नि.38 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 15/2011 नोंदणी तारीख – 27/11/2011 निकाल तारीख – 8/4/2011 निकाल कालावधी – 169 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सौ पुष्पा विठ्ठल डांगे रा.चिंचणेर निंब, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री विकास उथळे) विरुध्द 1. मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. करिता श्री राजकुमार माणिकराव जाधव, सचिव मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.सातारा रा.19/2अ, प्रसन्न प्लाझा, पहिला मजला, पंताचा गोट, सातारा ता.जि.सातारा 2. श्री पंढरीनाथ भगवान भोसले, चेअरमन मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.सातारा रा.19/2अ, प्रसन्न प्लाझा, पहिला मजला, पंताचा गोट, सातारा ता.जि.सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत दोन वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे नि.12 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. सदर संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक चेअरमन व अर्जदार यांचे दीर कै. दत्तात्रय डांगे हे पहात होते. संस्थेच्या ऑडिटमध्ये त्यांनी बोगस कर्ज उचलल्याचे निदर्शनास आले. अर्जदार या 1994 पासून संस्थेच्या संचालक म्हणून काम करीत आहेत. शासन निर्णयाप्रमाणे संचालकास रु.50,000/- ठेव असणे गरजेचे व बंधनकारक आहे. त्यामुळे अर्जदारची ठेव रक्कम परत देता येत नाही. सहायक निबंधक यांचे कार्यालयात कार्यरत असलेले श्री शिरीष कदम यांनी संस्थेच्या दफतराचा ताबा घेतलेला आहे. त्यामुळे जाबदार यांना काम करणे अवघड झाले आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे. 3. अर्जदारचा तोंडी युक्तिवाद ऐकला तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. जाबदार यांनी नि.12 कडे म्हणणे तसेच नि.13 कडे शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारचे कथनानुसार अर्जदार संस्था स्थापनेपासून म्हणजे 1994 पासून संचालिका होत्या. अर्जदारचे सख्ख्ेा दिर कै दत्तात्रय डांगे यांनी संस्थेत रकमेचा गैरव्यवहार अपहार केला आहे. अर्जदार संचालिका असलेने कायद्याने ठेव ठेवणे बंधनकारक आहे. अपहारीत रकमेचा निर्णय झालेशिवाय रक्कम देता येत नाही. अर्जदारचे दिरांनी बोगस ठेव तारण कर्जे दिली आहेत. सबब अपहारीत रकमेचा निर्णय झालेशिवाय ठेव देता येत नाही. तक्रार फेटाळावी असे कथन केले आहे. 5. निर्विवादीतपणे अर्जदारने संचालिका असलेबाबतचे कथन शपथपत्राने नाकारले नाही. जाबदारने अर्जदारचे ठेवीवरती बोगस कर्ज असलेबाबतचा पुरावा दाखल केला नाही किंवा कायद्याने ठेव ठेवणे आवश्यक आहे असा कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा शासन निर्णय दाखल केला नाही. तथापि, संचालिका या नात्याने संस्थेच्या सध्याचे स्थितीस जाबदार क्र.2 बरोबर अर्जदार याही तितक्याच जबाबदार आहेत. परंतु अर्जदारने ठेव रक्कम ठेवली आहे हे संस्था मान्य करते. पावत्या बोगस आहेत असे संस्थेचे कथन नाही. सबब केवळ जाबदार नं.1 संस्था अर्जदारची रक्कम देणेस जबाबदार आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि.6 व 7 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5/1 कडील ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि.5 सोबतच्या नि. 6 व 7 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.592 व 783 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार क्र.2 विरुध्द काही आदेश नाही. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 8/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |