Exh.No.12
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 8/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.27/01/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.19/03/2015
श्री हरिश्चंद्र कृष्णा ढोलम
वय 64 वर्षे, व्यवसाय- सेवानिवृत्त,
मु.आडारी, पोस्ट- कोळंब, ता.मालवण
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्था मर्यादीत, कुडाळ,
एस.टी.स्टँड नजिक, मु.पो. कुडाळ,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
2) श्री वसंत नारायण आडेलकर
वय-47 वर्षे, धंदा- नोकरी,
वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्था मर्यादीत कुडाळ
करीता व्हाईस चेअरमन,
रा.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कुडाळ
सेक्शन ऑफिस, कुडाळ,
पो.ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
3) श्री विलास रामचंद्र सावंत
वय-45 वर्षे, धंदा- नोकरी,
वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्था मर्यादीत कुडाळ
करीता सचिव,
रा.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कुडाळ
सेक्शन ऑफिस कडावल, मु.पो.कडावल,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार- स्वतः
विरुद्ध पक्ष क्र.1 ते 3 तर्फे प्रतिनिधी श्री अनिल रा.कुडपकर.
निकालपत्र
(दि.19/03/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्था, कुडाळ या संस्थेचे ग्राहक सभासद असून विरुध्द पक्ष क्र.2 हे सदर संस्थेचे चेअरमन व विरुध्द पक्ष क्र.3 हे सचिव आहेत. तक्रारदार हे दि.31/5/2009 रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे दि.17/10/2008 रोजी राजीनामा देऊन ठेव रक्कम रु.5480/- आणि शेअर्सची रक्कम रु.9,660/- मिळून रु.15,140/- (रुपये पंधरा हजार एकशे चाळीस मात्र) ची मागणी केली. त्यानंतर वेळोवेळी विरुध्द पक्ष यांचे संस्था कार्यालयात जाऊन रक्कम मिळणेकरीता तोंडी मागणी केली. दरवेळी संस्थेकडे रक्कम शिल्लक नाही, अशी कारणे सांगून तक्रारदार यांची संस्थेकडील रक्कम देण्यात आली नाही, लेखी मागणी करुनही दखल घेतली नाही, निवृत्तीच्या कालावधीत विरुध्द पक्ष यांचे कार्यालयात फे-या माराव्या लागल्या. त्यामुळे प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास झाल्याने तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली.
2) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून ठेव व शेअर्सची रक्कम रु.15,140/- + व्याज रु.3,000/-, तक्रार खर्च कागदपत्र व ड्राफ्टचा खर्च रु.3000/-, तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- मिळून एकूण रु.26,140/- ची मागणी केली आहे. तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारदार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल, दि.17/10/2008 चे राजीनामा पत्राची प्रत, विरुध्द पक्ष यांना दि.19/11/2013 रोजी पाठविलेले रक्कमा मागणीचे पत्र वगैरे कागदपत्र दाखल केली आहेत.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 करीता अधिकारपत्रान्वये श्री अनिल राजाराम कुडपकर हे हजर झाले. विरुध्द पक्ष यांनी लेखी म्हणणे दाखल केले. ते नि.10 वर आहे. तक्रारदार यांनी संस्था सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले असून त्यांचे रु.18,140/- पैकी रु.3,000/- अदा केले असून रु.15,140/- संस्था तक्रारदार यांना देणे लागते हे मान्य केले आहे. मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतून संस्थेच्या 114 सभासदांनी राजीनामा दिल्यामुळे संस्था अडचणीत आली. त्यामुळे सभासदांना शेअर्सची रक्कम देणे संस्थेला शक्य झाले नाही. विरुध्द पक्ष संस्थेवर जिल्हा बँकेकडून घेणेत आलेल्या कर्जाचा बोजा आहे. तसेच सभासदांना दिलेल्या कर्जाची वसूली कमी प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना रक्कमा परत करणे अडचणीचे होत आहे असे म्हणणे मांडले. तसेच तक्रारदार यांना शेअर्सची रक्कम एप्रिल 2015 पासून थोडी थोडी देणेत येईल असेही कबुल केले.
4) तक्रार प्रकरणाचे कामी उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. इतरही ग्राहकांना रक्कमा अदा करण्याच्या असल्यामुळे तक्रारदार यांचे खाती दरमहा रु.1,000/- भरण्यात येतील असे विरुध्द पक्षातर्फे सांगण्यात आले. विरुध्द पक्ष संस्था आर्थिक संकटात असल्याने आणि ब-याच सभासदांनी एकाच वेळी रक्कमेची मागणी केली असल्याने दरमहा रु.1,000/- भरण्याची मुभा दयावी अशी विरुध्द पक्ष यांनी विनंती केली. परंतु तक्रारदार यांच्या रक्कमा सन 2008 पासून विरुध्द पक्ष यांचेकडे आहेत. तक्रारदार हे निवृत्त असून त्यांना रक्कमांची अत्यंत गरज असल्याने सर्व रक्कम व्याजासह एकरक्कमी देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तकारदार यांनी केली. तसेच नि.11 वर विरुध्द पक्ष यांचे म्हणण्यानुसार रु.18,140/- पैकी रु.3,000/- प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे.
5) तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व केलेला तोंडी युक्तीवाद विचारात घेता तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात विरुध्द पक्षातर्फे कमतरता ठेवल्याचे व रक्कमा मुदतीत दिल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. विरुध्द पक्ष यांनी केलेली सेवेतील कमतरता आणि विरुध्द पक्ष यांची सद्य आर्थिक स्थिती विचारात घेता मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात कमतरता ठेवल्यामुळे झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- तक्रारदार यांना अदा करावेत.
- तक्रार अर्जाप्रमाणे रक्कम रु. 15,140/- (रुपये पंधरा हजार एकशे चाळीस मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना अदा करावेत.
- वरील आदेश क्र.2 व 3 मधील आदेशाची पुर्ततेपोटी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी माहे एप्रिल 2015 पासून रक्कम फिटेपर्यंत रु.2,000/- प्रमाणे दरमहा 15 तारखेच्या आत रक्कम तक्रारदार यांना अदा करावी. तसे न केल्यास तक्रारदार उर्वरीत रक्कम 6% सरळ व्याजदराने वसूल करणेस पात्र राहतील.
- विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी नमूद आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द कार्यवाही करु शकतील.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 19/03/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.