Exh.No.14
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.45/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.03/08/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.29/10/2015
सौ.कल्पना गजानन तेंडूलकर
वय 57 वर्षे,
राहणार- बी/8, माठेवाडा, ता.सावंतवाडी,
जिल्हा - सिंधुदुर्ग, पिन – 416 510 ... तक्रारदार
विरुध्द
1) नाईक ट्रॅव्हल्स,
शॉप नं.21, अॅलकॉन पॅटॉ सेंटर,
कदंबा बस स्टँड समोर, पणजी, गोवा
2) गोगटे ट्रॅव्हल्स,
लक्ष्मी नारायण थिएटरजवळ,
स्वारगेट, पूणे
शॉप नं.4, प्लॉट नं.7,
त्रिमुर्ती बिल्डिंग, पर्वती रस्ता,
जयभवानी हॉटेलजवळ, पूणे - 9 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष.
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार - स्वतः
विरुद्ध पक्ष 1 व 2 – एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि. 29/10/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, नाईक ट्रॅव्हल्स लक्झरी बस क्र. MH12-F-9300 मधून दि.29/7/2015 रोजी तक्रारदार यांनी प्रवासाकरीता बुकींग केले. त्याचे तिकिट गोगटे ट्रॅव्हल्स यांचेकडे आरक्षित केले. सदर बस ही पूणे – पणजी अशी होती. तक्रारदार यांनी सदर बस सावंतवाडीतून जाते का ? अशी चौकशी केली. त्यांना ‘होय’ असे सांगण्यात आले. तक्रारदार यांना सावंतवाडी येथे उतरावयाचे होते. पहाटे पावणेपाच ते पाचच्या दरम्यान बस झाराप तिठा येथे ड्रायव्हरने थांबवली व उतरण्यास सांगितले. तक्रारदार यांना सावंतवाडी येथे उतरायचे असल्याने त्यांनी त्यास नकार दिला. त्यावेळी बस ड्रायव्हरने सांगितले की 10/12 पॅसेंजर असते तर गाडी सावंतवाडीतून नेली असती, एका पॅसेंजरसाठी नेणार नाही. याची कोणतीही पूर्वकल्पना गोगटे ट्रॅव्हल्स ऑफिस किंवा बस ड्रायव्हरने दिली नव्हती. तशी कल्पना दिली असती तर त्यांनी तिकीटच घेतले नसते असे तक्रारदार यांचे कथन आहे.
2) तक्रारदार यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी ड्रायव्हरला खूप विनंती केली की, त्या एकटया असून निर्मनुष्य रस्त्यावर उतरू शकत नाहीत. त्याने खूप वाद घातला. नंतर तक्रारदार बांदा येथे उतरल्या व तेथून सावंतवाडीला आल्या. त्यांनी त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दिली. नंतर आर.टी.ओ. फ्लाईंग स्कॉड, बांदानाका यांजकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारदार यांचे कथनानुसार त्यांचे वय 57 वर्षे असून त्यांना डायबेटीस, ब्लडप्रेशर, स्पॉडिलायटीस असे आजार असून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कृत्यामुळे त्यांना अतीशय मानसिक व शारीरिक त्रास झाला. तसेच आर्थिक भुर्दंड पडला . त्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी त्यांनी रक्कम रु.25,000/- ची मागणी केली आहे.
3) तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांस नोटीसा पाठविण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांस मुदतीत बजावणी होऊनही जरुर संधी देऊनही ते तक्रार प्रकरणात हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करुन प्रकरण चौकशीसाठी नेमण्यात आले.
4) तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.3 सोबत गोगटे टुर्स अँड टॅव्हल्सचे तिकिट, इनचार्ज फ्लाईंग स्कॉड, आर.टी.ओ. बांदा यांना दि.30/7/2015 रोजी दिलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.10 वर दाखल केले. तसेच नि.11 सोबत 3 कागदपत्रे दाखल केली असून त्यात आर.टी.ओ.कडील दि.30/7/2015 ची पावती, गाडीचे फोटो आणि युक्ता फोटो स्टुडिओचे बिल अशी कागदपत्रे आहेत. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद नि.13 वर दाखल केला आहे.
5) तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, विरुध्द पक्ष यांची गैरहजेरी या सर्व बाबींचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.
6) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेले दि.29/7/2015 च्या प्रवासाचे तिकिट दाखल केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांचे टॅव्हल्समधून प्रवास केल्याचे फोटोग्राफ्स हजर केले आहेत. त्यामुळे तक्रारदार हया विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या ‘ग्राहक’ आहेत. तक्रारदार यांना सावंतवाडी येथे उतरावयाचे असल्याने त्यांनी तशी चौकशी तिकिट घेतांना तसेच प्रवास करतांना केली होती. त्यांना सावंतवाडीतून बस जाणार असे सांगण्यात आल्यामुळे त्यांनी सदर बसचे बुकींग केले हाते. असे असता त्यांना झाराप तिठा येथे निर्मनुष्य ठिकाणी की जेथे पहाटेच्यावेळी रिक्षाही नसते अशा ठिकाणी उतरण्यास सांगण्यात आले. तक्रारदार यांनी विनंती करुनही विरुध्द पक्ष यांच्या ड्रायव्हरने बस सावंतवाडी येथे नेली नाही. तसेच 10-12 प्रवासी असतील तरच बस सावंतवाडीतून जाणार एकटयासाठी बस सावंतवाडीतून नेणार नाही असे सांगण्यात आले. ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
7) तक्रारदार यांचे युक्तीवादादरम्यान असे म्हणणे आहे की, तिकिट बुकींग करतांना बसचे तिकिट गोवा पर्यंतचे देतात, परंतु सावंतवाडीत उतरण्याचे कबुल केले जाते. आणि पहाटेच्यावेळी झाराप येथे उतरवणे हे विरुध्द पक्षाचे कृत्य योग्य नाही. तक्रारदार यांना बांदा गावापर्यंत जाऊन परत मागे सावंतवाडीत यावे लागले. तक्रारदार या आजारी असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागला. तक्रारदार यांनी नाईक ट्रॅव्हल्सच्या बस विरोधात केलेल्या तक्रारीमुळे बसवर कारवाई होऊन रु.1000/- दंड आकारण्यात आला त्याची सहिशिक्याची पावती तक्रारदार यांनी नि.11 सोबत दाखल केली आहे. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीसा पाठवूनही ते तक्रार प्रकरणात हजर झालेले नाहीत अथवा त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8) तक्रारदार या महिला असून त्यास पहाटेच्या वेळी पुर्वी कबुल केल्याप्रमाणे सावंतवाडी येथे न उतरविता झाराप तिठा अशा निर्मनुष्य ठिकाणी उतरविले ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील अक्षम्य अशी त्रुटी आहे. विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले या मताशी मंच सहमत आहे; परंतु तक्रारदार यांची मागणी ही अवास्तव वाटत असल्याने तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत. असे मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) मात्र विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांस दयावेत.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच 29/10/2015 पासून 45 दिवसांचे आत करण्यात यावी. तसे न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करण्यास पात्र राहतील.
4) राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/ जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.14/12/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/10/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.