द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 20 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी दिनांक 18/12/2010 रोजी सेल फॉर यू या दुकानातून मायक्रोमॅक्स या कंपनीचा हॅन्डसेट रुपये 2600/- ला खरेदी केला. खरेदी केल्यानंतर लगेचच दिनांक 22/1/2011 रोजी हॅन्डसेट बंद पडला. म्हणून तक्रारदारांनी मेघा सेंन्टर हडपसर सर्व्हिस सेंन्टर येथे दुरुस्तीसाठी दिला. आठ दिवसांनी मोबाईल दुरुस्त करुन मिळेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदार दिनांक 9/2/2011 रोजी जाबदेणार क्र.3 यांनी मोबाईल साधारण जुजबी दुरुस्त करुन दिला. त्यानंतरही तो व्यवस्थित चालत नव्हता. दिनांक 3/5/2011 रोजी जाबदेणार क्र.1 यांना मोबाईल दाखवला असता मोबाईल दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठवितो असे सांगितले, परत जॉबशिट तयार केले. तक्रारदारांना 15 दिवस दुरुस्तीसाठी लागतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. दिनांक 18/5/2011 रोजी तक्रारदार मोबाईल घेण्यासाठी गेले असता परत आठ दिवसांनी त्यांना बोलावण्यात आले. दिनांक 28/5/2011 रोजी तक्रारदारांना परत दिनांक 29/5/2011 रोजी चौकशी करण्यास सांगण्यात आले. परत चौकशीअंती मोबाईल एल 3 मध्ये टाकतो असे तक्रारदारांना सांगण्यात आले. दुस-या दिवशी मोबाईलची आतली मशिनरी बॉडी सोडून सर्व बदलावी लागेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यासाठी किती कालावधी लागेल याची माहिती देखील तक्रारदारांना देण्यात आली नाही. दिनांक 30/5/2011 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या कस्टमर केअर, दिल्ली येथे तक्रार नोंदविली. त्यानंतरही तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार ई-मेल, पत्र, दुरध्वनीद्वारे चौकशी करुनही उपयोग झाली नाही. तक्रारदारांच्या मोबाईल मध्ये दोन सिमकार्डची सुविधा होती, तक्रारदारांना त्याची गरजही होती, परंतू त्याचा तक्रारदारांना फायदा झाला नाही. तक्रारदार हे कुटूंब प्रमुख असून त्यांच्या घरी वयोवृध्द आई 90 वर्षे बेडरिडन अवस्थेत आहे, त्यांच्या घरापासून एक किलोमिटर पर्यन्त पी सी ओ नाही. तक्रारदारांना त्यांच्या आईंना दवाखान्यात दाखवायचे असल्यास या मोबाईल शिवाय इतर सुविधा नाही. तक्रारदार पुणे महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात अत्यावश्यक विभागात काम करतात, तक्रारदारांना 24 तासांमध्ये कार्यालयीन गरजेनुसार केव्हाही कामावर हजर रहावे लागते, त्यासाठी वरिष्ठांचे फोन येतात. मोबाईल अभावी तक्रारदारांची अत्यंत गैरसोय होते म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार त्यांच्या तक्रारीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा असे नमूद करतात. तसेच मोबाईलचा तक्रारदारांना उपयोग नसल्यामुळे त्याची किंमत रुपये 2600/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून दिनांक 18/12/2010 रोजी रुपये 2600/- देऊन मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता हे दाखल पावतीवरुन दिसून येते. मोबाईल खरेदीनंतर लगेचच एका महिन्यात हॅन्डसेट खराब झाला, त्यामुळे दुरुस्तीसाठी तक्रारदारांनी मोबाईल जाबदेणार क्र.3 यांच्याकडे दिला. एकदा दुरुस्त करुनही उपयोग झाला नाही, म्हणून पुन्हा लगेचच दुरुस्तीसाठी जाबदेणारांकडे सदरहू मोबाईल दिला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जॉबशिटवरुन मोबाईल मध्ये माईक प्रॉब्लेम, ऑटो स्वीच ऑफ व नेट वर्क प्रॉब्लेम या कारणासाठी मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्याचे दिसून येते. त्यानंतर जाबदेणारांकडून अद्यापपर्यन्त तक्रारदारांना दुरुस्त केलेला मोबाईल परत मिळालेला नाही. या संदर्भात तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिल्ली येथे ई मेल वरुन पाठपुरावा केल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी वेळोवेळी मोबाईल दुरुस्त करुन देऊ असे सांगूनही तक्रार दाखल करेपर्यन्त हॅन्डसेट दुरुस्त करुन दिलेला नाही. यावरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. म्हणून जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना पुर्ण दुरुस्त करुन दिलेला, नवीन पार्ट पुढील वॉरंटीसह घालून दिलेला हॅन्डसेट चालू स्थितीत असलेला दयावा असा मंच आदेश देत आहे. मोबाईल खरेदी केल्यापासून वॉरंटी कालावधीतच त्यात दोष निर्माण झाला, जाबदेणार यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतर तो चालू स्थितीत, पुर्णत: दुरुस्त करुन तक्रारदारांना दिलेला नाही, तक्रारदारांना मोबाईलची अत्यंत निकड असतांनाही ते मोबाईल वापरु शकले नाहीत यावरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 3,000/- दयावेत असा आदेश देत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पुर्ण दुरुस्त करुन दिलेला, नवीन पार्ट पुढील वॉरंटीसह घालून दिलेला हॅन्डसेट चालू स्थितीत असलेला मायक्रोमॅक्स x 250 मोबाईल आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावा.
[3] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.