निकालपत्र
(दि.19.08.2015)
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर,सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यादव गंगाराम डोंगरे हा विठठल नगर, नांदेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 550013061521 असा आहे. अर्जदार हा दोन पंखे,1 टीव्ही, दोन बल्ब असा विजेचा वापर करतो व त्यास दरमहा रक्कम रु.400 ते 500/- चे विद्युत बील येत असते. सदरील विजेचा भरणा अर्जदार नियमितपणे करतो. असाच एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर एकदम दरमहा विद्युत देयकाची रक्कम दुप्पटीपेक्षा जास्त येऊ लागली. त्याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली असता दिनांक 1.12.2013 रोजी अर्जदाराचे विद्युत मिटर बदलून दिले होते. बदललेले मिटर देखील जुने स्वरुपातील असून दोषयुक्त आहे असे करुन गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिलेली आहे. बदललेले मिटर जुने व तांत्रिकरीत्या बरोबर नसल्याने अर्जदारास नेहमीप्रमाणे 70 ते 75 युनीट वापर दाखवित असणारे मिटर आता 150 युनीट दर्शवू लागले आहे. गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी दिनांक 06.06.2013 रोजी, दिनांक 15.07.2013 रोजी व दिनांक 22.04.2014 रोजी अर्ज दिला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. विद्युत मिटर बदलवून घेतले असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे डोळे पुसण्यासाठी कुणाचे तरी जुने असलेले मिटर बसवून त्यात पुर्वीचे असलेले रिडींग असलेले दोषयुक्त मिटर देऊन पुर्वीच्या मिटरच्या संदर्भाने वाढवून बील देण्याचे चालूच ठेवले. जेणेकरुन नवीन मीटर बदलविल्यानंतर सर्वसाधारणपणे अर्जदारास मार्च,2013 च्या देयकाप्रमाणे दरमहा 400 ते 500 रु. इतके बील येणे योग्य होते. परंतु दुप्पट युनीटचे देयक देऊन गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल करुन मंचस विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करुन अर्जदारास बदलून दिलेले मिटर (जुनेच असलेले) बदलून नवीन फ्रेश विद्युत मिटर देण्याचा आदेश व्हावा. तसेच गैरअर्जदार यांनी दोषयुक्त मिटर बदलून दिल्याकारणी व पहिल्या वाढीव विद्युत देयकाप्रमाणे दुप्पट देयक देत असलेले , कमी करुन, दिनांक 02.08.2014 चे देयक रद्दबातल करुन त्यातील वाढीव देयक कमी करुन सुधारीत (दरमहा 500/- रुपये) प्रमाणे देयक देण्यात यावे. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.85,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.15,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा इत्यादी मागणी अर्जदार यांनी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, दिनांक 10.12.2013 मध्ये विद्युत मिटरचे नवीन कनेक्शन देण्यात आलेल्या मिटरवर पहिलेच रिडींग होते. जर तसे केलेले होते तर अर्जदार यांनी त्याच वेळी आक्षेप नोंदविणे आवश्यक होते. अर्जदाराने तसे केल्याचे दिसून येत नाही. केल्याचे दिसून येत नाही. जुने रिडींग असते तर अर्जदार यांनी त्यावेळेसच आक्षेप घेतला असता. दिनांक 10.12.2013 रोजी बसविण्यात आलेले मिटर हे डिजिटल मिटर होते व वापरलेल्या युनीटप्रमाणे बील देण्यात आले आहे. अर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे नवीन मिटर बसविण्यात आले तसेच मिटर बसवितेवेळी अर्जदाराचे मिटरचे सील फोडण्यात येते व नंतरच मिटर बसविण्यात येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यादव गंगाराम डोंगरे हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 550013061521 असा आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या बिलाच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे मिटर बदलून मिळणेसाठी दिनांक 06.06.2013 व दिनांक 15.07.2013 रोजी अर्ज केलेला होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर अर्जाच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर दिनांक 10.12.2013 रोजी बदलून दिलेले आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट वरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी दिनांक 24.03.2013 चे बील दाखल केलेले असून त्यामध्ये अर्जदाराचा विज वापर 111 युनीट नमुद आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विद्युत वापर हा मार्च,एप्रील, 2013 च्या देयकाप्रमाणे असन दरमहा 400 ते 500 रुपयाचे बील अर्जदारास येणे योग्य आहे. परंतु त्यास दरमहा 150 युनीटचे बील देण्यात आले. नंतर दिनांक 10.12.2013 रोजी मिटर बदलून देण्यात आलेवर देखील दरमहा 150 युनीटचे बिल देण्यात आले जेकी, चुकीचे व अयोग्य आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 24.03.2013 चे बील जे की, अर्जदार यांच्या म्हणणेप्रमाणे योग्य आहे त्याचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात. सदर विज बीलांतः-
(1) चालु रिडींग 1167
(2) मागील रिडींग 1056
(3) विज वापर 111 युनीट नमुद आहे.
तसेच सदर बिलात जुलै 2012 ते फेब्रुवारी 2013 पर्यंतचे विज वापर नमुद आहे जे पुढील प्रमाणे आहे.
जुलै,2012 480 युनीट
ऑगस्ट,2012 401 युनीट
सप्टेंबर,2012 091 युनीट
ऑक्टोबर,2012 022 युनीट
नोव्हेंबर,2012 144 युनीट
डिसेंबर,2012 976 युनीट
जानेवारी,2013 217 युनीट
फेब्रुवारी,2013 179 युनीट
मार्च,2013 111 युनीट
वरील माहिती वरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदारास त्याच्या विद्युत वापराप्रमाणे विज देयक देण्यात आलेले आहे.
मार्च,2013 नंतर एप्रील,2013 मध्ये 173 युनीट व मे,2013 मध्ये 621 युनीटचे विज वापर नमुद आहे हे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जदाराच्या सी.पी.एल. वरुन स्पष्ट आहे. सदर सी.पी.एल. चे बारकाईने अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतातः-
मे, 2013 मध्ये चालु मिटर रिडींग हे 1961 व मागील मिटर रिडींग हे 1340 दर्शविलेले आहे. त्यानंतर जुन, 2013 पासुन ऑक्टोबर,2013 पर्यंत अर्जदाराचे मिटर रिडींग हे (inaccess) मुळे घेण्यात आलेले नाही. नोव्हेंबर,2013 मध्ये अर्जदाराचे मिटर रिडींग घेण्यात आले त्यावेळी चालु रिडींग 5012 व मागील रिडींग 1961 दर्शविलेले आहे जेकी, योग्य आहे व अर्जदाराचा जुन, 2013 ते ऑक्टोबर,2013 च्या कालावधीत विज वापर 3051 युनीटचा आहे व मागील थकबाकीसहीत बिल हे रक्कम रु.30,267/- चे आहे. सदर बिल हे अर्जदाराने वापरलेल्या विज वापराबद्दलचेच असल्यामुळे अर्जदारास सदर रक्कम भरणे क्रमप्राप्त आहे.
अर्जदाराचे मिटर दिनांक 10.12.2013 रोजी बदलून दिलेले आहे. सदर बदललेल्या मिटरमध्ये सुरुवातीची रिडींग ही 12101 अशी दर्शविलेली आहे. त्यानंतर जानेवारी,2014 ते मे,2014 या पाच महिन्यांत inaccess मुळे अर्जदाराचे मिटरची रिडींग घेतलेली दिसून येत नाही. जुन,2014 मध्ये अर्जदाराची मिटर रिडींग घेण्यात आलेली दिसून येते.
त्यात चालु रिडींग 12745 व मागील रिडींग 12101 ( मिटर बदलतांना असलेली सुरुवातीची रिडींग) असे नमुद असून विज वापर हा 707 युनीटचा आहे. सदर 707 युनीटचा विज वापर हा 6 महिन्याचा आहे. म्हणून बदललेले मिटर जरी जुने असले तरी ते योग्य रिडींग दाखवत असल्याचे स्पष्ट आहे. वरील स्पष्ट झालेल्या बाबीवरुन असा निष्कर्ष निघतो की, अर्जदारास त्याच्या विद्युत वापराप्रमाणे बिल दिलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बिल दिले व सेवेत त्रुटी दिलेली आहे हे अर्जदाराचे म्हणणे सिद्ध होत नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.