जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 169/2010. तक्रार दाखल दिनांक : 07/04/2010. तक्रार आदेश दिनांक :09/03/2011. दत्तात्रय प्रकाश वानकर, वय 28 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. देगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. 2. शंकर लक्ष्मण गाडेकर, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. बसवेश्वर नगर, ता. उ.सोलापूर जि. सोलापूर. (वि.प. क्र.2 यांना दि.26/11/2010 च्या पुरसीस अन्वये वगळण्यात आले.) विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : यु.डी. फरतडे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.एच. हंचाटे आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी दि.1/10/2009 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून मौजे बसवेश्वर नगर येथील गट नं.65/1ब शेतजमीन खरेदी केलेली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपामध्ये 'विद्युत वितरण कंपनी') यांचे ग्राहक आहेत आणि ग्राहक क्र.330010076832 आहे. सदर वीज पुरवठा विद्युत वितरण कंपनीने माहे डिसेंबर 2006 मध्ये बंद केला आहे. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांचे मागील थकीत वीज बिलाचा तक्रारदार यांचा काहीही संबंध नसताना व विद्युत पुरवठा बंद असताना तक्रारदार यांना अवास्तव व अवाजवी थकीत वीज बिले देण्यात येत आहेत. तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनीकडे शेतीसाठी विद्युत जोडणीची मागणी करुनही त्यास नकार दिला आहे. विरुध्द पक्ष यांनी ऑक्टोंबर 2009 पासून वीज जोडणी न दिल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. शेवटी प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनीकडे त्यांना दिलेली बेकायदेशीर वीज बिले रद्द होऊन मिळावेत आणि त्यांना विद्युत जोडणी देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे. तसेच तक्रारदार यांनी मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना ग्राहक क्र.330010076862 अन्वये वीज पुरवठा केलेला आहे. मार्च 2010 पर्यंत विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे रु.95,190/- थकबाकी आहे. तक्रारदार यांनी शेतजमीन खरेदीपूर्वी त्या गट क्रमांकावरील वीज बील थकबाकीबाबत त्यांच्याकडे विचारणा केलेली नाही आणि खरेदीनंतरही आजपावेतो त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला नाही. सदरचे वीज कनेक्शन बंद नसून तक्रारदार त्यांचा वापर करीत असल्यामुळे त्याचा वीज बील भरणे क्रमप्राप्त आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द होऊन मिळावी, अशी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी दि.1/10/2009 रोजी मौजे बसवेश्वर नगर येथील गट नं.65/1ब शेतजमीन विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून खरेदी केल्याविषयी विवाद नाही. सदर शेतजमीन क्षेत्रामध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांचे नांवे ग्राहक क्र.330010076862 अन्वये वीज पुरवठा देण्यात आल्याविषयी विवाद नाही. तसेच सदर विद्युत जोडणीची बिले तक्रारदार यांना देण्यात येत असल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनीने त्यांना ग्राहक क्र.330010076862 अन्वये दिलेले वीज बिले रद्द व्हावेत आणि आणि त्यांना विद्युत जोडणी मिळावी, अशी विनंती केलेली आहे. उलटपक्षी, विद्युत वितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ग्राहक क्र.330010076862 या वीज पुरवठयावर रु.95,190/- थकबाकी असून वीज कनेक्शन बंद नाही आणि तक्रारदार त्याचा वापर करीत असल्यामुळे त्याचे वीज बील भरणे क्रमप्राप्त आहे. 6. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर विरुध्द पक्ष क्र.2 श्री. शंकर लक्ष्मण गाडेकर यांचे नांवे असलेल्या ग्राहक क्र.330010076862 चे सी.पी.एल. दाखल केले आहे. त्याचे अवलोकन करता, माहे मार्च 2006 पासून मार्च 2010 पर्यंत मीटर रिडींग 'शुन्य' नमूद करुन बिले आकारणी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी ऑक्टोंबर 2009 मध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून जमीन खरेदी केलेली आहे. वीज वापराचे रिडींग पाहता, तक्रारदार ग्राहक क्र.330010076862 या वीज जोडणीचा वापर करीत असल्याचे सिध्द होत नाही. तसेच विद्युत वितरण कंपनीनेही तक्रारदार यांच्याकडून सदर वीज जोडणीचा वापर झाल्याचे सिध्द केलेले नाही. 7. ग्राहक क्र.330010076862 या वीज जोडणीवर श्री. शंकर लक्ष्मण गाडेकर यांचे नांवे तथाकथित थकबाकी असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते आणि त्याविषयी विवाद नाही. आमच्या मते, ज्या वीज जोडणीचा वापर तक्रारदार यांनी केलेलाच नाही, त्या वीज जोडणीची बिले तक्रारदार यांच्यावर लादणे निश्चितच नैसर्गिक न्याय-तत्वास धरुन नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्याकडून सदर बिलाची वसुली करता येणार नाही आणि ते रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 8. तक्रारदार यांनी त्यांच्या मागणीप्रमाणे वीज जोडणी मिळावी, अशी विनंती केलेली असून त्यांनी खरेदी केलेल्या शेतजमीन क्षेत्राकरिता त्यांचे नांवे वीज जोडणी आवश्यक आहे. शेतीतील विद्युत पंपाकरिता वीज जोडणी अत्यावश्यक आहे. वीज जोडणीशिवाय शेती पिकांना पाणी देणे कठीण आहे. 'वीज' हा विषय विद्युत वितरण कंपनीच्या संपूर्ण अखत्यारीत असून त्यावर त्यांची एकाधिकारशाही आहे. तक्रारदार हे संभाव्य ग्राहक आहेत. अशा परिस्थितीत, विद्युत वितरण कंपनीने तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा देणे आवश्यक ठरते. वरील सर्व विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना ग्राहक क्र.330010076862 अन्वये दिलेली वीज देयके रद्द करण्यात येतात. 2. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे उचित कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या शेतजमिनीतील विद्युत पंपास विद्युत जोडणी द्यावी. 3. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/11311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |