Exh.No.30
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 37/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.10/07/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.21/03/2016
श्री चंद्रशेखर अनंत देसाई
वय सुमारे 37 वर्षे, धंदा – नोकरी (पत्रकार)
रा.मु.पो.वरवडे, ता.कणकवली,
जि. सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
शॅडोज टेलर्स अँड रेडीमेडस् करिता
प्रोप्रा. मुनाफ पटेल
दुकानाचा पत्ता – मेन चौक, ठाणेकर बिल्डींग,
आझाद मेडिकलच्यावर, मु.पो.कणकवली,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री. उमेश सावंत
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री. स्वरुप पई
निकालपत्र
(दि. 21/03/2016)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) विरुध्द पक्षाने लेखी आश्वासन तथा मुदत देवूनही शर्ट शिवून दिला नाही, दुरुत्तरे केली व आपल्या सेवेत त्रुटी ठेवली म्हणून तक्रारदाराने मंचासमोर तक्रार दाखल केली आहे.
2) प्रस्तुत प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की –
तक्रारदार हे कणकवलीतील रहिवाशी असून व्यवसायाने पत्रकार आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या विवाहाप्रसंगी परिधान करणेसाठी शर्ट पीस खरेदी करुन विरुध्द पक्षाकडे शर्ट शिवण्यासाठी दिला. तक्रारदाराच्या नातेवाईकाचे लग्न दि.24/5/2015 रोजी आरंभिले होते. त्यामुळे तक्रारदार विरुध्द पक्षाकडे दि.27/4/2015 रोजी शर्टपीस शिवायला घेऊन गेले. त्यावेळी दि.15/5/2015 पर्यंत शर्ट शिवून दयायला विरुध्द पक्षाला सांगीतले. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने मापे घेण्याचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराचे नाव, मोबाईल नमूद करुन त्याला शर्ट शिलाईची रु.250/- ची पावती दिली व त्या पावतीवर शर्टची डिलेव्हरीची ता.15/5/2015 अशी नमूद करुन तक्रारदाराला पावती दिली. त्याप्रमाणे तक्रारदार विरुध्द पक्षाकडे शर्ट शिवून झालेला असेल म्हणून ता.15/5/2015 रोजी न जाता दि.17/5/2015 रोजी सकाळी 10.30 वाजता शर्टची डिलेव्हरी घेणेसाठी गेला असता विरुध्द पक्षाने शर्ट तयार नसल्याचे सांगितले; त्यावर तक्रारदाराने शर्टची डिलेव्हरी देण्याची तारीख उलटून गेली आहे, मला दि.24/5/2015 च्या लग्नासाठी शर्टची गरज आहे. ‘मला त्यापूर्वी शर्ट शिवून दया किंवा आत्ताच माझे कापड परत दया’ अशी विनंती केली. त्याचा राग येऊन विरुध्द पक्षाने तक्रारदाराला उद्धट व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावर तक्रारदाराने पोलीस स्टेशनला जाऊन विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार अर्ज दाखल केला. पोलीसांनी तक्रारदाराच्या प्रस्तुत अर्जाची चौकशी विरुध्द पक्षाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून केली. त्या चौकशीत विरुध्द पक्षाने सदरचा शर्ट 30 मे 2015 रोजी शिवून देतो असे लिहून दिले. ज्या कारणासाठी तक्रारदाराने शर्ट शिवायला दिला होता तो विवाह सोहळा 24 मे 2015 रोजी असल्याने तक्रारदाराचा शर्ट शिवून घेण्याचा मुख्य उद्देश निष्प्रभ ठरला. सदर शर्टवर घालण्यासाठी तक्रारदाराने खरेदी केलेली अनुरुप पँटही त्याला वापरता येणारी नव्हती. त्यामुळे तक्रारदाराला त्याच विवाह सोहळयासाठी दुसरी शर्ट पँट रु.1665/- ला खरेदी करावी लागली. विरुध्द पक्षाने ग्राहक म्हणून दयावयाच्या सेवेत अक्षम्य निष्काळजीपणा-हजगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास आणि भुर्दंड सहन करावा लागला म्हणून विरुध्द पक्षाकडून सेवेतील कमतरतेसाठी रु.5,000/-, आश्वासन न पाळणे रु.2,000/- मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, झालेल्या नुकसानीपोटी रु.3,000/- व प्रकरण खर्चापोटी रु.10,000/- असे एकूण रु.30,000/- मिळावेत यासाठी हे प्रकरण मंचासमोर दाखल केले आहे.
3) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.4 वर एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) विरुध्द पक्षाने आपले लेखी म्हणणे नि.9 वर दाखल केले असून प्रस्तुतची तक्रार खोटी व खोडसाळ असून तक्रारदाराने मांडलेले सर्व मुद्दे नाकारलेले आहेत.
5) विरुध्द पक्षाने नि.10 वर एकूण 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6) तक्रारदाराची तक्रार, कागदोपत्री पुरावे, विरुध्द पक्षाचे त्यावरील म्हणणे, लेखी पुरावे, दोन्ही विधिज्ञांचा लेखी व तोंडी युक्तीवाद या सर्व गोष्टी विचारात घेता मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यास दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे. |
7) मुद्दा क्रमांक 1 - विरुध्द पक्षाने तक्रारदाराला दिलेल्या पावतीचे (नि.4/2) अवलोकन केले असता विरुध्द पक्षाने तक्रारदाराला ग्राहय पावती दिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे दोघांमध्ये ग्राहक व सेवादार हे नाते प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते; पर्यायाने तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे हे मान्य करणे क्रमप्राप्त आहे.
8) मुद्दा क्रमांक 2 – नि.4/2 वरील पावतीवर शर्ट शिवून डिलेव्हरी देण्याची ता.15/5/2015 विरुध्द पक्षाने नमूद केलेली आहे. त्याची पुर्तता त्यांने केलेली नाही. दि.17/5/2015 पर्यंत शर्ट शिवलेले नव्हते व त्यानंतरही पोलीस स्टेशनमध्ये शर्ट 30/5/2015 रोजी शिवून देण्याचे लेखी लिहून दिले. म्हणजे ज्या कारणासाठी शर्टची आवश्यकता होती त्या कारणाची गरज संपुष्टात आणण्याचे काम विरुध्द पक्षाने केलेले आहे. विरुध्द पक्षाने दिलेली पावती हा विरुध्द पक्ष व तक्रारदार यांच्यामधील करार होता व तो भंग करण्याचे काम विरुध्द पक्षाने केलेले असल्यामुळे ती सेवेतील न्युनता ठरते. सबब दुस-या निष्कर्षाप्रती मंचाने होकार दर्शविला आहे.
9) मुद्दा क्रमांक 3 - विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे शर्ट शिवणारा कामगार अचानक आजारी पडला, त्यामुळे शर्ट शिवून देण्यास विलंब झाला. मात्र त्याबाबत सदर कामगाराचे शपथपत्र किंवा तो आजारी असल्याचे सक्षम वैदयकीय प्राधिका-याचे प्रमाणपत्र पुराव्यादाखल मंचासमोर दाखल करता आले असते पण तसे घडले नाही. विरुध्द पक्षाला प्रस्तुत पुरावा दाखल करणेत अपयश आल्याचे त्यातून स्पष्ट होते. तसा कोणताही ठोस पुरावा अथवा सबळ कारण मंचासमोर विरुध्द पक्षाकडून आले नाही.
10) तक्रारदार हा व्यवसायाने पत्रकार असला तरी एक जागृक ग्राहक म्हणून मंचासमोर आलेला आहे. ज्या कारणासाठी त्याला शर्टची आवश्यकता होती त्या गरजेची पुर्तता विरुध्द पक्षाकडून झालेली नाही. किंबहूना 24/5/2015 रोजी लग्न सोहळयाची तारीख असतांना पोलीस स्टेशनमध्ये 30/5/2015 ला शर्ट शिवून देतो असे लेखी स्वरुपात लिहून देणे हे समर्थनीय नाही; अनुचित व्यापारी पध्दतीच्या हया प्रघाताला छेद देण्याचे काम ग्राहक मंचाला करणे क्रमप्राप्त आहे.
11) विरुध्द पक्षाच्या विधिज्ञांनी लेखी व तोंडी युक्तीवादात सुप्रिम कोर्टाच्या न्यायनिवाडयांचा हवाला देतांना झालेली नुकसानी वा नुकसानीचे कृत्य ऐच्छिक –निष्काजीपणामुळे घडलेले नाही असे म्हटले आहे. मात्र मंचाच्या मते विरुध्द पक्षाकडून घडलेली कृती किंवा त्याचा घटनाक्रम पाहता विरुध्द पक्षाचे प्रस्तुत कृत्य समर्थनीय नाही हे स्पष्ट होते. तक्रारदाराने विवाहसोहळयाच्या अगोदर जवळपास 1 महिना शर्ट शिवण्यासाठी विरुध्द पक्षाकडे दिला होता. त्यामुळे केवळ कामगार आजारी किंवा तशा प्रकारची तकलादू कारणे मंचासमोर मांडणे व आपण अपराधी नाही हे सिध्द करणेचा प्रयत्न करणे हे व्यापारी नीती मुल्यांचा -हास करण्यासारखे आहे. व्यापारातील सचोटी आणि प्रामाणिकपणा ही दीर्घकाळाची ठेव असते. ही बाब विरुध्द पक्षाकडून दुर्लक्षित झालेली दिसून येते.
12) तक्रारदाराने एकूण नुकसानी, मानसिक त्रास इत्यादीसाठी रु.20,000/- व प्रकरण खर्चापोटी रु.10,000/- ची मागणी केली आहे. वस्तुस्थितीचा साकल्याने विचार करता तक्रारदाराने खरेदी केलेल्या शर्टपिसची किंमत रु.383/- + शिलाई रु.250/- अशी एकूण रु.633/- होते. त्याला नवीन शर्टपँट घ्यावी लागली त्याची किंमत रु.1665/- एवढी होते. तौलनिकदृष्टया नुकसानीची दर्शविलेली पूर्णता रक्कम मान्य करता येणार नाही. मात्र हे सुध्दा खर आहे की, तक्रारदाराला झालेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास हा विचारात घेण्याजोगा आहे. लहानसहान गोष्टींसाठी ग्राहकाला करावा लागलेला ‘द्रविडी प्राणायाम’ मंच विचारात घेत आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करणे न्यायीक होईल असे मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) विरुध्द पक्षाकडे शिवून तयार असलेले शर्ट रु.250/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) शिलाई विरुध्द पक्षाला देऊन तक्रारदाराने ताब्यात घ्यावे.
3) तक्रारदाराला झालेल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी विरुध्द पक्षाने रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तक्रारदाराला दयावेत.
4) विरुध्द पक्षाने प्रकरण खर्चापोटी रु.2,000/-(रुपये दोन हजार मात्र) तक्रारदारास दयावेत.
5) प्रस्तुत आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष यांनी 30 दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करु शकतील.
6) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 30 दिवसानंतर म्हणजेच दि.21/04/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 21/03/2016
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.