जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 127/2010. तक्रार दाखल दिनांक : 17/03/2010. तक्रार निर्णय दिनांक : 13/10/2010. वसंतसिंग रामसिंग ठाकूर, वय सज्ञान, व्यवसाय व्यापार, रा. स्टेशन रोड, पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : आर.जी. कदम विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : पी.व्ही. भातलवंडे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे पंढरपूर येथे स्टेशन रोड, हॉटेल लक्ष्मण बागेलगत चहाचे दुकान असून त्याकरिता त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'नगर परिषद') यांच्याकडून नळ कनेक्शन घेतले आहे. सन 2008 मध्ये जानकी वल्लभजी महाराज मंदिर व त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे मंदिराने त्यांच्या व पंढरपूर नगर परिषदेविरुध्द दिवाणी दावा क्र.358/2008 दाखल केल्यामुळे नगर परिषदेने सन 2008 मध्ये त्यांचे नळ कनेक्शन बंद केले आहे. न्यायालयाने दावा क्र.358/2008 मध्ये विरुध्द पक्ष यांना तुर्तातुर्त ताकीद दिली असून तक्रारदार यांच्या विरुध्दची मागणी फेटाळली आहे. तक्रारदार यांनी वारंवार विनंती करुनही नळ कनेक्शन पूर्ववत चालू करुन दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन नळ कनेक्शन पूर्ववत जोडून देण्याबाबत आदेश करावा आणि मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार श्री. जानकी वल्लभजी महाराज मंदिर ट्रस्टने त्यांच्या व तक्रारदार यांच्या विरुध्द दाखल केलेल्या रे.मु.नं. 358/2008 मध्ये नि.क्र.5 वरील तुर्तातुर्त मनाईच्या अर्ज अंशत: मंजूर केला असून त्याविरुध्द श्री. जानकी वल्लभजी महाराज मंदिर ट्रस्टसह नगर परिषदेने अपील केलेले आहे. त्या अपिलामध्ये तक्रारदार हे प्रतिवादी आहेत आणि त्यामुळे तक्रार मंचासमोर चालू शकत नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या विरुध्द दाखल केलेला रे.मु.नं. 453/08 कोर्टाने काढून टाकलेला आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे, याविषयी विवाद नाही. श्री. जानकी वल्लभजी महाराज मंदिर ट्रस्ट, तक्रारदार व नगर परिषद यांच्यातील वाद दिवाणी न्यायालयात चालू होता आणि सध्या त्यातील निर्णयानंतर जिल्हा न्यायालयामध्ये अपील प्रलंबीत आहेत, याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, नगर परिषदेने दिवाणी दाव्यांचा आधार घेत नळ कनेक्शन बंद केल्याचे निदर्शनास येते. 5. दिवाणी न्यायालयाने रे.मु.नं. 358/2008 मध्ये नि.क्र.5 वर दिलेल्या आदेशामध्ये तक्रारदार यांच्या विरुध्द मागितलेली दाद नामंजूर केल्याचे निदर्शनास येते. जरी सदर निर्णयाविरुध्द श्री. जानकी वल्लभजी महाराज मंदिर ट्रस्ट व नगर परिषदेने जिल्हा न्यायालयाकडे अपील दाखल केलेले असले तरी ते प्रलंबीत आहेत. नगर परिषदेला तक्रारदार यांचे नळ कनेक्शन बंद करण्याबाबत न्यायालयाचे कोणतेही स्पष्ट आदेश किंवा सूचना असल्याचे रेकॉर्डवर सिध्द करण्यात आलेले नाही. नगर परिषदेने तक्रारदार यांचे नळ कनेक्शन अनुचित त-हेने बंद करुन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी यांचे नळ कनेक्शन या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत पूर्ववत जोडून द्यावे. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/131010)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |