निकाल (घोषित दि. 26.10.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार महराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली असून जानेवारी 2010 मधे त्यास वीज वितरण कंपनीने रक्कम रुपये 4,410/- चे देयक दिले. सदर देयकामधे दर्शविलेली थकबाकी चुकीची असल्यामुळे त्याने गैरअर्जदारांना देयक दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी संपूर्ण रक्कम भरुन घेतली. त्यानंतर जून 2010 मधे दिलेल्या देयकात चालू रिडींग 2,873 दर्शविली. परंतू मीटरच्या छायाचित्रामधे चालू रिडींग 1,431 असल्याचे स्पष्ट दिसते. सदर बाब गैरअर्जदारांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी पुढील देयकात दुरुस्ती करुन देऊ असे सांगितले. परंतू जुलै 2010 मधील देयकामधे वीज वितरण कंपनीने मागील रिडींग 2,873 अशी दर्शविली आणि चालू रिडींग उपलब्ध नसलयाचे नमूद करुन त्यास सरासरी 263 युनिट वीज वापराचे देयक दिले. वास्तविक देयकातील मीटरच्या छायाचित्रामधे त्याच्या मीटरमधील रिडींग 1,436 होती असे दिसून येते. चुकीची मीटर रिडींग नोंदवून देयक दिल्यामुळे त्याने वीज वितरण कंपनीकडे तक्रार दिली असता वीज वितरण कंपनीच्या ज्युनिअर इंजिनिअरने त्याच्या मीटरची पाहणी केली त्यावेळी त्याचे मीटर चालू असल्याचे आढळून आले. परंतू वीज वितरण कंपनीने त्यास प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार देयक दिले नाही आणि त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास वीज वापरानुसार देयक देण्यात यावे आणि जून व जुलै मधील देयके रद्द करुन नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदाराला विद्युत वापरानुसारच देयके दिलेली आहेत. तक्रारदाराला त्याच्या मीटरची तपासणी केल्यानंतर नियमानुसारच देयके देण्यात आलेली असून थकीत रक्कम भरावी लागू नये म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराला कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नसून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एम.आर.वाघुंडे आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराला गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दिनांक 10.04.2010 रोजी दिलेले देयक नि. 4/4 ची पाहणी केली असता असे दिसून येते की, सदर देयक दिनांक 28.02.2010 ते 28.03.2010 या कालावधीसाठी देण्यात आलेले असून दिनांक 28.03.2010 रोजीची मागील रिडींग 1,423 असून चालू रिडींगच्या रकान्यामधे “फॉल्टी” असा शब्द नमूद करण्यात आलेला आहे. परंतू सदर देयकामधे छापण्यात आलेल्या मीटरचे छायाचित्र पाहता मीटरमधील चालू रिडींग 1,431 असल्याचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदाराचा दिनांक 28.02.2010 ते 28.03.2010 या कालावधीतील वीज वापर केवळ 8 युनिट होता. परंतू वीज वितरण कंपनीने सदर देयकामधे त्याचा वीज वापर 35 युनिट दर्शविलेला आहे. त्यानंतर दिनांक 10.06.2010 रोजी दिलेले देयक देखील वीज वितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडींगनुसार न देता सरासरीनुसारच दिले. वीज वितरण कंपनीने दिनांक 09.07.2010 रोजी दिलेले देयक नि. 4/7 मधे मागील रिडींग 1,431 आणि चालू रिडींग 2,873 अशी दर्शवून दिनांक 31.05.2010 ते 30.06.2010 या कालावधीतील वीज वापर 1,442 दर्शवून तक्रारदाराला रुपये 10,350/- चे देयक देण्यात आले. वीज वितरण कंपनीने सदर देयकामधे दर्शविलेली चालू रिडींग 2,873 ही चुकीची असल्याचे वीज वितरण कंपनीच्याच ज्युनिअर इंजिनिअरने दिनांक 02.08.2010 रोजी केलेल्या तपासणी अहवाल नि. 4/9 वरुन दिसून येते. सदर तपासणी अहवालात ज्युनिअर इंजिनिअरने हे स्पष्ट नमूद केले आहे की, तक्रारदाराचे मीटर चालू स्थितीत असून दिनांक 02.08.2010 रोजी त्याच्या मीटरमधील रिडींग 1,461 होती. यावरुन हे स्पष्ट दिसून येते की, वीज वितरण कंपनीने दिनांक 09.07.2010 रोजीचे देयक नि. 4/7 मधे दर्शविलेली दिनांक 30.06.2010 रोजीची चालू रिडींग 2,873 ही चुकीची असून काल्पनिकरित्या नमूद केलेली आहे. त्यामुळे दिनांक 09.07.2010 रोजीच्या देयकामधे दर्शविलेला वीज वापर 1,442 युनिट निश्चितपणे चुकीचा आहे. त्यामुळे सदर देयक चुकीचे असल्याचे सिध्द् होते. वीज वितरण कंपनीने अशा प्रकारे चुकीचे देयक देऊन तक्रारदारास निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 09.07.2010 रोजी दिलेले देयक रक्कम रुपये 10,350/- आणि दिनांक 10.08.2010 रोजीचे देयक रक्कम रुपये 11,760/- रद्द करण्यात येतात.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 28.03.2010 पासून दिनांक 02.08.2010 या कालावधीसाठी फक्त 38 युनिटचे सुधारीत देयक निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावे आणि दिनांक 09.07.2010 आणि दिनांक 10.08.2010 रोजीच्या देयकामधे दर्शविलेली रक्कम पुढील देयकामधे थकबाकी म्हणून दर्शवू नये.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रुपये 500/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- असे एकूण रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा तक्रारदाराच्या पुढील देयकामधे समायोजित करावेत.
- दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
सौ. ज्योती ह. पत्की डी.एस.देशमुख सदस्या अध्यक्ष
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |