निकालपत्र
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष नाईसर डायसर कंपनीने तक्रारदार यांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी टि.व्ही.वर विरुध्दपक्ष कंपनीच्या नाईसर डायसर ची जाहीरात पाहून, तसेच त्याबाबत विरुध्दपक्ष यांचे मॅनेजरशी दि.23-03-2010 व दि. 27-03-2010 रोजी बोलणी करुन खाद्यपदार्थ बनविण्यासाठी त्याची ऑर्डर दुरध्वनीद्वारे दि.15-02-2010 रोजी दिली व त्याचे पार्सल रु.2,409-/ भरुन पोस्टातून सोडविले. परंतु या मशिनचा एक भाग खराब होता त्याचे पाते जुडत नव्हते,दुस-या पात्याजवळील डावा कान खराब आहे त्यामुळे ते निरुपयोगी झाले. तसेच विरुध्दपक्ष यांनी पाठविलेल्या व्हि.पी.मध्ये झाकणे तीन पाठविली परंतु पॉट भांडे दोन पाठविली त्यामुळे ते उपयोगात येवूशकले नाही. जोडण्याचे पॉट भांडे छोटे आहे म्हणून ते बसूशकत नाही. त्यामुळे मशिन बदलून मिळण्यासाठी तक्रारदारांनी विरुध्दपक्ष कंपनीशी वेळोवेळी दुरध्वनीवर संपर्क साधला, वकीला मार्फत नोटीस दिली परंतु विरुध्दपक्ष यांनी यासाठी तक्रारदाराने पोष्टाचा खर्च करण्यास व नादुरुस्त मशिन आधी पाठविण्यास सांगितले. विरुध्दपक्ष यांनी सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसान भरपाई मिळणे करिता त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(3) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, सदर डिफेक्टीव्ह मशिनमुळे त्यांना मानसिक,शारीरीक व सामाजिक त्रास झाला. त्यामुळे विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांना व्हि.पी.सोडविण्याचा खर्च,नोटीस खर्च व इतर खर्चाचे मिळून रु.24,000-/ एवढी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे.
(4) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृटयर्थ नि.नं. 4 वर शपथपत्र तसेच नि.नं. 5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 3 कागदपत्रे दाखल केली आहेत.
(5) विरुध्दपक्ष यांना या न्यायमंचाने रजिष्टर्ड पोष्टाद्वारे पाठविलेली नोटीस मिळूनही ते सदर प्रकरणात गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनीधीद्वारे स्वतःचे बचावार्थ काहीही म्हणणे अथवा कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. वेळोवेळी नेमलेल्या तारखांना व युक्तिवादाचे वेळी ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला.
(6) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)विरुध्दपक्ष कंपनीने तक्रारदारास देण्याच्या सेवेत कमतरता ठेवली आहे काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहेत ? | ःअंतिम आदेशानुसार |
(क)आदेश काय ? | ःखालील प्रमाणे |
विवेचन
(7) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदार यांची तक्रार ही विरुध्दपक्ष कंपनीने दोषीत नाईसर डायसर देऊन सेवेत कमतरता केली अशी आहे. विरुध्दपक्ष यांना या न्यायमंचाची नोटीस मिळूनही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे त्यांना या बाबत काहीही म्हणणे दयावयाचे नाही व त्यांना तक्रारदारांची तक्रार मान्य आहे असा अर्थ निघतो. तसेच विरुध्दपक्ष यांच्या वकीलांनी तक्रारदारांच्या वकीलांना जे नोटीस उत्तर पाठविले आहे त्याची प्रत तक्रारदारांनी प्रकरणात दाखल केली आहे. त्यात विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास दिलेले मशिन बदलवून देण्याचे मान्य केले आहे परंतु त्यापोटी त्यांनी तक्रारदाराकडून इनव्हाईस किंमतीच्या पन्नाट टक्के म्हणजे रक्कम रु.1,000-/ इतक्या रकमेची मागणी केली आहे. याचाही अर्थ असाच होतो की, विरुध्दपक्ष यांना सदर मशिन दोषीत असल्याचे मान्य आहे. असे असतांनाही विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराकडून दोषीत मशिन आधी परत मागण्याचा व इनव्हाईस किंमतीच्या पन्नास टक्के रक्कम देण्याचा आग्रह धरला आहे. वास्तवीक विरुध्दपक्ष यांनी दोषीत वस्तू पुरविली असल्याने व वॉरंटी कालावधी असतांना ती स्वखर्चाने तक्रारदारास बदलवून देणे आवश्यक होते. तसे न करुन त्यांनी सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
(8) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून मानसिक त्रास व नुकसानीपोटी एकूण रक्कम रु.24,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रृटी केली असल्यामुळे तक्रारदार दोषीत मशिनची किंमत परत मिळण्यास पात्र आहेत. परंतु तक्रारदार यांनी मानसिक त्रास व नुकसानीपोटी केलेली मागणी अवास्तव आहे. आमच्या मते तक्रारदार मानसिक त्रास व नुकसानीपोटी रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
(9) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर आदेशाच्या प्राप्तीपासून पूढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांनी त्यांना विरुध्दपक्ष यांनी पुरविलेले नाईसर डायसर स्वखर्चाने विरुध्दपक्ष यांचे पत्त्यावर पोष्टाद्वारे पाठवावे.
(क) तक्रारदाराने पाठविलेले नाईसर डायसर विरुध्दपक्ष यांना मिळाल्यापासून पुढील तीस दिवसांचे आत, विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराकडून नाईसर डायसरची स्वीकारलेली संपूर्ण रक्कम 2,409/- (अक्षरी रुपये दोन हजार चारशे नऊ फक्त) व मानसिक त्रास आणि नुकसानीपोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) तक्रारदारास द्यावेत.
धुळे
दिनांक – 25-01-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.