निकालपत्र
( पारीत दिनांक :22/10/2013 )
( द्वारा अध्यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) )
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदार यांच्या मुळे अर्जदाराला झालेल्या नुकसान
भरपाईची रक्कम रु.1,74,700/- गैरअर्जदार यांनी द्यावी.
2. प्रकरणाचा खर्च रु.10,000/-
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदाराने सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, त्याने शेती कामाकरीता 1 बैलजोडी व 1 गाय खरेदी केली होती. दिनांक 28/05/2011 रोजी मध्यरात्री अचानक वादळी हवा येवुन विद्युत तार तुटुन कंपाउंडवर पडली व त्यामुळे त्यांच्या एक गाय व बैलाला करंट लागला व त्यामध्ये ते दगावले/मरण पावले. अर्जदाराने सदर घटनेची माहिती त्वरीत गैरअर्जदार यांना दिली व त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा बंद केला. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडे नुकसान भरपाईकरिता अर्ज दाखल केला व सदर अर्जाची एक प्रत कारंजा पोलीस स्टेशन यांना दिली. पोलीसांनी घटनेची नोंद घेवुन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच पशुवैदयकीय अधिकारी कारंजा घाडगे यांनी गाय व बैलाचे शवविच्छेदन केले व त्यात सदर जनावरे ही विद्युत करंट लागुन मृत्यु पावल्याचे नमुद केले.
अर्जदाराने नमुद केले आहे की, गैरअर्जदार यांनी सदर घटनेची चौकशी करण्याकरीता विद्युत निरीक्षकाची नेमणुक केली व त्यांच्या अहवालानुसार सदरच्या चुकीकरीता गैरअर्जदारच जबाबदार असल्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सुचना केली तसेच तहसीलदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार गाईकरीता रु.25,000/- व बैलाकरीता रु.35,000/- नुकसान भरपाईची मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या सदर मागणीची 21/12/2011 पर्यंत काहीच दखल घेतली नाही व त्यानंतर गैरअर्जदार यांनी फक्त रु.11,113/- मंजुर करण्यात आल्याचे अर्जदाराच्या लक्षात आले तसेच पुढे पत्रात असेही नमुद केले की, अर्जदारावर मोटारपंपाची थकबाकी असल्यास सदर रकमेतुन थकबाकीची रक्कम वळती करावी. गैरअर्जदार यांनीच अर्जदार यांना नुकसान भरपाई म्हणुन रु.60,000/- द्यावी असा अहवाल असतांना फक्त रु.11,113/- मंजुर करण्यात यावे ही बाब म्हणजे अर्जदार यांची अहवेलनाच आहे. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
सदर तक्रार पंजीबध्द करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार हे आपल्या अधिवक्त्यामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी जवाब दाखल केला.
02. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाबामध्ये गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने/आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हा गैरअर्जदारांचे ग्राहक आहे व त्याचे DL 288 व शेतातील AG चे विद्युत कनेक्शन आहे हे कबूल केले आहे. अर्जदार यांनी केलेली मागणी ही बेकायदेशीर असुन तहसीलदार यांनी प्रमाण पत्रानुसार गाई करीता रु.25,000/- व बैलाकरीता रु.35,000/- असे जे मुल्यांकन केले आहे ते चुकीचे व बेकायदेशीर आहे तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराला नुकसान भरपाईकरीता रु.60,000/- देण्याचे कुठलेही आश्वासन दिलेले नव्हते. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांनी कंपनीच्या नियमाअंतर्गत रु.11,113/- मंजुर केले व सदर रक्कम घेण्यास अर्जदार यांनी नकार दिला. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदाराने रु.10,000/- इलेकट्रीक शेती पंपाचे विज देयक फेडलेले नाही तसेच अर्जदाराजवळ शेती नसुन त्यांनी सदर शेती दिनांक 8/8/2010 रोजी संजय भुसारी यांना विकलेली आहे. अर्जदाराचे जनावरे ही विद्युत प्रवाहानेच मृत्यु पावली ही बाब सिध्द झालेली नसुन वरील सर्व घटनांसांठी अर्जदार यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागवयास पाहीजे. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांच्याकडुन सेवे मध्ये कोणतीही टाळाटाळ किंवा दिरंगाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे वि.मंचास केलेली आहे.
03. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत, अर्जदाराचे विद्युत देयक, नुकसान भरपाईसाठी केलेला अर्जाची प्रत, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टन रिपोर्ट, कनिष्ठ अभियंता यांनी तहसीलदार कारंजा यांना प्रमाणपत्राकरीता दिलेले पत्र, सहा,आयुक्त पशुसंवर्धन कारंजा यांनी कनिष्ठ अभियंता यांना पाठविलेल्या उत्तराची प्रत तसेच पत्रे व पोस्टाच्या पावत्या इत्यादी एकुण 17 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला आहे.
अर्जदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जवाब व उभयंताच्या वकीलांचा युक्तिवाद यावरुन वि.मंचासमक्ष खालील मुद्द (Points of Consideration) विचारार्थ निघाले
मुद्दे उत्तर
1) अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) अर्जदाराने सदर जनावरांचे मृत्यु गैरअर्जदार
यांचे विद्युत प्रवाहाने झाला आहे हे सिध्द
केले आहे काय ? होय.
3) अर्जदार, गैरअर्जदार यांचे कडुन नुकसान
भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश अंतिम आदेशावरुन
-: कारणे व निष्कर्ष :-
मुद्दा क्र.1 -- अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रारीत तो कास्तकार असुन त्याचे जवळ शेतातील कामाकरीता एक बैलजोडी व एक गाय होती हे नमुद केले आहे. अर्जदाराने निशानी क्र.4/1 कडे DL 288 व विज देयक जोडले आहे. यावरुन तो गैरअर्जदार यांचा ग्राहक ठरतो तसेच सदर गोष्ट गैरअर्जदार यांना सुदा त्यांचे लेखी जबाबात कलम 9 मध्ये नमुद केली आहे. अर्जदाराकडे DL 288 चे विज कनेक्शन आहे व शेताकरीता दुसरे विज कनेक्शन आहे व तो गैरअर्जदार यांच्या AG कनेक्शनचा ग्राहक होतो हे गैरअर्जदार यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचा ग्राहक ठरतो म्हणुन मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 -- अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही शपथपत्रावर आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार व निशानी क्र.4 कडे दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता दिनांक 28/5/2011 रोजी पहाटे 4.00 वाजताच्या सुमारास अर्जदाराच्या घराच्या कंपाउंडवर/कुपनावर विद्युत तार तुटून पडली व त्यामुळे कुपनाला बांधलेल्या अर्जदाराचे गाय व बैल यांचा विजेचा शॉक लागुन मरण पावली आहे हे नि.क्र.4/3 कनिष्ठ अभियंता यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या पत्रावरुन व नि.क्र.4/4 वरील पोलीसांचे घटनास्थळ पंचानाम्यावरुन दिसुन येते, तसेच नि.4/5 वरील गैरअर्जदार यांच्या कनिष्ठ अभियंता यांनी केलेला घटनास्थळ पंचनाम्यामध्ये सुध्दा सदर अर्जदार यांचे शेतातील तारेच्या कुपनावर तार पडलेली आढळली आहे व सदर जनावरांचा मृत्यु हा विजेच्या शॉकने झाल्याचे दिसुन येते असे सदर पंचनाम्यामध्ये नमुद केले आहे. नि.क्र.4/6 व नि.क्र.4/7 वरील गाय व बैलाचे शवविच्छेदन अहवालामध्ये सुध्दा सदर जनावरांचा मृत्यु हा हाय होल्टेज विजेच्या शॉकने झाल्याचे नमुद आहे. त्यामुळे सदर जनावरांच्या मृत्युचे कारण हे गैरअर्जदार यांच्या विद्युत तारा तुटून शॉक लागल्याने झाला हे सिध्द होते, म्हणुन मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.3 -- वर नमुद मुद्दा क्र.2 मध्ये अर्जदाराची गाय व बैल हे गैरअर्जदार यांचे विद्दुत तारेच्या शॉकने मरण पावले हे सिध्द होत आहे हे नमुद केले आहे. सदर जनावरांचे मृत्यु नंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या कडे नुकसान भरपाई मिळण्याकरीता अर्ज केला हे नि.क्र.4/1 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते. त्यानंतर गैरअर्जदार यांचे कार्यालयामार्फत याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली. गैरअर्जदार यांचे मार्फत कनिष्ठ अभियंता यांनी पशुवैधकीय अधिकारी कारंजा यांना पत्राने कळवुन सदर मृत्यु पावलेल्या जनावरांची किंमत काय असावी यांचे प्रमाणपत्राची मागणी केली हि बाब नि.क्र.4/10 वरील पत्रावरुन दिसुन येते. सदर पत्रा प्रमाणे पशुवैधकीय अधिकारी कारंजा यांनी कनिष्ठ अभियंता यांना सदर मृत्यु पावलेल्या गायीची किंमत रु.25,000/- व बैलाची किंमत रु.35,000/- आहे असे कळविले हे नि.क्र.4/9 वरील पत्रावरुन दिसुन येते. म्हणजेच अर्जदाराच्या मृत्यु पावलेल्या गायीची किंमत रु.25,000/- व बैलाची किंमत रु.35,000/- असल्याचे सिध्द होते.
सदर अपघातानंतर योग्य ती चौकशी पुर्ण झाल्यानंतर गैरअर्जदार यांचे विद्युत निरीक्षक यांनी दिनांक 27/5/2012 रोजी कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवुन सदर अपघाताची जबाबदारी स्विकारुन अर्जदार यांना नुकसान भरपाई मंजुर करावी असे कळविले व ही बाब नि.क्र.4/14 वरील पत्रावरुन दिसुन येते. त्यानंतर गैरअर्जदार यांनी नि.क्र.4/15 दिनांक 21/12/2012 रोजीच्या पत्रान्वये गाय व बैलाची फक्त रु.11,113/- एवढीच नुकसान भरपाई मंजुर केली व सदर नुकसान भरपाई कुठल्या आधारे काढण्यात आली याचा सविस्तर खुलासा गैरअर्जदार यांनी केला नाही. आपले लेखी जबाबतसुध्दा गैरअर्जदार यांनी रु.11,113/- देण्यास तयारी दर्शविली. मात्र सदर नुकसान भरपाईची रक्कम रु.11,113/- कशाचे आधारे काढली हे दर्शविणारा एकही पुरावा या कामी दाखल केला नाही व अल्पशी रक्कम देण्याचा प्रयत्न करुन आपली जबाबदारी झटकण्याचा व अर्जदाराची एकप्रकारे कुचेष्ठा करणेचा प्रयत्न गैरअर्जदार यांनी केला आहे असे दिसुन येते.
गैरअर्जदार यांनी एके ठिकाणी अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही असे कथन करतात तर एके ठिकाणी तो ग्राहक आहे असे कबुल करतात. म्हणजे गैरअर्जदार हेच स्वतःचे म्हणण्यावर ठाम नाही असे दिसुन येते. गैरअर्जदार यांनी सदर अर्जदार हा ग्राहक नाही व सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या पुष्ठयर्थ मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई याचा First Appeal No.A/7/27 या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. सदर न्यायनिवाडया मध्ये अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक होत नाही त्यामुळे सदरचा वाद हा ग्राहक वाद नाही असे नमुद आहे. मात्र प्रस्तुत न्यायनिवाडा हा या प्रकरणांस लागु होत नाही. कारण गैरअर्जदार यांनी आपले लेखी जबाबात अर्जदार हा त्यांचा ग्राहक आहे ही गोष्ट मान्य केली आहे व फक्त अर्जदार हा शेतकरी नाही व त्याने शेती विकली आहे असे नमुद केले आहे. मात्र त्याबाबतचा कुठलाही पुरावा वि.मंचात दाखल केलेला नाही. अर्जदाराजवळ शेती नाही म्हणुन तो शेतकरी नाही असा बचाव गैरअर्जदार यांचा आहे, परंतु तो ग्राहक नाही असे कथन गैरअर्जदार यांचे नाही. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे व त्यामुळे प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद ठरतो, त्यामुळे गैरअर्जदार यांच्या विजेच्या तारेचा शॉक लागुन अर्जदार यांचे जनावरे मरण पावल्यामुळे त्यासंबंधीची गैरअर्जदार यांच्याकडुन नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पात्र आहे.
अर्जदार यांनी आपल्या मागणीच्या पुष्ठयर्थ मा.राज्य ग्राहक आयोग, कर्नाटक यांचा 2012(3)CPR 121, Ganga Patil……V/s………Gescom and Anr., decided on 7/12/2011. हया न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
गैरअर्जदार यांनी सदर अपघाताचे चौकशीच्या वेळी सदर जनावरांची किंमत ठरविण्यासाठी पशुवैधकीय अधिकारी यांचे कडुन प्रमाणपत्र मागवितले होते. त्याप्रमाणे नि.क्र.4/9 वरील सहाय्यक आयुक्त पशुवैधकीय अधिकारी कारंजा जिल्हा वर्धा यांनी सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता मृत्यु पावलेल्या गायीची किंमत रु.25,000/- व बैलाची किंमत रु.35,000/- केल्याचे दिसुन येते. तसेच मा.तहसिलदार यांना सुध्दा तलाठी यांनी स्थानीक चौकशी करुन सदर गायीची किंमत रु.25,000/- व बैलाची किंमत रु.35,000/- असल्याचे नि.क्र.4/11 वरील तलाठी यांचे पत्रावरुन दिसुन येते. तसेच अर्जदाराने सदर अपघातानंतर नवीन बैल रु.40,100/- मध्ये खरेदी केला हे नि.क्र.4/13 वरील विक्री पत्रावरुन दिसुन येते. यावरुन मृत बैलाची किंमत रु.35,000/- व गाईची किंमत ही रु.25,000/- होती हे कागदोपत्री पुराव्यासहित सिध्द झाले आहे व सदर रक्कम मिळण्यास अर्जदार पात्र आहे. याबाबत नुकतेच मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांनी, III(2013)CPJ 377 (NC), Jogender………..V/s……… U.H.B.V.N.L. & ors, decided on 22/5/2013 ला आदेश पारीत केला व त्यान नमुद केले आहे की,
“ Consumer Protection Act,1986 – Section 2(1)(g), 14(1)(d), 21(b)---Electrocution---Death of two buffaloes--- Old electric wires fell down—Loss suffered—Compensation---District Forum awarded compensation @ Rs.1 lakh--- State Commission reduced compensation amount to Rs.50,000/- Hence revision—Veterinary Surgeon rightly estimated cost of one buffalo @ Rs.50,000/- Order of District Forum was based on affidavit evidence of petitioner and report of Veterinary Surgeon—Impugned order modifying cost of buffaloes set aside.”
या प्रकरणात निवाडा देतांना विजेचे ता-याच्या धक्याने जनावरांचा मृत्यु झाल्याचे उपलब्ध पुरावा व पशुवैधकीय सर्जन यांनी दिलेली किंमत ही योग्य व कायदेशीर आहे व त्याप्रमाणे किंमत मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे स्पष्ट नमुद केले आहे. सदर न्यायनिवाडा सदर प्रकरणांशी पुर्णपणे लागु पडतो त्यामुळे सदर निवाडयांचा आधार घेता व प्रस्तुत प्रकरणातील नि.क्र.4/9 वरील सहाय्यक आयुक्त, पशुवैधकीय अधिकारी कारंजा यांनी दिलेली मृत जनावरांच्या किंमतीचे प्रमाणपत्राप्रमाणे मृत गायीची किंमत रु.25,000/- व बैलाची किंमत रु.35,000/- अशी एकुण रु.60,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे वि.मंचाचे स्पष्ट मत झाले आहे.
गैरअर्जदार यांच्या विजेच्या तारेच्या शॉक मुळेच अर्जदारांची जनावरे मरण पावली याची जबाबदारी स्विकारुन गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई मंजुर करणे गरजेचे होते. परंतु केवळ गैरअर्जदार यांनी वेळ काढुपणा केला त्यामुळे अर्जदाराला वारंवार गैरअर्जदार यांचे कडे चकरा माराव्या लागल्या, लेखी अर्ज दयावे लागले तरीही गैरअर्जदार यांनी त्यास दाद दिली नाही. अर्जदाराने वकीलामार्फत नोटीसही दिला तरीही गैरअर्जदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले एवढेच नव्हे तर नोटीसला साधे उत्तरही देण्याचे सौजन्य दाखविले नाही, यावरुन गैरअर्जदार यांचे ग्राहकाबद्दल किती नकारात्मक मानसिकता असते हे दिसुन येते त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दुषित व त्रुटीची सेवा दिली आहे ही बाब सिध्द होते व त्यामुळे गैरअर्जदाराच्या दुषित व त्रुटीची सेवेमुळे अर्जदाराला झालेल्या मानसीक व शारीरीक त्रासापोटी रु.2500/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रु.1500/-मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे वि.मचाचे मत आहे.
एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत वि.मंच आलेले असल्याने पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अंतिम आदेश //
1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तीकरीत्या
अर्जदाराला त्याच्या मृत जनावरांची एकुण किंमत
रु.60,000/- (रु.साठ हजार फक्त) अदा करावे.
3) अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल
गैरअर्जदार यांनी अर्जदारास रुपये 2,500/- ( रुपये दोन
हजार पाचशे फक्त) व तक्रारीचा खर्चरुपये 2000/- (रुपये
दोन हजार फक्त) द्यावे.
4) गैरअर्जदार यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त
झालेल्या दिनांकापासुन 30 दिवसांच्या आंत करावे. अन्यथा
उपरोक्त कलम 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे देय रकमेवर
तक्रार दाखल दिनांक म्हणजेच 29/2/2012 पासुन ते पुर्ण
रक्कम प्राप्त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 10 टक्के दराने
व्याज द्यावे लागेल याची नोंद घ्यावी.
5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत
घेवुन जाव्यात.
6) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.