मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 29/11/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांच्या संस्थेमध्ये दि.16.03.2009 ला बचत खाते उघडले. सदर खाते क्र.एसबी/82, लेजर पृष्ठ क्र.9/82 असा आहे. सदर खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम रु.74,730/- काढण्यास तक्रारकर्ते गैरअर्जदार संस्थेकडे गेले असता त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने वारंवार तिनही गैरअर्जदारांना रक्कम देण्याची विनंती केली असता त्यांनी टाळाटाळ करुन आजतागायत सदर रक्कम तक्रारकर्त्याला परत केलेली नाही. तक्रारकर्त्याने मते गैरअर्जदार संस्था लोकांना आकर्षक आश्वासने लोकांना देत असून त्याची पूर्तता करीत नसल्याने ते अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे. म्हणून मंचासमोर तक्रार दाखल करुन रु.74,730/- ही रक्कम व्याजासह मिळावी, नुकसान भरपाई मिळावी, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत रक्कम मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा, सदर रकमांवर व्याज मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर प्रकरण मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला असता गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा त्यांनी लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.04.08.2010 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.20.11.2010 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला व प्रकरणात दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे बचत खाते गैरअर्जदाराकडे होते हे स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 5. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज पृष्ठ क्र.9 ते 12 वरुन तक्रारकर्त्याचे गैरअर्जदार पत संस्थेकडे रु.74,730/- बचत खात्यांतर्गत असल्याचे निदर्शनास येते. त्यावर संबंधित लिपिकाची स्वाक्षरीही आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने सदर रकमेची मागणी गैरअर्जदार पंतसंस्थेकडे केली असता त्यांनी देण्यास नकार दिला. मंचाचे मते तक्रारकर्त्याने स्वतःच्या बचत खात्यातील रक्कम मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्त्यास गैरअर्जदाराने द्यावयास पाहिजे होती. परंतू गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याच्याच बचत खात्यातील रक्कम देण्यास नकार देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने मंचासमोर तक्रार दाखल केल्यावर व मंचाचा नोटीस गेल्यावरही गैरअर्जदारांची तक्रारीस उत्तर दाखल केलेले नाही किंवा दस्तऐवजासह तक्रारकर्त्याची तक्रार खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार शपथपत्रावर व दस्तऐवजासह असलेली तक्रार सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याची बचत खात्यात जमा असलेली रक्कम रु.74,730/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार पतसंस्थेने सदर रक्कम आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्त्यास न दिल्यास तक्रार दाखल दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत गैरअर्जदार द.सा.द.शे.9 टक्के दंडनीय व्याज देण्यास बाध्य राहील. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावर गैरअर्जदार पतसंस्था गुंतवणुकीबाबत अनेक योजना राबवित असल्याचे व त्यावर आकर्षक व्याजाचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास येते. मात्र प्रत्यक्षात त्याची पूर्तता ते करीत नाही. यावरुन गैरअर्जदार पतसंस्था अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास येते. 6. गैरअर्जदाराने सदर रक्कम तक्रारकर्त्याला मागणी करुनही न दिल्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ता सदर त्रासाच्या भरपाईबाबत रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.74,730/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावे. सदर रक्कम 30 दीवसाचे आत परत न केल्यास तक्रार दाखल दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत गैरअर्जदार द.सा.द.शे.9 टक्के दंडनीय व्याज देण्यास बाध्य राहील. 3) तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाच्या भरपाईबाबत रु.5,000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने द्यावे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने तक्रारकर्त्याला तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |