Exh.No.29
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 25/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 17/09/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि. 28/08/2013
सौ.दिप्ती दत्तात्रेय तेली
तर्फे कुलमुखत्यारी म्हणून
श्री दत्तात्रेय विठ्ठल तेली
वय वर्षे 57,धंदा – नोकरी,
रा.राजश्री कॉम्प्लेक्स, कुडाळ,
ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी करीता
अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी,शाखा कुडाळ,
एम.आय.डी.सी. एरीया, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
2) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी करीता
सहाय्यक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी,शाखा कुडाळ,
एम.आय.डी.सी. एरीया, ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग
- कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी,
शाखा कुडाळ, एम.आय.डी.सी. एरीया,
ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री सुरेंद्र माळगावकर
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री के.डी. वारंग
निकालपत्र
(दि.28/08/2013
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - तक्रारदार यांना महावितरणने अवाजवी बीले देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून सदर बील रद्द करावे व योग्य वीज वापराची वीज बीले द्यावीत, यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी (यापूढे संक्षिप्ततेसाठी ‘महावितरण’ असे संबोधण्यात येईल) यांचेकडून घर क्र.2523 मध्ये वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्र.237510049551 असा आहे. सदर वीजेचा वापर ते योग्य प्रकारे व काळजीने करत आहेत व देण्यात आलेली बीले नियमीतपणे भरत आहेत.
3) तक्रारदार यांनी पुढे म्हटले आहे की, 17/04/2011 ते 17/07/2011 या कालावधीचे त्यांना रु.3330/- चे बील देण्यात आले. सदर बील अवाजवी असल्याने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे तक्रार अर्ज दिला व मीटर तपासणीसाठी रु.100/- दि.20/06/2011 रोजी भरले. सदर मीटर दि.12/08/2011 रोजी टेस्ट करण्यात आला व तो 3.25% जादा गतीने फिरत असल्याचा अहवाल आला. त्यामुळे महावितरणने मीटर बदलून दि.01/07/2011 रोजी नवीन मीटर दिला. परंतु सदर नवीन मीटर देखील जादा नोंदी करत असल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार केली व त्याची तपासणी करावी यासाठी रु.100/- भरले. त्याचा तपासणी अहवाल दि.11/02/2012 रोजी आला. त्यानुसार मीटर 1.17% जादा नोंदी घेत असल्याचे स्पष्ट झाले.
4) तक्रारदार यांनी पुढे म्हटले आहे की, एप्रिल 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीत देण्यात आलेली बीले अवाजवी आहेत. महावितरणच्या अधिका-यांना बील कमी करुन देण्याबाबत त्यांनी विनंती केली परंतु त्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. तक्रारदार यांनी आक्षेप ठेवून वेळोवेळी रु.10,530/- तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत भरले आहेत. त्याबाबत त्यांनी अधिक्षक अभियंता, सहाय्यक अभियंता व कनिष्ट अभियंता यांना वेळोवेळी वीज बील देण्याबाबत विनंती केली. परंतु त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्ष बीले दुरुस्त करुन देण्यात आली नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना व्याजासह विनाकारण बोजा भरावा लागत आहे.
5) तक्रारदार यांनी शेवटी त्यांना सन 2010-2011 च्या सरासरीच्या बीलाची आकारणी करुन बील देण्यात यावे. मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.5,000/-, नोटीसचा खर्च र.1,000/- वकील फी रु.6,000/- व्यावसायीक नुकसान रु.30,000/-, प्रवास खर्च रु.10,000/- व तक्रार व इतर खर्च रु.13,000/- असे एकुण रु.95,000/- भरपाई देण्याचा महावितरणला आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
6) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.4 वरील यादीनुसार 70 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात कुलमुखत्यारपत्र, नोटीसा, तक्रार अर्जाच्या प्रती, वीज बीले, वीज खंडीत करणेबाबत नोटीस इ.चा समावेश आहे.
7) महावितरणने आपले लेखी म्हणणे नि.13 वर दाखल करुन तक्रार अर्जातील सर्व म्हणणे खोटे व खोडसाळ आहे, तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही, तक्रार अर्ज मुदतीत नाही, तक्रार आहे त्या स्वरुपात मंचात चालू शकत नाही म्हणून ती रद्द करावी अशी विनंती केली आहे.
