदार याने खरेदी केलेले एनएस 629 टोमॅटोचे वाण हे शेडनेटमध्ये लागवड करण्याकरता योग्य आहे काय याबाबत कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच तक्रारदार याने तालुकास्तरीय समितीचा अहवाल यावर सुध्दा कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही. यावरुन सदर अहवाल तक्रारदारास मान्य आहे असे निदर्शनास येते. शेडनेटमध्ये लागवड केल्याने टोमॅटो या पिकासउपयुक्त असलेले वातावरण योग्य प्रमाणात न मिळाल्याने फुलधारणा व फळधारणा याच्यात घट होते.तसेच या पिकास थंडी व उष्ण हे सारख्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. जर पिकास योग्य वातावरण व पोषक द्रव्य व खतपाणी व औषध यांचा योग्य प्रमाणात वापर न केल्यास त्याचा परिणाम फूल व फळधारणावर होतो. शेडनेटमध्ये कोणत्या प्रकारचे वाण लावण्यात येते व कोणते नाही याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही. शेडनेटमध्ये लावण्यात आलेल्या रोपाचे संकरण (Pollination) होत नाही. त्याचाही परिणाम फळधारणावर होतो. या सर्व बाबाीची माहिती तक्रारदार हा शेतकरी असल्यामुळे त्याला माहीत असणे अनिवार्य आहे. तक्रारदार याने टोमॅटो या पिकाची लागवड शेडनेटमध्ये केल्यामुळे तक्रारदार हा झालेल्या आर्थिक नुकसानास सर्वस्वी जबाबदार आहे. त्याकरीता गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कसूर ठेवलेला नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व बाबीचा विचार करता तक्रारदार याने टोमॅटो एनएस 629 या वाणाची लागवड शेडनेटमध्ये केल्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसान झाले आहे असे या मंचाचे मत आहे. त्याकरता गैरअर्जदार हे जबाबदार नाही. तक्रारदाराची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. वरील कारणास्तव मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना