ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :19/11/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त.क. क्रं. 1 ते 3 चे वडील कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे महादेवपुरा, वर्धा येथे नझूल शीट क्रं. 11, घर क्रं. 67/1 व घर क्रं. 68 मालकी व कब्जात होते. त्यांनी वि.प.कडून ग्राहक क्रं. 390010032507 अन्वये घर क्रं.67/1 मध्ये वीजपुरवठा घेतला होता. कृष्णराव हरबाजी जुमडे यांचा दि.08.06.2012 रोजी मृत्यु झाला. त.क. व त्याचे भाऊ सुनील कृष्णराव जुमडे हे सर्व कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे वारस असून घर क्रं. 67/1 मधील विजपुरवठयासाठी ते सर्व ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(i) नुसार लाभार्थी ठरतात. त.क. क्रं. 1 ते 3 यांच्या मुलांनी स्पे. दिवाणी दावा क्रं. 8/11 नुसार कृष्णराव हरबाजी जुमडे व सुनिल जुमडे यांचे विरुध्द दिवाणी न्यायालयात वाटणी व घराचा ताबा मिळण्याकरिता दाखल केला असून तो प्रलंबित आहे. कृष्णराव ह.जुमडे यांच्या मृत्युमुळे सर्व त.क. त्यात पक्षकार आहेत.
- त.क. ने पुढे असे कथन केले की, त.क.चे धाकटे बंधू सुनिल कृष्णराव जुमडे यांनी मृत्युपत्राच्या आधारे घर क्रं. 67/1 मधील विद्युत मीटर स्वतःचे नांवे करण्याबाबत वि.प. कडे अर्ज केला. वि.प. 1 ने कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या सर्व वारसांना नोटीस न काढता, सुनिल कृष्णराव जुमडे यांच्या अर्जाची, शपथपत्राची, प्रलंबित दाव्याची चौकशी न करता, वि.प.क्रं. 1 व 2 यांनी कायदेशीर कारवाईची योग्य शहानिशा न करता सुनिल कृष्णराव जुमडे यांचे नांव मीटरधारक म्हणून बेकायदेशीररित्या नोंदविले. वि.प. चे कृत्य हे बेकायदेशीर व बेजबाबदारपणाचे असून ग्रा. सं. कायद्या अंतर्गत 2(1)(4)(1) नुसार प्रतिबंधीत व अनुचित व्यवहार पध्दती ठरते.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, सुनिल जुमडे यांचे नांव कृष्णराव जुमडे यांच्या ऐवजी नमूद केल्याबाबत प्रथमतः दि.23.08.2013 रोजी निदर्शनास आले, तेव्हा त.क. हे वि.प. च्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन प्रलंबित दिवाणी दाव्याची कागदोपत्री माहिती दिली व मुळ ग्राहकाच्या नांवात केलेला बदल रद्द करण्याबाबत विनंती अर्ज केला व दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दाव्या संबंधी सर्व कागदपत्रे सुनिल जुमडे यांचे नांव रद्द करण्याकरिता पुन्हा दाखल केले. परंतु वि.प. यांनी न्यायालयीन कारवाईची दखल न घेता सुनिल जुमडे यांचे नांव कायम ठेवले. पुन्हा दि.10.09.2013 रोजी त.क.ने वि.प.ची भेट घेऊन सर्व आवश्यक कागदपत्रे दाखल केली. परंतु वि.प. ने बेकायदेशीररित्या नांवात केलेला बदल रद्द केला नाही. त्यामुळे त.क.ने नाईलाजाने दिवाणी न्यायालयात तात्पुरता मनाई हुकूम करिता अर्ज करुन कायदेशीर कारवाई करणे भाग पडले. त्याकरिता त.क.ला प्रचंड मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले. वकिलांनी या तात्पुरता मनाई हुकुमाकरिता स्वतंत्र 5000/-रुपये फी घेतली तसेच प्रवास व इतर खर्चाकरिता 5000/-रुपये त.क.ला खर्च करावा लागला. दाव्यामध्ये दाखल कागदपत्रांच्या आधारे उभय पक्षांच्या युक्तिवादा अंती दि. 16.06.2013 रोजी प्रथमतः जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश झाला. त्यानंतर दि.01.10.2013 रोजी तात्पुरता मनाई हुकूम दावा प्रलंबित असे पर्यंत हुकूम पारित केला. त्या आदेशाची प्रत वि.प.कडे दि. 08.10.2013 रोजी दाखल केली. दि. 20.07.2013 व 08.10.2013 या कालावधीत त.क.ने वि.प.कडे दाखल केलेले कायदेशीर कागदोपत्री पुरावा विचारात न घेता मुळ मीटरधारकाच्या नावातील बदल रद्द न केल्यामुळे त.क.ला विनाकारण तात्पुरता मनाई हुकुमाच्या आदेशाच्या कारवाईकरिता, आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त.क.ला झालेल्या संपूर्ण नुकसानीकरिता वि.प. 1 वैयक्तिकरित्या तसेच वि.प.च्या कार्यालयीन जबाबदारीनुसार देखील नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. त.क. ने वारंवांर स्मरणपत्रे देऊन ही वि.प. यांनी त्याची दखल घेतली नव्हती. परंतु 25.10.2013 रोजी वि.प. यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार वि.प.ने न्यायालयीन आदेशानुसार कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे नांव पूर्ववत करुन सुनिल जुमडे यांचे नांव रद्द केल्याचे कळविले. वि.प.ने सर्व दस्ताऐवजाची व त.क.च्या विनंती अर्जाची योग्य शहानिशा न करताच मुळ मीटर धारकाचे नांवात बदल केल्यामुळे त.क.ला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व वि.प. यांनी प्रतिबंधीत व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन मुळ मीटर धारकाच्या नांवात बदल केल्यामुळेच त.क. यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त.क. ने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन वि.प. यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे ठरविण्यात यावे , त.क. यांना 51,000/-रुपये नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून विनंती केली आहे.
- वि.प. क्रं. 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं.13 वर दाखल करुन, वि.प.ने कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या नांवे विद्युत पुरवठा दिला होता व कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या मृत्युनंतर सुनिल जुमडे यांच्या अर्जावरुन कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे नांव कमी करुन सुनिल जुमडे यांचे नांव लावले होते हे कबूल केले आहे. इतर सर्व आक्षेप वि.प. यांनी अमान्य केलेले आहे. वि.प.चे म्हणणे असे की, कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे महादेवपुरा वर्धा येथे असलेल्या घराला विद्युत पुरवठा देण्यात आला होता. कृष्णराव जुमडे यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांनी विहित नमुन्यात अर्ज करुन सदर मीटर त्यांच्या नांवे नोंद करण्याकरिता विनंती केली होती व सोबत वडिलांचे रजिष्टर्ड मृत्युपत्र व स्वतःचे शपथपत्र जोडलेले होते.त्यानुसार सत्यता सिध्द झाल्यामुळे सुनिल जुमडेचा अर्ज मंजूर करण्यात आला व त्याचे नांव सदर विद्युत कनेक्शनशी दर्ज करण्यात आले. सदरची कारवाई वि.प.ने नियमाप्रमाणे केलेली होती. त.क. ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सुनिल जुमडे व इतर यांच्यामध्ये स्पे. दिवाणी दावा क्रं. 8/11 वर्धा येथील न्यायालयात प्रलंबित आहे. सदरचा दावा वाटणी करुन मिळण्याकरिता धवल व एक इतर यांनी मयत कृष्णराव व इतर यांचे विरुध्द केलेला आहे व त्या दाव्यात केलेल्या मनाई हुकुमाच्या दाव्यावर कोर्टाने जैसे थे स्थितीचा आदेश दिला व मालमत्ता हस्तांतर करु नये असा तात्पुरता मनाई हुकूम आदेश दिला. सदर आदेशामध्ये विद्युत मीटरबाबत कोणताही आदेश नाही, असे असतांना त.क. हे वि.प. यांच्यावर मीटर पूर्ववत कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या नांवावर करण्याकरिता दबाव आणत होते व वारंवांर तेच ते अर्ज देत होते. सुनिल जुमडे यांच्या नांवाने मीटर कां करुन देण्यात आले, याबाबत पूर्णपणे समाधान करुन देण्यात आले असतांना देखील ज्या मनाई हुकुमाचा मीटरशी संबंध नाही, त्याच्या आधारे कारवाई करण्याकरिता जबरदस्ती करीत होते. शेवटी कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या मालमत्तेबाबत कोर्टात दावा प्रलंबित आहे ही बाब विचारात घेऊन मीटर हे पुन्हा कृष्णराव हरबाजी जुमडे यांचे नांवाने करण्यात आले. त.क. ने सदर दाव्यात केलेल्या मागणीचा विद्युत मीटरशी व वि.प.शी कोणताही संबंध नाही. त्यामुळे दावा दाखल करण्यासाठी लागलेल्या खर्चाकरिता वि.प. कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. त.क. ने दाखल केलेल्या तक्रारीची दखल ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत घेता येत नाही. विनाकारण वि.प. यांच्या विरुध्द खोटे व बिनबुडाची तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई मागितली आहे. त्यामुळे त.क. चा तक्रार अर्ज वि.प. ला 25,000/-रुपये खर्च देण्याच्या आदेशासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
- वि.प.ने नि.क्रं.14 वर त.क.च्या तक्रारीस प्रतिउत्तर शपथपत्रावर दाखल केले आहे. त.क.ने आपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ नि.क्रं. 4 वर दस्ताऐवज वर्णन यादी सोबत नि.क्रं. 4(1) सोबत एकूण 17 कागदपत्रांच्या झेराक्स प्रती दाखल केलेल्या आहे. वि.प. यांनी तोंडी किंवा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. वि.प. 1 व 2 यांनी नि.क्रं.16 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच उभय पक्षांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणेमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्षाने कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या नांवावर असलेले विद्युत मीटर त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांच्या नांवे करुन दोषपूर्ण सेवा व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही | 2 | तक्रारकर्ते मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही | 3 | अंतिम आदेश काय ? | आदेशाप्रमाणे |
: कारणेमिमांसा :- - मुद्दा क्रं.1, 2 व 3 बाबत ः-त.क. चे वडील कृष्णराव हरबाजी जुमडे यांच्या नांवे महादेवपुरा, वर्धा येथे नझुल शीट क्रं. 11, घर क्रं. 67/1 व घर क्रं. 68 आहे व त्यांनी वि.प.कडून ग्राहक क्रं. 390010032507 अन्वये घर क्रं. 67/1 करिता विद्युत पुरवठा घेतला होता व कृष्णराव हरबाजी जुमडे यांचा दि. 08.06.2012 रोजी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांच्या अर्जावरुन सदरील मीटर त्याच्या नांवे नोंदविण्यात आले व नंतर त.क.ने आक्षेप घेतल्यामुळे ते रद्द करण्यात आले हे उभयतांना मान्य आहे. तसेच कृष्णराव जुमडे यांच्या हयातीत असतांनाच त.क. क्रं. 1 ते 3 यांच्या मुलांनी स्पे. दिवाणी दावा क्रं. 8/11 सदरील घराच्या वाटणीकरिता कृष्णराव जुमडे व इतर यांच्या विरुध्द दाखल केला होता व तो दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे हे सुध्दा वादीत नाही. त.क. ची तक्रार अशी आहे की, वि.प. क्रं. 1 व 2 यांनी कृष्णराव जुमडे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांना नोटीस न काढता व प्रलंबित दाव्याची चौकशी न करता बेकायदेशीररित्या कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर सुनिल जुमडे यांच्या नांवे नोंदविले व त.क.नी वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन सुध्दा दि. 20.07.2013 ते 08.10.2013 या कालावधीत सदरील नोंद रद्द न केल्यामुळे त.क.ला दिवाणी कोर्टात तात्पुरता मनाई हुकुमचा अर्ज दाखल करावा लागला व त्यासाठी वकिलाची फी व इतर खर्च करावा लागला व बेकायदेशीर मुळ मीटर धारकाचे नांव बदलल्यामुळे त.क.ला नुकसान सहन करावे लागले, त्यामुळे त्यांना 51,000/-रुपयाचे नुकसान झाले व सदर नुकसान हे वि.प.च्या प्रतिबंधित व अनुचित व्यापार पध्दतीमुळे झालेले आहे.
- या उलट वि.प.ने असे कथन केलेले आहे की, कृष्णराव जुमडे यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांनी रजिस्टर्ड मृत्युपत्र, शपथपत्र व इतर कागदपत्र दाखल करुन कृष्णरावच्या नांवे असलेले विद्युत मीटर त्याच्या नांवे करण्याची विनंती केल्यामुळे वि.प. 1 ने सर्व गोष्टींची शहानिशा करुन त्याची नोंद केलेली आहे. त्यांनी कुठलीही अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही, त्यामुळे वि.प.चे कृत्य हे कायदेशीर आहे.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ वर्णन यादी नि.क्रं. 4 सोबत एकूण 17 कागदपत्रे दाखल केलेली आहे. त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, कृष्णराव जुमडे यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांनी वि.प.क्रं. 1 कडे कृष्णराव जुमडेच्या नांवे असलेले वादग्रस्त विद्युत मीटर त्याच्या नांवे करण्यासाठी अर्ज दाखल केला व अर्जा सोबत कृष्णराव जुमडे यांनी त्याच्या नांवे करुन दिलेले मृत्युपत्र व त्याचे स्वतःचे शपथपत्र व इतर कागदपत्रे दाखल केली व त्यावरुन वि.प. ने कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर हे सुनिल जुमडे यांच्या नांवे नोंदविले.
- त.क.चे अधिवक्ता यांनी आपल्या युक्तिवादात असे प्रतिपादन केले की, वि.प. 1 यांनी सुनिल जुमडे यांचा अर्ज आल्यानंतर कृष्णराव जुमडे यांच्या वारसांना नोटीस काढावयास पाहिजे होती व त्यांच्या चालू असलेल्या दिवाणी दाव्याची चौकशी करावयास पाहिजे होती. परंतु कुठलीही शहानिशा न करता घाईगडबडीने 10 दिवसात वादीत विद्युत मीटर सुनिल जुमडे यांच्या नांवाने नोंदविले, जेव्हा ही बाब त.क.च्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी वेळोवेळी वि.प. क्रं. 1 व 2 कडे तक्रार अर्ज दाखल केला. परंतु वि.प.ने दि. 20.07.2013 ते 08.10.2013 या कालावधीत त.क.ने दाखल केलेले कागदोपत्री पुरावा विचारात न घेता मुळ मीटर धारकाच्या नांवातील बदल रद्द केला नाही. त्यामुळे त.क.ला दिवाणी न्यायालयात तात्पुरता मनाई हुकुमचा अर्ज दाखल करावा लागला व त्यासाठी वकिलाची फी द्यावी लागली व इतर खर्च करावा लागला, यासाठी वि.प. 1 व 2 जबाबदार आहेत. वि.प. 1 हे स्वतः हजर होऊन त्यांनी त्यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे वि.प. 1 हे व्यक्तिशः नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे.
- वि.प.च्या वकिलांनी त्यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान असे प्रतिपादन केले की, त.क. हे वि.प. चे ग्राहक नाही. म्हणून सदर तक्रार मंचासमोर चालू शकत नाही. दिवाणी दावा क्रं. 8/11 मध्ये वि.प. हे पक्षकार नाही किंवा त्या दाव्यातील मनाई हुकुमच्या अर्जात वादातील मीटर संबंधी कुठलाही आदेश नाही. सुनिल जुमडे यांनी दाखल केलेले मृत्युपत्राच्या आधारे व इतर कागदपत्राच्या आधारे कायदेशीररित्या त्याच्या नांवे विद्युत मीटर करण्यात आले होते. त्यानंतर ते रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे वि.प. क्रं. 1 व 2 यांनी कोणत्याही प्रकारे अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही व त.क.ला दिवाणी दाव्यासाठी आलेल्या खर्चाची नुकसान भरपाई देण्यास वि.प. जबाबदार नाही. म्हणून त.क.चा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली.
- त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन एक मात्र निश्चित होते की, त.क.च्या मुलाने कृष्णराव जुमडे हयात असतांनाच त्यांच्या विरुध्द स्पे. दिवाणी दावा क्रं. 8/11 वाटणीकरिता दाखल केला होता व तो दावा चालू असतांना कृष्णराव जुमडे यांचा मृत्यु झाला. पुढे असे सुध्दा निदर्शनास येते की, कृष्णराव जुमडे हे हयातीत असतांनाच त्यांनी त्यांचा मुलगा सुनिल जुमडे यांच्या नांवे त्यांच्या मिळकतीचे मृत्युपत्र करुन दिले होते. त्या मृत्युपत्राच्या आधारे सुनिल जुमडे यांनी कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर त्याच्या नांवे करण्यासाठी वि.प.कडे रीतसर अर्ज केला व त्या अर्जाची व कागदपत्राचे अवलोकन करुन कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर सुनिल जुमडे यांच्या नांवे नोंदविले. त.क.च्या वकिलांनी सुनिल जुमडे यांनी केलेल्या अर्जातील काही बाबी मंचाच्या निदर्शनास आणून नांवात बदल करण्यासाठी ज्या बाबी वि.प.ने तपासावयास पाहिजे होती ते तपासले नाही. अर्ज भरण्यासंबंधी सूचना मध्ये अ.क्रं. 4 मध्ये नावातील बदलाकरिता अर्जदारानी य, र, ल किंवा व अर्जासोबत मालकी हक्क/हस्तांतरण /याबाबतचा पुरावा किंवा मालकाकडून किंवा कायदेशीर वारसाकडून प्राप्त केलेले नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. घरगुती वापराच्या ग्राहकांच्या नावातील बदल करण्याबाबतीत सुधारीत सोपे अर्ज स्विकारले जातील असे नमूद आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, सुनिल जुमडे यांनी त्यांच्या अर्जासोबत नोंदणीकृत कृष्णराव जुमडे यांचे मृत्युपत्र व स्वतःचे शपथपत्र दाखल केले होते. त.क.च्या वकिलांनी सदरील शपथपत्राच्या मजकुराबाबत आक्षेप घेतला परंतु सदरील शपथपत्र हे अर्जासोबत परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या नमुन्यात असल्यामुळे ते शपथपत्र चुकिचे आहे असे म्हणता येणार नाही. जेव्हा सुनिल जुमडे यांनी कृष्णराव जुमडे यांनी केलेल्या मृत्यु पत्र अर्जा सोबत जोडलेले होते तेव्हा वि.प.ला कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटरचे हस्तांतरण सुनिल जुमडे यांच्या नांवे करण्याकरिता इतर वारसांना नोटीस काढण्याची आवश्यकता नाही असे मंचाचे मत आहे. तसेच कृष्णराव जुमडे यांचे इतर वारस कोण आहेत याची सुध्दा वि.प.ला माहिती नसावी. सुनिल जुमडे यांच्या नांवे विद्युत मीटरची नोंदणी होईपर्यंत वि.प.ला कृष्णराव जुमडेच्या मिळकती संबंधी दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे याची कल्पना नव्हती ही बाब प्रथमतः जेव्हा त.क.नी त्यासाठी तक्रार अर्ज वि.प. 1 कडे दिला त्यावेळेस त्याच्या निदर्शनास आले होती. तसेच दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे सुध्दा लक्षात येते की, त्यानंतर वि.प. यांनी वकीला मार्फत त्यासंबंधी मत मागितले. त्यांनतर त.क.ने दाखल केलेल्या मनाई आदेशाचे अवलोकन करुन सुनिल जुमडे यांच्या नांवे नोंदविण्यात आलेले विद्युत मीटर रद्द करण्यात आले. त्यामुळे वि.प. यांनी कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले असे दिसून येत नाही. जरी वि.प. 1 ने स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नसले तरी त्यांनी जे काही सुनिल जुमडे यांच्या अर्जावरुन कारवाई केली होती, ती त्यांच्या स्वतःच्या कैपेसिटीत केलेली नाही तर त्यांनी उप-कार्यकारी अभियंता या मुद्दयावरुन केलेली आहे. म्हणून वि.प. 1 ने स्वतःचे शपथपत्र दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द व्यक्तिशः कुठलीही कार्यवाही करणे योग्य होणार नाही.
- मंचासमोर असा प्रश्न निर्माण होते की, वि.प. 1 ने कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर सुनिल जुमडे यांच्या नांवे नोंदवून दोषपूर्ण सेवा दिली काय ? वास्तविक पाहता वि.प.यांचा मुळ उद्देश त्याच्या ग्राहकांना विद्युत पुरवठा व्यवस्थितपणे करणे व त्यासाठी ग्राहकांना योग्य ती सवलत देणे आहे. सुनिल जुमडे यांच्या नांवाने विद्युत मीटर केल्यामुळे त.क. यांच्या वडिलांच्या नांवे असलेल्या मिळकतीत मालकीत बदल झाला असे नाही. त्या घरात विद्युत पुरवठा नियमित सुरु होता व त्याचा उपभोग सदरील घरात राहणा-या व्यक्तिने घेतलेला आहे. म्हणून विद्युत मीटरच्या नांवात बदल करणे ही दोषपूर्ण सेवा म्हणता येत नाही असे मंचाचे मत आहे. तसेच विद्युत मीटरच्या नांवात बदल केल्यामुळे कृष्णराव जुमडे यांच्या मिळकतीमध्ये बदल होतो असे नाही किंवा त्याचा परिणाम दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणात होतो असे सुध्दा नाही.
- त.क.ने तक्रार करुन सुध्दा सुनिल जुमडे यांच्या नांवाने नोंदविलेल्या मीटरमध्ये बदल न केल्यामुळे त्यांना दिवाणी न्यायालयात तात्पुरता मनाई हुकूम अर्ज दाखल करावा लागला व त्यासाठी खर्च करावा लागला हे म्हणणे योग्य वाटत नाही. कारण त.क.ने दाखल केलेल्या मनाई हुकूम आदेशाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, त.क.च्या मुलाने कृष्णराव जुमडे व इतर यांच्या विरुध्द वाटणीसाठी दावा दाखल केला होता, त्या दाव्यात त.क. हे सुध्दा पक्षकार आहेत. त्यांनी त्या दाव्यामध्ये त्यांचा प्रतिदावा (Counter claim) दाखल करुन त्याच्या हिस्सायाची मागणी कृष्णराव जुमडे यांच्या मिळकतीत केल्याचे दिसून येते व त्या दाव्यामध्ये त.क. ने दि. 16.07.2013 रोजी सुनिल जुमडे व कृष्णराव जुमडे यांच्या विरुध्द कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेली मिळकतीचे विल्हेवाट लावू नये असा मनाई हुकूम मागितला होता. त्या अर्जावर मा. सह न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांनी त्या मिळकतीचे जैसे थे स्थिती ठेवण्याकरिता त्याच दिवशी आदेश केला होता. त्यानंतर सदरील अर्जाचा निकाल दि. 01.10.2013 रोजी होऊन, त्या दाव्यातील प्रतिवादी नं. 2 म्हणजेच सुनिल जुमडे यांनी दाव्यातील मिळकतीचे विल्हेवाट लावू नये व त्यावर इतर व्यक्तिंचा बोजा करु नये असा मनाई आदेश सुनिल जुमडे विरुध्द देण्यात आला. सदर आदेशाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता कुठेही असे दिसून येत नाही की, वादातील मिळकतीत कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटर संबंधी कोणताही आदेश झालेला आहे. तसेच वि.प. सुध्दा त्या दाव्यात पक्षकार नव्हते. मनाई अर्ज हा दि. 16.06.2013 रोजी दाखल केला असल्यामुळे व कृष्णराव जुमडे यांच्या नांवे असलेले विद्युत मीटरची नोंद सुनिल जुमडे यांच्या नांवे करण्यात आल्याची बाब त.क.च्या लक्षात दि. 23.08.2013 रोजी आल्यामुळे त.क.ने वि.प. कडे सुनिल जुमडे यांच्या नांवावर कृष्णराव जुमडे यांचे नांवे असलेले विद्युत मीटरची नोंद केल्यामुळे त.क.ला दिवाणी न्यायालयात मनाई हुकुमाची कारवाई करावी लागली असे म्हणता येणार नाही. तात्पुरता मनाई हुकुमचा अर्ज हा पूर्वी पासूनच दिवाणी न्यायालयात सुरु होता आणि त्यासाठी वि.प. च्या कृत्यामुळे खर्च करावा लागला असे म्हणता येणार नाही. तसेच यासाठी वकिलाला दिलेली फी व तात्पुरता मनाई हुकुमासाठी आलेला खर्च देण्यास वि.प. जबाबदार नाही.
- त.क. हे कृष्णराव जुमडे यांच्या नांवावर असलेल्या घरात राहत नसून त.क. क्रं. 1 हे पुणे येथे राहतात, त.क.क्रं. 2 हे हवालदारपुरा वर्धा येथे राहतात तर त.क.क्रं. 3 ही अकोला येथे राहते. त्यामुळे ते कृष्णराव जुमडे यांच्या नांवावर देण्यात आलेल्या विद्युत मीटरचे उपभोग घेत होते व कृष्णराव जुमडे च्या मृत्युनंतर ते वि.प.चे ग्राहक झाले असे म्हणता येणार नाही. सुनिल जुमडे हे त्या घरात राहत आहेत व त्यांनी कृष्णराव जुमडे यांच्या नांवावर असलेल्या विद्युत मीटर पासून विद्युत पुरवठयाचा उपभोग घेत होते व त्यासाठी नांवे ट्रान्स्फर (बदल) करण्यासाठी मृत्युपत्रा सोबत अर्ज दिला होता. म्हणून वि.प.ने त्याच्या नांवे सदरील विद्युत मीटर ट्रान्स्फर केले होते. जरी सुनिल जुमडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर वि.प.ने 10 दिवसाच्या आत विद्युत मीटर नोंदविले. याचा अर्थ असा होत नाही की, त.क.चे हक्क डावलण्यासाठी वि.प. 1 ने घाईगडबडीने सुनिल जुमडे यांच्या नांवे विद्युत मीटरची नोंदणी केली. उलट यावरुन असे दिसून येते की, वि.प. 1 ने त्यांच्या कार्यात तत्परता दाखवून ताबडतोब विद्युत मीटरची नोंदणी केली.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता वि.प. यांनी त.क. यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही व ही बाब त.क. सिध्द करु शकले नाही असे मंचाचे मत आहे.त्यामुळे वरील दोन्ही मुद्दयाचे उत्तर नकारार्थी देण्यात येते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2 उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्वतः करावे. 3 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 4 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |