मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 05/01/2011) 1. मूळ तक्रार क्र.346/07 यामध्ये मंचाने दि.30/11/2007 रोजी पारित केलेल्या आदेशाला मा. राज्य ग्राहक आयोगासमोर आव्हानीत केल्यानंतर मा. राज्य ग्राहक आयोग, परीक्रमा खंडपीठ, नागपूर यांच्या दि.01.10.2008 च्या आदेशानुसार श्री महेश हरीप्रसाद शर्मा यांना विरुध्द पक्ष म्हणून दाखल करण्याचे आदेशीत करुन सदर प्रकरण मंचासमोर पुनः विचारार्थ पाठविण्यात आले. 2. तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ता क्र. 1 यांचे खाते क्र. AF-7456 व AG-0799 असून त्यामध्ये अनुक्रमे रु.30,100/- व रु.12,900/- तसेच तक्रारकर्ता क्र. 2 यांचे खाते क्र. AF-6096 मध्ये रु.33,100/- व AF-9721 मध्ये रु.18,100/- अशा रकमा जमा होत्या. तक्रारकर्त्यांनी रकमा काढण्याबाबत गैरअर्जदार क्र. 2 ला विचारले असता त्यांनी टाळाटाळ केली. अधिक चौकशीअंती तक्रारकर्त्यांच्या असे निदर्शनास आले की, गैरअर्जदार क्र. 1 ने कुठलीही त्यांच्या स्वाक्षरीची शहानीशा न करता सदर रक्कम काढण्याची परवानगी दिली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी बॅकेत अफरातफर करुन रक्कम काढल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने रक्कम न मिळाल्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विवादित रक्कम, नुकसान भरपाई व कार्यवाहीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 4. गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्त्यांचे त्यांच्याकडे बचत खाते होते. त्यांनी संबंधित व्यक्तीस अधिकार पत्र देऊन खात्यातून रक्कम काढलेली असल्याने त्यांच्या सेवेत कोणतीच त्रुटी नाही. तसेच बँकेतील अफरातफरीस ते जबाबदार नाहीत. म्हणून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली. 5. गैरअर्जदार क्र. 2 ने सदर तक्रारीला उत्तर दाखल करुन सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली. त्यांनी तक्रारकर्त्याने तक्रारीतील बहुतांश तथ्य लपवून ठेवल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्ते हे त्यांचे ग्राहक ठरत नसून त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही सेवा प्रदान केलेली नाही. सदर तक्रार ही कालबाह्य असल्याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने अधिकारपत्रावरील सह्या या खोटया असल्याचे नमूद केले आहे हे तपासून पाहण्याकरीता विशेष तज्ञांची गरज असल्याचे नमूद करुन सदर तक्रार ही गुंतागुंतीची असल्याचे दिवाणी स्वरुपाची असल्याचे नमूद केले आहे. आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे संपूर्ण म्हणणे नाकारले असून तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 6. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.23.12.2010 रोजी आली असता तक्रारकर्ते व गैरअर्जदार क्र. 1 व 2 याचे वकीलांनी हजर होऊन युक्तीवाद केला. तसेच मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 7. तक्रारकर्ता क्र. 1 अशोक सातपुते व तक्रारकर्ता क्र. 2 हेमंत सातपुते यांचे बचत खाते गैरअर्जदार क्र. 1 यांचे संस्थेत होते व त्यांचा क्रमांक हा AF-7456, AG-0799 व AF-6096, AF-9721 होता ही बाब तक्रारर्ते व गैरअर्जदार क्र. 1 यांच्या कथनावरुन व दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. म्हणून तक्रारकर्ते गैरअर्जदार क्र. 1 चे ग्राहक ठरतात. तसेच गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 1 चा प्रतिनीधी आहे ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते व तक्रारकर्त्यांचे खाते गैरअर्जदार क्र. 2 द्वारा गैरअर्जदार क्र. 1 कडे उघडले होते. गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 1 चा प्रतिनीधी असल्याने तक्रारकर्त्याकडून रकमा घेऊन त्या गैरअर्जदार क्र. 1 कडे जमा करीत होता. त्याप्रित्यर्थ गैरअर्जदार क्र. 2 ला कमिशन मिळत होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 हा अप्रत्यक्षपणे तक्रारकर्त्यांना सेवा प्रदान करीत असल्याने व त्याबाबत माध्यमातून त्याला कमिशन मिळत असल्याने ग्रा.सं.का.चे कलम 2 (1) (0) अंतर्गत तक्रारकर्ते हे त्याचे ग्राहक ठरतात असे मंचाचे मत आहे. 8. सदर प्रकरणामध्ये मा. राज्य ग्राहक आयोगाने तक्रार पुनः विचारार्थ पाठविल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 ला विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ट करण्यात आले व त्यांनी नंतर लेखी उत्तर दाखल केले. त्यानंतर मंचाने अशोक सातपुते ह्यांच्या सह्या विशेष तज्ञांच्या अहवालाकरीता The State Examinar of Documents C.I.D.M.S. Nagpur ह्यांच्याकडे पाठविले. त्यांनी 29.03.2010 रोजी अहवाल तयार केला व तो मंचास 30.10.2010 रोजी मिळाला. सदर अहवालानुसार तक्रारकर्ता क्र. 1 यांच्या अधिकारपत्रावरील सह्या (Q-1) व भुगतान प्रमाणकावरील सह्या (Q-2) तसेच तक्रारकर्ता क्र. 2 यांच्या अधिकारपत्रावरील सह्या (Q-3) व भुगतान प्रमाणकावरील सह्या (Q-4) आणि वास्तविक तक्रारकर्त्याच्या असलेल्या सह्या यामध्ये साम्य नसल्याचे विशेष तज्ञांचे अहवालात नमूद केले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या उत्तरामध्ये घेतलेले बचावात्मक कथन अमान्य करण्यात येते. कारण गैरअर्जदार क्र. 1 आपल्या उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 यांना अधिकार पत्र दिले होते व त्या आधारे गैरअर्जदार क्र. 2 यांना रक्कम देण्यात आली. परंतू प्रत्यक्षात पाहिले असता केले असता अधिकारपत्रावरील स्वाक्ष-या व तक्रारकर्त्यांच्या स्वाक्ष-या यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास येते आणि यावरुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 ला अधिकार पत्र दिल्याचे स्पष्ट होत नाही. तक्रारकर्त्यांच्या स्वाक्ष-यांची शहानीशा न करता गैरअर्जदार क्र. 1 यांनी रक्कम अदा केलेली आहे. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असल्याचे व निष्काळजीपणा असल्याचे मंचाचे मत आहे. 9. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या नावे करारनामा लिहून दिलेला आहे. सदर करारनाम्यामध्ये गैरअर्जदार क्र. 2 ने मान्य केले आहे की, त्यांच्या हाताने चुकी झाली असून ते तक्रारकर्त्यांना रक्कम परत करण्यास तयार आहे. परंतू अद्यापही रक्कम परत केलेली नाही. सदर दस्तऐवज तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 6 म्हणून दाखल केलेले आहे. सदर दस्तऐवजांच्या वैधतेबद्दल गैरअर्जदाराने कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याने तो ग्राह्य धरण्यात येतो. यावरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्यांची रक्कम परस्पर उचलली आहे व ती उचलीत असतांना गैर मार्गाचा अवलंब केला. परंतू अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र. 1 ची जबाबदारी होती की, अधिकार पत्रावरील स्वाक्ष-या तपासणे. जर त्यात साम्य नव्हते तर त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 ला तक्रारकर्त्याची रक्कम द्यावयास पाहिजे नव्हती. तक्रारकर्ते एक ग्राहक असून त्यांना न्यायोचित संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांची रक्कम त्यांना परत मिळणे गरजेचे आहे. त्याकरीता या प्रकरणी दोन्ही गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना रु.95,100/- ही त्यांची रक्कम दि.14.08.2007 पासून म्हणजेच सुरुवातीला तक्रार दाखल केल्यापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह देणे आवश्यक आहे व ते न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. 10. गैरअर्जदाराने केलेल्या कृतीमुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून तक्रारकर्ता क्र. 1 यांना रु.5,000/- व तक्रारकर्ता क्र. 2 यांना रु.5,000/- ही रक्कमसुध्दा दोन्ही गैरअर्जदारांनी द्यावी असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/-गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना द्यावे. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ता क्र. 1 यांना रु.43,300/- व तक्रारकर्ता क्र. 2 यांना रु.51,800/- असे एकूण रु.95,100/- तक्रारकर्त्यांना द्यावे. सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच दि.14.08.2007 पासून तर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ता क्र. 1 यांना रु.5,000/- व तक्रारकर्ता क्र. 2 यांना रु.5,000/- मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईबाबत द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने रु.5,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |