( आदेश पारित द्वारा- श्रीमती अलका पटेल -मा सदस्या)
आदेश
(पारीत दिनांक –15 डिसेंबर, 2012 )
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रुटीबाबत या मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे
2. तक्रारकर्ता हा पाटणसावंगी येथील रहीवासी असून शेतकरी आहे. दिनांक 29/6/2011 रोजी विरुध्द पक्ष क्रं.1 नागपूर डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक शाखा, पाटणसावंगी येथील भारतीय जीवन विमा निगमतर्फे प्राप्त रक्कम रु.31528/- चा धनादेश क्रं.0437 तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा केला नाही. सदर धनादेश बँक ऑाफ इंडिया गडचिरोली शाखेचा होता व 29/9/2011 पर्यत जमा झाला नव्हता. तक्रारकर्ता यांनी दिनांक 29/9/2011 रोजी विरुध्द पक्ष क्रं.1 यांना पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणुन त्यांनी मुख्य शाखा, नागपूर येथे व्यवस्थापकाकडे संपर्क साधला असता, त्यांनी विरुध्द पक्ष क्रं.1 ला निर्देश दिल्यानंतर धनादेश तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा करण्यात आला.
3. तक्रारकर्ता यांचा धनादेश वटविण्याकरिता तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे, सदर कालावधीतील व्याज विरुध्द पक्ष यांचे कडुन मिळावे. तसेच तक्रारकर्ता हा शेतकरी आहे. सदर धनादेशाची रक्कम शेतीच्या कामासाठी वेळेवर उपयोगी आली नाही. तक्रारकर्त्याला कर्ज घेवुन खर्च करावा लागला, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे रु.25,000/- चे नुकसान झाले व मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला, म्हणुन तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन दिनांक 29/6/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 कडे जमा केलेल्या धनादेशाची रक्कम रु.31528/- वर तो वटविल्याच्या दिनांकापर्यंत व्याज मिळावे. तक्रारकर्त्याने घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम मिळावी. नुकसानीसाठी रुपये 25,000/- शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
4. तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तावेज दाखल करण्याच्या नुसार एकुण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. सदर तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दस्तऐवजासह दाखल केला.
6. विरुध्द पक्ष क्रं.1 आपल्या लेखी जवाबात नमुद करतात की, तक्रारकर्त्याने दिनांक 29/6/2011 रोजी धनादेश क्रं. 047374 दिनांक 25/5/2011 बँक ऑफ इंडिया , गडचिरोली रु.31528/- विरुध्द पक्ष क्रं.1 कडे वटविण्याकरिता जमा केला. सदर धनादेश विरुध्द पक्ष क्रं.1 ने दिनांक 30/6/2011 रोजी तयार करुन बिल क्रं.433 नुसार विरुध्द पक्ष क्रं.2 बँक ऑफ इंडिया, गडचिरोली यांना रजिस्टर पोस्टाने दिनांक 6/7/2011 रोजी पाठविण्यात आला व त्यांना तो प्राप्त झाला. विरुध्द पक्ष क्रं.1 म्हणतात की, विरुध्द पक्ष म्हणतात की, त्यांनी विरुध्द पक्ष क्रं.2 दिनांक 12/8/2011 रोजी पत्राद्वारे सदर धनादेश वटविण्याबाबत विचारण्यात आले तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्वरीत डी.डी. पाठवावे अशी विनंती केली. नंतर दिनांक 30/9/2011 व दिनांक 4/10/2011 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 2 ला स्मरण पत्र पाठविले आहे.
7. दिनांक 11/10/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 बँक ऑफ इंडिया, गडचिरोली दिनांक 13/7/2011 च्या पत्रासोबत रु.31,478/- चा डी.डी. सुध्दा मिळाला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिनांक 30/6/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पाठविलेल्या पत्र मिळाल्याचे मान्य केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रं.2 यांनी पाठविलेल्या पोस्टाच्या लिफाफ्यावर शिक्का दिनांक 11/10/2012 रोजीचा आहे हे स्पष्ट दिसुन येते. डि.डि.मिळताच दिनांक 12/10/2011 रोजी नागपूर येथील मुख्यालयात पाठविण्यात आला व दिनांक 15/10/2012 रोजी तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.
8. विरुध्द पक्ष क्रं.1 म्हणतात की, त्यांनी आपले काम लवकर केले. तसेच वि.प.क्र. 2 ला अनेकवेळा पत्र पाठवून धनादेशाच्या क्लीयरंस (आदरित) करण्याबाबत विचारणा केली आहे. त्यांचा त्यात दोष किंवा सेवेत त्रुटी नाही. त्यांच्या विरोधात तक्रार खारीज करण्यात यावी व त्यांना झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई तक्रारकर्त्यावर लादण्यात यावी. वि.प.क्र. 1 यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ एकूण 14 दस्त दाखल केले आहेत.
9. वि.प.क्र.2 आपल्या लेखी जवाबात म्हणतात की, वि.प.क्र. 1 यांनी सदर धनादेश वि.प.क्र.2 कडे सादर केल्या बरोबर, त्यांनी योग्य कार्यवाही करुन धनादेशाची रक्कम वि.प.क्र.1 कडे पाठविली आहे. लेजर सोबत जोडलेले आहे. दि.13.07.2011 रोजीच वि.प.क्र. 2 यांनी योग्य कार्यवाही केली आहे. दि.29.09.2011 धनादेशाची रक्कम जमा होण्यास झालेल्या विलंबामध्ये त्यांचा दोष नाही. दि.13.07.2011 रोजी व्हाऊचरवर शिक्का मारलेली धनादेशाची प्रत संलग्न आहे. या प्रकरणात धनादेशाची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा होण्यास विलंब वि.प.क्र.2 च्या त्रुटीमुळे अमान्य आहे व तक्रारकर्त्याला झालेला नुकसान व शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी जबाबदार नाही. तक्रारकर्त्याची सदर तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
10. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, दस्तऐवज तसेच युक्तिवादाच्या वेळी तपासणी साठी दोन्ही पक्षांनी उपस्थित केलेले मुळ दस्तऐवज यांचे बारकाईने अवलोकन केले. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होते.
-कारणे व निष्कर्ष-
11. तक्रारकर्त्याला दि.23.05.2011 ला भारतीय जिवन विमाकडून मिळालेला धनादेश क्र. 047374 रु.31528/- बँक ऑफ इंडिया, गडचिरोलीचा होता. त्यांनी 29.06.2011 ला वि.प.क्र.1 नागपूर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक, पाटणसावंगी येथे सदर धनादेश वटविण्याकरीता जमा केला व वि.प.क्र.1 द्वारा दि.06.07.2011 रोजी वि.प.क्र.2 कडे क्लीयरींगसाठी पाठविला व त्यांना मिळाला आहे. त्यांनी या कालावधीत तक्रारकर्त्याला वि.प.कडून नुकसान भरपाई अपेक्षित आहे. तसेच त्यांनी या काळात घेतलेल्या कर्जावर व्याजाची रक्कम वि.प. यांनी द्यावी अशी मागणी केली आहे. परंतू त्याबद्दल त्याबद्दल पुरावा त्यांचा स्वतःच्या नावे कर्ज नसून त्याचा भावाच्या नावे आहे, रेकॉर्डवर दाखल दस्तऐवजावरुन दिसते, म्हणून त्यावर विचार करण्यास मंचास रास्त वाटत नाही. सदर धनादेश वि.प.क्र.1 यांनी वेळेवर वि.प.क्र.2 कडे पाठविले आहे व वारंवार विचारणा केली आहे, म्हणून त्यांचा दोष किंवा त्रुटी नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प.क्र. 2 च्या कार्यवाहीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे तक्रारकर्त्याला रक्कम मिळण्यास काही दिवसाचा विलंब झाला व त्यामुळे तक्रारकर्त्याला मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली, व शारिरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणून सदर खर्च मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र.1 यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
3) वि.प.क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला शारिरिक, मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी
रुपये रु.2,000/- द्यावे.