मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार , सदस्य. //- आदेश -// (पारित दिनांक – 27/09/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदार संस्थेच्या दामदुप्पट ठेव योजनेत खालीलप्रमाणे रकमा मुदत ठेवी अंतर्गत गुंतविल्या होत्या व सदर रकमांवर गैरअर्जदाराने आकर्षक व्याज देण्याचे आश्वासन तक्रारकर्त्याला दिलेले असल्याने तक्रारकर्त्याने दीर्घ मुदतीत रकमा गुंतविल्या होत्या. दि.13.12.2008 रोजी रु.2,00,000/- व दि.12.01.2009 रोजी रु.2,00,000/- 13 महीनेकरीता गुंतविल्या होत्या. या दीर्घ ठेवीवर 12 टक्के गैरअर्जदार मासिक व्याज तक्रारकर्त्याच्या एजंटचे खात्यात जमा होते व एजंट हा तक्रारकर्त्याला सदर व्याज देत होता. सप्टेंबर 2009 पासून तक्रारकर्त्याला व्याज न मिळाल्यामुळे त्याने एजंटकडून चौकशी केली असता गैरअर्जदार संस्थेने एजंटच्या खात्यात जमा केले नव्हते व सदर संस्था अडचणीत असल्यामुळे व्याज देण्यात आले नाही असे कळविले. संस्थेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारकर्त्याने मुदत ठेवी या परीपक्व होण्यापूर्वी परत मागितल्या असता गैरअर्जदाराने संचालक मंडळ बरखास्त झाले व संस्थेच्या रकमेची अफरातफर झाल्याने संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली असे सांगितले. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदार संस्थेने आश्वासित केलेले व्याज न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे, म्हणून त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, एकूण रक्कम रु.4,00,000/- व त्यावरील नियमित व्याज, शारिरीक त्रास, आर्थिक नुकसान व इतर खर्चाबाबत रकमेची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 वर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा मंचाने त्यांना वारंवार संधी देऊनही तक्रारीस लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द दि.01.09.2010 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता दि.17.09.2010 रोजी आले असता तक्रारकर्त्याने पुरसिस दाखल करुन त्यांची तक्रार हाच त्यांचा युक्तीवाद समजण्यात यावा असे नमूद केले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व त्यापुष्टयर्थ दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने गैरअर्जदार संस्थेकडे दस्तऐवज क्र. 1 व 2 वरुन दि.13.12.2008 व दि.12.01.2009 रोजी तक्रारकर्त्याने गैरअर्जदार संस्थेकडे प्रत्येकी रु.2,00,000/- ची ठेव ठेवून मासिक व्याज 12 टक्केप्रमाणे 13 महिन्यांकरीता गुंतविल्या होत्या. सदर व्याज हे एजंटच्या खात्यामध्ये जमा होत होत व ते नंतर तक्रारकर्त्याला मिळत होते. या दस्तऐवजावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे स्पष्ट होते. 5. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जेव्हा सप्टेंबर 2009 पासून व्याज मिळाले नाही, तेव्हा त्याने अधिक चौकशी केली असता असे कळले की, गैरअर्जदार संस्थेत घोटाळे झालेले आहेत व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले आहे, म्हणून तक्रारकर्त्याने त्याची गुंतविलेली रक्कम परत मागितली. परंतू गैरअर्जदार संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले व रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने वारंवार रकमेची मागणी केलेली आहे. तसेच पोलिसांकडे याबाबतच तक्रारही केलेली आहे. परंतू गैरअर्जदार संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही. मंचाने दस्तऐवज क्र. 5 वरील संस्थेच्या आकर्षक ठेव योजना व त्यावरील देय व्याज यांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार संस्थेने मुदत ठेवीवर आकर्षक व्याज ग्राहकांना देण्याचे नमूद केलेले आहे. तसेच ठेव योजनेच्या प्रमाणपत्रावरही व्याज देण्याचे नमूद केलेले आहे. परंतू तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार व्याज तर देण्यात आलेच नाही व मागणी केल्यानंतर मुदत ठेवीची रक्कमही परत करण्यात आलेली नाही. मंचाचे मते आकर्षक व्याज देण्याचे आश्वासित करुन गैरअर्जदार संस्थेने तक्रारकर्त्याला मुदत ठेवीवर मासिक व्याज न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. तसेच गैरअर्जदार संस्थेत घोटाळे झाल्याने मुदत ठेवी प्रमाणपत्रानुसार रक्कम परत मागितल्यावरही तक्रारकर्त्याला त्याची रक्कम परत न करुन गैरअर्जदारांनी सेवा देण्यात निष्काळजीपणा केलेला आहे असे मंचाचे मत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षक प्रलोभने देऊन ठेव योजने अंतर्गत रकमा गुंतविण्यास भाग पाडणे व आश्वासित केलेले व्याज न देऊन गैरअर्जदार संस्थेने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याने वारंवार गैरअर्जदार संस्थेला भेटी देऊन व रकमेची मागणी केल्यानंतर गैरअर्जदारांनी रकमा परत केलेल्या नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रार नोंदविल्यानंतरही गैरअर्जदाराने रक्कम परत करण्याकरीता कोणतीही पावले उचलली नाहीत. मंचासमोर तक्रार दाखल झाल्यावर, मंचाने गैरअर्जदारांचे सदर तक्रारीवर काय म्हणणे आहे हे जाणण्याकरीता नोटीस बजाविली असता दोन्ही गैरअर्जदार प्रत्येक तारखेस सातत्याने गैरहजर होते. तसेच त्यांनी युक्तीवादही केला नाही किंवा मंचासमोर हजर होऊन तक्रारीबाबत आक्षेप घेतला नाही किंवा कागदपत्रासह तक्रारीतील मुद्ये नाकारले नाहीत किंवा तक्रारीतील तक्रारकर्त्याच्या अभीकथनावर आक्षेप नोंदविले नाही, म्हणून मंचाचे मते तक्रारकर्त्याने शपथपत्रावर व दस्तऐवजासह दाखल केलेली तक्रार सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. तक्रारकर्त्याने सदर गैरअर्जदार संस्थेवर प्रशासक नियूक्त करण्यात आल्याचे म्हटले आहे व त्यांनाही मंचाने नोटीस बजावलेली आहे. परंतू प्रशासकांनी संस्थेच्या कारभाराविषयी किंवा ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबत काहीही माहिती मंचासमोर आणलेली नाही. तक्रारकर्त्याच्या ठेवी परीपक्व झालेल्या आहेत. परंतू तक्रारकर्त्याला सदर रक्कम गैरअर्जदारांकडून मिळालेली आहे असे दिसून येत नाही. सकृतदर्शनी गैरअर्जदार ठेवीदारांच्या रकमा परत करण्याबाबत उदासीन असल्याने निदर्शनास येते. 7. मुदत ठेव प्रमाणपत्र क्र.FDR/006047 व मुदत ठेव प्रमाणपत्र क्र.FDR/006169 नुसार प्रत्येकी रु.2,00,000/- (एकूण रु.4,00,000/-) ही रक्कम सप्टेंबर 2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. 8. गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ता सदर त्रासाची क्षतिपूर्ती म्हणून रु.10,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदारांच्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याला मंचासमोर येऊन तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारीच्या खर्चाबाबत तक्रारकर्ता रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त विवेचनावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) मुदत ठेव प्रमाणपत्र क्र.FDR/006047 व मुदत ठेव प्रमाणपत्र क्र.FDR/006169 नुसार प्रत्येकी रु.2,00,000/- (एकूण रु.4,00,000/-) या रक्कमेवर सप्टेंबर 2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला द्यावे. 3) गैरअर्जदारांनी, तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची क्षतिपूर्ती म्हणून रु.10,000/- द्यावे. तक्रारीच्या खर्चाबाबत तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराने रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 5) तक्रारकर्त्याने, दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |