तक्रारदाराचे वकील हजर, गैरअर्जदार गैरहजर. सदर प्रकरणात अजदाराचे स्वतःचे घर असून, हे घर ग्रामपंचायत मध्ये तक्रारदाराचे नांवावर आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्यास गैरअर्जदारातर्फे विद्युत मीटर पुरविण्यात आलेले असून त्याचा ग्राहक क्रमांक 42206002373 असा आहे. तक्रारदार हे त्याबाबतचे नियमित बिद्युत बिल भरीत होते. पूर्वी तक्रारदाराची आई त्यांचेसोबत रहात होती, मात्र घरगुती वादामुळे सध्या तक्रारदाराची आई त्याचा लहान भाऊ मोहन लोहकरे यांचेसोबत रहात आहे. तक्रारदाराकडील विज मीटर त्याचे नावानेच आहे. पुढे विद्युत बिल भरण्याबाबत वाद निर्माण झाला म्हणुन भाऊ रहातो त्या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. पुढे तक्रारदाराचा भाउ मोहन यांनी विद्युत विभागाकडे त्याचे आईचे नावाने खोटे दस्तऐवजाचे माध्यमातून विद्युत पुरवठा मिळणेसाठी अर्ज केला आणि त्यांनी मोहन यांचा अर्ज मंजूर करुन त्याला विद्युत मीटर जोडून दिले. त्यानंतर त्याचे भावाने तक्रारदाराला विद्युत पुरवठा होत असलेली सर्व्हिस लाईन तोडली, त्यामुळे तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. तक्रारदार ह्याबाबतची रितसर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यासाठी गेला असता, पोलीसांनी कोणत्याही प्रकारची मदत न करता, विद्युत वितरण कंपनीकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे तक्रारदाराने दिनांक 3/5/2010 आणि 24/5/2010 रोजी विद्युत वितरण कंपनीकडे त्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करणेकरीता अर्ज केले आणि त्या अर्जांमध्ये असे नमूद केले की, पुन्हा जोडणीकरीता येणारा खर्च तक्रारदार सोसण्यास तयार आहे. मात्र गैरअर्जदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. पुढे तक्रारदाराने नोटीस दिली, परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणुन शेवटी तक्रारदार श्री ज्ञानेश्वर लोहकरे यांनी ही तक्रार मंचासमक्ष करुन तीद्वारे तक्रारदाराचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा, गैरअर्जदाराच्या बेकायदेशिर कृतीमुळे त्यास झालेला मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 1 लक्ष नुकसान भरपाई मिळावी, कायदेशिर नोटीसचा खर्च रुपये 3,000/- आणि तक्रारखर्चाबद्दल रुपये 10,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत. यात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली, मात्र गैरअर्जदारानी या प्रकरणी जबाब दाखल केलेला नाही म्हणुन त्यांचेविरुध्द एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला. पुढे गैरअर्जदार यांनी या प्रकरणात हजर होऊन त्यांचेविरुध्दचा एकतर्फी आदेश रद्द करण्यासाठी मागणी केली व आपला लेखी जबाब दाखल केला. मंचाने रुपये 500/- कॉस्टसह अर्ज मंजूर केला, मात्र त्यांनी सदर रक्कम मंचात जमा केली नाही. म्हणुन आम्ही या प्रकरणात गुणवत्तेवर निकाल देत आहोत. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे या प्रकरणात तक्रारदाराने त्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करावा यासंबंधी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणुन तक्रारदाराचा विद्युत पुरवठा चालू करुन देता आला नाही. यात गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार व त्यांचा भाऊ यांचेमध्ये वाद आहे. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत घरटॅक्स पावती, पोलीस स्टेशनला दिलेली फिर्याद,गैरअर्जदार यांचेकडे केलेल्या तक्रारी, नोटीस व पोस्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदारासोबत केलेला पत्रव्यवहार, कार्यालयीन टिपणी, चंद्रभागा लोहकरे यांचे पत्र व सहपत्र, मालमत्तेची कर आकारणी, इतर पत्रव्यवहार, पोस्टाची पावती व पोचपावती याप्रमाणे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. सदर प्रकरणात तक्रारदारातर्फे त्यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला, गैरअर्जदारातर्फे कोणीही हजर झाले नाही. सदर प्रकरणी तक्रारदाराने विद्युत बिल दाखल केले. त्यात त्यांचा ग्राहक क्रमांक 42206002373 असा दर्शविलेला आहे ते ग्राहक ज्ञानेश्वर पुडलिक लोहकरे हे आहेत. सदर बिलावरुन ते तक्रारदाराचे नावाचे आहे असे दिसून येते. यात तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे तक्रारदाराने यासंबंधात पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद नोंदविली आहे. गैरअर्जदाराने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तक्रारदाराने त्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी त्यांना सहकार्य केले नाही. तक्रारदार व त्यांचे भाऊ यांचा मालमत्तेसंबंधिचा वाद आहे आणि त्यामुळे मालेमत्तेसंबंधिच्या बाबींची पूर्तता करण्यासाठी तक्रारदाराने कोणताही पुरावा दिला नाही. वास्तविक पाहता तक्रारदाराचे नावाने विद्युत मीटर मुळातच आहे. त्याचे भावाने गैरकायदेशिरपणे विज पुरवठा खंडीत केला तो जोडून देणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य आहे व गैरअर्जदाराने ते योग्यरित्या पार पाडले नाही, त्यावरुन ह्या सर्व बाबी गैरअर्जदाराच्या लंगड्या सबबी आहेत हे स्पष्ट होते. यावरुन गैरअर्जदार तक्रारदारास या प्रकरणी योग्य ते सहकार्य करीत नाहीत व त्याचा विद्युत पुरवठा सुरु करीत नाहीत हे उघड आहे. आणि ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा विद्युत पुरवठा आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत पूर्ववत सुरु करुन द्यावा. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईदाखल रुपये 10,000/- आणि तक्रारखर्चादाखल रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 11,000/- (रुपये अकरा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. 4) गैरअर्जदार उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसाचे आत पूर्ण करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |