निकाल (घोषित दि. 26.10.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. वीज वितरण कंपनीने दिलेली देयके त्याने वेळोवेळी भरणा केली. परंतू जुन 2010 मधे वीज वितरण कंपनीने त्यास अवाजवी देयक दिले. वीज वितरण कंपनीने सदर देयकामधे त्याचा मे 2010 मधील वीज वापर 1,800 युनिट दाखविला सदर बाब वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणली असता त्यांनी देयक दुरुस्त करुन देऊ असे सांगितले आणि त्याच्याकडून रुपये 280/- घेतले. परंतू पुढील कालावधीमधे वीज वितरण कंपनीने मीटर रिडींगमधे झालेली चुक दुरुस्त केली नाही आणि पुढील कालावधीतील देयकामधे रुपये 9,900/- थकबाकी दर्शविली. म्हणून त्याने दिनांक 01.07.2010 रोजी लेखी तक्रार दिली. त्यानंतर दिनांक 14.07.2010 रोजी वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-याने त्याच्या मीटरची तपासणी केली. परंतू त्यानंतरही वीज वितरण कंपनीने योग्य देयक दिले नाही. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास प्रत्यक्ष वीज वापरानुसार देयक देण्यात यावे आणि जुन व जुलै मधील देयके रद्द करुन नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदाराला विद्युत वापरानुसारच देयके दिलेली आहेत. तक्रारदाराला त्याच्या मीटरची तपासणी केल्यानंतर नियमानुसारच देयके देण्यात आलेली असून थकीत रक्कम भरावी लागू नये म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराला कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नसून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एम.आर.वाघुंडे आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराला गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने मे 2010 मधे 1,800 युनिट वीज वापराचे देयक दिलेले होते. त्यापूर्वीचा तक्रारदाराचा वीज वापर पाहिला असता असे दिसून येते की, तो साधारणपणे 22 ते 50 युनिट प्रतिमाहच्या दरम्यान होता. त्यामुळे मे 2010 मधे अचानक 1,802 युनिट वीज वापर कसा झाला या विषयी निश्चितपणे संशय उत्पन्न होतो. मे 2010 मधील तक्रारदाराचा वीज वापर 1,802 युनिट अचानक वाढला कसा आणि त्यावेळी सुरुवातीची आणि शेवटची रिडींग काय होती हे दर्शविणारा कोणताही पुरावा वीज वितरण कंपनीने दिला नाही. मे 2010 मधील तक्रारदाराचा वीज वापर 1,802 युनिट झाला होता हे सिध्द् करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीवर होती. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नसून वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा मे 2010 मधील वीज वापर 1,802 युनिट झाला होता हे सिध्द् केलेले नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 02.05.2009 रोजी वीज जोडणी दिल्याचे देयक नि. 4/2 व नि. 4/3 वरील नोदींवरुन दिसून येते. जर तक्रारदारास दिनांक 02.05.2009 रोजी वीज जोडणी दिलेली असेल आणि दिनांक 14.07.2010 रोजी त्याच्या मीटरमधील रिडींग तपासणी अहवाल नि. 4/5 नुसार 2,159 असेल तर त्याचा दिनांक 02.05.2009 ते 14.07.2010 या कालावधीतील वीज वापर 2,158 युनिट होतो. परंतू या ठिकाणी जुलै 2009 पासून उपलब्ध असलेला तक्रारदाराचा वीज वापर पाहिला तर तो 2,610 युनिट नोंदविण्यात आल्याचे दिसून येते. यावरुन वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मे 2010 मधे दिलेले 1,802 युनिटचे देयक चुकीचे असल्याचेच सिध्द् होते आणि म्हणून वीज वितरण कंपनीला मे 2010 मधील देयकाच्या अनुषंगाने कोणतीही थकबाकी वसुल करण्याचा अधिकार उरत नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 10.08.2010 रोजी दिलेले देयक नि. 4/3 देखील चुकीचेच दिल्याचे दिसते. कारण सदर देयकामधे दिनांक 30.06.2010 रोजीची मागील रिडींग 2,069 दर्शविलेली असून चालू रिडींगच्या रकान्यात (INACCS) असे नमूद केलेले आहे आणि सदर देयकामधे तक्रारदाराचा वीज वापर 326 युनिट दर्शविला आहे. सदर 326 युनिट कसे आले याचा कोणताही खुलासा वीज वितरण कंपनीने केलेला नाही. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला चुकीची वीज देयके देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 09.07.2010 आणि 10.08.2010 रोजी दिलेली देयके रद्द करण्यात येतात.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वीज वितरण कंपनीने तक्रारदारास प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार मे, जुन आणि जुलै 2010 ची सुधारीत देयके निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावीत.
- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 500/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- असे एकूण रक्कम रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा तक्रारदाराच्या पुढील देयकामधे समायोजित करावेत.
- दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |