निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 24/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 24/09/2010 तक्रार निकाल दिनांकः- 28/04/2011 कालावधी 07 महिने 04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. उत्तमराव पि.किशनराव गजमल. अर्जदार वय 50. धंदा.नौकरी. अड.एस.आर.घाटगे. रा.सदगुरु नगर. जुना पेडगावरोड. परभणी विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार महा.स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. अड.एस.एस.देशपांडे. परभणी विभाग.जिंतूर रोड.परभणी. 2 उप कार्यकारी अभियंता. महा.स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. महावितरण शहरी उपविभाग.जिंतूररोड.परभणी 431 401 ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा. श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या .) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने ग्राहक क्रमांक 530010521784 अन्वये घरगुती वापरासाठी गैरअर्जदार विज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतला होता.मिटर घेतल्यापासून डिसेंबर 2009 या कालावधीपर्यंत अर्जदाराने नियमित विद्युत देयकाचा भरणा केलेला आहे.अर्जदाराचा विज वापर प्रतिमहा 50 ते 60 युनिट एवढा होता.अर्जदारास डिसेंबर 2009 पर्यंत गैरअर्जदार कार्यालयाने व्यवस्थीत व योग्य विद्युत देयक दिली.परंतु अचानकपणे जानेवारी 2010 या महिन्याचे 1630 युनिटचे रु.9190/- चे बिल दिले सदर बिला मध्ये मागील रिडींग 770 युनिट व चालू रिडींग हातानी लिहिलेली 2400 एवढी दर्शविण्यात आली होती. अर्जदाराने दिनांक 12/01/2010 रोजी लेखी तक्रार अर्ज देवुन अवाजवी बील येत असल्यामुळे मीटर मध्ये काही बिघाड असल्यास ते बदलुन नवीन मीटर बसवण्याची अथवा जुने मीटर दुरुस्त करण्याची विनंती गैरअर्जदारास केली,परंतु त्यानंतर देखील गैरअर्जदाराने फेब्रुवारी 2010 व मार्च 2010 साठी प्रत्येकी 291 युनिटचे विज बील अर्जदारास दिली.पुढे वेळोवेळी अर्जदाराने पाठपुरावा केल्यामुळे गैरअर्जदार कार्यालयाने अर्जदाराच्या मीटरची पाहणी करण्याचे मनावर घेतले अर्जदाराने नियमा नुसार टेस्टींग फीस रु.100/- भरल्यानंतर गैरअर्जदाराने मीटर टेस्ट केले व त्यामध्ये असे निष्पन्न झाले की,मीटर बॉडी गाहक पेपर सील शाबीत आहे, परंतु मीटर मध्ये डिफेक्ट असल्याचे आढळून आल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास नवीन मिटर बसवुन दिले.नवीन मिटर बसवल्यानंतर या पुढिल विज बीलात योग्य विज वापर दर्शविण्यत आला,परंतु त्यात मागील थकबाकी अथवा इतर शिर्षकाखाली जास्तीचे बिल देणे चालूच ठेवले.तदनंतर दिनांक 23/04/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारांना परत अर्ज देवुन योग्य विद्युत देयक देण्याची विनंती अर्जदाराने केली,परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.एप्रिल 2010 मध्ये एकुण 14 युनिट विज वापर दर्शवुन रु.9930/- चे तर मे 2010 मध्ये एकुन विज वापर 72 विजी बील रु.10,320/- जुलै 2010 मध्ये 81 युनिट विज वापर व रक्कम रु. 6210/- चे विज बिल अर्जदारास दिले.शेवटी दिनांक 09/07/2010 रोजी लेखी विनंती अर्ज देवुन विज बिलात दुरुस्ती करण्याची विनंती अर्जदाराने केली,परंतु त्यास गैरअर्जदाराने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन जानेवारी 2010 ते मार्च 2010 या कालावधीचे विज बिल अयोग्य असल्याचे जाहिर करुन ते रद्द बातल करावेत तसेच एप्रिल 2010 ते ऑगस्ट 2010 या कालावधीचे विज बील विज वापरा नुसार देण्याचे गैरअर्जदारास आदेश द्यावेत.तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- गैरअर्जदाराने द्यावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 व व पुराव्यातील कागदपत्र नि.7/1 ते नि.7/14 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ला मिळाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.16 वर दाखल करुन अर्जदाराचे म्हणणे बहुतअंशी अमान्य केले.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदारास योग्य व त्याच्या विज वापरा नुसार विद्युत देयक दिलेली आहेत. नोव्हेंबर 2009 व डिसेंबर 2009 या काळात अर्जदाराचे घर बंद असल्यामुळे मिटर रिडींग मिळाली नाही. जानेवारी 2010 मध्ये मिटर रिडींग 2400 एवढी तर ऑक्टोबर 09 या महिन्यात मिटर रिडींग 770 होती. त्यामुळे अर्जदारास 2400 – 770 = 1630 युनिटचे बिल दिले. वास्तविक पाहता सदरचे बील हे 3 महिन्यासाठीचे दिलेले आहे.वरील काळात मिटर रिडींग न मिळाल्यामुळे 52 युनीटचे अंदाजे बील देण्यत आले होते व त्याची रक्कम चालू बिलातून वजा करुन योग्य बिले अर्जदारास दिलेली आहेत.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने विज बिलाचा भरणा न केल्यामुळे थकबाकी व व्याज वाढत गेले.त्यामुळे बिलाची रक्कम जास्त वाटते. परंतु अर्जदारास देण्यात आलेली विज बिल योग्य आहेत.म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.17 वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता.अर्जदाराचा सरासरी विज वापर प्रतिमहा 50 ते 60 युनीट प्रमाणे होता.डिसेंबर 2009 पर्यंत अर्जदारास योग्य व त्याच्या विज वापरानुसार विद्युत देयक मिळत होती व त्याप्रमाणे त्याने सर्व विद्युत देयकाचा भरणा देखील केलेला होता.परंतु जानेवारी 2010 या महिन्यापासून अर्जदारास अवास्तव युनिटचे विद्युत देयक देण्यात आली.अर्जदाराने अनेक वेळा ही बाब गैरअर्जदाराच्या निदर्शनास आणून दिली.व सदर मिटर सदोष असल्यास बदलवुन देण्यासाठी पाठपुराव केल्यनंतर गैरअर्जदाराने दिनांक 23/03/2010 रोजी मीटर टेस्ट केले व तपासणी अंती मीटर सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गैरअर्जदाराने जुने मीटर काढून नवीन मिटर बसवुन दिले.पुढे अर्जदारास देण्यात आलेल्या विद्युत देयका मध्ये योग्य विज वापरची नोंद होती परंतु मागील थकबाकी दर्शवुन अवास्तव रक्कमेचे विद्युत देयक अर्जदारास देण्यात आले.अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.मंचासमोर अर्जदाराने विद्युत देयकांच्या मुळ प्रति नि.7/1 ते नि.7/10 दाखल केल्या आहेत.त्याची पडताळणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते.दिनांक 11/07/2009 रोजीचे 52 युनिटचे ( नि.7/1), दिनांक 10/08/2009 रोजीचे 138 युनिटचे ( नि.7/12) , दिनांक 11/10/2009 रोजीचे 54 युनिटचे ( नि.7/4) व दिनांक 06/02/2010 रोजीचे 1630 युनिटचे ( नि.7/6) चे विद्युत देयक अर्जदारास दिलेली आहेत.त्यावरुन अर्जदारास योग्य विद्युत देयक देण्यात आलेली नव्हती हे लक्षात येते.तसेच अर्जदाराचे मीटर सदोष असल्याचे ही गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे.परंतु त्या नंतर देखील देण्यात आलेल्या विद्युत देयका मध्ये मागील थकबाकीसह अर्जदारास अवास्तव रक्कमेचे विद्युत देयक देणे ही बाब नक्कीच गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याचे दर्शविते.त्यामुळे जानेवारी 2010 ते मार्च 2010 पर्यंतची सर्व विद्युत देयक अयोग्य असल्याने रद्द करण्यात येत आहे.उपरोक्त कालावधीसाठी अर्जदाराचा विज वापर साधारण प्रतिमहा 75 युनिट प्रतिमहा असल्याचे निदर्शनास आल्याने ( नि.7/8, नि.7/9) त्याप्रमाणे अर्जदाराकडून विद्युत देयकापोटी रक्कम वसुल करावी.त्या पुढिल म्हणजे एप्रिल 2010 पासून ते ऑगस्ट 2010 पर्यंतचे विद्युत देयका मधील थकबाकीची रक्कम वसुल न करता फक्त विज वापराच्या युनिट एवढी रक्कम अर्जदाराकडून वसुल करावी व उपरोक्त कालावधी मध्ये अर्जदाराने भरलेली रक्कम त्या रक्कमेत समायोजित करावी.असा आदेश देणे न्यायोचित असल्यामुळे वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1) अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) माहे जानवोरी 2010 ते मार्च 2010 चे अर्जदारास दिलेले देयक रद्द करण्यात येत आहेत. त्या ऐवजी उपरोक्त कालावधी मध्ये 75 युनिट प्रतिमहा प्रमाणे विद्युत देयक निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या आत गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावी. 3) एप्रिल 2010 ते ऑगस्ट 2010 च्या देयका मधील मागील थकबाकीपोटी दर्शविण्यात आलेली रक्कम अर्जदाराकडून वसूल करु नये.असा आदेश गैरअर्जदारास देण्यात येत आहे,परंतु विज वापरानुसार देण्यात आलेल्या युनिटची रक्कम अर्जदाराकडून वसूल करावी.तसेच उपरोक्त कालावधीमध्ये जर अर्जदाराने काही रक्कम भरली असेल तर ती रक्कम या विज बिलाच्या रक्कमेतून समायोजित करण्यात यावी. 4) गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सेवात्रुटीपोटी व त्या अनुषंगाने झालेल्या मानसिक त्रासापोटी एकुण रक्कम रु.1500/- अर्जदारास द्यावी. 5) दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |