जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –05/2013 तक्रार दाखल तारीख – 07/01/2013
निकाल तारीख - 20/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 02 म. 13 दिवस.
हणमंत रामराव कुलकर्णी,
वय – 66 वर्षे, धंदा – माजी सैनिक व शेती,
रा. डोंगरज, ता. चाकुर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
मा. मुख्य अभियंता (वाणिज्य),
म.रा.वि.वि.कं.मर्या,
मार्फत –
1) सहाय्यक अभियंता,
उपविभाग, शिरुर ताजबंद,
ता. अहमदपुर.
2) कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं.मर्या,
विभागीय कार्यालय,
देगलुर रोड, उदगीर,
जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एम.मान्नीकर.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.जी.साखरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे डोंगरज ता. चाकुर येथील रहिवाशी असून, गट क्र. 53 मध्ये शेतजमीन आहे. सदरील शेतजमीनीत विदयुत मोटार पंपाचे माहे- सप्टेंबर 2012 चे विज देयक रक्कम रु. 62,530/- इतके आले आहे. अर्जदाराने सदरचे बिल दुरुस्त करुन देण्याची मागणी गैरअर्जदारास केली होती. सदरचे बिल दुरुस्त करुन दिले नाही म्हणून तक्रारी अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराने सन – 2000 मध्ये 3 एच.पी.च्या विदयुत कनेक्शनसाठी डिमांड रक्कम रु. 1770/- भरली होती. परत गैरअर्जदाराच्या सांगण्यानुसार अर्जदाराने दि. 07/10/2005 रोजी रु. 3,530/- इतकी रक्कम भरली. सन- 2005 पुर्वी भरलेल्या परंतु आवश्यक टेस्ट रिपोर्ट व करारपत्रे याची पुर्तता अर्जदारास वरिष्ठ कार्यालयाने करण्याचा आदेश सन – 2010 मध्ये दिला. अर्जदारास एप्रिल – 2011 मध्ये विज कनेक्शन देण्यात आले. अर्जदारास सप्टेंबर 2012 मध्ये रु. 62,530/- विज बिल देयक देण्यात आले. त्यावर विदयुत पुरवठा तारीख 07/10/2005 असुन, 7.5 एच.पी प्रमाणे विदयुत पुरवठा देण्यात आला आहे, असा उल्लेख केले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 28/10/2012 रोजी पत्र व दि. 26/11/2012 रोजी बिल दुरुस्तीची नोटीस दिली आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जात सप्टेंबर 2012 चे देयक रु. 62,530/- रद्द करावे व एप्रिल 2011 पासुन नियमाप्रमाणे विज बिल व्याजाची आकारणी न करता दयावे. तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी, तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 25,000/- देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकुण – 12 कागदपत्रे दाखल केली आहेत, व अंतरिम अर्ज दाखल केला आहे.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने सिध्द करावे की, गट क्र. 53 मध्ये डोंगरज ता; चाकुर येथे शेती आहे. अर्जदाराने दि. 27/03/2010 रोजी डिमांड रक्कम रु. 1770/- जमा केली असून, 5 वर्षापर्यंत टेस्ट रिपोर्ट दिला नाही, नंतर नविन कोटेशन प्रमाणे गैरअर्जदाराने नविन कोटेशन रु. 3530/- दि. 07/10/2005 रोजी अर्जदाराकडुन घेतले आहे. अर्जदाराने टेस्ट रिपोर्ट सन-2008 मध्ये दिला आहे. अर्जदार स्वच्छ हाताने आलेला नाही, अर्जदाराची तक्रारी खारीज करण्यात यावी. अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. गैरअर्जदाराने विदयुत वापराप्रमाणे रु. 62,350/- चे विदयुत बिल दिले आहे. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराने एकही बिल भरले नाही. अर्जदार हा डिफॉल्टर आहे. अर्जदारास सदर मंचात तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदाराचा अंतरिम अर्ज रद्द करण्यात यावा.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने मोबदला देवून गैरअर्जदाराकडुन विदयुत पुरवठा घेतला आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचा अंतरिम अर्ज दि. 07/01/2013 रोजी मंजुर करण्यात आला. अर्जदाराने दि; 27/03/2000 रोजी रु. 1770/- चे डिमांड भरुन 3 एच.पी. कनेक्शनची मागणी गैरअर्जदाराकडे केली आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने दि. 01/10/2005 रोजी रु. 3,510/- कोटेशन भरण्यास सांगितले आहे. सदरचे कोटेशन दि. 07/10/2005 रोजी भरल्याचे दाखल केलेल्या पावतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने दि. 08/03/2011 रोजीचे गैरअर्जदार क्र. 1 चे पत्र दाखल केले आहे त्यात वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मार्च – 2010 पर्यंत डिमांड भरलेल्या ग्राहकांना शेती पंपाचे कनेक्शन देण्यातयेत आहे. आपण 7 दिवसाच्या आत टेस्ट रिपोर्ट व करार पत्र कार्यालयात सादर करावे. त्यामुळे आपणास विदयुत कनेक्शन देता येईल. यावरुन असे दिसुन येते की, अर्जदारास दि. 08/03/2011 पर्यंत विदयुत कनेक्शन दिले नाही. अर्जदाराने दि. 18/10/2012 रोजी रक्कम रु. 62,530/- चे विदयुत बिल दाखल केले आहे, त्यात 7.5 एच.पी. एवढा मंजुर भार दिसत आहे. गैरअर्जदाराचा अहवाल यामध्ये शेती पंपासाठी 3 एच.पी विदयुत भार दि. 23/03/2011 रोजी घेतला आहे, असे नमुद केले आहे. अर्जदाराने डिसेंबर-2011,मार्च-2012 व जुन – 2012 चे सीपीएल दाखल केले आहे. अर्जदाराने दि. 20/03/2011 रोजी बिल क्र. 2387 लक्ष्मी इंजिनिअरींग लातुर येथून शेती पंपासाठी लागणारे साहित्य खरेदी केल्याचे दिसुन येत आहे. अर्जदाराने दि. 30/09/2014 चे विदयुत बिल दाखल केले आहे. त्यात वाणिज्य परिपत्रक क्र. 223,229,234 नुसार कृषी संजीवनी योजनेच्या लाभासाठी अर्जदार पात्र असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने रु. 62,530/- बिल रद्द करण्यासाठी दि; 28/10/2012 रोजी पत्र व दि. 26/11/2012 रोजी नोटीस गैरअर्जदारास दिल्याचे दिसुन येते. सदरची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्याचे पोहच पावतीवरुन स्पष्ट होते; गैरअर्जदाराने अर्जदारास विदयुत पुरवठा 2005 पासुन 2011 पर्यंतचे न दिल्याचे स्पष्ट होते, व त्या कालवधीचे विदयुत बिल अर्जदारास देवून गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होत असल्यामुळे, गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराने दिलेले रक्कम रु. 62,530/- चे विदयुत बिल रद्द करण्यात यावे. अर्जदारास मार्च – 2011 पासुन पुढील विदयुत बिल 3 एच.पी विदयुत पुरवठयानुसार देण्यात यावे. कृषी संजीवनी योजना, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु. 8,000/- अनुतोषास पात्र आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 62,530/- चे दिलेले
विदयुत बिल रद्द करण्यात यावे.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास आपणाकडुन एप्रिल – 2011 रोजी
3 एच.पी. विदयुत पुरवठयाचे कनेक्शन दिले आहे, त्यापासुन विना दंड व्याज तयार
होणारे बिल कृषी संजीवनी योजना अंतर्गत लाभ आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावा.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 3 चे पालन मुदतीत न
केल्यास गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु. 3,000/- दंड देण्यात यावा.
5) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.