(पारीत दिनांक : 26 एप्रिल, 2019)
आदेश पारीत व्दारा - श्री अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य -
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम – 12 अंतर्गत विरुध्दपक्षाने दिलेल्या सेवेतील त्रुटीसंबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याच्या कथनानुसार तक्रारकर्ता हा वेस्टर्न कोल फिल्ड, उमरेड येथे नोकरी करतो आणि तेथील कॉलनीच रहिवासी आहे. विरुध्दपक्षाकडून दिनांक 15.9.2015 रोजी अॅक्वा गार्ड वॉटर फिल्टर रुपये 17,490/- देऊन खरेदी केला, त्याचा इनवाईस नं.26263667, चालान नं.26263667, ऑर्डर नं.106051946 असुन ग्राहक क्रं.1012325827 असा आहे. तक्रारकर्त्याच्या घरी लावलेला अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर योग्य प्रकार काम करीत नव्हता आणि पाणी फिल्टर होण्यासाठी जास्त कालावधी लागत होता, त्यामुळे विरुध्दपक्षाकडे व त्याच्या मुख्यालयाकडे तक्रारी केल्या. विरुध्दपक्षाने तक्रार निवारण करण्याचे आश्वासन दिले, परंतु कुठलीच कार्यवाही केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पैसे परत देण्याची मागणी केली. त्यानंतर, विरुध्दपक्षाने त्यांच्या प्रतिनिधीला तपासणीकरीता पाठविले आणि विवादीत अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर परत जमा करण्यास सांगितले व तक्रारकर्त्याचे पैसे परत देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पत्र पाठवून अॅक्वागार्ड फिल्टर तक्रारकर्त्याच्या घरुन घेऊन जाण्याची मागणी केली व अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर विरुध्दपक्षाकडे जमा केला नाही. वकीला मार्फत नोटिस पाठवून प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल केली. तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर खरेदी दिलेले रुपये 17,490/- व्याजासह, तसेच तक्रारकर्त्याच्या सुट्टीमुळे झालेले पगाराचे नुकसान व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या समर्थनार्थ 10 दस्तऐवज दाखल केले.
3. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्दपक्षांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्षाने लेखीउत्तर दाखल करुन प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष चालविण्याचा अधिकार नसल्याचा प्राथमिक आक्षेप नोंदविताना प्रस्तुत तक्रार केवळ पैसे वसुलीचा दावा असल्याने दिवाणी स्वरुपाचा दावा मंचासमोर चालविण्या योग्य नसल्याचे निवेदन दिले. पुढे परिच्छेदनिहाय् उत्तर देतांना उभय पक्षात झालेला व्यवहार मान्य केला. पुढे वॉटर फिल्टर लावल्यानंतर 5 ते 6 महिने तक्रारकर्त्याची कुठलिही तक्रार नव्हती आणि तक्रारकर्त्याच्या तक्रारीबद्दल प्रतिनिधीने निरिक्षण केल्यानंतर दिलेल्या अहवालानुसार वॉटर फिल्टर योग्य प्रकारे काम करीत होते, परंतु त्याला पाणीपुरवठा करणा-या टाकीची उंची कमी असल्याने पाण्याचा आवश्यक दबाव मिळत नसल्यामुळे पाणी फिल्टरेशन कमी प्रमाणात होत असल्याचे निर्देशनास आले, त्यासाठी तक्रारकर्त्याला एक छोटा पंप लावण्याचा सल्ला देखील देण्यात आला, परंतु तक्रारकर्ता पंप लावण्यास तयार नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीचे निवारण झाले नाही. त्यानंतर वॉटर फिल्टर वॉरंटी कालावधीत असल्यामुळे कंपनीच्या धोरणानुसार वॅट कर कपात करुन पैसे परत करण्याची तयारी दर्शविली, तसेच अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर सात दिवसांचे आत विरुध्दपक्षाच्या कार्यालयात जमा करण्याचे कळविले होते. तक्रारकर्त्याने कुठलिही कार्यवाही न करता प्रस्तुत तक्रार दाखल केल्याने विरुध्दपक्षाच्या सेवेत त्रुटी नसल्याचे निवेदन देत प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली आहे.
4. तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल करुन तक्रारीतील कथनाचा पुर्नःउच्चार करीत विरुध्दपक्षाचे म्हणणे नाकबुल केले. तसेच, वॉटर फिल्टर तक्रारकर्त्याच्या घरुन घेवून जाण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची असल्याचे नमुद केले. विरुध्दपक्षाने कुठलिही कार्यवाही न केल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर होण्यास पात्र असल्याचे निवेदन दिले.
5. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा युक्तिवाद मंचाने ऐकला. विरुध्दपक्षाचे वकील युक्तिवादाचेवेळी गैरहजर राहिले. सदर प्रकरणी अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले, त्याप्रमाणे मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे देण्यात येतात.
// निष्कर्ष //
6. प्रस्तुत तक्रारीतील दाखल दस्तऐवज, चालान आणि डिलिवरी मेमो इत्यादी दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर दिनांक 15.9.2015 रोजी रुपये 17,490/- मध्ये खरेदी केल्याचे दिसते. तसेच सदर दस्तऐवज व वस्तुस्थिती विरुध्दपक्षाने मान्य केल्याचे दिसते. प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष चालविण्याचा अधिकार नसल्याचा प्राथमिक आक्षेप नोंदविताना प्रस्तुत तक्रार केवळ पैसे वसुलीचा दावा असल्याने दिवाणी स्वरुपाचा दावा मंचासमोर चालविण्या योग्य नसल्याचे निवेदन दिल्याचे दिसते. तक्रारकर्त्याची प्रस्तुत तक्रार ही अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर योग्य प्रकारे काम करीत नसल्याबद्दल व त्यानंतर विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रुटीबद्दलची दिसते. त्यामुळे विरुध्दपक्षाचा सदर आक्षेप बिनबुडाचा असल्याने फेटाळण्यात येतो तसेच मंचासमोर दाखल केलेली प्रस्तुत तक्रार ही ग्राहक सरंक्षण कायदा 1986, कलम 12 अन्वये असून ग्राहक सरंक्षण कायद्याच्या कलम-3 नुसार ग्राहकाला असलेला हक्क हा अतिरिक्त व दिवाणी स्वरुपाचा कायदेशिर हक्क आहे. वरील बाबींचा विचार करता उभय पक्षात ग्राहक, विक्रेता, सेवा पुरवठादार असा संबंध असल्याचे व तक्रार मंचाच्या अधिकार क्षेत्रात असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. तक्रार दस्तऐवज क्रं.5 नुसार दिनांक 9.3.2016 रोजी तक्रारकर्त्याने विवादीत वॉटर फिल्टर योग्यप्रकारे डिसेंबर 2015 पासुन योग्यप्रकारे काम करीत नसल्याबद्दल कळविल्याचे दिसते. त्यानंतर दस्तऐवज क्रं.6 नुसार दि. 27.06.2016 रोजीच्या पत्राद्वारे विरुध्दपक्षाने वॉटर फिल्टर परत जमा करण्याबद्दल व पैसे परत करण्यास विरुध्दपक्ष तयार असल्याबद्दल तक्रारकर्त्याला कळविल्याचे दिसते. तक्रारीसोबत दाखल दस्तऐवज क्रं. 2 नुसार वॉरंटी अटी व शर्ती मधील अट क्रं.1 नुसार 12 महिन्याचे वॉरंटी कालावधीत वॉटर फिल्टर नादुरुस्त झाल्यास कंपनी प्रतिनिधी पाठवून तक्रारकर्त्याचे घरी वॉटर फिल्टर दुरुस्त करुन देण्याची तरतुद होती पण वॉटर फिल्टर बदलीसाठी कंपनी कार्यालय/सेवा केंद्रात तक्रारकर्त्याला मुळ बिलासह जमा करणे आवश्यक होते, परंतु तक्रारकर्त्याने तसे न करता कंपनीला पत्र पाठवून वॉटर फिल्टर घेवून जाण्याची विनंती केल्याचे दिसते. तसेच दिनांक 15.9.2015 रोजी वॉटर फिल्टर स्थापित करून सुरू केल्यानंतर दिनांक 19.3.2016, जवळपास सहा महिनेपर्यंत तक्रारकर्त्याने कुठलीही तक्रार केल्याचे दिसत नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच वॉटर फिल्टरमध्ये उत्पादन अथवा अन्य दोष असल्याबाबत कुठलाही मान्य करण्यायोग्य पुरावा मंचासमोर सादर केला नाही. विरुध्दपक्षाने पाणीपुरवठा करणा-या टाकीची उंची कमी असल्याने पाण्याचा आवश्यक दबाव मिळत नसल्यामुळे पाणी फिल्टरेशन कमी प्रमाणात होत असल्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण पुर्णपणे अमान्य करण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे कारण सदर वस्तुस्थिती नाकारण्यासाठी तक्रारकर्त्याने कुठलेही निवेदन अथवा पुरावा मंचासमोर सादर केला नाही. वॉरंटी अटी व शर्ती मधील अट क्रं.1 व विरुध्दपक्षाच्या पत्रानुसार जर तक्रारकर्त्याने अॅक्वागार्ड वॉटर फिल्टर विरुध्दपक्षाकडे जमा केले असते तर त्याला पैसे परत मिळाले असते आणि प्रस्तुत वाद वॉरंटी कालावधीत तेव्हाच संपला असता. परंतु, तक्रारकर्त्याने आवश्यक कार्यवाही न करता प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे दिसते त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याची जबाबदार पार पडली नसल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दि. 15.09.2015 ते 09.03.2016 दरम्यान तक्रार केली नसल्याचे व वॉटर फिल्टरचा वापर केल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने आजतागायत विवादीत वॉटर फिल्टर विरुध्दपक्षाकडे जमा केल्याचे दिसत नाही आणि विरुध्दपक्षाच्या सल्ल्यानुसार पाणीपुरवठा करणा-या टाकीची उंची बाबत उपाययोजना करून त्याचा वापर केल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो.
- आदेश –
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.
3) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.