(घोषित दि. 29.06.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 2011 साली खरेदीखत करुन मंठा येथे दुकान खरेदी केले. या दुकानाचा वीज पुरवठा जुन्या मालकाच्या नावे असून वीज मीटर पोलवर लावण्यात आले आहे. अर्जदाराने वीज बिलाचा भरणा केला असून त्यांच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. दिनांक 02.03.2012 रोजी गैरअर्जदार यांनी खांबावर लावण्यात आलेल्या मीटरची तपासणी करुन त्यांना दिनांक 06.03.2012 रोजी मस्तगड, जालना येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. गैरअर्जदार यांनी त्यांना मागील थकबाकी म्हणून 3,52,923/- रुपयाचे वीज बिल आकारले जे त्यांना मान्य नाही. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा व इतर अटी, विनीमय 2005 नुसार मीटरची नोंद घेतली गेली नसेल तर गैरअर्जदार यांनी सरासरीवर अधारीत वीज बिल आकरणी करणे अपेक्षित असल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल न घेण्यात आल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. त्यांना देण्यात आलेले वीज बिल रद्द करण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या वीज बिला पोटी वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारित करण्याची विनंती अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत दुकान खरेदी केल्याचे खरेदी खत, गैरअर्जदार यांनी दिलेली वीज बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
वीज पुरवठा खंडीत करु नये यासाठी अर्जदाराने दिलेल्या अंतरिम अर्जावर मंचाने दिनांक 30.03.2012 रोजी सुनावणी घेतली. अर्जदाराने मंचात दाखल केलेली कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी अर्जदाराच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आल्यामुळे अर्जदाराने 80,000/- रुपये 12 दिवसात जमा केल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश देण्यात आला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे त्यांना मंचासमोर दाद मागता येत नसल्याचे म्हटले आहे. दिनांक 02.03.2012 रोजी भरारी पथकाने अर्जदार वापरत असलेल्या वीज मीटरची पाहणी केली असता, वीज मीटर राजेशकुमार बंसल यांच्या नांवे असून ते मूळ ग्राहक असल्याचे दिसून आले त्यांच्या मीटर वरील रिडींग तपासले असता ते 59282 असे असल्याचे दिसून आले. परतू ग्राहकास 5241 असे रिडींग दर्शवून बिल देण्यात आल्याचे दिसून आले. मीटरची तपासणी केली असता ते सुस्थितीत असून वीज वापराची योग्य नोंद घेत असल्याचे दिसून आले. सदरील निरीक्षणाचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून त्यांनी प्रत्यक्ष वीज वापर व दिलेले बिल यामधील फरकेचे बिल पाठविले असून ते योग्य आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत स्थळ तपासणी अहवाल, मीटर चाचणी अहवाल इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी राजेशकुमार बन्सल यांच्या नावे वाणिज्य वापरासाठी वीज पुरवठा दिलेला आहे. अर्जदाराने सदरील दुकान हे जुन्या ग्राहकाकडून विकत घेतले असल्याचे व त्याची नोंदणीकृत खरेदी केल्याचे दिसून येते. खरेदी खत नोंदण क्रमांक 692/2011 असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदरील मीटर हे जरी अर्जदाराच्या नावावर नसले तरी ते वीजवापर करीत असल्यामुळे वीज कायद्यातील तरतुदी प्रमाणे वीज ग्राहक आहेत.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत घटनास्थळ पंचनामा दाखल केलेला आहे. दिनांक 02.03.2012 रोजीच्या पंचनाम्याचे निरीक्षण केल्यावर वीज मीटर हे दुकानात लावण्यात आलेले नसून ते दुकाना समोर असलेल्या पोलवर लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. सदरील मीटरचे सील व्यवस्थित असून मीटर वरील रिडींग 59282 असे असल्याचे नमूद केलेले आहे. सदरील मीटरची चाचणी करण्यात आल्यानंतर मीटरमध्ये कोणताही दोष नसून ते वीजवापराची योग्य नोंद घेत असल्याचे स्पष्ट होते.
वरील सर्व बाबीचे निरीक्षण केल्यावर अर्जदाराने, दुकान विकत घेतल्यानंतर म्हणजेच माचे 2011 वीज वापर सुरु केलेला आहे. मीटर व्यवस्थित नोंद घेत असल्यामुळे व पोलवर लावण्यात आलेले असल्यामुळे वीज वापराच्या नोंदीमध्ये अर्जदारातर्फे कोणतीही हेराफेरी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्यात आलेल्या वीज बिलाची असेसमेंट शिट मंचामध्ये दाखल केली आहे ज्यामध्ये सदरील वीज बिल हे 72 महिन्याचे असून सरासरी वीज वापर 823 युनिट प्रतिमहिना असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार या असेसमेंट शिटमध्ये वीज पुरवठा देण्यात आलेल्या वर्षापासून म्हणजे 2006 पासून ते फेब्रूवारी 2012 पर्यंतच्या काळात अंमलात असलेल्या टॅरीफ दाराप्रमाणे वीज बिल आकारणी केली आहे. वीज कायदा 2003 मधील कलम 56 (2) हे पुढील प्रमाणे आहे.
“Not with standing any thing contained in any other law for the time being inforce, no sum due from any consumer under this section shall be recoverable after the period of two years from the date when such sum became first due unless such sum has been shown continuously as recoverable as arrear of charges for electricity supplied and the licensee shall not cut off the supply of electricity.”
वीज कायद्यातील वरील तरतुदी नुसार वीज थकबाकी मागील दोन वर्षात जर वीज बिलात दर्शविली नसेल तर ती वसूल करण्याचा अधिकार वीज कंपनीला नाही. गैरअर्जदार यांनी मागील दोन वर्षात कोणतीही थकबाकी दर्शविलेली नाही. मंचात दाखल केलेल्या असेसमेंट पत्रकात 2006 पासून वीज बिलाची आकरणी केली असल्याचे दिसून येते जी कायद्यातील तरतुदीनुसार नसल्यामुळे मंच मान्य करीत नाही.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीत (पॅरेग्राफ – 13) त्यांना देण्यात आलेले वीज बिल जास्तीचे असून ते कमी करण्यात यावे असे गैरअर्जदार यांना कळविले असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने मार्च 2011 मध्ये दुकान खरेदी केल्यानंतर वीज वापर सुरु केला आहे. त्यामुळे मार्च 2011 ते फेब्रूवारी 2012 पर्यंतच्या वीज बिलाचा भरणा करणे हे त्यांची नैतिक जवाबदारी आहे असे मंचाचे मत आहे. ऑक्टोबर 2010 ते सप्टेंबर 2011 या कालावधीत एकूण वीज बिलापैकी मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 पर्यंतचे 6 महिन्याचे वीज बिल तसेच ऑक्टोबर 2011 ते फेब्रूवारी 2012 पर्यंत पूर्ण वीज बिल भरणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी असेसमेंट पत्रकात नमूद केल्यायप्रमाणे मार्च 2010 ते सप्टेंबर 2011 या कालावधीच्या एकूण रकमेपैकी 6 महिन्याची रक्कम (72328 – 2 = 36164) तसेच ऑक्टोबर 2011 ते फेब्रूवारी 2012 मधील एकूण रक्कम 31760/- रुपये असे एकूण 67924/- रुपये अर्जदाराने भरणे जरुरी आहे. या रकमेपैकी अर्जदाराने अंतरिम आदेशानुसार 80,000/- रुपये, मार्च 2011 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीत भरलेली रक्कम वजा करुन अर्जदारास सुधारीत वीज बिल देणे योग्य ठरेल.
वरील सर्व निरीक्षणा वरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 06.03.2012 रोजी दिलेले 3,52,923/- रुपयाचे वीज बिल रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मार्च 2011 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीचे एकूण 67,924/- रुपयाचे सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे देण्यात आलेल्या सुधारीत वीज बिलातून अर्जदाराने मार्च 2011 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीत वीज बिलापोटी भरलेली रक्कम तसेच मंचाच्या अंतरिम आदेशानुसार भरलेली रक्कम वजा करावी व अर्जदारास 30 दिवसात वजा /जमा रकमेचे सुधारीत बिल द्यावे.
- खर्चा बद्दल आदेश नाही.