जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 300/2010. तक्रार दाखल दिनांक : 18/05/2010. तक्रार आदेश दिनांक :21/02/2011. श्री. प्रितम रमेश सावळे, वय 32 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. महातपूर, ता. माढा, जि. सोलापूर तर्फे कुलमुखत्यारपत्रधारक श्री. रमेश खेमचंद सावळे, वय 63 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. सदर. तक्रारदार विरुध्द 1. कार्यकारी अभियंता (ग्रामीण), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., सोलापूर, जुनी मील कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. 2. उपअभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., उपविभाग माढा, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. व्ही.के. वसगडेकर (साक्षी लॉ असोसिएटस्) विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. एस.एस. कालेकर आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे डि. व सब-डि. सोलापूर, ता. माढा, मौजे निमगांव (मा.) येथील गट नं.18/2-ब चे एकूण क्षेत्र 1 हे 40.5 आर शेतजमीन क्षेत्र आहे. सदर क्षेत्रातील पिकास पाणी देण्यासाठी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विद्युत वितरण कंपनी') यांच्याकडून श्री. संजीव लहू सर्जेराव यांचे नांवे विद्युत जोडणी घेण्यात आलेली असून गट नं.20 चे ते मालक व वहिवाटदार आहेत. तक्रारदार यांचे बंधू श्री. गोमटेश रमेश सावळे यांनी श्री. सर्जेराव यांच्याकडून गट नं.20 खरेदी केली असून तक्रारदार यांच्या हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकी व अविभक्त हिश्याची मिळकत आहे. सदर विद्युत जोडणीचे देयकाचा भरणा तक्रार करीत आहेत आणि ते विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी सन 2009-2010 मध्ये 2.5 एकर क्षेत्रामध्ये ऊस पिकाची लागवड केलेली होती. दि.11/3/2010 रोजी त्यांच्या ऊस पिकाची तोडणी चालू असताना दुपारी 3.00 वाजता विद्युत वाहिनीची एक तार तुटून दुस-या तारेच्या संपर्कात आल्यामुळे ठिणग्या पडल्या आणि त्यांचे ऊस पीक जळून गेले. ऊस जळाल्यामुळे 116 टन वजन भरले आणि 60 टन उत्पादनाची घट आली. कारखान्याने रु.2,200/- प्रतिटन दर दिलेला असून त्यांचे रु.1,32,000/- चे नुकसानीसह वाडयाचे रु.20,000/- चे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा तलाठी, निमगाव यांनी पंचनामा केला. विद्युत वितरण कंपनीकडून नुकसान भरपाईची लेखी मागणी केली असता, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.1,75,200/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी त्यांनी विनंती केली आहे. 2. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्युत पुरवठा संजीव लहू सर्जेराव यांचे नांवे असल्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत आणि त्यांना मंचासमोर दाद मागता येणार नाही. तसेच विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्यामुळे ऊस जळाल्याचे त्यांनी नाकारले आहे. तक्रारदार यांची नुकसान भरपाईची मागणी त्यांनी फेटाळून लावली असून शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक होते काय ? नाहीत. 2. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- सर्वप्रथम, तक्रारदार यांचे नांवे विद्युत पुरवठा दिलेला नसल्यामुळे तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत आणि तक्रार मंचासमोर चालू शकत नाहीत, असा युक्तिवाद विद्युत वितरण कंपनीतर्फे करण्यात आला. तक्रारदार यांनीही त्यांचे नांवे विद्युत पुरवठा नसल्याचे नमूद केले असले तरी तो श्री. संजीव लहू सर्जेराव यांचे नांवे असून ते क्षेत्र तक्रारदार यांचे बंधू श्री. गोमटेश रमेश सावळे यांनी श्री. सर्जेराव यांच्याकडून खरेदी केली आहे आणि तक्रारदार यांच्या हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकी व अविभक्त हिश्याची मिळकत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्या विद्युत पुरवठयाचा वापर करीत असल्याचे व त्याचे देयक भरणा करीत असल्याचे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांचे नांवे वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी श्री. संजीव लहू सर्जेराव यांचे नांवे असून ते क्षेत्र सध्या श्री. गोमटेश रमेश सावळे यांचे नांवे आहे. रेकॉर्डवर श्री. गोमटेश रमेश सावळे हे तक्रारदार यांच्यासह एकत्र कुटुंब पध्दतीद्वारे राहत असल्याचे शपथपत्र दाखल नाही. विद्युत पुरवठा श्री. गोमटेश रमेश सावळे यांनी त्यांचे नांवे हस्तांतरीत केलेला आहे काय ? किंवा कसे ? याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तक्रारदार हे त्यांचे नांवे असलेला विद्युत पुरवठा वापर करीत असल्याबाबत किंवा त्या सेवेचा लाभ घेत असल्याबाबत कागदोपत्री पुराव्याद्वारे सिध्द झालेले नाही. 6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) असे स्पष्ट करते की, (d) "consumer" means any person who— (ii) hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 'hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purposes; Explanation.— For the purposes of this clause, “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by means of self-employment; 7. वरील तरतुदीनुसार वस्तु किंवा सेवा घेणारा व्यक्ती किंवा लाभार्थी व्यक्ती 'ग्राहक' होतो, परंतु सदर सेवा प्रथम व्यक्तीच्या संमतीने देण्यात आलेली असणे आवश्यक आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये कायदेशीर तरतुदीप्रमाणे वस्तुस्थिती नाही. 8. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर मा.छत्तीसगड राज्य आयोगाने 'ज्युनिअर इंजीनिअर, छत्तीसगड राज्य विद्युत मंडळ व इतर /विरुध्द/ गोवर्धन प्रसाद धुरंदर', 2010 (3) सी.पी.आर. 139 निवाडा दाखल केला असून त्यातील तत्व काही अंशी या तक्रारीत लागू पडते. 9. वरील विवेचनावरुन तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक होऊ शकत नाहीत, या निर्णयाप्रता आम्ही आलो असून तक्रारीत उपस्थित इतर मुद्यांना स्पर्श न करता तक्रारदार यांची तक्रार वरील कारणामुळे रद्द करणे न्यायोचित ठरते. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. (संविक/स्व/10211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |