-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक- 22 जुन, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, महाराजा टॉवर्स, 387/5, क्रिडाचौक, हनुमान नगर, नागपूर-440009 नोंदणी क्रं-NGP/CTY/ISR/CR/705/1996 या सहकारी संस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष नागमित्र नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष हे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक आहेत.
तक्रारकर्त्याने सदर पतसंस्थे मध्ये मुदतीठेव पावती व्दारे “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे पुढील प्रमाणे रक्कम गुंतवली-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | तक्रारकर्त्याचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | कालावधी | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | व्याजाचा दर | Remarks |
1 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | |
1 | DNYANESHWAR MAROTRAO WAGHDARE | FDR/ 006827 | 30/07/2009 To 30/08/2010 | 3,00,000/- | वार्षिक-12% | Dhanvantari Yojana |
| | | | | | |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, ठेवी वरील मासिक व्याज त्याच्या खात्यात जमा होत होते परंतु सप्टेंबर-2009 पसून विरुध्दपक्ष पतसंस्थेनी मासिक व्याज त्याच्या खात्यात जमा करणे बंद केले, विचारणा केली असता मुदत ठेव देय दिनांकाला देण्यात येईल असे विरुध्दपक्ष संस्थे तर्फे त्याला सांगण्यात आले. त्याला पैशाची अत्यंत गरज असल्याने त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये रकमेची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली, व्यवस्थापकाने असेही सांगितले की, संचालक मंडळ बरखास्त झाले असून संस्थेवर आता प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे रक्कम परत मिळणार नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास होत आहे तसेच तो जेष्ठ नागरीक आहे.
म्हणून त्याने सदर तक्रार दाखल करुन विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षानां त्याची पतसंस्थेत जमा रक्कम रुपये-3,00,000/- वार्षिक 12 टक्के दराने व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे.
(02) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-20,000/- देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर तर्फे अध्यक्ष श्री चंद्रकांत पु. गाते, उपाध्यक्षा कु.सिमा कृष्णराव आसरे, सर्वश्री संदिप आनंदराव मस्के, रत्ना पुरुषोत्तम गाते, प्रविण गोपाळराव चांदेकर, श्रावण वसंतराव डोमळे, विनोद नामदेवराव डांगोरे, प्रशांत नारायणराव सोनकुसळे आणि श्रीमती शेवंताबाई यादवराव मराठे विरुध्दपक्ष पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक वृंद यांनी एकत्रित लेखी निवेदन ग्राहक मंचा समोर दाखल केले. त्यांचे निवेदना नुसार सदर पतसंस्थेचे माजी संचालक यांनी आर्थिक अफरातफर केलेली असून आणि संस्थेचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बंद असल्याने नवनिर्वाचित संचालकांची ठेवी परत करण्याची सद्दस्थिती नाही. मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी पतसंस्थेच्या आर्थिक गैरकारभारा संबधाने चौकशी करुन अहवाल दिनांक-31 मे, 2011 रोजी सादर केला, त्यांचे अहवाला नुसार संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे आणि संस्थेचे इतर संचालक यांनी संस्थेच्या कार्यकाळात वेगवेगळया प्रकारचा अवलंब करुन संस्थेत असलेल्या रकमेची अफरातफर केली. तसेच संस्थेचे फेर लेखापरिक्षण जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्री यशवंत बागडे यांचे मार्फत करण्यात आले त्यांच्या अहवाला नुसार संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे यांनी आर्थिक गैरव्यवहार करुन एकूण अकरा कोटी त्रेचाळीस लक्ष बहात्तर हजार सदुसष्ट रुपये एवढया मोठया रकमेची अफरातफर केल्याने संस्था आर्थिक अडचणीत आलेली आहे. तसेच लेखा परिक्षण अहवाला नुसार
जबाबदार संचालक सदस्यांवर कार्यवाही करण्या करीता श्री झेड.डी.शेंडे, सेवानिवृत्त न्यायाधिश सहकार यांची नियुक्ती झालेली असून चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून चौकशी अहवाल प्राप्त होताच अफरातफर रकमेची वसुली माजी अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे आणि संस्थेचे इतर संचालक विरुध्द करण्यात येईल व ठेवीदारानां टप्प्या टप्प्याने रक्कम परत करण्यात येईल. निवडणूक ही दिनांक-30/05/2015 रोजी झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळ व पदाधिकारी यांना दिनांक-14.10.2015 रोजी संस्थेचे प्रशासक श्री बेदरकर यांनी पदभार दिला, त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या मुदतीठेवीचे व्यवहाराशी नविन संचालक मंडळाचा संबध येत नाही. संस्थेच्या काही ठेवीदारांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई नागपूर खंडपिठ येथे रिट पिटीशन दाखल केलेली आहे. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-9) सतिश रामजी आष्टनकर यांनी लेखी उत्तर सादर केले, त्यांचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष संस्थे मध्ये मुदती ठेवी व्यवहारा बाबत त्यांना माहिती नाही. त्यांना संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती नाही. संस्थेच्या व्यवहारात ते कधीही सहभागी नव्हते. तक्रारकर्त्याची तक्रार मुदतबाहय झालेली आहे, तक्रार दिवाणी स्वरुपाची असल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये मुदतीठेव पावतीची प्रत, विरुध्दपक्ष संस्थे विरुध्द वृत्तपत्रातून छापून आलेल्या बातमिचे कात्रण अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे तसेच प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे लेखी युक्तीवाद व चौकशी अहवालाचे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
07. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजाच्या प्रती आणि वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
08. विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष हे सदर पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक आहेत. विरुध्दपक्षांचे लेखी उत्तरा नुसार संस्थेची निवडणूक ही दिनांक-30/05/2015 रोजी झाली आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी दिनांक-14.10.2015 रोजी संस्थेचे प्रशासक श्री बेदरकर यांचे कडून पदभार स्विकारला.
09. तक्रारकर्त्याने मुदत ठेव रक्कम रुपये-3,00,000/- ही विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये दिनांक 30/07/2009 ते दिनांक-30/08/2010 या कालावधीत गुंतविली होती आणि विरुध्दपक्षांचे लेखी उत्तरा नुसार ते त्यावेळी सदर पतसंस्थे मध्ये पदाधिकारी नव्हते. विरुध्दपक्ष यांनी असेही नमुद केले की, सदर पतसंस्थेचे माजी संचलक यांनी आर्थिक अफरातफर केली असल्याने मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी पतसंस्थेच्या आर्थिक गैरकारभारा संबधाने चौकशी करुन अहवाल दिनांक-31 मे, 2011 रोजी सादर केला, त्यांचे अहवाला नुसार संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे आणि संस्थेचे इतर संचालक यांनी संस्थेत असलेल्या रकमेची अफरातफर केली. तसेच संस्थेचे फेर लेखापरिक्षण जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्री यशवंत बागडे यांचे मार्फत करण्यात आले त्यांच्या अहवाला नुसार संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे यांनी एकूण अकरा कोटी त्रेचाळीस लक्ष बहात्तर हजार सदुसष्ट रुपये एवढया मोठया रकमेची अफरातफर केल्याने संस्था आर्थिक अडचणीत आलेली आहे. तसेच लेखा परिक्षण अहवाला नुसार जबाबदार संचालक सदस्यांवर कार्यवाही करण्या करीता श्री झेड.डी.शेंडे, सेवानिवृत्त न्यायाधिश सहकार यांची नियुक्ती झालेली असून
चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून चौकशी अहवाल प्राप्त होताच अफरातफर रकमेची वसुली माजी अध्यक्षा सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे व उपाध्यक्ष लालेंद्र सिताराम मेहरकुरे आणि संस्थेचे इतर संचालक विरुध्द करण्यात येईल व ठेवीदारानां टप्प्या टप्प्याने रक्कम परत करण्यात येईल.
10. विरुध्दपक्षानीं आपल्या उपरोक्त म्हणण्याचे पुष्टयर्थ्य विरुध्दपक्षानीं संस्थेचे प्रशासक श्री डी.के.बेदरकर यांनी संस्थेला दिलेल्या नोटीसची प्रत, श्री राजेंद्र दाभेराव, उपनिबंधक, सहकारी संस्था नागपूर शहर यांचे चौकशी अहवाला प्रमाणे सौ. मंगला लालेंद्र मेहरकुरे, अध्यक्ष तसेच श्री लालेंद्र सिताराम मेहरकुरे, उपाध्यक्ष यांनी केलेल्या अपहारा संबधाने वसुलीपात्र रकमेचे तपशिलाचे विवरण सुध्दा दाखल केलेले आहे. त्याच बरोबर विरुध्दपक्ष पतसंस्थेचे फेर लेखा परिक्षण श्री वाय. एस. बागडे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था नागपूर यांनी केले असून त्याचा कालावधी दिनांक-01/04/2006 ते दिनांक-31/03/2009 असा असून लेखा परिक्षण अहवाल दिनांक-26/03/2012 रोजीचा असून त्याची प्रत दाखल केलेली आहे.
11. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतीउत्तरात विरुध्दपक्षा तर्फे दिलेल्या लेखी उत्तरावर काहीही भाष्य केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी संबधाने जो व्यवहार केलेला आहे, ती मुदतठेव दिनांक 30/07/2009 ते दिनांक-30/08/2010 या कालावधीत ठेवलेली आहे आणि त्या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे सौ. मंगला लालेंद्र मेहरकुरे तसेच श्री लालेंद्र सिताराम मेहरकुरे होते व विरुध्दपक्षां तर्फे दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रती वरुन विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये जे काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत त्याची चौकशी श्री राजेंद्र दाभेराव, उपनिबंधक, सहकारी संस्था नागपूर शहर यांनी केलेली असून त्यांचे चौकशी अहवाला प्रमाणे सौ. मंगला लालेंद्र मेहरकुरे, अध्यक्ष तसेच श्री लालेंद्र सिताराम मेहरकुरे, उपाध्यक्ष यांनी केलेल्या अपहारा संबधाने वसुलीपात्र रकमेचे तपशिलाचे विवरण सुध्दा दाखल केलेले आहे, त्या अहवाला नुसार सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे, अध्यक्ष तसेच
श्री लालेंद्र सिताराम मेहरकुरे, उपाध्यक्ष यांनी विरुध्दपक्ष पतसंस्थेत एकूण अकरा कोटी त्रेचाळीस लक्ष बहात्तर हजार सदुसष्ट रुपये एवढया मोठया रकमेची अफरातफर केल्याचे नमुद केलेले आहे.
12. मंचाचे मते विरुध्दपक्षां तर्फे सविस्तर लेखी उत्तर आणि पुराव्यार्थ लेखी दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्या नंतर विरुध्दपक्ष पतसंस्थेचे तत्कालीन माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे सौ.मंगला लालेंद्र मेहरकुरे तसेच श्री लालेंद्र सिताराम मेहरकुरे यांनी संस्थेत अपहार केल्याची बाब जरी समोर येत असली तरी त्या बाबीशी तक्रारकर्त्याचा काहीही संबध येत नाही याचे कारण असे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदतठेव म्हणून रक्कम गुंतविलेली आहे कोण्या पदाधिका-याकडे पाहून त्याने रक्कम गुंतवणूक केलेली नाही म्हणून विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तीचे कार्यरत पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळ यांचेवर त्याने गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत करण्याची जबाबदारी येते. विरुध्दपक्ष पतसंस्था ही अपहार करणा-या दोषी व्यक्तीं विरुध्द कारवाई करण्यास मोकळी आहे, त्या अंतर्गत बाबीशी तक्रारकर्त्याचा काहीही संबध येत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही विरुध्दपक्ष पतसंस्था आणि कार्यरत तिचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री ज्ञानेश्वर मारोतराव वाघदरे यांची तक्रार विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, महाराजा टॉवर्स, 387/5, क्रिडाचौक, हनुमान नगर, नागपूर-440009 ही पतसंस्था आणि तिचे कार्यरत पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच कार्यरत संचालक मंडळ यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर आणि तिचे कार्यरत पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थेत गुंतवणूक केलेली रक्कम रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त) गुंतवणूक केल्याचा दिनांक-30/07/2009 पासून ते रकमेच्य प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह परत करावी.
(03) विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर आणि तिचे कार्यरत पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर आणि तिचे कार्यरत पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.