::: तक्रार खारीज करणेबाबत विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या अर्जावर आ दे श :::
( पारित दिनांक : 30/06/2018 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून दाखल केली आहे.
सदर तक्रार, तक्रारदाराने वडीलामार्फत विरुध्द पक्षाविरुध्द मंचात दाखल करुन, तक्रारदाराचे नोव्हेंबर 2017 चे विद्युत देयक दुरुस्त करुन देण्याचा आदेश व्हावा तसेच समायोजित रकमेचा खुलासा व्हावा, देयकावर मीटरचा फोटो छापण्याचा आदेश व्हावा, बिल प्राप्तीबाबत ग्राहकाची स्वाक्षरी घेण्याचा आदेश व्हावा त्रुटीपूर्ण देयके न देण्याचा आदेश होवुन नुकसान भरपाई, प्रकरण खर्च द्यावा इ. मदत मंचाकडून मागीतली आहे.
2) विरुध्द पक्ष प्रकरणात हजर झाल्यावर त्यांनी तक्रार खारीज करावी, असा अर्ज दाखल करुन, असा युक्तिवाद केला की, सदर तक्रार ही विजय पटुकले तर्फे वडिलांनी दाखल केली आहे परंतु वडील श्रीरामअप्पा पटुकले हे विरुध्द पक्षाचे ग्राहक नाहीत, त्यांच्या नावाने दुसरे मीटर क्रमांक आहे तसेच कायद्याच्या तरतुदीनुसार विजय पटुकले यांनी कोणतेही मुखत्यारपत्र श्रीरामअप्पा यांना दिलेले नाही. त्यामुळे दाखल विशेष मुखत्यारपत्र हे वाचता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायद्यात जरी अधिकारपत्राबद्दल किंवा विशेष मुखत्यारपत्राबद्दल प्रोसीजर नाही तरीही प्रोसीजरल लॉ नुसार विशेष मुखत्यारपत्र हे विहीत नमुन्यात पाहिजे, त्यावर संमती देणा-याची सही आवश्यक आहे व ते बॉंम्बे स्टॅम्प अॅक्ट 48 नुसार 100/- रुपयाच्या स्टँम्प पेपरवर नोटरीपुढे केलेले पाहिजे. सदर प्रकरणात असे विशेष मुखत्यारपत्र दाखल केलेले नाही. वादातील विद्युत देयक ग्राहकाने भरलेले आहे व तो मंचात कधीच हजर राहिलेला नाही, ही बाब लक्षात घेवून तक्रार खारिज करण्यात यावी.
3) यावर मुखत्यारपत्रधारक यांचे असे म्हणणे आहे की, मुखत्यारपत्रधारक हे उपभोक्ता आहेत व नाते हे वडिलाचे आहे, त्यामुळे रेकॉर्डवर दाखल केलेले विशेष मुखत्यारपत्र कायदेशीर आहे. विरुध्द पक्ष याने हजर झाल्यानंतर अजून प्रकरणात लेखी जबाब दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर अर्ज हा प्रकरण लांबविण्याच्या हेतूने दाखल केलेला आहे, तो दंड लावून नामंजूर करावा.
4) अशाप्रकारे उभय पक्षांचे म्हणणे एैकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता यांचे वडिलांनी रेकॉर्डवर विशेष मुखत्यारपत्र असे शिर्षक देवून दाखल केलेले दस्त हे बॉंम्बे स्टॅम्प अॅक्ट 1985, अॅक्ट 48 नुसार, विहीत नमुन्यात नाही तसेच मुखत्यारपत्रधारक यांचे नावाने दुसरे अलग मीटर असावे कारण त्याबद्दलच्या तक्रारी मंचात चालू आहेत. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या अर्जात मंचाला तथ्य आढळते. तक्रारकर्ता विहीत नमुन्यातील विशेष मुखत्यारपत्रासह नव्याने ही तक्रार मंचासमोर दाखल करु शकतो. सबब अंतिम आदेश, पुढीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
- विरुध्द पक्षाचा अर्ज मंजूर केल्यामुळे, तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते. मात्र तक्रारकर्त्याला विहीत नमुन्यातील विशेष मुखत्यारपत्रासह नव्याने ही तक्रार मंचासमोर दाखल करण्याची मुभा देण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर) (सौ. एस.एम.उंटवाले)
सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri