-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
( पारित दिनांक-13 एप्रिल, 2018)
01. तक्रारकर्तीने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) म्युर मेमोरियल हॉस्पीटल, नागपूर विरुध्द वैद्दकीय निष्काळजीपणाच्या आरोपा खाली दाखल केली आहे.
02. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) हे म्युर मेमोरियल हॉस्पिटलचे अनुक्रमे वैद्दकीय अधिष्ठाता आणि संचालक आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनी आहे. दिनांक-15/01/2002 ला तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाच्या रुग्णालतयात तब्येत दाखविण्यासाठी गेली होती, त्यावेळी तिला एक मुलगी आणि मुलगा अशी दोन अपत्ये होती. तक्रारकर्तीची मासिक पाळी बंद झाल्या बाबतची तक्रार होती. डॉक्टरांनी केलेल्या वैद्दकीय परिक्षणा नंतर तक्रारकर्ती ही गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते, परिक्षणासाठी तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष रुग्णालयात रक्कम जमा केली होती. तक्रारकर्तीने पुन्हा नविन मुल जन्माला घालण्यास असमर्थता दर्शविल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन दिनांक-19/01/2002 रोजी विरुध्दपक्ष रुग्णालयात तिचा गर्भपात (Abortion) करण्यात आला आणि तिचेवर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया (Family Planning Operation) डॉ.ठाकूर आणि डॉ.देशपांडे यांनी केली आणि तिला दवाखान्यातून दिनांक-25/01/2002 रोजी सुट्टी देण्यात आली.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, त्यानंतर ती वैवाहिक आयुष्य सुखाने जगत होती परंतु दिनांक-09/09/2005 रोजी तिची मासिक पाळी पुन्हा बंद झाल्याने ती पुन्हा विरुध्दपक्ष रुग्णालयात गेली, त्यावेळी केलेल्या वैद्दकीय परिक्षणा मध्ये तिला 06 महिन्याची गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाले. संतती प्रतिबंधक कुटूंब नियोजन शस्त्रक्रिये नंतरही तिला गर्भ राहिल्याने धक्का बसला. परंतु तिने दिनांक-26/12/2005 रोजी एका मुलाला जन्म दिला आणि 02 दिवसा नंतर दिनांक-28/12/2005 रोजी पुन्हा तिच्यावर एकदा कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यावेळी तिला एकूण रुपये-7231/- एवढा खर्च आला.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्यावर करण्यात आलेल्या दुस-या कुटूंब नियोजन शस्त्रक्रिये नंतर सुध्दा पुन्हा तिची मासिक पाळी बंद झाल्याने ती डॉ.रोहिणी पाटील यांचेकडे वैद्दकीय परिक्षणासाठी गेली कारण विरुध्दपक्ष रुग्णालयातील वैद्दकीय उपचारा वरील तिचा विश्वास उडालेला होता. तिस-या वेळी पुन्हा ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले असल्याने तिने दिनांक-15/03/2010 रोजी गर्भपात करुन घेतला, ज्यासाठी तिला रुपये-12,774/- एवढा खर्च आला.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती हे छोटेसे किराणा दुकान चालवितात. 02 मुला नंतर कुटूंब मर्यादित राहण्याचे उद्देश्याने तिने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली होती परंतु ती अयशस्वी ठरली. दिनांक-26/12/2005 रोजी जन्मलेल्या तिस-या मुलाच्या पालन-पोषणाच्या खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार तिला सोसावा लागत आहे. तिच्या वरील दुसरी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सुध्दा अयशस्वी ठरली. विरुध्दपक्ष रुग्णालयातील डॉक्टराच्या चुकीमुळे तिला 05 वेळा बाळांतपणास सामोरे जावे लागले, ज्यामध्ये एका वेळी मुलाचा जन्म झाला आणि दोन वेळा गर्भपात करावा लागला, त्यामुळे तिला झालेल्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासासाठीची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची आहे. म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्दपक्षा कडून डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- तसेच तिस-या मुलाच्या पालन पोषण आणि शिक्षणाचा खर्च रुपये-15,00,000/- आणि त्याशिवाय तिला झालेल्या मानसिक त्रासा बद्दल त्याच बरोबर कायम स्वरुपी कमजोरीसाठी रुपये-3,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- अशा रकमांची मागणी केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) म्युर मेमोरियल हॉस्पिटल, नागपूर तर्फे आपले लेखी उत्तर नि.क्रं-13 नुसार दाखल केले. त्यांच्या लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्ष रुग्णालय हे व्यवसायिक रुग्णालय नसून ते धर्मदाय रुग्णालय (Charitable Hospital) आहे. तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष रुग्णालयात मासिक पाळी बंद झाल्या संबधाने आली होती आणि तिच्यावर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती या सर्व बाबी मान्य केल्यात.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान तक्रारकर्तीची बीज वाहिनी (Fallopian Tube) कापून ती बांधण्यात आली होती, अशाप्रकारची “Tubectomy” शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आली होती, अशा शस्त्रक्रिये मध्ये अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत (In a rare Case) नैसर्गिकरित्या बीज वाहिनीची वाढ होऊन ती आपोआप जोडल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये गर्भधारणा राहू शकते. परंतु अशा नैसर्गिक स्थितीमुळे रुग्णालय किंवा तक्रारकर्तीवर रुग्णालयात कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हे जबाबदार असू शकत नाही.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी उत्तरात पुढे असे नमुद केले की, दोन्ही कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या संभाव्य धोक्याची कल्पना तक्रारकर्ती आणि तिचे पती यांना दिली होती आणि त्यांचे मान्यते नंतरच तिचेवर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. विरुध्दपक्ष रुग्णालयाचा किंवा त्यांच्या डॉक्टरांचा कुठलाही निष्काळजीपणा होता किंवा चुक होती हे पूर्णपणे नाकबुल केले. पुढे असेही नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) यांनी, विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनी कडून व्यवसायिक निष्काळजीपणा अंतर्गत विमा पॉलिसी काढलेली होती, आणि त्या पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तारखांचा कालावधी सुध्दा समाविष्ट आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे असे म्हणणे आहे की, जर विरुध्दपक्षाचा किंवा त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांचा तक्रारकर्तीचे बाबतीत वैद्दकीय निष्काळजीपणा होता असा निष्कर्ष जर ग्राहक मंचा तर्फे काढल्या गेला तर तक्रारकर्तीला देय असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनी कडून वसुल करण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे कडून कुठलीही चुक किंवा निष्काळजीपणा झालेला नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनी तर्फे लेखी जबाब सादर करुन त्यात असे नमुद केले की, दाखल वैद्दकीय दस्तऐवजां वरुन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तसेच तक्रारकर्तीवर विरुध्दपक्ष रुग्णालयातील शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांची कुठलीही चुक किंवा निष्काळजपणा केल्याचे दिसून येत नाही. पुढे असे नमुद केले की, त्यांनी विरुध्दपक्ष रुग्णालयाला “Professional Indemnity Policy” दोन वेळा दिली होती. पहिल्या पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-17/08/2004 ते दिनांक-16/08/2005 असा होता, ज्यामध्ये आश्वासित विमा रक्कम रुपये-20,00,000/- एवढी होती परंतु कुठल्याही एका घटनेसाठी आश्वासित विमा राशी रुपये-5,00,000/- एवढी मर्यादित होती. दुस-या पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-17/08/2005 ते दिनांक-16/08/2006 असा होता, त्यामध्ये सुध्दा रुपये-6,00,000/- कुठल्याही एका घटनेसाठी मर्यादित रक्कम निश्चीत करण्यात आली होती. पॉलिसी अंतर्गत जर रुग्णालयाचा व्यवसायिक हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा सिध्द झाला तर त्याची नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनीने भरुन देण्याची हमी पॉलिसी अंतर्गत दिली होती. विमा पॉलिसीच्या कालावधीच्या बाहेर घडलेल्या घटनेसाठी विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा राशी देण्यासाठी जबाबदार राहू शकत नाही म्हणून तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
5. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती तसेच तक्रारकर्तीचे वकील आणि विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) यांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. या तक्रारीतील वस्तुस्थितीच्या गुणवत्तेवर (On Merits) भाष्य करण्यापूर्वी एक बाब लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की, तक्रारकर्तीने या प्रकरणात विरुध्दपक्ष रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी तिच्यावर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया (Female Sterilization) केली, त्यांना या प्रकरणात प्रतिपक्ष बनविलेले नाही. वैद्दकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणामध्ये प्राथमिक जबाबदारी ही त्या डॉक्टरांची असते जो प्रत्यक्ष्यात रुग्णावर वैद्दकीय उपचार करतो, रुग्णालयाची जबाबदारी ही केवळ “Vicarious liability” असते आणि म्हणून जो पर्यंत प्राथमिक जबाबदार असलेल्या व्यक्ती म्हणजेच रुग्णावर वैद्दकीय उपचार करणारे डॉक्टर यांना प्रतिपक्ष बनविण्यात येत नाही, तो पर्यंत केवळ रुग्णालयाला जबाबदार धरता येऊ शकत नाही, त्यामुळे केवळ एका सदोष मुद्दामुळे ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालविण्यास योग्य नाही.
07. तक्रारीच्या गुणवत्तेचा (On Merits) विचार करता प्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी हे नाकबुल केलेले नाही की, तक्रारकर्तीवर करण्यात आलेल्या दोन्ही कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या नव्हत्या त्यामुळे तिला गर्भधारणा राहिली होती. असे दिसते की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे विरुध्द वैद्दकीय निष्काळजीपणाचा आरोप यासाठी केला आहे की, कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करुनही तिला गर्भधारणा झाली होती, त्यामुळे यामध्ये विरुध्दपक्षाची चुक किंवा निष्काळजीपणा आहे असा कयास तक्रारकर्तीने काढलेला दिसून येतो.
08. कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिये नंतरही (Female Sterilization) राहिलेल्या गर्भधारणे संबधात विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांच्या वकीलांनी असे सांगितले की, ज्या पध्दतीची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया तिचेवर करण्यात आली होती, त्यामध्ये तिच्या दोन्ही बीज वाहिनीनां काप देण्यात आला होता आणि त्यानंतर काप दिलेला भाग शिवण्यात आला होता, जेणे करुन अंडाशयात निर्माण होणारे बीज गर्भाशया पर्यंत पोहचू शकणार नाही. गर्भधारणा रोखण्यासाठी ही एक सर्वोत्तम आणि परिणामकारक कार्यपध्दती आहे, ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता ही हजारामध्ये एक असते, जरी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिये नंतर पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता फार कमी असेली तरी गर्भधारणा होण्याची शक्यता काही अंशी राहतेच. वैद्दकीय साहित्या नुसार (As per Medical Literature) संतती नियोजन शस्त्रक्रिया 100% पूर्णपणे यशस्वी नसतात. शस्त्रक्रिये नंतर गर्भधारणा तेंव्हा होते, ज्यावेळी, दोन्ही बीज वाहिनीची नैसर्गिकरित्या पुन्हा वाढ होऊन त्या एकमेकांशी आपोआप जोडल्या जातात. तक्रारकर्तीचा असा आरोप नाही की, तिच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया चुकीच्या पध्दतीने किंवा निष्काळजीपणाने किंवा अयोग्य व्यक्तीने केली होती.
09. ज्यावेळी ही तक्रार दाखल करुन घेण्यासाठी ग्राहक मंचा समक्ष आली होती, त्यावेळी ग्राहक मंचाने तज्ञ डॉक्टरां कडून अहवाल (Expert Medical Report) मागविला होता. इंदिरा गांधी वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील तज्ञ समितीने पाठविलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास केल्या नंतर असा अहवाल दिला होता की, यामध्ये तक्रारकर्तीवर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचा वैद्दकीय निष्काळजीपणा असल्याचा पुरावा दिसून आला नाही, तो अहवाल इंदिरा गांधी गव्हरनमेंट मेडीकल कॉलेज, नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर एम.आर.वाईकर यांनी दिला होता.तक्रारकर्ती तर्फे डॉ.एम.आर.वाईकर यांची उलट तपासणी घेण्याचा अर्ज मंजूर केला होता परंतु डॉ.एम.आर.वाईकर यांच्यावर समन्सची बजावणी होऊ शकली नाही, त्यामुळे तज्ञांनी दिलेल्या अहवालावर तक्रारकर्ती कडून नंतर कुठलाही आक्षेप किंवा हरकत घेण्यात आली नाही.
10. जर डॉक्टरने संबधित रुग्णावर वैद्दकीय साहित्या (As per Medical Literature) नुसार आणि ठरवून दिलेले वैद्दकीय मापदंडा नुसार निर्दीष्ट वैद्दकीय उपचार आणि उपचाराची कार्यपध्दती (Standard Norms & Protocol) नुसार वैद्दकीय उपचार केले असतील तर त्याला वैद्दकीय उपचारातील निष्काळजीपणा संबधी जबाबदार धरता येत नाही.
नुकत्याच दिलेल्या मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांच्या पुढील एका निवाडयात “N.K.CHOUDHARI-VERSUS-MAX SPECIALITY HOSPITAL”-2017 (4) CPR-695 (NC) यात असे नमुद केलेले आहे की, वैद्दकीय निष्काळजीपणा हा विशेष वैद्दकीय तज्ञांच्या पुराव्या वरुन सिध्द करणे आवश्यक आहे.
परंतु हातातील प्रकरणा मध्ये कुठल्याही डॉक्टरांना प्रतिपक्ष बनविलेले नाही किंवा कुठल्याही विशीष्ट डॉक्टर विरुध्द निष्काळजीपणाचा आरोप सिध्द केलेला नाही.
11. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीची तक्रार वाचल्यावर त्यातील कथन विश्वासार्ह वाटत नाही कारण तिचा पहिला गर्भपात (Abortion) आणि संतती नियोजनाची शस्त्रक्रिया (Female Sterilization) दिनांक-19/01/2002 रोजी झाली होती, त्यानंतर जवळपास 03 वर्षा पेक्षा जास्त काळ सर्व काही सुरळीत चालले होते. त्यानंतर तिचे असे म्हणणे आहे की, दिनांक-09/09/2005 ला तिची मासिक पाळी बंद झाली, वैद्दकीय परिक्षणा नंतर तिला 06 महिन्याचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले, तिचे हे विधान विश्वासार्ह दिसून येत नाही, किम्बुहूना ते पूर्णपणे चुकीचे आहे, असेच म्हणावे लागेल कारण दिनांक-09/09/2005 ला ती 06 महिन्याची गर्भवती होती आणि त्याची कल्पना तिला अजिबात नव्हती हे म्हणणे पटण्यायोग्य नाही, उलटपक्षी तक्रारकर्तीला ती गर्भवती असल्याची पूर्ण कल्पना होती परंतु काही कारणास्तव तिने विरुध्दपक्षा विरुध्द किंवा तिच्यावर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टर विरुध्द तक्रार केली नाही. तिची मासिक पाळी बंद झाल्या नंतर तिने लगेच वैद्दकीय तपासणी करुन घ्यावयास हवी होती आणि अशी तपासणी वेळेच्या आत केली असती तर त्याच वेळी तिच्या लक्षात आले असते की, तिला गर्भधारणा झालेली आहे आणि अशावेळी ती संबधित डॉक्टरां कडून त्याचे स्पष्टीकरण मागू शकली असती. तिने तिस-या मुलाला दिनांक-26/12/2005 रोजी जन्म दिला. तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे दिनांक-09/09/2005 रोजी तिची मासिक पाळी बंद झाल्याचे तिला समजले आणि त्याच्या तीन महिन्यात म्हणजे दिनांक-26/12/2005 रोजी तिने मुलाला जन्म दिला. नैसर्गिक नियमा प्रमाणे हे शक्य नाही की, तिला जवळ जवळ 05 महिन्या पर्यंत मासिक पाळी बंद होती याची कल्पना आली नाही, तक्रारकर्ती या बद्दल सपशेल खोटे बोलत आहे. तिची मासिक पाळी दिनांक-09/09/2005 चे पूर्वी पासूनच बंद झाली होती, याची तिला पुरेपुर माहिती होती पण तिने काही कारणास्तव या संबधी कोणाकडेही या संबधी वाच्यता केली नाही.
12. अशाप्रकारे तिच्या तक्रारी वरुन हे प्रकरण वैद्दकीय निष्काळजीपणाचे (Medical Negligence) दिसून येत नाही तर अपवादात्मक परिस्थितीत (In a rare case) तिला संतती नियोजन शस्त्रक्रिये (Female Sterilization) नंतर सुध्दा गर्भधारणा राहिली होती. विरुध्दपक्ष रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी तक्रारकर्तीवर संतती नियोजनाची शस्त्रक्रिया(Female Sterilization) केली होती त्यांना या तक्रारी मध्ये प्रतिपक्ष बनविले नसल्यामुळे केवळ रुग्णालयाला कुठल्याही निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन अतिरिक्त ग्राहक मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती श्रीमती सविता संजय ढोले यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) व विरुध्दपक्ष क्रं-2) अनुक्रमे म्युर मेडीकल हॉस्पीटल, सिताबर्डी नागपूर व्दारा अधिष्ठाता आणि संचालक तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) दि न्यु इंडीया एश्योरन्स कं.लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.