(घोषित दि. 10.11.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. सदर वीज जोडणी संदर्भात वीज वितरण कंपनीने वेळोवेळी रुपये 400/- ते 600/- च्या सरासरीनुसार वीज देयके दिली होती. परंतू डिसेंबर 2009 पासून वीज वितरण कंपनीने अवाजवी देयके दिली. त्यामुळे तिने योग्य देयके देण्याबाबत वीज वितरण कंपनीला विनंती केली. परंतू त्यांनी अवाजवी देयके दुरुस्त केली नाही. तिच्याकडे बसविलेले मीटर सदोष होते. सदर वीज मीटर जानेवारी 2010 मधे बदलण्यात आले परंतू नवीन बसविलेले मीटर देखील सदोष होते. म्हणून तिने वीज वितरण कंपनीकडे त्याबाबत तक्रार दिली. परंतू त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर वीज वितरण कंपनीने वेळोवेळी अवाजवी व चुकीची देयके दिली. वीज वितरण कंपनीला चुकीची देयके दुरुस्त करुन देण्याची मागणी करुनही त्यांनी देयके दुरुस्त करुन दिली नाही. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला देण्यात आलेली अवाजवी देयके दुरुस्त करुन देण्याबाबत वीज वितरण कंपनीला आदेश द्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराला त्यांनी योग्य देयके दिलेली असून तक्रारदाराने थकीत रक्कम भरावी लागू नये म्हणून ही चुकीची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसून तिला नियमानुसारच देयके देण्यात आलेली आहेत. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास अवाजवी व चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एस.एम.धन्नावत आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दाखल केलेले कंझ्युमर पर्सनल लेजर (सी.पी.एल) नि. 14/1 पाहता असे दिसून येते की, तक्रारदाराला वीज वितरण कंपनीने जानेवारी 2009 पासून जानेवारी 2010 पर्यंत प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार देयके न देता 158 युनिट प्रतिमाह या सरासरीनुसार वीज वापर दर्शवून देयके दिली होती. सतत सरासरीनुसारच देयके देण्याच्या कारणांचा वीज वितरण कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. ऑक्टोबर 2009 मधे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्या मीटरमधील मागील रिडींग 2991 दर्शवून चालू रिडींग 354 अशी दर्शविली. सुरुवातीची रिडींग 2991 असताना पुढील रिडींग साहजिकच जास्त असते. परंतू ऑक्टोबर 2009 मधील पुढील रिडींग मागील रिडींग पेक्षा कमी दर्शविण्यात आली. याबाबत देखील वीज वितरण कंपनीने कोणताही खुलासा केला नाही. त्यानंतर डिसेंबर 2009 मधे मागील व चालू रिडींग 1 अशी दर्शवून त्या महिन्यातील तक्रारदाराचा वीज वापर 2737 युनिट दर्शविण्यात आला. सदर वीज वापर कशावरुन नोंदविण्यात आला याचा काहीही खुलासा वीज वितरण कंपनीने केला नाही. डिसेंबर 2009 मधील मागील रिडींग 1 आणि चालू रिडींग 1 अशी असताना तक्रारदाराचा वीज वापर 2737 युनिट कसा होऊ शकतो याचा काहीही खुलासा वीज वितरण कंपनीने केलेला नाही. त्यामुळे डिसेंबर 2009 मधील तक्रारदाराचा वीज वापर अवाजवी व चुकीचा दर्शविल्याचे स्पष्ट दिसून येते. म्हणून त्या महिन्याचे तक्रारदाराचे देयक रक्कम रुपये 24,096.65 चुकीचेच असल्याचे आमचे मत आहे आणि म्हणून सदर देयकाच्या अनुषंगाने पुढील महिन्यामधे दर्शविण्यात आलेली थकबाकी व त्यावरील व्याज हे चुकीचेच असल्याबाबत वाद राहत नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला डिसेंबर 2009 मधे अवाजवी व चुकीचे देयक दिले आणि त्यानंतर वेळोवेळी त्या देयकाच्या अनुषंगाने चुकीची थकबाकी दर्शवून चुकीची देयके दिली आणि तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिली याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास ग्राहक क्रमांक 510030086188 संदर्भात डिसेंबर 2009 मध्ये 2737 युनिट वीज वापराबद्दल दिलेले देयक रक्कम रुपये 21,974/- च्या हद्दीपर्यंत रद्द करण्यात येते. त्यामुळे सदर रक्कमेच्या अनुषंगाने जानेवारी 2010 पासून पुढील कालावधीत दर्शविलेली थकबाकी व त्यावरील व्याज देखील रद्द करण्यात येते. वीज वितरण कंपनीने तक्रारदारास डिसेंबर 2009 व जानेवारी 2010 या दोन महिन्यांसाठी 568 युनिट वीज वापराचे देयक आकारावे व तक्रारदारास त्यानुसार देयक देवून डिसेंबर 2009 पासुन आतापर्यंत मीटर रिडींग नुसार होणारा तिचा प्रत्यक्ष वीज वापर विचारात घेवून तिला सुधारीत देयक द्यावे व तिने डिसेंबर 2009 पासुन आतापर्यंत भरलेली रक्कम सुधारीत देयकात समायोजित करावी. सदर कार्यवाही निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत करावी.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास त्रुटीच्या सेवेबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,000/- मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- असे एकूण रुपये 2,500/- (दोन हजार पाचशे फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा तिच्या देयकामधे समायोजित करावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |