ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 59/2011 तक्रार दाखल तारीख –06/02/2011
अंगद पि. दगडू साळुंके
वय 35 वर्षे धंदा शेती व मजूरी .तक्रारदार
रा.पाली ता. जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म. बीड
मार्फत कार्यकारी अभिंयता, जालना रोड,बीड. .सामनेवाला
2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म. बीड
मार्फत सहायक अभिंयता, माळीवेस, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डी.एम.डबडे
सामनेवाला तर्फे :- अँड.डी.बी.बागल
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे मौजे पाली ता.जि. बीड येथे राहते माळवदाचे साडे चार खणाचे बांधकाम आहे. तेथे कूटूंबासोबत ते राहतात. तक्रारदाराचे पत्नीचे नांवाने विद्यूत जोडणी घेतलेली आहे. त्यांचा ग्राहक क्र.576030006053 आहे.
दि.01.04.2009 रोजी दुपारी 1 ते 1.30 चे दरम्यान भारनियमानंतर विज पुरवठा सूरु झाला त्यावेळी जास्तीचे विज प्रवाह येऊन शॉर्टसर्कीट होऊन घरावरुन गेलेल्या तारेतून आगीचे गोळे पडून तक्रारदाराचे घराला आग लागली. घरातील जीवन उपयोगी वस्तू व माळवदाचे घर जळून खाक झाले. सामनेवाला यांचे सेवेतील त्रूटी मूळे आग लागली असून त्यात तक्रारदाराचे जवळपास रु.1,50,000/- चे नूकसान झाले.
घटने बाबत बिड ग्रामीण पोलिस स्टेशनला यांना कळविले. तलाठी, मंडळ अधिकारी यांना कळविले. आग आटोक्यात न आल्याने अग्नीशामक दलाला कळविले. त्यानंतर अग्नीशामक दलाने येऊन सदर आग विझविली. त्यानंतर दि.2.4.2009 रोजी मंडळ अधिकारी, पोलिस निरिक्षक ग्रामीण पोलिस स्टेशन बीड तसेच विद्यूत निरिक्षक यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला.त्यात सामनेवाला यांचे चूकीने आग लागल्याचे नमूद केले.
तक्रारदारांनी नूकसानीची सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी मागणी केली परंतु सामनेवाला यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी दि.31.3.2011 रोजी कोणतेही कागद देण्यास व नूकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला. सामनेवाला क्र.1 व 2 हे नुकसान भरपाई देण्यास वैयक्तीक व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत. तक्रार खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
अ) घर जळून झालेले एकूण नूकसान रु.1,50,000/-
ब) मानसिक त्रासापोटी रु.25,000/-
क) तक्रारीचा खर्च रु.5,000/- एकूण रु..1,80,000/-
वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
विनंती की, रक्कम रु.1,80,000/- त्यावर 12 टक्के द.सा.द.शे. व्याज देण्याचे सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचा खुलासा दि.12.7.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदारांने सामनेवाला यांचे ग्राहक असल्याबददल विज देयक दाखल न केल्याने मान्य करता येत नाही. विज जास्तीचा प्रवाह आला की नाही हे फक्त विद्यूत निरिक्षक व अभियंता सांगू शकतो. विज प्रवाह आला असता तर त्याचा परिणाम इतरावरही झाला असता.शिवाय तक्रारदाराच्या घरातील फिटींग कमकूवत व लिकेज वायर मुळे पण होऊ शकतो. यात सामनेवाला यांची काही एक चूक नाही. तक्रारदार जाणूनबूजून पैसे मिळविण्याचे दृष्टीने सामनेवाला यांचेवर खोटे आरोप करीत आहेत. सदर घटनेस सामनेवाला जिम्मेदार नाहीत. तक्रारदाराचे रु.1,50,000/- चे नूकसान झाले या बाबत खुलासा टिपणी सविस्तर दिली नसल्याकारणाने भरवसा ठेवण्यासारखा नाही व कल्पोकल्पीत असल्यामुळे बिलकूल मान्य नाही. मानसीक त्रासाचा प्रश्न नाही. खोटी केस केली, सेवेत कसूर नाही तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.डबडे व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.बागल यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारीत नमूद केलेल्या घटनेचे संदर्भात तक्रारदाराने दि.9.4.2009 रोजी पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन ग्रामीण बीड यांचेकडे अर्ज दिल्याची स्थळ प्रत दाखल केली आहे.तसेच दि.2.4.2009 रोजीचा महसूल खातचा पंचनामा तसेच मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांनी दिलेला अहवाल दाखल केलेला आहे. या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तक्रारदारानी सदरची घटना सामनेवाला यांना कळविल्याचे तक्रारीत म्हटले नाही. तक्रारीत पोलिस अधिक्षक, मंडळ अधिकारी व विद्यूत निरिक्षक यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केल्याचे म्हटले आहे. परंतु विद्यूत निरिक्षक हजर असल्याचे सदर कागदपत्रात कूठेही दिसत नाही. सामनेवाला यांना सदरची घटना कळविली नाही असे सामनेवाला यांचा आक्षेप आहे. तसेच आगीचे संदर्भात आगीचे कारण हे विजेशी संबंधीत असल्याचे विद्यूत निरिक्षक हे स्पष्टपणे सांगू शकतात परंतु त्यांचा त्या बाबतचा अहवाल नाही. तसेच वरील सर्व कागदपत्रे ही झेरॉक्स आहेत. त्यांचे संदर्भात तक्रारदाराच्या शपथपत्राशिवाय दूसरा पुरावा नाही. त्यामुळे विज तारेतून आगीचे गोळे पडून आग लागल्याची सिध्द करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची होती.त्यात बाबतचा योग्य तो पुरावा नसल्याने तक्रार मंजूर करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड