Exh.No.15
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 68/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.30/12/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.06/04/2016
श्री. श्रीहरी पुरुषोत्तम काशीकर
वय 65 वर्षे, व्यवसाय – निवृत्त शिक्षक,
घर नं.3950, दत्तनगर - कुडाळ,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित
कुडाळ करीता अधिक्षक अभियंता,
2) महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित
कुडाळ करीता
उप कार्यकारी अभियंता श्री भावर साहेब,
3) महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित
कुडाळ करीता
कार्यकारी अभियंता, (प्रशासन) तथा
अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष – अध्यक्ष-
कुडाळ, श्री इंगळे साहेब,
वि.प.1 ते 3 सर्व राहणार मु.पो.कुडाळ,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री. के.डी. वारंग
निकालपत्र
(दि.06/04/2016)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुत प्रकरणामध्ये तात्पुरत्या कनेक्शनसाठी भरलेली अनामत रक्कम विरुध्द पक्षाकडे वारंवार मागणी करुनही तक्रारदाराला परत करणेस टाळाटाळ करणेत आल्याने मंचासमोर दाखल करणेत आली आहे.
2) सदर प्रकरणाचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे निवृत्त शिक्षक असून आपल्या निवृत्तीनंतर दत्तनगर कुडाळ येथे घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करुन तात्पुरत्या वीज कनेक्शनसाठी विरुध्द पक्षाकडे मागणी केली. तक्रारदारांनी डिपॉझिट रु.5,000/- + अन्य रु.140/- असे एकूण रु.5140/- विरुध्द पक्षाकडे भरले. दि.29/12/2011 ते दि.16/2/2012 या दरम्यान 140 दिवसांत विरुध्द पक्षाकडे 33 वेळा खेपा विरुध्द पक्षाच्या कार्यालयात घालून विनवण्या केल्यानंतर दि.16/5/2012 रोजी तात्पुरते वीज कनेक्शन देण्यात आले. प्रस्तुतच्या कनेक्शनचा ग्राहक क्रमांक 237510150163 असा आहे. उशीरा कनेक्शन दिल्यामुळे तक्रारदाराच्या घर बांधणी व विहीरीच्या कामाचा खोळंबा झाला व रु.7,000/- जादा मजूरी दयावी लागली. तसेच तात्पुरत्या कनेक्शनसाठी कराव्या लागणा-या कोटेशनमध्येही सर्व्हे केल्यानंतर आवश्यकता नसतांनाही सिमेंट, विटा, वाळू यांचे रु.770/- विनाकारण विरुध्द पक्षाने आकारले. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. दि.22/10/2013 रोजी तात्पुरते कनेक्शन रद्द करुन नियमित कनेक्शनसाठी तक्रारदाराने अर्ज केला त्यात तक्रारदाराचे तात्पुरत्या कनेक्शनचे डिपॅाझिट रु.5,000/- विरुध्द पक्षाकडे असतांनाही दि.28/10/2013 रोजी नव्याने रु.2,000/- व अन्य रु.200/- असे रु.2200/-डिपॉझिट घेणेत आले. सदर रक्कम भरल्यानंतर दोन महिन्यानंतर नियमीत कनेक्शन देण्यात आले. त्या दोन महिन्याच्या प्रलंबित काळाचे रु.800/- जादा बील तक्रारदाराला भरावे लागले. तक्रारदाराने दि.4/1/2014 रोजी डिपॉझिटची रक्कम मिळावी यासाठी विरुध्द पक्षाकडे अर्ज केला. मात्र विरुध्द पक्षाने डिपॉझिट + व्याजाची रक्कम देण्यास सातत्याने टाळाटाळ केलेली आहे व त्याउलट तक्रारदाराच्या डिपॉझिटमधून रु.567/- ची वसूली केली व तक्रारदाराने विरुध्द पक्षाची चूक दाखविल्यानंतर रु.380/- परत दिले. मात्र रु.187/- परत केलेले नाहीत. विरुध्द पक्षाच्या ग्राहक तक्रार निवारण कक्ष, रत्नागिरी येथेही तक्रार केली मात्र अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याबाबत तक्रारदाराने नोटीसही विरुध्द पक्षाला दिली. त्याचेही उत्तर त्यांनी अद्यापपावेतो दिलेले नाही आणि म्हणून प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल केलेली आहे. त्यामध्ये अनामत रक्कम व त्यावरील व्याज, बीलातील फरक, झालेले नुकसान, मानसिक त्रास अशा विविध कारणांसाठी रु.47,100/- मिळावेत अशी तक्रार अर्जात मागणी केलेली आहे.
3) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्र.3 वर एकूण 29 कागदपत्रे पुराव्यादाखल मंचासमोर दाखल केलेली आहेत.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी नि.क्र.8 वर आपले म्हणणे दाखल केले असून प्रस्तुतची तक्रार खोटी व खोडसाळ असून आपल्याला मान्य नसल्याचे कथीत केले आहे. आपल्या कथनात आपल्या कार्यालयाच्या कार्यप्रणालीचा उहापोह केलेला आहे व तक्रारदाराने अनावश्यक तक्रार केल्याने रु.10,000/- त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी असे म्हटले आहे.
5) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 तर्फे बाजू मांडण्यासाठी श्री. हरिश रामचंद्र भवर यांना नि.क्र.10/1 वर अधिकारपत्र देण्यात आले आहे.
6) अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा विरुध्द पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला नाही.
7) तक्रारदाराची तक्रार, कागदोपत्री पुरावे तसेच विरुध्द पक्षाचे म्हणणे, दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तीवाद या सर्व गोष्टींचे अवलोकन केल्यास मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्षाने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खाली नमूद केलेप्रमाणे |
-कारणमिमांसा -
8) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून वीज कनेक्शन घेतलेले आहे. त्याप्रमाणे वीज बीले अदा केलेली आहेत. त्यावरील ग्राहक क्रमांकाचा उल्लेख स्पष्टपणे दिसून येतो. सबब तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
9) मुद्दा क्रमांक 2 व 3 - तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही डिपॉझिटची रक्कम देण्यास विरुध्द पक्षाने दिरंगाई केल्याचे दिसून येते. प्रस्तुत रक्कम तक्रारदाराला न देण्याचे सबळ कारण विरुध्द पक्षाला मंचासमोर मांडता आलेले नाही. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरीक असून निवृत्त शिक्षक आहेत. त्यापेक्षाही ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत. डिपॉझिटची रक्कम मागणी करुनही न देणे तसेच वीज कनेक्शन वेळेत न देणे ही सेवात्रुटी ठरते आणि ती विरुध्द पक्षाने केलेली आहे हे कागदोपत्री पुराव्यावरुन स्पष्ट होते.
10) तक्रारदाराला वीज कनेक्शन मिळवण्यासाठी अनेकवेळा विरुध्द पक्षाच्या कार्यालयात जावे लागले, डिपॉझिट भरुनही वीज कनेक्शन देण्यात जो कालापव्यय झाला तो तक्रारदाराच्या नुकसानीस कारणीभूत ठरला हे तक्रारदाराच्या कथनातून दिसून येते.
11) विरुध्द पक्षाचे वीज ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र ग्राहक तक्रार निवारण कक्ष आहे. त्या माध्यमातूनही तक्रारदाराची तक्रार अनुत्तरीत राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्षाची ग्राहकाप्रती असलेली अनास्था दिसून येते. न केलेल्या कामाचे पैसे सुध्दा (सिमेंट,विटा, वाळू रु.770/-) विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून घेतली ही कृती अनुचित व्यापारी पध्दतीमध्ये येते. त्यामुळे सर्वसमावेशक असलेली विरुध्द पक्षाची आस्थापना सर्वसामान्य ग्राहकाप्रती किती सद्भावनेने वागते आणि प्रत्यक्षात कसा कृतीपाठ दर्शविते हे या प्रकरणातून कागदोपत्री पुराव्यावरुन तक्रारदाराने सिध्द केलेले आहे. त्यामूळे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केलेल्या मागण्या अंशतः मान्य करणे क्रमप्राप्त आहे. विरुध्द पक्षाने स्वीकारलेल्या रु.5,000/- अनामत रक्कमेवरील 9% दराने व्याज रु.1300/-, टेंपररी व पर्मनंट बिलातील फरकाची रक्कम रु.800/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- देण्याचे मंच मान्य करीत आहे.
सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास अनामत रक्कम रु.5,000/- दि.09/04/2012 पासून द.सा.द.शे. 9% व्याजदराने तक्रारदारास अदा करावेत.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास टेंपररी व पर्मनंट बिलातील फरक रु.800/- दयावेत.
4) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- दयावेत.
5) वरील आदेश क्र.2 ते 4 ची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकपणे 30 दिवसांत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कार्यवाही करु शकतील.
6) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज /परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.06/05/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 06/04/2016
Sd/- sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.