(मंचाचे आदेशान्वये श्री. पी.एस.चोपकर, सदस्य)
-000 आ दे श -000
(पारित दिनांक 22 जून 2005)
तक्रारकर्तीने सदरची तक्रार गैरअर्जदार यांच्या विरोधात दिनांक 12.02.2004 व दिनांक 13.08.2004 रोजी पाठविलेली विजेची देयके ही चुकिची आहेत तसेच दिनांक 18.10.2003 पासून म्हणजेच नवीन मीटर लावल्यापासून सुधारित देयक पाठवावे, तक्रारकर्तीने जुन-2000 ते डिसेंबर-2003 पर्यंत भरलेली वीज बिलाची रक्कम रुपये 26,920/- व्यतिरिक्त थकबाकीपोटी जादा रकमेची तक्रारकर्तीकडून आकारणी करु नये तसेच नुकसानी व मानसिक त्रासादाखल रु.10,000/- मिळण्याकरिता ही तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
तक्रारकर्तीचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तक्रारकर्तीकडे गैरअर्जदार यांचेकडून 15 वर्षापासून विद्युत पुरवठा सुरु असून मीटर क्रमांक बीए-डीएल-13222 व ग्राहक क्रमांक 430010132228 असा आहे. तक्रारकर्ती ही नियमितपणे विजेची देयके भरत होती. हया मीटरमध्ये सन 1999 पासून बिघाड झाल्यामुळे वापरलेल्या विजेची नोंद बरोबर होत नव्हती. म्हणून गैरअर्जदार यांचेकडे हे मीटर बदलविण्याकरिता अनेक वेळा अर्ज केले. परंतु त्यांनी मीटर न बदलविल्यामुळे तक्रारकर्तीने या मंचासमोर तक्रार क्रं. 237/2000 दाखल केली होती. या तक्रारीचा निकाल मंचाने दिनांक 7.1.2001 रोजी पारित केला व गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीचे वरील मीटर विद्युत निरीक्षक यांचेकडे पाठवावे व विद्युत निरीक्षक यांनी मीटर त्यांचेकडे पाठविल्यापासून 2 महिन्याचे अवधीमध्ये निर्णय घ्यावा त्या अवधीत तक्रारकर्तीला सरासरी बिले देण्यात यावीत असा आदेश दिला. वरील आदेशानुसार गैरअर्जदार यांनी मीटर विद्युत निरीक्षकाकडे न पाठविल्यामुळे तक्रारकर्तीन मंचासमोर किरकोळ अर्ज क्रं. 1/2003 दिनांक 30.06.2003 रोजी दाखल केला.
तक्रारकर्तीने दाखल केलेल्या किरकोळ अर्जाची सुनावणी या मंचासमोर सुरु असतांना गैरअर्जदार यांच्या कर्मचा-यांनी दिनांक 18.10.2003 रोजी वादातील मीटर तक्रारकर्तीच्या घरुन काढून नेले व त्याऐवजी नवीन मीटर क्रं. 152137 बसविले. विद्युत निरीक्षक यांनी दिनांक 19.01.2003 रोजी वादातील मीटर क्रं. 13222 हे सदोष असल्याबाबतचा अहवाल दिला. हे मीटर सदोष असल्याचे आढळून आल्यानंतर गैरअर्जदार व तक्रारकर्ती यांचेमध्ये मंचासमोर आपसी समझोता होऊन सरासरीने विद्युत देयके पाठविण्याचे ठरले. त्यानुसार गैरअर्जदार यांनी दिनांक 30.01.2004 रोजी जून-2000 ते डिसेंबर-2003 पर्यंतचे रक्कम रु.26,920/- चे बिल पाठविले व हे बिल तक्रारकर्तीन दिनांक 9.2.2004 रोजी गैरअर्जदार यांचेकडे भरले. गैरअर्जदार यांच्या कर्मचा-यांनी नवीन मीटर क्रं. 152137 बसविले त्यावेळी त्याचे मीटर वाचन 01524 असे होते. गैरअर्जदार यांनी दिनांक 12.02.2004 रोजी दिनांक 07.12.2003 ते 7.2.2004 या कालावधीचे रक्कम रु.66,250/- चे देयक तक्रारकर्तीला पाठविले व त्यामध्ये 746 युनिटस वीज वापर दाखवून मागील थकबाकी दर्शविली . हे देयक मिळाल्यानंतर तक्रारकर्ती ही अवाक झाली. म्हणून दिनांक 14.05.2004 रोजी तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे अर्ज करुन बिल दुरुस्त करुन मागितले. त्यानंतर पुन्हा दिनांक 31.07.2004 रोजी तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दिला. परंतु काही उपयोग झाला नाही. गैरअर्जदार यांनी पुन्हा दिनांक 13.08.2004 रोजी चुकिचे बिल दि. 7.6.2004 ते 7.87.2004 या कालावधीचे रक्कम रु. 60,270/- चे पाठविले व त्यामध्ये वापरलेले युनिटस 5753 असे दर्शविले. हे बिल नवीन मीटर आल्यापासूनचे असून यामध्ये सुध्दा मागील थकबाकी गैरअर्जदार यांनी जोडलेली आहे. तक्रारकर्ती ही दिनांक 18.10.2003 पासून ते पुढील बिल वापरलेल्या युनिटसनुसार भरण्यास तयार आहे. म्हणून तक्रारकर्तीन सदरचे बिल रद्द करुन सुधारित बिल देण्याकरिता गैरअर्जदार यांचे विरुध्द ही तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
तक्रारकर्तीने सदर तक्रार शपथपत्रावर दाखल केली असून दस्ताऐवजाची यादी निशाणी – 3 नुसार एकंदर 11 कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. ज्यामध्ये या मंचाने पारित केलेल्या आदेशाची प्रत, विद्युत निरीक्षक यांचा दिनांक 13.10.2000 चा मीटर तपासल्याबाबतचा अहवाल, वि’द्युत देयके तसेच गैरअर्जदार यांचेकडे केलेल्या अर्जाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. या तक्रारीसोबत तक्रारकर्तीने निशाणी -11 नुसार गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा खंडित करु नये म्हणून तात्पुरता मनाई आदेश मिळण्याकरिता मंचासमोर अर्ज दाखल केला. या अर्जावर मंचाने दिनांक 14.02.2005 रोजी आदेश पारित करुन तक्रारकर्तीस गैरअर्जदार यांचेकडे रु.15000/- तात्पुरते भरण्याविषयी आदेश दिला. त्यानुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 24.02.2005 रोजी रुपये 15,000/- चा भरणा केल्याबद्दलचे देयक दस्ताऐवजाची यादी निशाणी -17 नुसार दाखल केलेले आहे.
सदर तक्रारीची नोंद घेऊन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यांत आले. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत निशाणी-13 नुसार आपला लेखी जबाब, निशाणी-14 नुसार शपथपत्र, निशाणी -15 दस्ताऐवजांची यादी नुसार कागदपत्र दाखल केलेले आहेत. ज्यामध्ये दिनांक 15.12.2003 रोजी तक्रारकर्तीस दिलेले पत्र, दुरुस्त करुन दिलेल्या बिलाबद्दलच्या हिशोबाचे विवरणपत्र तसेच खाजगी लेजरची प्रत इत्यादींचा समावेश आहे. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तक्रारकर्तीने जून-2003 ते ऑक्टोंबर -2003 या कालावधीचे बिल रु.26,920/- दिनांक 9.2.2004 रोजी भरले आहेत. त्यापुढील बिलाची थकबाकी तिच्याकडून घेणे बाकी आहे. तसेच तिला तिने भरलेल्या जास्तीच्या रकमेबद्दल Credit देण्यात आले असून तक्रारकर्तीकडे रु.37,330/- बाकी निघत आहेत. तक्रारकर्तीची तक्रार खोटी असल्यामुळे ती खारीज करण्यात यावी अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रारकर्तीने दाखल केलेले कागदपत्र तसेच तिच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादाच्या वेळेस तक्रारकर्तीच्या वकिलांनी मंचासमोर (1) AIR 1987 DELHI 219, (2) II (1995) CPJ 70 PUNJAB STATE COMMISSION तसेच (3) II (1995) CPJ 190 HARYANA STATE COMMISSION यांनी दिलेल्या निकालांच्या झेरॉक्स प्रती सुनावणीच्या दिवशी मंचासमोर दाखल केल्या. गैरअर्जदार यांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र यावरुन या मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
1. तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ? होय, अंशतः
2 गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस पाठविलेली देयके रद्द होण्यास पात्र आहेत काय ? होय
3 गैरअर्जदार हे वसूल केलेल्या विद्युत देयकांच्या सरासरी रकमेव्यतिरिक्त
मागील रक्कम वसूल करण्यास पात्र आहेत काय ? नाही
4 या तक्रारीचा अंतिम आदेश काय ? कारणमिमांसेनुसार
/// कारणमिमांसा//
तक्रारकर्तीने या मंचासमोर गैरअर्जदार यांचे विरोधात तक्रारकर्तीचे मीटर क्रं. 13222 हे दोषपूर्ण असल्यामुळे ते मीटर बदलविण्यात यावे म्हणून तक्रार क्रं. युटीपी-237/2000 या मंचासमोर दाखल केलेली होती व या तक्रारीचा निर्णय दिनांक 7.1.2001 रोजी मंचाने दिला असून पारित आदेशानुसार गैरअर्जदार यांना तक्रारकर्तीचे वरील मीटर विद्युत निरीक्षक यांचेकडे पाठवावे व विद्युत निरीक्षक यांनी मीटर त्यांचेकडे पाठविल्यापासून 2 महिन्याचे अवधीत निर्णय घ्यावा व त्या अवधीत तक्रारकर्तीस सरासरीने बिले द्यावीत असा आदेश पारित करण्यात आला होता. गैरअर्जदार यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे तक्रारकर्तीने या मंचासमोर पुन्हा किरकोळ अर्ज क्रं. 1/2003 दिनांक 30.06.2003 रोजी दाखल केला व या अर्जाचा नोटीस गैरअर्जदार यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दिनाक 18.10.2003 रोजी तक्रारकर्तीचे घरुन जुने मीटर क्रं. 13222 काढून नेले व त्याऐवजी नवीन मीटर क्रं. 152137 बसविले तेव्हा नवीन मीटरचे वाचन 01524 असे होते. मीटर बदलवून दिल्याबाबतचा अहवाल तक्रारकर्तीने निशाणी-3 नुसार अ.क्रं. 3 प्रमाणे दाखल केला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, मंचाने दिनांक 7.1.2002 रोजी आदेश पारित करुन सुध्दा जवळजवळ पावने दोन वर्षे कोणतीही कार्यवाही गैरअर्जदार यांनी केली नलवहती. गैरअर्जदार यांना मंचाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हे मीटर बदलवून दिल्याचे स्पष्ट होत आहे. जुने मीटर गैरअर्जदार यांनी तपासणीकरिता मीटर टेस्टर सी.सी. ओ. अन्ड एम. डिव्हीजन, भंडारा यांचेकडे पाठविले व त्यांनी हे मीटर दिनांक 13.10.2003 रोजी टेस्ट करुन आपला अहवाल दिला. त्यामध्ये “Meter is sticking”असे स्पष्ट नमूद केले आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या मीटरच्या टेस्ट रिपोर्टची प्रत तक्रारकर्तीने अ.क्रं. 2 नुसार दाखलकेली आहे. या अहवालावरुन असे दिसते की, मीटर क्रं. 13222 हे दोषपूर्ण होते.
तक्रारकर्तीने अ.क्रं. 1 नुसार या मंचाने तक्रार क्रं. 237/2000 मध्ये दिनांक 7.1.2002 रोजी पारित केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे व त्यामध्ये गैरअर्जदार यांना तक्रारकर्तीस सरासरीने बिले देण्याचा आदेश मंचाने दिलेला होता. गैरअर्जदार यांनी मंचाच्या आदेशाचे पालन न करता दिनांक 30.01.2004 रोजी जून 2000 ते डिसेंबर 2003 पर्यंतच्या कालावधीचे रु.26,920/- चे देयक सरासरीने पाठविले व तक्रारकर्तीने हे बिल दिनांक 9.2.2004 रोजी गैरअर्जदार यांचेकडे भरले. गैरअर्जदार यांनी मंचाचा आदेश नसतांना सुध्दा जून-2000 पासून सरासरीने बिल कसे काय पाठविले याबद्दलचा खुलासा केलेला दिसून यत नाही. तक्रारकर्तीच्या वकिलांनी AIR 1987 DELHI 219 H.D. Shourie v/s. Municipal Corporation of Delhi या प्रकरणामध्ये पारित केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. यामध्ये असा निर्णय देण्यात आला आहे की, “Electricity Act (9 of 1910), S. 26 (6) – Electricity meter – Defect in-Revised charge-It cannot be for more than 6 months irrespective of period of defect in meter”.तसेच पंजाब राज्य आयोग यांनी“Punjab State Electricity Board V/s Ashokkumar”.या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाची झेरॉक्स प्रत 1995 C.P.J. Vol. II page 70 दाखल केली आहे. त्यामध्ये असा निर्णय देण्यात आला आहे की,“The District Forum rightly noticed that the primal responsibility of the correct metering of electric energy lies on the Board and its equipment unless tampering or other malpractice is established. It seems right in its view that the respondent cannot be held liable for the fault of the meter, if any and it is for the appellant- Board to either have checked the same or replaced if it was defective. The District Forum was right in holding that unless it is established that the respondent had either tampered or consumed more electricity than shown in the bills , he cannot be arbitrarily burdened with additional charges.”
वरील निर्णयावरुन असे स्पष्ट होते की, गैरअर्जदार दोषपूर्ण मीटरमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या बिलाची मागणी करु शकत नाही. तसेच जोपर्यंत तक्रारकर्तीने त्या मीटरमध्ये बिघाड केला नाही किंवा छेडछाड केली नाही तर जास्तीच्या रकमेची मागणी गैरअर्जदार यांना तक्रारकर्तीकडून करता येणार नाही. सदरच्या तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी जून 2000 ते डिसेंबर 2003 पर्यंत म्हणजेच 3 वर्षा पेक्षा जास्त कालावधीच्या बिलाची सरासरीने आकारणी करुन रक्कम रु.26,920/- चे वीज देयक दिनांक 30.01.2004 रोजी पाठविले व हे बिल तक्रारकर्तीने दिनांक 9.2.2004 रोजी भरले सुध्दा आहे.
गैरअर्जदार यांनी दिनांक 18.10.2003 रोजी नवीन मीटर क्रं. 152137तक्रारकर्तीच्या घरी लावून दिले व त्यामध्ये शेवटचे वाचन 01524 असे होते. या बिलात त्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 12.2.2004 रोजी दि. 07.12.2003 ते 7.2.2004 या कालावधीचे बिल तक्रारकर्तीस पाठविले व त्यामध्ये जुन्या बिलाची थकबाकी सुध्दा दर्शविल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीने वापरलेल्या वीज वापराचे लेजर मंचासमोर दाखल केलेले आहे. सदर लेजरचे निरीक्षण केले असता जून 2004 मध्ये मीटर locked दाखविले असून ऑगस्ट-2004 मध्ये वापरलेले युनिटस 6142 दाखविलेले आहे. तसेच ऑक्टोंबनर-2004 मध्ये वापरलेले युनिटस 860 असे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या लेजरवरुन दिसून येते. त्या अगोदरच्या मुद्दयांचे निरीक्षण केले असता वापरलेले युनिटस 390, 744, 581, 916, 746, 746, 820 असे दिसून येतात. तेव्हा गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस दि. 7.6.2004 ते 7.8.2004 या कालावधीचे पाठविलेले बिल रक्कम रु.60,270/- हे सुध्दा सदोष असल्याचे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व कारणांकरिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2 गैरअर्जदार यांनी दिनांक 12.02.2004 व 13.08.2004 रोजी पाठविलेले बिल हे रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदार यांनी दिनांक 18.10.2003 पासून त्यानंतरच्या अवधीची तक्रारकर्तीस सरासरीने बिले देण्यात यावीत.
4 तक्रारकर्तीकडून जून-2000 ते डिसेंबर-2003 या कालावधीच्या पूर्वीच्या बिलाच्या थकबाकीची रक्कम गैरअर्जदार यांनी वसूल करु नये.
5 तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडे भरलेली रु.15,000/- ही रक्कम पुढील देयकांमध्ये समायोजित करण्यात यावी.
6 गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस मानसिक त्रासादाखल रु.500/- व तक्रार खर्चादाखल रु.500/- याप्रमाणे एकूण रु.1,000/- आदेश पारित झाल्या दिनांकापासून 1 महिन्याचे आत द्यावेत.