8) महावितरणने वस्तुस्थिती अशी आहे या सदरात म्हटले आहे की. तक्रारदार यांनी दि.01/02/2000 रोजी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. तक्रारदार यांना दि.17/04/2011 ते 17/05/2011 या कालावधीचे रु.3330/- चे विद्युत देयक देण्यात आले. सदर देयक मान्य नाही म्हणून त्यांनी मीटर क्रमांक 12129452 दि.20/06/2011 रोजी तपासून घेतला. सदर तपासणी अहवालानुसार मीटर 3.25% जलद फिरत असल्याने त्याठिकाणी नवीन मीटर बसवून देण्यात आला.
9) तक्रारदार यांची घरी बसवण्यात आलेला नवीन मीटर क्र.01175022 हा सुध्दा दोषपूर्ण आहे असे तक्रारदारांना वाटल्यामुळे त्यांनी मीटर तपासणीसाठी अर्ज केला. त्याची तपासणी करण्यात आली व अहवाल दि.29/02/2012 रोजी देण्यात आला. त्यानुसार मीटर फक्त + 1.17 % जलद फिरतो व तो कमी असल्याकारणाने मीटर सुस्थितीत असल्याचे नमूद करण्यात आले. दि.20/08/2011 व दि.29/02/2012 रोजीची तपासणी अहवालाबाबत तक्रारदार यांनी तक्रार अर्जात आक्षेप घेतलेला नाही किंवा अहवाल नाकरलेला नाही.
10) महावितरणने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी वीज बीलांचा भरणा न केल्यामुळे त्यांना कलम 56(1) नुसार नोटीस देण्यात आली. तसेच दि.22/06/2012 च्या पत्रात मीटर 3.25% जलद फिरत असल्याचे अहवालानुसार 57 युनिटचे बील कमी करण्यात येईल असे कळवले. परंतु तक्रारदार यांनी वीज बीलांचा भरणा केलेला नाही. तक्रारदार यांनी आपल्या पत्रात नवीन बसवलेला मीटर सुस्थितीत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना आता तो सुस्थितीत नव्हता असे म्हणता येणार नाही. तक्रारदारास Princiiple of Estoppal या तत्वाची बाधा येते. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दि.20/08/2011 रोजीच्या मीटर तपासणी अहवालाचा गैरफायदा घेण्याच्या इरादयाने दाखल केली आहे. तसेच दि.27/03/2012 नंतर कोणतेही वीज बील भरलेले नाही. त्यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे.
11) महावितरणने पुढे असे म्हटले आहे की,, महाराष्ट्र राज्य विद्यूत नियामक आयोग (विद्यूत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्या इतर अटी) विनियम 2005 चे कलम 15.4 नुसार जर मीटर सदोष असेल तर तपासणी अहवालाच्या निष्कर्षानुसार मीटर सदोष असल्याचे ज्या महिन्यात निदर्शनास आले असेल त्या महिन्याच्या मागील जास्तीत जास्त 3 महिन्याच्या कालावधीतील ग्राहकांच्या देयकांची रक्कम समायोजित करण्यात येईल असे म्हटलेले आहे. तक्रारदार यांची तक्रार माहे मे-2011 चे बीलाबाबत असल्याने महावितरणने 57 युनिटचे बील कमी करण्यात येईल असे तक्रारदारास कळवले आहे. तसेच The Electricity Rules 1956 चे कलम 57 नुसार कार्यवाही करण्यात आलेली असल्याने तक्रारीस कारण उरत नाही.
12) महावितरणने शेवटी तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा व त्यांना नाहक खर्चात पाडल्याबद्दल कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.50,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
13) महावितरणने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.19/1 वर सी.पी.एल. ची प्रत, नि.21 वर पुराव्याचे शपथपत्र आणि नि.22 वरील यादीनुसार वीज वितरण कंपनीच्या ग्राहक मंच व आयोगाच्या निकालपत्राच्या प्रती, कायदयातील तरतुदीचा उतारा दाखल केला आहे.
14) तक्रारदार यांची तक्रार, महावितरणचा खुलासा, दाखल कागदपत्रे व युक्तीवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | महावितरणने तक्रारदार यांना अवाजवी वीज देयक देऊन सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | खालीलप्रमाणे |
3 | आदेश काय ? | अंतीम आदेशात नमूद केलेप्रमाणे |
15) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार यांनी महावितरणकडून दि.01/02/2000 रोजी वीज पुरवठा घेतला आहे व वीज वापराची बीले ते नियमीत भरत आलेले आहेत, परंतू मे 2011 या महिन्याचे रु.3330/- चे बील आल्यानंतर, सदर बील अवाजवी वाटल्याने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे तक्रार अर्ज दिला व मीटर तपासणीसाठी रु.100/- दि.20/06/2011 रोजी भरले. सदर मीटर दि.12/08/2011 रोजी टेस्ट करण्यात आला व तो 3.25% जादा गतीने फिरत असल्याचा अहवाल आला. त्यामुळे महावितरणने मीटर बदलून दि.01/07/2011 रोजी नवीन मीटर दिला. परंतु सदर नवीन मीटर देखील जादा नोंदी करत असल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार केली व त्याची तपासणी करावी यासाठी रु.100/- भरले. त्याचा तपासणी अहवाल दि.11/02/2012 रोजी आला. त्यानुसार मीटर 1.17% जादा नोंदी घेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एप्रिल 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीत त्यांना देण्यात आलेली बीले अवाजवी आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना बील कमी करुन देण्याबाबत त्यांनी विनंती केली परंतु त्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
16) महावितरणच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दि.01/02/2000 रोजी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. तक्रारदार यांना दि.17/04/2011 ते 17/05/2011 या कालावधीचे रु.3330/- चे विद्युत देयक देण्यात आले. सदर देयक मान्य नाही म्हणून त्यांनी मीटर क्रमांक 12129452 दि.20/06/2011 रोजी तपासून घेतला. सदर तपासणी अहवालानुसार मीटर 3.25% जलद फिरत असल्याने त्याठिकाणी नवीन मीटर बसवून देण्यात आला. तसेच तक्रारदार यांची घरी बसवण्यात आलेला नवीन मीटर क्र.01175022 हा सुध्दा दोषपूर्ण आहे असे तक्रारदारांना वाटल्यामुळे त्यांनी मीटर तपासणीसाठी अर्ज केला. त्याची तपासणी करण्यात आली व अहवाल दि.29/02/2012 रोजी देण्यात आला. त्यानुसार मीटर फक्त + 1.17 % जलद फिरतो व तो कमी असल्याकारणाने मीटर सुस्थितीत असल्याचे नमूद करण्यात आले. दि.20/08/2011 व दि.29/02/2012 रोजीची तपासणी अहवालाबाबत तक्रारदार यांनी तक्रार अर्जात आक्षेप घेतलेला नाही किंवा अहवाल नाकारलेला नाही.
17) महावितरणने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी वीज बीलांचा भरणा न केल्यामुळे त्यांना कलम 56(1) नुसार नोटीस देण्यात आली. तसेच दि.22/06/2012 च्या पत्रात मीटर 3.25% जलद फिरत असल्याचे अहवालानुसार 57 युनिटचे बील कमी करण्यात येईल असे कळवले. परंतु तक्रारदार यांनी वीज बीलांचा भरणा केलेला नाही. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दि.20/08/2011 रोजीच्या मीटर तपासणी अहवालाचा गैरफायदा घेण्याच्या इरादयाने दाखल केली आहे. तसेच दि.27/03/2012 नंतर कोणतेही वीज बील भरलेले नाही. त्यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे.
18) तक्रारदार व महावितरण यांचे परस्परविरोधी म्हणणे पाहता तक्रारदार यांना महावितरणने दिलेली देयके योग्य आहेत काय ? हे पाहणे आवश्यक ठरते. तक्रारदार/ग्राहकांना देण्यात येणा-या वीजेची नोंद घेण्यासाठी मीटर्स बसवण्यात येत असतात व त्याच्या नोंदीनुसार देयक दिले जाते. तसेच सदर मीटर्स सदोष असल्यास सरासरीच्या आधारावर देयक दिले जाते याबाबत विद्यूत नियामक आयोगाचे नियम आहेत.
19) याठिकाणी तक्रारदार यांना माहे मे 2011 चे बील अवाजवी आल्यानंतर त्यांनी मीटरची तपासणी करुन मिळावी यासाठी अर्ज दिला व त्यासाठीची रक्कम रु.100/- भरुन मीटर तपासणी करावी अशी विनंती केली. त्यानुसार मीटर तपासण्यात आला व तो + 3.17 जलद असल्याचा अहवाल आला. त्यानंतर दुसरा मीटर क्र.01175022 बसवण्यसात आला परंतू तो देखील जादा गतीने फिरत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यामुळे तो तपासून द्यावा अशी त्यांनी मागणी केली. त्याची तपासणी केली असता तो + 1.17 जलद फिरत असल्याने व सदर फरक क्षम्य असल्याने तो बरोबर आहे असा अहवाल तपासणी यंत्रणेकडून देण्यात आला. आम्ही महावितरणने केलेल्या वीज मीटर तपासणी अहवालांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारदार यांनी महावितरणकडे त्यांचे मीटर सदोष आहेत म्हणून त्यांची तपासणी करावी यासाठी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या मीटर क्र.12129452 बाबत त्यांनी दि.20/06/2011 रोजी रक्कम रु.100/- भरले आहेत. त्यानुसार मीटर 01/07/2011 रोजी काढून तपासणीसाठी 22/07/2011 रोजी पाठवण्यात आला. त्याची तपासणी दि.12/08/2011 रोजी करण्यात आली व अहवाल दि.20/08/2011 रोजी देण्यात आला. सदर कालावधी पाहता मीटर काढल्यानंतर 41 दिवसांनी त्याची तपासणी केल्याचे दिसून येते.
20) तसेच दुसरा मीटर क्र.01175022 तपासणीसाठी दि.18/01/2012 रोजी काढण्यात आला व दि.11/02/2012 रोजी तो तपासण्यात आला. त्याचा अहवाल दि.29/02/2012 रोजी देण्यात आला. म्हणजे जवळपास 24 दिवसांनी तो तपासण्यात आला. या कालावधीत मीटर कोठे ठेवण्यात आला ? एवढा कालावधी का लागला ? या कालावधीत तो व्यवस्थित हाताळण्यात आला होता का ? हे प्रश्न उपस्थित होतात. वास्तविक विजेचे सदर मीटर्स अत्यंत संवेदनशील असतात व त्याची हाताळणी व्यवस्थित व काळजीपूर्वक होणे आवश्यक असते; तसे न झाल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो तसेच मीटर तपासणीबाबत टेस्टींग युनिटने ग्राहकास त्याची तारीख व वेळ देऊन उपस्थित राहणेबाबत कळवणे आवश्यक होते परंतु त्याबाबत तक्रारदारास सूचना देण्यात आलेली नव्हती. शिवाय मीटर टेस्ट करणा-या अधिका-याचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही.
21) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मीटर क्र.12129452 चा टेस्टींग रिपोर्ट नि.4/56 पाहिला असता त्यावर मीटर तपासणीच्या वेळी Initial Reading 4130 असे नमूद आहे. व Final Reading 1436 असे दर्शवले आहे व त्याच्या आधारे मीटर + 3.25% Fast असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे सदर मीटर तपासणीसाठी घेतला असता त्यावर Initial Reading चार हजार एकशे तीस युनिट दाखवण्यात आले होते व तपासणी नंतर Final Reading एक हजार चारशे छत्तीस युनीट दर्शवणेत आले आहे. सदर नोंदीवरुन सदर तपासणी अहवाल अयोग्य पध्दतीने व पुरेशी काळजी घेऊन केलेला नाही हे स्पष्ट आहे. तसेच वरील नोंदी पाहता सदर मीटर + 3.25 % Fast होते हा काढलेला निष्कर्ष सुसंगत वाटत नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत, मीटर तपासणी अधिका-याचे शपथपत्र नसल्यामुळे तसेच सदर अहवालात नमूद नोंदीवरुन, मीटरची तपासणी अयोग्य पध्दतीने केली आहे, असे आम्हांस वाटते. त्यामुळे सदरचे अहवाल गाहय धरता येणार नाहीत.
22) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्युत नियामक आयोगाच्या नियमातील नियम 14.4.4 नुसार तपासणीनंतर मीटर सदोष निघाल्यास तक्रारदाराने भरलेली रक्कम तक्रारदारास परत करणे आवश्यक आहे. सदर तरतुद खालीलप्रमाणे आहे.
Maharashtra Electricity Regulatory Commission (Electricity Supply Code and
Other Conditions of Supply) Regulations, 2005
14.4.4 - In the event of the meter being tested and found to be beyond the limits of accuracy prescribed in the Indian Electricity Rules, 1956, till the regulations are specified by
the Authority under Section 55 of the Act, the Distribution Licensee shall refund the testing charges paid by the consumer and adjust the amount of the bill in accordance with the results of the test as specified in Regulation 15.4 below.
23) सदर तरतुदीनुसार महावितरणने रु.100/- तक्रारदाराचे खात्यावर जमा करणे आवश्यक होते. व ही देखील सेवेत त्रुटी आहे, असे आम्हांस वाटते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
24) मुद्दा क्रमांक 3- तक्रारदार यांनी महावितरणने त्यांना सन 2010-2011 च्या सरासरीच्या बीलाची आकारणी करुन बील देण्यात यावे. तसेच मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.5,000/-, नोटीसचा खर्च रु.1,000/- वकील फी रु.6,000/- व्यावसायीक नुकसान रु.30,000/-, प्रवास खर्च रु.10,000/- व तक्रार व इतर खर्च रु.13,000/- असे एकुण रु.95,000/- भरपाई देण्याचा महावितरणला आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
25) आम्ही महावितरणने दाखल केलेल्या सी.पी.एल. अहवाल दि.19/1 चे अवलोकन केले आहे. त्यावर तक्रारदाराचा मीटर क्र.67/01734424 बसवल्यानंतरच्या नोंदी व मीटर क्र.76/12129652 च्या मार्च 2011 पूवीच्या नोंदीचे अवलोकन केले आहे. सदर नोंदीवरुन तक्रारदाराचा वीजेचा वापर माहे जुन 2012 पासून 210, 177, 189, 148, 166, 187, 211, 199, 188, 200, 208, 230 असा आहे. तर मे 2010 पासून 200, 213, 155, 142, 200, 138, 134, 159, 183, 141, 207, व 220 युनिट आणि वादग्रस्त कालावधी म्हणजे मे 2011 पासून तो 519, 502, 307, 464, 527, 378, 524, 692 558, 315 असा आहे. वरील नोंदीवरुन तक्रारदारांचा वीज वापर हा वादग्रस्त कालावधी सोडल्यास जास्तीत जास्त 230 युनीट आहे. तक्रारदार यांचा वापर पाहता सरासरीच्या आधारावर त्यांचा दरमहा वापर हा 184 युनीट असल्याचे दिसून येते. त्यामुळे महावितरणने तक्रारदार यांना माहे मे 2011 ते माहे फेब्रुवारी 2012 मध्ये दिलेली सर्व बीले दुरुस्त करुन त्याऐवजी दरमहा 184 युनीट वापराची बीले देण्याचा आदेश करणे आम्हांस योग्य व न्यायाचे वाटते. तसेच मीटर तपासणीसाठी भरलेली रक्कम रु.100/- नियम 14.4.4 नुसार खात्यात जमा करावी. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रार अर्जाचा खर्च करावा लागला असल्याने मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाच्या खचापोटी रु.1000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे.
26) वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) महावितरणने तक्रारदार यांना, माहे मे 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत देण्यात आलेली सर्व बीले दुरुस्त करुन त्याऐवजी दरमहा 184 युनीट प्रमाणे बीले या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत द्यावीत.
3) महावितरणने तक्रारदार यांनी मीटर तपासणीसाठी भरलेली रक्कम रु.100/- (रुपये शंभर मात्र) तक्रारदाराच्या खात्यात या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत जमा करावी.
4) तक्रारदार यांनी सदर कालावधीत भरलेल्या रक्कमा सदर बीलांमध्ये समायोजित करण्यात याव्यात.
5) तसेच महावितरणने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत द्यावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/08/2013
Sd/- Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.