तक्रारदारातर्फे अॅड. श्रीमती जयश्री कुलकर्णी हजर
जाबदेणार गैरहजर
द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(17/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील तक्रारदार हे त्यांच्या मालकीची स्कुटर “अॅक्टीव्हा” सिल्व्हर कलर, एम.एच. 12, सीसी – 5320, चासीस नं. 8360793, गाडी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी आणि सर्व्हिसिंगसाठी देत असत. दि. 1/4/2009 रोजी तक्रारदार यांनी त्यांची गाडी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे सर्व्हिसिंगसाठी दिलेली असताना, त्याच दिवशी जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदार यांची गाडी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे धुण्यासाठी दिली, ती गाडी धुऊन झालेवर बाहेर लावली असता 1.30 चे सुमारास त्यांच्या प्रिमायसेसमधून चोरीला गेल्याचे कळविले. तक्रारदार यांनी याबाबत जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरची गाडी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे वॉशिंगसाठी दिल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरच्या गाडी चोरीची एफ.आय.आर. कोंढवा पोलिस स्टेशन, पुणे मध्ये नोंदविली, परंतु अद्याप पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही वा पोलीस तपासात ती सापडली नाही. मे. ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट, वर्ग 1, लष्कर कोर्टकडे क्र. 70/09 चे चार्जशिट दाखल झाले. सदर गुन्हा कायम तपासावर घेऊन समरी वर्ग ‘अ' मध्ये समाविष्ट झाला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार यांच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेतील त्रुटीमुळे त्यांचे नुकसान झालेले आहे, म्हणून त्यांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून गाडीची किंमत रक्कम रु. 40,000/-, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 10,000/- व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदार यांनी या तक्रारीच्या कामी त्यांचे शपथपत्र, दि. 2/4/2009 रोजी पोलीसांकडे नोंदविलेली एफ.आय.आर.ची प्रत, श्री. मोहम्मद अली कांथालीया यांचे शपथपत्र, पोलीस तक्रारीचा अंतीम अहवाल रिपोर्ट, RTO रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, गाडी
ट्रान्सफर बाबतचे कागदपत्रे, लष्कर कोर्ट येथील मे. ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट, वर्ग 1 कडील आरोपपत्र क्र. 70/09ची कोर्ट आदेशाची प्रत आणि गाडीच्या इन्शुरन्सची इ. कागदपत्रे दाखल केली.
3] सदर प्रकरणी जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील व शपथपत्रातील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या :
सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे का? : होय
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई देण्यास जबाबदार आहेत का ? : होय
[क ] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
5] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे, विशेषत: तक्रारदारांनी दि. 2/4/2009 रोजी नोंदविलेल्या फिर्यादीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांची गाडी, हॉंन्डा अॅक्टीव्हा स्कुटर नं. एम.एच. -12, सी.सी.
5320, चासी नं. 8360793, इंजिन नं. 0370527, सिल्व्हर रंगाची गाडी, दि. 1/4/2009 रोजी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे सर्व्हिसिंगसाठी दिलेली होती व त्यांनी ती धुण्यासाठी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे सोपविली होती व सदर गाडी जाबदेणार क्र. 2 यांनी धुऊन बाहेर लावली असता तेथून ती त्याच दिवशी चोरीला गेली. यावरुन तक्रारदार यांनी त्यांची गाडी सर्व्हिसिंगसाठी जाबदेणार क्र. 1 यांच्या ताब्यात दिलेली होती हे स्पष्ट दिसून येते. सामान्यत:, जेव्हा एखादा ग्राहक त्याची गाडी सर्व्हिसिंग किंवा दुरुस्तीसाठी सर्व्हिसिंग सेंटर/गॅरेजकडे सोपवितो, तेव्हा गाडीच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही त्या सर्व्हिसिंग सेंटर/गॅरेजची असते. प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी त्यांची हॉंन्डा अॅक्टीव्हा स्कुटर जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे सर्व्हिसिंगसाठी दिलेली होती त्यामुळे तीच्या सुरक्षेची जबाबदारी ही जाबदेणार क्र. 1 यांची होती. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 1 यांनी सदरची गाडी ही जाबदेणार क्र. 2 यांच्या ताब्यात वॉशिंगकरीता दिलेली असताना चोरी झालेली आहे. त्यामुळे जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी सदरच्या गाडीची योग्य ती काळजी घेतलेली नाही, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी गाडीची व्यवस्थित काळजी न घेऊन तक्रारदार यांना सदोष व दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या गाडीच्या चोरीसाठी जाबदेणार क्र. 1 व 2 हे वैयक्तीक व संयुक्तीक रित्या जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
5] तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारीतील कथने व शपथपत्र, जाबदेणार यांनी मंचामध्ये हजर राहून नाकारलेली नाहीत. कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी केलेल्या मागण्या या योग्य व कायदेशिर आहेत. तक्रारदारांनी यांनी सदरच्या गाडीची किंमत रक्कम रु. 40,000/- जाबदेणार
यांच्याकडून मागितलेली आहे, परंतु त्यांनी त्यापुष्ठ्यर्थ गाडीखरेदीची पावती किंवा इतर कोणताही गाडीची किंमत दाखविणारा पुरावा दाखल केलेला नाही. याउलट त्यांनी दाखल केलेल्या एफ.आय.आर. मध्ये सदरच्या गाडीची किंमत रक्कम रु. 20,000/- इतकी नमुद केलेली आहे. तक्रारदार यांनी सदरची गाडी ही सन 2004 मध्ये खरेदी केलेली आहे व ती सन 2009 मध्ये ती चोरीला गेलेली आहे. यावरुन तक्रारदार यांनी सदरची गाडी जवळ-जवळ पाच वर्षे वापरलेली आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांनी नमुद केलेल्या किंमतीच्या 10% घसारा रक्कम, म्हणजे रक्कम रु. 2000/- वजा करणे योग्य व संयुक्तीक ठरते.
6] जाबदेणार क्र. 1 व 2 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांना पोलीसांकडे तक्रार दाखल करावी लागली, त्याचा पाठपुरावा करावा लागला, तसेच प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली व त्या अनुषंगाने पैसा व वेळ खर्च करावा लागला, त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2000/- मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची अंशत: मंजूर करण्यात येते.
2] जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी, वैयक्तीक व संयुक्तीकरित्या
तक्रारदार यांना रक्कम रु. 18,000/- (रु. अठरा हजार
फक्त) गाडीच्या किंमतीपोटी व रक्कम रु. 2,000/-(रु. दोन
हजार फक्त) नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी, असे
एकुण रक्कम रु. 20,000/-(रु.वीस हजार फक्त) या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
3] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.