(घोषित दि. 31.07.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांनी पिठाची गिरणी चालविण्याकरिता गैरअर्जदार यांचेकडून विद्युत पुरवठा ग्राहक क्रमांक 510030067396 अन्वये घेतला आहे. तक्रारदार नियमितपणे वीज देयकाचा भरणा करतात.
गैरअर्जदार यांच्या भरारीपथकाने दिनांक 26.05.2011 रोजी तक्रारदारांच्या गिरणीला भेट दिली. तक्रारदारांनी अनाधिकृतपणे विजेचा वापर केला असा अहवाल भरारीपथकाने तयार केला व वीज कायदा 2003 कलम 135 नुसार कार्यवाहीकरुन तक्रारदारांना रुपये 1,73,050/- एवढया रकमेचे विद्युत देयक देण्यात आले. तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. तक्रारदारांचे विरुध्द वीज चोरी बाबतचे प्रकरण सक्षम न्यायालयासमोर प्रलंबित आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याबाबत विनंती केली. तसेच त्यांनी दिनांक 12.08.2011 रोजी तक्रारदारांना दिलेले रुपये 3,190/- चे विद्युत देयक भरणा करण्यास तयार असल्याबाबत तक्रारदारांनी नमूद केले आहे.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी वीज चोरी केल्याचे भरारी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तक्रारदारांनी मीटरची सिल तोडून मीटरमध्ये प्रत्यक्ष वापरापेक्षा मीटर 69.3 टक्के स्लो होईल अशी व्याख्या केली आहे. भरारी पथकाच्या तपासणी नूसार झालेल्या परिस्थितीबाबतचा अहवाल, घटनास्थळ पंचनामा, असेंसमेंट शिट, पंचनामे वगैरे तयार करण्यात आले. तक्रारदारांनी वीज चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामूळे तक्रारदारांना कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे योग्य प्रकारे वीज देयक दिले आहे. तक्रारदारांचे सदरील प्रकरण वीज चोरी संदर्भातील असल्यामूळे न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
गैरअर्जदार यांनी त्यांचे समर्थनाथ सर्वोच्च न्यायालयाचे सिव्हील अपील क्रमांक 5466/2012(U.P. Power Corporation V/s Anis Ahmed) मध्ये दिनांक 01.07.2013 रोजी दिलेला न्यानिवाडा दाखल केला आहे.
वरील न्यायनिवाडयानूसार
“A Complaint made against the assessment made by assessing officer u/s 126 or against the offences committed u/s 135 to 140 of the Electricity Act, 2003 is not maintainable before a consumer Forum.”
यावरुन तक्रारदारांची तक्रार न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.