निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/08/2011 कालावधी 07 महिने 07 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. प्रभाकर पि.गणपतराव जामकर. अर्जदार वय 60 वर्ष.धंदा.सेवानिवृत. अड.वनिता काळविट. रा.शिवाजी नगर.परभणी. विरुध्द 1 उप कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. अर्बन सब डिव्हीजन, अड.एस.एस.देशपांडे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. कार्यालय परभणी. 2 कनिष्ठ अभियंता. झोन क्र.2 यु.एस.डि. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. कार्यालय परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) अवास्तव विज बिला बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराचे शिवाजीनगर परभणी येथे स्वतःचे घर आहे.त्याने गैरअर्जदाराकडून घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतलेले आहे.त्याचा ग्राहक क्रमांक 530010111969 आहे. वीज वापर दरमहा सरासरी 40 ते 50 युनीट होतो त्याप्रमाणे नियमितपणे वीज बीले भरली आहेत.तारीख 23/12/2008 रोजी जुने मिटर काढून नवीन मिटर बसविले त्यानंतर प्रत्यक्ष रिडींग न घेताच बिलावर RNA, INACCS FAULTY असे शेरे मारुन बीले दिली. रिडींग प्रमाणे बिले मिळण्यासाठी अर्जदाराने अनेकवेळा तक्रारी केल्या परंतु गैरअर्जदाराने दाद दिली नाही माहे नोव्हेंबर 2009 चे अचानक 499 युनीटचे रु.2770/- चे अवास्तव रक्कमेचे बील दिले. त्यानंतर पुन्हा जुलै 2010 मध्ये 423 युनीटचे बील दिले. चुकीची बिले दुरुस्त करुन द्यावीत म्हणून गैरअर्जदारकडे तारीख 27/08/2010 रोजी लेखी तक्रार केली मात्र त्याची दखल घेतली नाही. माहे ऑगस्ट 2010 चे 50 युनीटचे रु.9,270/- चे बील दिले. त्याबाबत तक्रार केली असता बिलावर Disputed matter शेरा मारुन 2500/- रु.ची आकारणी केली व रक्कम भरुन घेतली व त्यानंतर पुन्हा सप्टेंबर 10 चे रु.64840/- चे अवास्तव व चुकीचे बील दिले. त्याची दुरुस्ती करुन मागीतली असता ते दुरुस्त करुन न देता पुन्हा नोव्हेंबर 2010 चे रु.70280/- चे अवास्तव रक्कमेचे बील दिले. अशा रितीने सेवात्रुटी केली म्हणून त्याची दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराने तारीख 07/12/2010 चे माहे नोव्हेंबर 2010 चे देयक रद्द व्हावे मानसिकत्रासापोटी रु.10,000/-व अर्जाचा खर्च रु.3000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.7 लगत माहे जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंतची वादग्रस्त बिले वगैरे 49 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यानंतर तारीख 30/07/2011 रोजी एकत्रित लेखी जबाब (नि.16) दाखल केला. अर्जदारने घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतले संबंधीचा तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 1 व 2 मधील मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारली आहेत.त्यांचे म्हणणे असे की,अर्जदाराचे घर मिटर रिडींग घेते वेळी बंद असल्यामुळे रिडींग घेता आले नव्हते त्यामुळे अंदाजे सरासरीची बीले दिली आहेत.जून 2010 मध्ये प्रत्यक्ष रिडींग 6036 अशी मिळाली त्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये 423 युनिटचे दिलेले बील प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे असून ते बरोबर आहे.जून 2010 नंतर अर्जदारने एकही बील न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली आहे.सप्टेंबर 2010 ते नोव्हेंबर 2010 ची बीले रिडींग प्रमाणेच आहे.अवास्तव अथवा चुकीची नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.17) दाखल केले आहे. अंतीम सुनावणीच्या नेमले तारखेस अर्जदार तर्फे अड.सेलूकर व गैरअर्जदार तर्फे अड.सचिन देशपांडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्त्र. 1 गैरअर्जदारानी अर्जदारास जानेवारी 2009 पासून नोव्हेंबर 2010 पर्यंत रिडींग न घेता मनमानी पध्दतीने अवास्तव व चुकीची बिले देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 कारणे. अर्जदाराने घरगुती वापराचे गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010111969 नं.चे विज कनेक्शन घेतलेले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे. तसेच तारीख 23/12/2008 रोजी पूर्वीचे जुने मिटर बदलुन नवीन मिटर बसविले होते ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदारने पुराव्यात नि.7 लगत दाखल केलेल्या बिलावरील नोंदीतून आणि नि.7/14 वरील मिटर बदली अहवालाच्या नोंदी वरुन हे स्पष्ट होते. अर्जदाराची मुख्यतः अशी तक्रार आहे नवीन मिटर बसविल्यानंतर जानेवारी 09 पासून नोव्हेंबर 2010 पर्यंतची बिले गैरअर्जदाराच्या कर्मचा-याने रिडींग न घेता RNA, FAULTY असे शेरे मारुन अंदाजे व चुकीची बिले दिली होती म्हणून प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे बिले मिळावेत म्हणून व चुकीच्या व अवास्तव रक्कमेच्या वादग्रस्त बिलामध्ये दुरुस्ती करावी म्हणून लेखी, तोंडी तक्रार करुनही गैरअर्जदारांनी त्याची दखल घेतली नाही.पुराव्यात नि.7 लगत दाखल केलेल्या माहे जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंतच्या सर्व बिलांचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की,माहे जानेवारी 08 ते डिसेंबर 08 मधील सुरवातीच्या दोन तीन महिन्यात प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे साधारण 65 ते 80 युनीट प्रमाणे विज वापराची बिले आहेत.माहे मे 08 ते ऑगस्ट 08 पर्यंत रिडींग न घेता RNA, किंवा Locked असे शेरे मारुन स्थिर युनीट 83 ची आकारणी केली आहे.सप्टेंबर 08 ते डिसेंबर 08 च्या बिलात मागील रिडींग व चालू रिडींगचे आकडे देवुन बिलाची आकारणी केली आहे मात्र डिसेंबर 08 च्या बिलात (नि.7/10) मागिल विज वापर या तपशिला खाली माहे फेब्रुवारी 08 ते ऑक्टोबर 08 पर्यंत दरमहा वापरलेल्या युनिटची आकडेवारी आणि त्या त्या महिन्याच्या बिलात प्रत्यक्ष आकारणी केलेले युनिटस् च्या आकडयात तफावत असून मुळीच ताळमेळ बसत नाही. तारीख 23/12/2008 रोजी अर्जदाराच्या घरातील जुने मिटर बदलून नवीन मिटर बसविले हाते त्याचा मिटर चेंज रिपोर्ट अर्जदारने पुराव्यात (नि.7/14) दाखल केलेला आहे त्याचे अवलोकन करता जुना मिटर क्रमांक 255898 चे शेवटचे रिडींग 12767 ची नोंद केली आहे.व नवीन मिटर क्रमांक 10668008 चे चालू रिडींग 00002 अशी नोंद आहे रिपोर्ट वर अर्जदार व गैरअर्जदार दोघांच्याही सह्या आहेत.मिटर बदलल्यानंतर वास्तवीक नविन मिटर वरील प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे गैरअर्जदाराने त्यानंतरची बिले द्यायला काहीच हरकत नव्हती मात्र पुराव्यातील नि.7/15 ते नि.7/29 वरील माहे जानेवारी 09 ते डिसेंबर 09 च्या बिलांचे अवलोकन करता मिटरच्या प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे एकाही बिलात आकारणी न करता सरासरी 87 युनीट विज वापर गृहीत धरुन बिलाची आकारणी केली आहे. माहे डिसेंबर 08 मध्ये नवीन मिटर बसविल्यावर एकवर्षभर प्रत्यक्ष रिडींग न घेता गैरअर्जदाराच्या कर्मचा-यानी निष्काळजीपणा करुन व त्याकडे दुर्लक्ष करुन मनमानी पध्दतीने बिलाची आकारणी करुन ग्राहकावर अन्याय केलेला आहे हे स्पष्ट दिसते आणि या बाबतीत त्रुटीची सेवा दिली आहे या बद्दल कोणतीही शंका उरत नाही. गैरअर्जदारतर्फे सादर केलेल्या लेखी जबाबात अर्जदाराचे घर बंद असल्यामुळे रिडींग घेता आले नव्हते असा बचाव घेवुन आपला निष्काळजीपणा दडवण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु तो मुळीच पटण्यासारखा नाही व विश्वासार्ह देखील नाही. पुराव्यात दाखल केलेल्या 2010 सालातील बिलांचे व बिलापोटी भरलेल्या पावत्यांचे आणि वादग्रस्त बिलाबाबत गैरअर्जदारकडे तक्रार अर्जांच्या स्थळप्रतींचे (नि.7/31 ते 7/48) अवलोकन करता असे दिसून येते की, जानेवारी 10 नंतर ऑगस्ट 10 पर्यंतच्या बिलात देखील जुन्या मिटर नंबरचीच बिले असून रिडींग न घेता RNA शेरे मारुन सरासरी 147 युनीट विज वापर ग्रहीत धरुन बिलांची आकारणी केलेली आहे परंतु 147 युनीट ग्रहीत धरलेला विज वापर कशाच्या आधारे ग्रहीत धरला याबाबतचे कसलेही स्पष्टीकरण लेखी जबाबात अथवा युक्तिवादाच्या वेळी दिलेले नाही माहे जुलै 10 च्या देयकात (नि.7/42) देयक तारीख 6/8/10 मध्ये मागील रिडींग 6036 व चालू रिडींग 6459 ची नोंद करुन जे 423 युनिट एक महिन्यात विज वापर केल्याचे बील दिलेले आहे त्यावर दिलेल्या रिडींगची आकाडेवारी निश्चितपणे चुकीची व बोगस वाटते.कारण डिसेंबर 08 मध्ये जुना मिटर बदलला त्यावेळी मिटरचेंज रिपोर्ट (नि.7/14) प्रमाणे शेवटची रिडीग जर 12766 होते तर मग जुलै 10 च्या बिलात मागील रिडींग 6036 कसे काय आले ? हे अनाकलनीय आहे.त्यामुळे जुलै 10 चे वादग्रस्त बिल निश्चितपणे चुकीचे असल्याचाच निष्कर्ष निघतो अर्जदारने चुकीची आकरणी केलेल्या बिलात दुरुस्ती करुन मिळावी म्हणून गैरअर्जदारांच्या कार्यालयात हस्तपोच दिलेल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत (नि7/46) पुराव्यात दाखल केलेली आहे.परंतु त्याची दखल न घेता निष्काळजी पणाचा कळस केला आहे.नि.7/47 वरील माहे सप्टेंबर 10 चे बिलात (देयक तारीख 6/11/2010) नवीन मिटरची नोंद आहे त्यामध्ये मागील रिडींग 2727 व चालू रिडींग 7575 दाखवुन एक महिन्यात 348 युनिट विज वापर केल्याचे रु.1896.45 ची आकारणी करुन मागील थकबाकीसह एकुण 67890 रु.चे दिलेले बील चुकीचे असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते कारण घरगुती वापरात एक महिन्यात 348 युनिटचा अर्जदाराने विज वापर केला असेल हे मुळीच पटण्यासारखे नाही व ग्राहय धरता येणार नाही. तसेच त्यापुढिल माहे नोव्हेंबर 10 चे वादग्रस्त बील ( 7/48) ( देयक तारीख 7/12/2010) पाहता त्याही बिलावर नविन बदललेल्या मिटरचा क्रमांक आहे त्यावर चालू रिडींग 7927 व मागील रिडींग 7575 दाखवुन एक महिन्यात 352 युनिटचा विज वापर केल्याचे रु. 2317.35 ची आकारणी करुन थकबाकीसह एकुण रु.70240 चे दिलेले बिलाच्या बाबतीत देखील नि.7/47 वरील सप्टेंबर 10 च्या बिला सारखीच या बिलाची ही परिस्थिती आहे अर्जदाराच्या घरी एक महिन्यात 352 युनिटचा वापर केला होता याबाबतचा कसलाही ठोस पुरावा गैरअर्जदाराने प्रकरणात दाखल केलेला नाही.पुराव्यातील या वस्तुस्थितीमुळे अर्थातच जानेवारी 09 पासून नोव्हेंबर 10 पर्यंतची प्रत्यक्ष रिडींग न घेता मनमानी पध्दतीने अर्जदारास बिले देवुन अनुचित व्यापारीप्रथेचा अवलंब करुन गैरअर्जदाराने सेवात्रुटी केली असल्याचे पुराव्यातून सध्दि झालेले असल्यामुळे थकबाकीसह एकुण रु.70240/- चे माहे नोव्हेंबर 10 चे वादग्रस्त बिल (देयक तारीख 7/12/2010 ) रद्द करणे खेरीज अन्य पर्याय उरत नाही.लेखी जबाबात गैरअर्जदारानी दिलेली बिले रिडींग प्रमाणे आहेत व ती बरोबर आहेत असे म्हंटलेले आहे परंतु पुराव्यातील वस्तुस्थीती पाहीली असता गैरअर्जदारांनी घेतलेला बचाव निखालस खोटा असल्याचे सिध्द झाले आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चा उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 530010111969 वरील माहे नोव्हेंबर 2010 चे (देयक तारीख 07/12/2010) चे वादग्रस्त बील रद्द करणेत येत आहे. 2 त्याऐवजी अर्जदाराच्या घरी दरमहा सरासरी 90 युनीट वीज वापर होतो असे गृहीत धरुन माहे जानेवारी 2009 पासून नोंव्हेंबर 2010 पर्यंत दरमहाची आकरणी करुन नवीन दुरुस्त बिले कोणताही दंड व्याज न आकारता आदेश तारखे पासून 30 दिवसांचे आत अर्जदारास द्यावे. या काळात अर्जदाराने जी काही रक्कम जमा केली असेल ती वजा करुन उरलेली रक्कम स्विकारावी जमा केलेली रक्कम जादा होत असेल तर ती पुढिल बिलात समायोजित करावी. 3 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटी पोटी रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- अर्जदारास द्यावे. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |