श्री.स.व.कलाल, मा.सदस्य यांचेव्दारे
1) प्रस्तूत प्रकरणी तक्रारदार हे ज्येष्ठ नागरीक असून ते चेंबूर, मुंबई येथील रहिवासी आहेत व ते तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर राहतात. तर सामनेवाले ही दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवणारी शासकीय कंपनी आहे. त्यांचे कार्यालय प्रभादेवी मुंबई येथे तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर आहे.
2) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सबबीखाली तक्रार दाखल केलेली आहे.
3) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी त्यांनी सामनेवाले यांचेकडून लॅन्डलाईन व ब्रॉडबॅन्ड दूरध्वनी कनेक्शन घेतले होते. त्याचा क्रमांक 25252862 असा होता. सदरचे कनेक्शन दीर्घकालावधीपासून बंद होते म्हणून तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने तक्रार नोंदविली. त्यानुसार तक्रारदार यांचा दूरध्वनी तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित झाला परंतु त्यानंतर पुन्हा दूरध्वनी बंद झाला. त्यासाठी तक्रारदाराने पुन्हा दिनांक 16 फेब्रुवारी,2023 रोजी ऑनलाईन पध्दतीने सामनेवाले यांच्याकडे तक्रार नोंदविली. परंतु दूरध्वनी दुरुस्त झाला नाही म्हणून तक्रारदाराने पुन्हा 22 मार्च,2023 रोजी सामनेवाले यांचे महाव्यवस्थापक यांच्याकडे तक्रार दाखल केली. याव्यतिरिक्त तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे पोस्टाव्दारे लेखी तक्रार पाठविली व पुन्हा एप्रिल-2024 या महिन्यात सामनेवाले यांच्या ईमेल आयडीवर तक्रार केली. अशाप्रकारे सामनेवाले यांचेकडे अनेकवेळा तक्रारी करून सुध्दा तक्रारदार यांची दूरध्वनी सेवा ही तक्रार दाखल करेपर्यंत कार्यान्वित झाली नव्हती व तक्रारदाराच्या तक्रारीची दखल सामनेवाले यांनी घेतलेली नाही. तथापि, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून नियमितपणे येत असलेल्या दूरध्वनी देयकांचा भरणा वेळोवेळी तत्परतेने केलेला आहे.
दूरध्वनी बंद असल्यामुळे तक्रारदार यांना ब्रॉडबॅन्ड सेवेचा उपभोग घेता आलेला नाही त्यामुळे तक्रारदार यांच्या कुटूंबातील सदस्यांना ऑनलाइन मीटिंग, कार्यालयीन कामे, ऑनलाईन क्लासेस अशा सुविधांचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे कुटूंबातील सर्व सदस्यांची अत्यंत गैरसोय झालेली असून त्यांना फार मोठा मनस्तापझालेला आहे. सदर बाबही सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब असल्याने तक्रारदाराने ही तक्रार या आयोगासमोर दाखल केलेली आहे.
4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीत त्यांचा बंद असलेला दुरध्वनी विनाविलंब तात्काळ चालू करण्याची मागणी केलेली आहे तसेच दूरध्वनी सेवायापुढे खंडीत होऊ नये यासाठी सामनेवाले यांना आयोगाने निर्देश दयावेत तसेच सामनेवाले यांना डिसेंबर-2022 पासून ते दूरध्वनी सेवा पूर्ववत कार्यान्वित होईपर्यंतच्या कालावधीसाठी सामनेवाले यांनी केलेली दूरध्वनी देयकांची आकारणी रद्द करण्याची मागणी केलेली आहे. याव्यतिरिक्ततक्रारदार यांना दूरध्वनी सेवेअभावी झालेला मानसिकत्रास व गैरसोय यासाठी नुकसान भ्रपाईपोटी रु.2,00,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
5) याउलट सामनेवाले यांना या आयोगातर्फे पाठवण्यात आलेली नोटीस दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी प्राप्त होऊन देखील सामनेवाले यांनी तक्रारीच्या अनुषंगाने त्यांचे लेखी उत्तर दाखल केले नाही म्हणून दिनांक 18 एप्रिल, 2024 रोजी त्यांच्याविरुध्दविनाकैफियत आदेश पारित करण्यात आलेला आहे.
6) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेल्या पुराव्यासंबंधीच्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदार यांच्या पुरावा शपथपत्राचे वाचन करण्यात आले. त्यानुसार सदर प्रकरणी गुणवत्तेच्या आधारावर खालीलप्रमाणे न्यायनिर्णय करण्यात येत आहे.
7) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांची दूरध्वनी सेवा डिसेंबर-2022 पासून बंद झालेली होती व त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे सतत तक्रारी नोंदवून व नोटीस पाठवून तक्रारीचे निराकरण करण्याची विनंती केली असता त्याकडे सामनेवाले यांनी दुर्लक्ष केले. ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे.
या मुद्दयाच्या अनुषंगाने सामनेवाले यांचेविरुध्द दिनांक 18 एप्रिल, 2024 रोजी विनाकैफियत आदेश पारित झालेला आहे. तथापि, सामनेवाले यांनी दिनांक 21 डिसेंबर,2023 रोजी या आयोगाच्या नावाने एक पत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांच्या दूरध्वनी कनेक्शनमधील केबलमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर,2022 रोजी दोष निर्माण झालेला होता व सदरच्या दोषामुळे ब्रॉडबॅन्ड सेवा बंद होती त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या दूरध्वनी देयकात ब्रॉडबॅन्ड सेवेच्या शुल्काची आकारणी केलेली नाही तसेच दूरध्वनी भाडे यामध्ये सुध्दा दिनांक 1 डिसेंबर,2022 ते 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत लॅन्डलाईन सेवेसाठी सूट देण्यात आलेली आहे आणि दिनांक 16 फेब्रुवारी,2023 ते 30 नोव्हेंबर,2023 या कालावधीसाठी ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी सूट देण्यात आलेली आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे दुरध्वनी कनेक्शनमधील कॉपर केबल यामध्ये अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती व सांडपाणी कामाच्या दुरुस्तीमुळे तक्रारदार राहत असलेल्या भागात दूरध्वनी सेवेत व्यत्यय निर्माण झाला होता. त्यामुळे त्या भागातील सर्व दूरध्वनी कनेक्शन हे फायबर कनेक्शन मध्ये रूपांतरित करून सेवेमध्ये सुधार करण्यात आला आहे. त्यानुसार तक्रारदार यांनी त्यांचे दूरध्वनी कनेक्शन नवीन ऑप्टिकल फायबर मध्ये रूपांतरित करून घेण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवाले यांच्या लेखी जबाबाची अभिलेखात नोंद घेण्यात आलेली नाही म्हणून त्यांच्याविरुध्दविनाकैफियत आदेश पारित करण्यात आलेला आहे. तथापि, न्यायहिताच्या दृष्टीने सामनेवाले यांचे म्हणणे सदर प्रकरणी तडजोड करण्यासंबंधी असल्याने त्याचे वाचन करुन ते विचारात घेण्यात आले आहे.
तक्रारदार यांच्या दूरध्वनी कनेक्शन दुरुस्ती संदर्भातब-याच वेळा तक्रारी नोंदवून सुध्दा त्याची सामनेवाले यांनी दखल घेतलेली नाही व तक्रारदार यांची दूरध्वनी सेवा पूर्ववत चालू केलेली नाही ही बाब सामनेवाले यांची सेवा सुविधा पुरविण्यास कसूर व आहे असे आयोगाचे मत आहे.
8) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत त्यांच्या दूरध्वनी सेवेतील दोष विनाविलंब दुरुस्त करण्याची विनंती केलेली आहे तसेच सामनेवाले यांनी डिसेंबर, 2022 पासून आकारणी केलेली सर्व देयके रद्द करावीत, मानसिक त्रासापोटी व दुरध्वनी सेवेअभावी झालेल्या गैरसोयीपोटी रु.2,00,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
वरील मुद्द्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्रासोबत पृष्ठ क्रमांक 15 व 16 वर डिसेंबर,2022 पासून ते मार्च, 2024 पर्यंत भरणा केलेल्या देयकांच्या संदर्भात पुरावे दाखल केलेले आहेत.त्यानुसार तक्रारदाराने कोणतीही सेवा उपलब्ध नसताना रु.7,094/- इतकी रक्कम सामनेवाले यांच्याकडे दूरध्वनी सेवेच्या देयकापोटी भरलेली असल्याचे दिसून येते. दूरध्वनी सेवा खंडित असतानासुध्दा सामनेवाले यांनी देयक आकारणी केलेली आहे व त्याचे पुरावे तक्रारदाराने पृष्ठ क्र.15 व 16 वर दाखल केलेले आहेत. सामनेवाले यांची सदरची कृती ही अनूचित व्यापारी प्रथेत मोडते असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे डिसेंबर,2022 पासूनची सर्व देयक आकारणी रद्द करणे संयुक्तिक होईल असे आयोगाचे मत आहे. तसेच दूरध्वनी सेवेअभावी तक्रारदार यांची झालेली गैरसोय व मानसिक त्रास या मागणीचा सुध्दा विचार करणे संयुक्तिक होईल असे या आयोगाचे मत आहे.
वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1) तक्रार क्रमांक CC/83/2023अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या दूरध्वनी सेवेबाबत सेवासुविधा पुरविण्यास कसूर केली आहे असे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांनी तक्रारदारास त्याची लॅन्डलाईन व ब्रॉडबॅन्ड दूरध्वनी सेवेचे कनेक्शन नवीन सुधारीत फायबर कनेक्शनमध्ये रुपांतरीत करुन सेवा पूर्ववत चालू करावी. त्यासाठी तक्रारदाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करु नये.
4) तक्रारदार यांनी डिसेंबर-2022 पासून दूरध्वनी सेवा बंद असतानासुध्दा भरणा केलेली देयके सामनेवाले यांनी रद्द करावीत व तक्रारदाराने भरणा केलेले रु.7,029/- (रु.सात हजार एकोणतीस फक्त) तक्रारदारास हे आदेश प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आंत परत करावेत अन्यथा पंधरा दिवसांनतर सदर रकमेवर द.सा.द.शे.6% दराने व्याज आकारणी लागू राहील.
5) सामनेवाले यांनी तक्रारदारास दूरध्वनी सेवेअभावी झालेली गैरसोय व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/-(रु.पाचशे मात्र) इतकी रककम तीस दिवसांत अदा करावी. तीस दिवसांनंतर या रकमेवर द.सा.द.शे.6% दराने व्याज लागू राहील.
6) या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात यावी.