(घोषित दि. 28.07.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 510030203991 द्वारे वीज जोडणी घेतलेली असुन जानेवारी 2008 पर्यंत वीज वितरण कंपनीकडून प्राप्त झालेली सर्व देयके त्याने नियमित भरली. जानेवारी 2008 मध्ये त्याच्या मीटरमधील रिडींग 6483 अशी होती. परंतू वीज वितरण कंपनीने त्या महिन्याचे देयक देत असताना त्याच्या मीटरमधील रिडींग 8483 अशी चुकीची दर्शवून त्यास 2012 युनिट वीज वापराचे रक्कम रुपये 12,020/- चे देयक दिले. सदर चुकीचे देयक प्राप्त झाल्यानंतर त्याने त्वरीत दिनांक 22.02.2008 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे योग्य देयक मिळावे म्हणून अर्ज दिला. परंतू वीज वितरण कंपनीने त्याच्या अर्जाची दखल घेतली नाही. म्हणून त्याने पुन्हा दिनांक 15.06.2009 रोजी वीज वितरण कंपनीकडे योग्य रिडींग नोंदवून योग्य देयक मिळावे अशी मागणी अर्जाद्वारे केली. त्यानंतर त्याने वीज वितरण कंपनीकडे दिनांक 19.06.2009 रोजी रुपये 6,000/- आणि दिनांक 23.03.2006 रोजी रक्कम रुपये 5,000/- जमा केले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दिनांक 17.06.2009 रोजी त्याच्या मीटरची तपासणी केली, त्यावेळी त्याच्या मीटरमधील रिडींग 7,138 असल्याचे दिसुन आले आणि त्याचे मीटर योग्य पध्द्तीने काम करीत असल्याचे दिसुन आले. म्हणून मीटर तपासणी करणा-या अधिका-याने मीटर तपासणी अहवालात त्याचे मीटर योग्य पध्द्तीने काम करत असुन त्यास रिडींग प्रमाणे देयक द्यावे असे नमूद केले. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनी सदर अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करत नसून वीज वितरण कंपनीने चुकीचे देयक दुरुस्त केले नाही आणि वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्यास योग्य रिडींग नुसार सुधारीत देयक देण्याबाबत आदेश द्यावा आणि त्यास नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदारास त्यांनी कधीही चुकीचे किंवा अवास्तव देयक दिलेले नाही. तक्रारदाराला नियमाप्रमाणेच प्रत्यक्ष वीज वापरानुसारच देयक देण्यात आलेले असुन, तक्रारदाराने त्याच्याकडे असलेली थकबाकी भरावी लागू नये या उद्देशाने ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराला नेहमीच चांगली सेवा देण्यात आलेली असुन, त्यास देण्यात आलेल्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास चुकीचे देयक देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड. विपूल देशपांडे आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 09.02.2008 रोजी 2,012 युनिट वीज वापराबद्दल रक्कम रुपये 12,370/- चे देयक नि.3/2 दिले होते. सदर देयकाचा कालावधी दिनांक 15.12.2007 ते 18.01.2008 असा होता. या देयकामध्ये दर्शविलेली मागील रिडींग म्हणजे दिनांक 15.12.2007 रोजीची रिडींग 6471 आणि दिनांक 18.01.2008 रोजीची चालू रिडींग 8483 अशी दर्शविण्यात आलेली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, दिनांक 18.01.2008 रोजीची चालू रिडींग 8483 अशी नव्हती तर ती 6483 अशी होती. म्हणून सदर देयक नि.3/2 प्राप्त झाल्यानंतर त्याने दिनांक 22.02.2008 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे सदर देयकाबाबत अर्ज नि.3/11 द्वारे तक्रार केली होती. परंतू वीज वितरण कंपनीने त्याच्या देयकामध्ये कोणतीही सुधारणा केली नाही. तक्रारदाराने सादर केलेले देयक नि.3/2 पाहता सदर देयकामध्ये वीज वितरण कंपनीने दिनांक 18.01.2008 रोजी दर्शविलेली चालू रिडींग 8483 ही चुकीची असल्याचे स्पष्ट दिसुन येते. कारण सदर देयकामध्ये तक्रारदाराच्या मीटरचे दिनांक 18.01.2008 रोजी काढलेले छायाचित्र छापलेले असुन त्यामध्ये तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 18.01.2008 रोजीची रिडींग 6483 असल्याचे ठळकपणे दिसते. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दिनांक 17.05.2008 रोजी तक्रारदाराच्या मीटरमधील चालू रिडींग 8571 असल्याचे देयक दिनांक 07.06.2008 नि.3/4मध्ये नमूद केले आहे. परंतू सदर देयकामध्ये देखील दिनांक 17.05.2008 रोजीचे छायाचित्र छापलेले असुन छायाचित्रामध्ये तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 17.05.2008 रोजीची रिडींग 6571 असल्याचे स्पष्ट दिसते. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दिनांक 04.10.2008 रोजी दिलेले देयक नि. 3/5 मध्ये देखील वीज वितरण कंपनीने चुकीचीच रिडींग नोंदविल्याचे दिसत असुन दिनांक 30.09.2008 रोजीची चालू रिडींग 8663 अशी दर्शविली. परंत वस्तुस्थितीमध्ये देयकावर छापलेल्या छायाचित्रावरुन त्यादिवशीची रिडींग 6663 असल्याचे दिसते. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने वेळोवेळी चुकीची रिडींग नोंदविल्याचे तक्रारदाराने सादर केलेल्या देयकांवरुन दिसत असुन वीज वितरण कंपनीने दिनांक 18.01.2008 रोजी नोंदविलेली रिडींग 8483 ही चुकीची असल्याचे तक्रारदाराने दाखल केलेले देयक दिनांक 07.09.2010 वरुन देखील सिध्द् होते. कारण देयक दिनांक 07.09.2010 मध्ये दिनांक 22.08.2010 रोजीची रिडींग 7200 अशी नोंदविण्यात आलेली असुन देयकावरील मीटरच्या छायाचित्रावरुन देखील दिनांक 22.08.2010 रोजीची रिडींग 7200 असल्याचे दिसते. तसेच दिनांक 17.06.2009 रोजी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याने तक्रारदाराचे मीटर तपासले त्यावेळी त्याच्या मीटरमधील रिडींग 7138 अशी असल्याचे आढळून आले होते. तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 17.06.2009 रोजीची रिडींग 7138 असल्यामुळे त्याच्या मीटरमध्ये दिनांक 18.01.2008 रोजीची रिडींग 8483 असणे कदापिही शक्य नाही. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या मीटर वाचकाने तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 18.01.2008 रोजीची रिडींग चुकीची नोंदविल्याचे स्पष्ट दिसत असुन त्याच्या मीटरमध्ये दिनांक 18.01.2008 रोजी 6483 अशी रिडींग असताना मीटर वाचकाने रिडींगमधील सुरुवातीच्या 6 या अंकाऐवजी 8 अशी नोंद केल्यामुळे तक्रारदाराला चुकीचे व अवाजवी देयक देण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. सदर दिनांक 09.02.2008 रोजीचे देयक चुकीचे असुन त्यामधील रिडींग चुकीची असल्याबाबत तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडे दिनांक 22.02.2008 रोजी तक्रार दिली होती. परंतू सदर तक्रारीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 30.04.2008 दिनांक 20.06.2008 आणि दिनांक 15.06.2009 रोजी त्यास वेळोवेळी चुकीच्या मीटर रिडींग नोंदवून देण्यात आलेल्या देयकांबाबत तक्रारी केल्या. परंतू वीज वितरण कंपनीने त्याच्या तक्रारींकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. वास्तविक वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याने दिनांक 19.06.2009 रोजी दिलेला अहवाल नि. 3/15 मध्ये तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 17.06.2009 रोजीची रिडींग 7138 असुन त्यास प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसार देयके देण्याबाबत शिफारस केलेली होती. परंतू वीज वितरण कंपनीने कनिष्ठ अभियंत्याच्या अहवालाकडे देखील दुर्लक्ष केले आणि तक्रारदाराला योग्य देयक देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर बाब गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा दर्शवित असुन वीज वितरण कंपनीने तक्रारदारास वेळोवेळी चुकीची मीटर रिडींग नोंदवून अवाजवी देयके दिल्याचे तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यावरुन सिध्द् होते. तसेच वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 09.02.2008 दिनांक 09.04.2008 दिनांक 07.06.2008 आणि दिनांक 04.10.2008 रोजी दिलेली देयके अनुक्रमे देयक क्रमांक 11, 249, 1044 आणि 1081 अनुक्रमे रक्कम रुपये 12,370/- , रु.16,020/- ,रु.14,080/- आणि रु.14,720/- रद्द करण्यात येतात आणि वीज वितरण कंपनीने सदर देयकांच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या पुढील देयकांमध्ये दर्शविलेली थकबाकी व त्यावरील व्याज देखील रद्द करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 15.12.2007 ते 22.07.2010 या कालावधीसाठी फक्त 728 युनिट वीज वापराची प्रतिमाह योग्य विभागणी करुन स्लॅब बेनिफीटसह सुधारीत देयक निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावे.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास त्रुटीच्या सेवेबद्दल आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) असे एकूण रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |