नि.10 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 33/2011 नोंदणी तारीख – 23/2/2011 निकाल तारीख – 9/5/2011 निकाल कालावधी – 76 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सर्जेराव आनंदराव डांगे रा.चिंचणेर निंब, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री अमरसिंह भोसले) विरुध्द 1. मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सातारा करिता श्री राजकुमार माणिकराव जाधव, सचिव मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सातारा रा.19/2अ, प्रसन्न प्लाझा, पहिला मजला, पंताचा गोट, सातारा, ता.जि.सातारा 2. श्री पंढरीनाथ भगवान भोसले, चेअरमन, मुक्ता को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सातारा रा.19/2अ, प्रसन्न प्लाझा, पहिला मजला, पंताचा गोट, सातारा, ता.जि.सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये रक्कम रु.50,000/- मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदरच्या ठेवीची मुदत संपलेली आहे. मुदत ठेवपावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून कर्ज उचलल्याची खोटी बतावनी केली व अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.4/10/2010 रोजी नोटीसउत्तर व प्रतिनोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.55,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.18 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक चेअरमन व अर्जदार यांचा मुलगा कै दत्तात्रय डांगे हे पहात होते. संस्थेचे ऑडीटरिपोर्टनुसार सदरचे चेअरमन यांनी ठेव तारणावर बोगस कर्ज उचलल्याचे निदर्शनास आले. अर्जदार यांनी ठेव ठेवली त्या काळात अर्जदार यांचा मुलगा संस्थेचे काम पहात होता. अर्जदार यांची सून पुष्पा डांगे व दुस-या सुन श्रीमती वंदना डांगे या संस्थेच्या संचालिका आहेत. शासन निर्णयाप्रमाणे संचालक किंवा त्यांचे नातेवाईकांची कमीत कमी रक्कम रु. 50,000/- ची ठेव संस्थेत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे अर्जदारची ठेव त्यांना परत देता येत नाही. तसेच अर्जदार यांचे जवळच्या नातेवाईकांनी घेतलेली कर्जे थकीत आहेत. मा. सहायक निबंधक सहकारी संस्था सातारा यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये अर्जदार व त्यांचे नातेवाईकांनी सदर रक्कम भरण्याचे कबूल केले होते. परंतु सहायक निबंधक यांचे कार्यालयात कार्यरत असलेले श्री शिरीष कदम यांनी स्वतःची ठेव परत मिळावी म्हणून अनाधिकाराने संस्थेच्या दफतराचा ताबा घेतलेला आहे. संस्थेची सर्व बँक खाती गोठविल्यामुळे तसेच दफतराचा ताबा देण्यास नकार दिल्याने जाबदार यांना काम करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सहायक निबंधक यांनी विलिनीकरणाचा आदेश पारीत केला आहे. कर्जवसुलीबाबत जोरात प्रयत्न चालू आहेत. सबब अर्जदार यांचा अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये जाबदार संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक चेअरमन व अर्जदार यांचा मुलगा कै दत्तात्रय डांगे हे पहात होते. संस्थेचे ऑडीटरिपोर्टनुसार सदरचे चेअरमन यांनी ठेव तारणावर बोगस कर्ज उचलल्याचे निदर्शनास आले. अर्जदार यांची सून पुष्पा डांगे व दुस-या सुन श्रीमती वंदना डांगे या संस्थेच्या संचालिका आहेत. शासन निर्णयाप्रमाणे संचालक किंवा त्यांचे नातेवाईकांची कमीत कमी रक्कम रु. 50,000/- ची ठेव संस्थेत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे अर्जदारची ठेव त्यांना परत देता येत नाही. तसेच अर्जदार यांचे जवळच्या नातेवाईकांनी घेतलेली कर्जे थकीत आहेत. परंतु सहायक निबंधक यांचे कार्यालयात कार्यरत असलेले श्री शिरीष कदम यांनी स्वतःची ठेव परत मिळावी म्हणून अनाधिकाराने संस्थेच्या दफतराचा ताबा घेतलेला आहे. संस्थेची सर्व बँक खाती गोठविल्यामुळे तसेच दफतराचा ताबा देण्यास नकार दिल्याने जाबदार यांना काम करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सहायक निबंधक यांनी विलिनीकरणाचा आदेश पारीत केला आहे इ. कथने केली आहेत. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी कोणताही ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही. अर्जदार यांचा मुलगा कै. दत्तात्रय डांगे यांनी अपहार केलेबाबत, अर्जदारचे जवळचे नातेवार्इकांनी कर्जे थकीत असलेबाबत तसेच कैफियतीतील इतर कोणत्याही कथनांबाबत जाबदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब जाबदार यांचे कोणतेही कथन पुराव्यात वाचता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 5. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये रु.50,000/- मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदरच्या ठेवीची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.647 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 9/5/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |