निकाल
(घोषित दि. 14.12.2016 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. तसेच सिंहगड बिल्डींग दुर्गामाता रोड जालना येथील रहिवाशी आहे. तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला आहे. त्याचा मीटर क्रमांक 510038502385 असा आहे. तक्रारदारास येणारे विद्युत बिल तक्रारदार यांनी वेळोवेळी भरणा गैरअर्जदार यांच्याकडे केलेला आहे. तक्रारदार याचे जानेवारी 2015 ते नोव्हेंबर 2015 पर्यंतचे वापरण्यात आलेले वीज युनिट हे साधारणतः 200 युनिटच्या आतमध्ये आहे. गैरअर्जदार याने तक्रारदारास दि.05.11.2015 पासून ते 05.12.2015 पर्यंतचे एक महिन्याचे विद्युत देयक1448 युनिटप्रमाणे रक्कम रु.15,771/- व दि.06.12.2015 ते 06.01.2016 चे विद्युत देयक 352 युनिटप्रमाणे रु.3,500/- असे डिसेंबर 2015 व जानेवारी 2016 या महिन्याचे एकूण रु.19,980/- चे वीज देयक दिले आहे. सदर विद्युत देयकाबाबत तक्रारदार याने गैरअर्जदारास मीटर तपासणी करण्याबाबत अर्ज दिला त्यानुसार वीज वितरण कंपनी यांनी तक्रारदाराच्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तुंची पाहणी करुन सदरील विद्युत मीटर तपासणी कामी सील करुन सोबत नेले.
विद्युत मीटर तपासणीसाठी काढून घेतल्यानंतर गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या घरामध्ये नवीन विद्युत मीटर बसविले त्यानुसार दि.06.01.2016 ते 06.02.2016 पर्यंतचे 67 युनिटप्रमाणे रक्कम रु.463/- चे वीज देयक तक्रारदारास आले आहे. विद्युत मीटर तपासणी कामी तक्रारदारास बोलाविणे आवश्यक होते परंतू गैरअर्जदार यांनी विद्युत मीटर तपासणीच्या वेळेस तक्रारदारास बोलाविले नाही. रिमोट कंट्रोलद्वारे सदरील मीटरमध्ये घोळ केल्याबाबतचा तपासणी अहवाल दिलेला आहे. तक्रारदार याने विद्युत मीटरमध्ये रिमोटद्वारे कोणताही फेरबदल केलेला नाही. तक्रारदार याने नवीन मीटर बसविल्यानंतर आलेले बिल याचा भराणा करण्याकरता तक्रारदार याने गैरअर्जदाराकडे विनंती केलेली आहे, परंतू गैरअर्जदार यांनी पूर्ण वीज बिल भरेपर्यंत नवीन मीटरचे विद्युत देयक घेणार नाही असे सांगितले. तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले आहे. तक्रारदार यांची विनंती की, तक्रार अर्ज मंजूर करुन दि.05.11.2015 पासून ते 05.12.2015 व दि.06.12.2015 पासून ते 06.01.2016 पर्यंतचे जास्तीचे आलेले वीज देयक कमी करुन योग्य ते वीज देयक वीज वितरण कंपनीने द्यावे अशी विनंती केली आहे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्र.10 अन्वये दाखल केलेले आहे. गैरअर्जदार याचे कथन की, तक्रारदाराने वापर केलेल्या वीजेचे देयक रिडींगप्रमाणे देण्यात आलेले असून त्यात कोणतीही चुक नाही. तक्रारदाराने वापर केलेल्या वीजेपेक्षा जास्त युनिटचे वीज देयक देण्यात आलेले नाही. तक्रारदाराच्या विनंतीनुसार तक्रारदाराचे विद्युत मीटर तपासणी करुन दिलेले आहे. त्याबाबतचा अहवाल तक्रारदार याने मा.मंचात दाखल केलेला आहे. सदर अहवालाचे निरीक्षण केले असता तक्रारदाराने गैरअर्जदार याची कोणतीही परवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी गैरअर्जदार यांनी दिलेल्या मीटरमध्ये छेडछाड केली असून रिमोट कंट्रोलचा वापर केलेला आहे. तक्रारदाराचे सदरील कृत्य हे बेकायदेशीर आहे. सदरील गैरकृत्य करुन तक्रारदार याने वीज वितरण कंपनीची फसवणूक केलेली आहे. सदरील कृत्य बेकायदेशीर असल्याने मा.मंचात तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारीतील मजकुर वैयक्तिक, तांत्रीक, कायदेशीर स्वरुपाचा असल्याने तक्रारदाराने सिध्द करावा. तसेच तक्रारदारास तक्रार दाखल करण्याचे कारण घडलेले नाही. वीज देयकाची रक्कम न भरावी या उददेशाने तक्रारदार याने सदरील तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांचा लेखी जबाब याचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत
त्रुटी ठेवली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 व 2 तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांचा लेखी जबाब याचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून जुलै 2014 मध्ये घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदार यांनी विद्युत पुरवठा घेतल्यापासून वेळोवेळी वीज देयकाचा भरणा गैरअर्जदार यांच्याकडे केलेला आहे. तक्रारदार याने दाखल केलेले वीज देयक याचे अवलोकन केले असता तक्रारदारास विद्युत पुरवठा घेतल्यापासून साधारणतः 200 वीज युनिट पर्यंतचे वापर केल्याचे निदर्शनास येते. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दि.05.11.2015 ते 05.12.2015 पर्यंत व दि.06.12.2015 ते 06.01.2016 पर्यंतचे एकूण वीज देयक रक्कम रु.19,980/- दिल्याचे निदर्शनास येते. त्यामध्ये तक्रारदार याने वीज वापर म्हणून 1448 युनिट व 322 युनिट केल्याचे निदर्शनास येत आहे. तक्रारदाराच्या अर्जानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारदार याचे विद्युत मीटर तपासणीकामी घेतल्याने सदर विद्युत मीटरची तपासणी केली आहे. दि.02.02.2016 रोजीचे मीटर तपासणी अहवाल तक्रारदार याने मंचासमोर दाखल केले. सदरील तपासणी अहवालाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने सदरील मीटरमध्ये रिमोट कंट्रोल लावून वीज वापर केल्याचा उल्लेख दिसून येतो आहे असा अहवाल दिला आहे. आमच्या मते जर दि.02.02.2016 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदार हा रिमोट कंट्रोल लावून वीज वापर करत असल्याचे अहवाल दिला आहे, सदरील कृत्य हे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर कृत्य असून सुध्दा गैरअर्जदार यांनी तक्रारदाराविरुध्द आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली असल्याचे निदर्शनास येत नाही. सबब गैरअर्जदार यांनी सदर विद्युत मीटर तपासणी अहवालानुसार तक्रारदार यांनी विद्युत मीटरमध्ये रिमोट कंट्रोलद्वारे वीज वापर केली असल्याचा बचाव घेतला आहे. सदर बचाव हा मा.मंचास स्विकार्य नाही. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे विद्युत देयकांचा वेळोवेळी भरणा केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्याकडे गैरअर्जदार यांची विद्युत देयकांची थकबाकी नाही. गैरअर्जदार यांनी दि.05.11.2015 ते 05.12.2015 व दि.06.12.2015 ते 06.01.2016 पर्यंतचे दिलेले वीज देयक हे चुकीचे आहे असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार यांनी चुकीचे वीज देयक आकारुन तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब तक्रारदारास दिलेले वीज देयके दि.05.11.2015 ते 05.12.2015 आणि 06.12.2015 ते 06.01.2016 या तारखेचे दिलेले वीज देयक रदद करण्यात येते व योग्य ते सुधारीत वीज देयक तक्रारदारास देण्यात यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- देण्यात यावे असे या मंचाचे मत आहे.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
2) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दि.05.11.2015 ते 05.12.2015 व
06.12.2015 ते 06.01.2016 चे दिलेले वीज देयक रदद करण्यात येते.
3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास सुधारीत वीज देयक निकाल कळाल्यापासून 30
दिवसाच्या आत द्यावे.
4) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम
रु.5,000/- द्यावेत. सदरील आदेशाचे पालन 30 दिवसाचे आत करावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना