Exh.No.34
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. – 18/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.20/03/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.18/03/2016
श्री सुरेश दत्तात्रय गोगटे
करीता मुखत्यार राहुल सुरेश गोगटे
वय वर्षे 35, धंदा – शेती/ व्यापार,
राहणार – मु.पो.जामसंडे, ता.देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी
करीता कार्यकारी अभियंता,
मु.पो.कणकवली, ता.कणकवली,
जि. सिंधुदुर्ग
2) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी
करीता उप कार्यकारी अभियंता,
मु.पो.ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री अभिषेक अजित गोगटे
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – प्रसन्न बाळकृष्ण सावंत
निकालपत्र
(दि.18/03/2016)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष वीज वितरण कंपनीने सेवेमध्ये केलेल्या त्रुटीसंबंधाने दाखल करण्यात आलेली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांची मौजे चांदोशी ता.देवगड येथे आंबा कलमबाग असून त्या मिळकतीत तक्रारदार यांचे नावे वीज मीटर क्र.9001883030 आहे. त्याचा ग्राहक क्र.232820002049 असा आहे. सदर मिळकतीमधून विरुध्द पक्ष वीज कंपनीच्या विद्यूत वाहिन्या जातात. मिळकतीमध्ये तक्रारदार यांची एकूण 600 कलमे असून त्यापासून दरवर्षी सुमारे 3 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न मिळते. दि.26/12/2012 रोजी सकाळी सुमारे 10 वाजणेचे सुमारास तक्रारदार त्यांचे कलमबागेत गेले असता वीज वाहिन्यांमधून स्पार्किंगचा आवाज झाला. म्हणून तक्रारदार यांनी विद्यूत वाहिन्यांकडे पाहिले असता सदर विद्यूत वाहिन्या एकमेकांना चिकटलेल्या दिसून आल्या व तारांमधून स्पार्कींग होऊन ठिणग्या पडत होत्या. सदर बागेत गवत काढणीचे काम सुरु असल्याने सदरच्या ठिणग्या गवतावर पडून गवताला आग लागली व ती आग संपूर्ण बागेत पसरली. सदर आगीमुळे जवळपास 165 कलमे पूर्ण जळाली तर 197 कलमे अर्धजळीत झाली. तसेच सदर मिळकतीत केलेले ठिबक सिंचनाचे पाईप पूर्ण जळून गेले. अशा प्रकारे विरुध्द पक्षकार यांच्या विद्यूत वाहिनीतुन निर्माण झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे तक्रारदार यांचे बागेला आग लागून त्यांचे सुमारे 19,57,000/- एवढे नुकसान झाले असे तक्रारदार यांचे कथन आहे.
3) तक्रारदार यांचे पुढे असे कथन आहे की, सदर आग लागून झालेल्या नुकसानीचा पंचनामा देवगड पोलिसांनी दि.26/12/2012 रोजी केला. तसेच तालुका कृषी अधिकारी, देवगड यांनी संपूर्ण जागेची पाहणी करुन झालेल्या नुकसानीबाबत दि.15/1/2013 रोजी दाखला दिला. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे दि.24/1/2013, 30/07/2014 रोजी नुकसान भरपाईसाठी अर्ज देऊनही विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या विविध कार्यालयाकडून फक्त अहवाल मागविण्याचे काम केले. विद्युत निरीक्षक, सिंधुदुर्ग यांनी विरुध्द पक्ष यांना दि.11/3/2013 रोजी अभिप्राय देऊन नुकसानी देणेबाबत कळविले परंतु दि.15/3/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार देवगड यांचे दाखल्याप्रमाणे तक्रारदार यांनी केलेली मागणी मान्य नसल्याचे कळविले आहे. विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांना नुकसानीची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्यांने त्यास दि.28/11/2014 रोजी नोटीस देऊन नुकसानीची मागणी केली असता विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.5/12/2014 चे पत्र पाठवून तक्रारदार यांचेकडून कागदपत्रांची मागणी केली व पुन्हा नुकसान भरपाई देणेस टाळाटाळ केली म्हणून तक्रार दाखल करणेत आलेली आहे.
4) तक्रारदार यांनी तक्रार अर्जात विरुध्द पक्ष यांचेकडून कलम बागेच्या नुकसानीपोटी रक्कम रु.19,57,000/- तक्रारदार यांना भोगाव्या लागलेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- आणि तक्रार खर्च रु.10,000/- देववावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.5 चे यादीलगत पंधरा कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, राहूल गोगटे यांचा जबाब, सुरेश गोगटे यांचा जबाब, तालुका कृषी अधिकारी यांचा दाखला, विद्यूत निरीक्षक सिंधुदुर्ग यांचा अभिप्राय, तीन 7/12 उतारे, लाईट बील, विरुध्द पक्ष यांना पाठविलेली नोटीस, पत्रे, तक्रार अर्ज, कुलमुखत्यारपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
5) तक्रार अर्ज दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. विरुध्द पक्ष त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे नि.13 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली असून ती खोटी व खोडसाळ असल्यामुळे नामंजूर करावी असे म्हटले आहे. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारीतील कथीत घटना दि.26/12/2012 रोजीची असून तक्रारदार यांनी दोन वर्षाचे आत तक्रार दाखल केली नसल्याने नामंजूर होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून वीज पुरवठा घेतला असला तरी ग्राहक म्हणून तक्रारदाराचा विरुध्द पक्ष यांचेशी असलेला संबंध हा त्या वीज जोडणीपुरता मर्यादीत आहे. तक्रारदाराची वीज जोडणीबाबत कोणतीही तक्रार नाही. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे वीज तारांचे स्पार्कींग होऊन आग लागलेली आहे व त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. यामध्ये तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक म्हणून कोणतेही नातेसंबंध निर्माण होत नाहीत. नुकसान भरपाईसाठी जरुर तर तक्रारदाराने योग्य त्या सक्षम दिवाणी न्यायालयात क्षतीपुर्तीसाठी दावा दाखल करणे गरजेचे आहे.
6) विरुध्द पक्ष यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बागेला आग विरुध्द पक्ष यांच्या विदयूत वाहिनीवरील स्पार्कींगमुळे लागली परंतु स्पार्कींग झालेबाबत कोणताही पुरावा नाही. विरुध्द पक्ष यांच्या निष्काजीपणामुळे स्पार्कींग झाले अशी तक्रारदार यांची तक्रार नाही. स्पार्कींगमुळे आग लागली असेल तर तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना लागलीच कळविणे गरजेचे होते; परंतु तसे तक्रारदाराने केलेले नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्या समक्ष कोणताही पंचनामा अगर कृषी अधिकारी यांच्याकडून तपासणी करुन घेतलेली नाही. यावरुन नुकसान भरपाई मिळविण्यासाठी वणव्यामुळे लागलेल्या आगीचा गैरफायदा घेऊन तक्रारदाराने बनावट रेकॉर्ड तयार केले आहे. त्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी. तसेच खोडसाळ तक्रार दाखल करुन खर्चात टाकल्याबद्दल तक्रारदाराकडून विरुध्द पक्ष यांना रु.10,000/- नुकसानी मिळावी असे म्हणणे मांडले.
7) तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.16 वर दाखल केले आहे. त्यास विरुध्द पक्ष यांनी उलटतपासाची दिलेली प्रश्नावली नि.क्र.19 वर असून त्याची लेखी उत्तरावली नि.21 वर आहे. तक्रारदार यांनी नि.23 सोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांच्या मुलाने तक्रारीतील घटनेबाबत माहितीच्या अधिकारात मागविलेले कागदपत्र आणि घटनास्थळाच्या वस्तुस्थितीचे फोटो यांचा समावेश आहे. विरुध्द पक्ष यांचे सरतपासाचे शपथपत्र नि.क्र.26 वर आहे. त्यास तक्रारदार यांनी उलटतपासाची दिलेली प्रश्नावली नि.28 वर असून विरुध्द पक्षाने दिलेली लेखी उत्तरावली नि.क्र.29 वर आहे. तक्रारदार यांचा लेखी युक्तीवाद नि.क्र.33 वर आहे. विरुध्द पक्षातर्फे वकील श्री प्रसन्न सावंत यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदारतर्फे वकील श्री गोगटे उपस्थित नसल्याने रिप्लायसाठी तक्रारदार यांचेतर्फे मुदत मागितली.
8) तक्रारीचा आशय, दोन्ही बाजूंचा पुरावा, युक्तीवाद यांचे अवलोकन करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | विरुध्द पक्षाने तक्रारदार या ग्राहकांस देणेत येणारे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ? | होय |
4 | तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय. अंशतः |
5 | आदेश काय ? | खाली नमूद केलेप्रमाणे |
9) मुद्दा क्रमांक 1 - विरुध्द पक्ष यांचा आक्षेप आहे की, तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार यांचे नाते नाही. परंतु तक्रारदार यांचे कथनानुसार तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून जळीत अपघातग्रस्त आंबा कलमबाग या मिळकतीमध्ये कृषी कारणासाठी विद्युत कनेक्शन घेतले आहे. त्याचा वीज मीटर क्र.9001883030 असून ग्राहक क्रमांक 232820002049 असा आहे. सबब तक्रारदार विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी माहे डिसेंबर 2012 चे विद्युत देयक दाखल केले आहे. ते नि.क्र.5/11 वर आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी आहे.
10) मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदार यांना वीज कनेक्शन देणेत आलेल्या विद्युत तारांमध्ये स्पार्कींग होऊन त्यातून ठिणग्या गवतावर पडून ती आग तक्रारदार यांच्या संपूर्ण बागेत पसरुन 165 आंबा कलमे पूर्ण जळाली तर 197 कलमे अर्धजळीत झाली. तसेच सदर मिळकतीत केलेले ठिबक सिंचनचे पाईप पूर्ण जळून गेले. अशा प्रकारे विरुध्द पक्षकार यांच्या विद्युत वाहिनीतून निर्माण झालेल्या आगीमुळे आंबा बागेला आग लागून तक्रारदार यांचे सुमारे रु.19,57,000/- एवढे नुकसान झाले. सदरची बाब तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना त्वरीत कळवून देखील विरुध्द पक्षाने नुकसान भरपाई दिली नाही. तसेच विद्युत निरीक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनी दि.11/03/2013 रोजी नुकसान भरपाईबाबत अभिप्राय विरुध्द पक्ष यांना दिला. तो नि.क्र.5/5 वर आहे. असे असूनही विरुध्द पक्ष यांनी दि.15/4/2014 रोजी पत्र पाठवून नुकसान भरपाईची रक्कम मान्य नसल्याचे म्हटले आहे. ते पत्र नि.5/12 वर आहे. विरुध्द पक्ष यांनीच वीज जोडणी देण्यात आलेल्या 1 फेज 2 वायर उपरी तारमार्गाच्या पोलमधील योग्य ते अंतर न राखल्यामुळे वाहकामध्ये योग्य तो ताण राखला न गेल्यामुळे जोरदार वा-यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्याने स्पार्कींग होऊन आग लागून आंबा कलमे जळाल्याचे त्या क्षेत्रातील तज्ञ विद्युत निरीक्षक यांनी अभिप्राय देवूनही विरुध्द पक्षाने तक्रारदारांना नुकसान भरपाई नाकारणे ही ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेतील त्रुटी स्पष्ट करते. सबब मंच मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
11) मुद्दा क्रमांक 3- विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये आक्षेप घेतला आहे की तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे कथीत घटना ही ता.26/12/2012 रोजीची आहे. तेव्हापासून 2 वर्षे म्हणजेच 26/12/2014 पर्यंत तक्रारदाराने तक्रार दाखल करणे गरजेचे होते, परंतु दोन वर्षाचे आत दाखल केली नसल्याने ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रार नामंजूर करावी. तक्रार प्रकरणातील कागदोपत्री पुरावा विचारात घेता तक्रारीची कथीत घटना ही दि.26/12/2012 रोजीची असून तेव्हापासून तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे नुकसान भरपाईकरीता पाठपुरावा केल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा नि.5/12 हे पत्र कार्यकारी अभियंता, महावितरण कणकवली यांनी तकारदार यांना दि.15/3/2014 रोजी पाठविलेले आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी मागणी केलेली नुकसान भरपाई विरुध्द पक्षास मान्य नाही असे स्पष्ट कळविले आहे. तक्रारदाराने दि.20/3/2015 रोजी तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा मंचामध्ये दाखल केली आहे. दि.15/3/2014 (विरुध्द पक्षाने मान्य नसलेबाबत कळविलेचा दिनांक) पासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल केली असल्याने तक्रारदाराची तक्रार मुदतीत दाखल आहे या निष्कर्षाप्रत मंच आलेला आहे.
12) मुद्दा क्रमांक 4 - विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहीनीतून निर्माण झालेल्या आगीमुळे तक्रारदार यांची आंबा बाग जळून सुमारे 19,57,000/- एवढे नुकसान झाले असे तक्रारदार यांचे कथन आहे. विरुध्द पक्ष यांनी सदर बाब नाकारली आहे. स्पार्कींग झालेबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही आणि विरुध्द पक्षाचे निष्काळजीपणामुळे स्पार्कींग झाले असेही तक्रारदाराचे म्हणणे नाही. स्पार्कींगमुळे आग लागली म्हणून तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना लागलीच कळविणे गरजेचे होते, परंतु तसेच तक्रारदाराने केले नाही आणि विरुध्द पक्ष यांचे अपरोक्ष पंचनामे व पाहाणी करुन वणव्यामुळे लागलेल्या आगीचा गैरुफायदा घेऊन तक्रारदाराने बनावट व खोडसाळ रेकॉर्ड तयार केले. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही असा आक्षेप विरुध्द पक्ष यांनी घेतला आहे.
13) तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ त्यांचे शपथपत्र तसेच नि.5 कागदाचे यादीसोबत जळीत घटना घडल्यानंतर पोलीसांसमोर दिलेली फिर्याद, पोलीसांनी पंचासमक्ष केलेला पंचनामा, तालुका कृषी अधिकारी यांनी आंबा बागेची पाहाणी करुन दिलेला दाखला, विद्युत निरीक्षक यांनी नुकसान भरपाईबाबत दिलेला अभिप्राय, सातबारा उतारे, विरुध्द पक्ष यांजकडे केलेला पत्रव्यवहार, तसेच विरुध्द पक्ष यांचेकडून माहितीचे अधिकारात घेतलेली माहिती नि.23 सोबत दाखल केली आहे. तसेच घटनास्थळाचे फोटोग्राफ हजर केलेले आहेत. विरुध्द पक्ष यांनी त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
14) विरुध्द पक्षाचा आक्षेप आहे की, जळीत घटना घडल्यानंतर तक्रारदारांनी त्यांना लागलीच कळविलेले नाही. परंतु तक्रारदार यानी दाखल केलेल्या नि.23 सोबतच्या कागदपत्रांचे वाचन व अवलोकन करता पान क्र.7 व 8 वरुन स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना जळीत अपघाताची माहिती ताबडतोब दिली होती. त्यामुळेच विरुध्द पक्ष यांचे कर्मचारी काशिनाथ राणे, तंत्रज्ञ आणि लक्ष्मण खोचरे, वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी तातडीने तेथे जाऊन त्यांनी अपघाताची पाहाणी केली तसेच विरुध्द पक्षाचे इंजिनिअर यांनी देखील त्वरीत पाहाणी केली असे कागदोपत्री पुराव्यावरुन स्पष्ट होते त्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना जळीत अपघाताची माहिती दिली नाही, हा आक्षेप मान्य करता येणार नाही.
15) सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शेतजमिनी हया कमी प्रमाणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड हा तालुका कातळ दगडांचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी हा पूर्णपणे आंबा व्यवसायावर अवलंबून असतो. कातळ दगडावर आंबा लागवड हे अतिशय खर्चिक आहे. जरुर तर बँकांची मदत घेऊनच हे सर्व करावे लागते. हाताशी आलेली आंबा कलम बाग जेव्हा आगीमुळे नष्ट होते तेव्हा त्या शेतक-याकडे जगण्यासाठी काहीही उरत नाही. कोकण भागातील शेतकरी सोशिक असल्याने तो नुकसान भरपाई मिळेल या आशेवर पाठपुरावा करत राहातो. तक्रारदार यांची आंबा कलमबाग जळून इतकी वर्षे लोटली तरी विरुध्द पक्ष हे तक्रारदारकडे कागदपत्रांचीच मागणी करत आहेत.
16) विरुध्द पक्ष यांचे वकीलांचा युक्तीवादादरम्यान आक्षेप आहे की, तक्रारदार याला मीटर दिला त्यासंबंधाने त्याची कोणतीही तक्रार नसल्याने तक्रारदार हा ग्राहक नाही आणि आंबा बागेला आग लागून झालेली नुकसानी अपकृत्य (Tort) खाली येत असल्याने ग्राहक संरक्षण कायदयाखाली येणार नाही तसेच नुकसानी मिळण्यास पात्र नाही. तसेच तक्रारदार यांनी प्रत्यक्षदर्शी कामगारांना पुराव्याकामी तपासले नाही. तसेच जे खातेउतारे दाखल केले आहेत ते सन 2015 चे आहेत. 600 आंबा कलमे असल्याचा पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. ज्या कृषी अधिका-यांनी दाखला दिला त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. कृषी अधिका-यांनी केलेला पंचनामा दाखल केलेला नाही. कंपाऊंडच्या बाहेर घटनास्थळ असल्याने रस्त्याने जाताना एखादी सिगारेट पडली तरी तशी आग लागू शकते. त्यामुळे सदर घटनेला विरुध्द पक्ष यांस जबाबदार धरता येणार नाही.
17) तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र नि.5/5 विचारात घेता तक्रारदार या ग्राहकाला ज्या लाईनवरुन पुरवठा केला तीच लाईन विरुध्द पक्षाने पुढे जोडणी करुन श्री विलास थोटम यांच्या घरासाठी वीज जोडणी केली आहे आणि त्या तारांमध्ये योग्य अंतर न ठेवल्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारदाराचे आंबा बागेस आग लागल्याचा विद्युत निरीक्षक यांचा अभिप्राय आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन तारांमध्ये योग्य अंतर न ठेवणे हा विरुध्द पक्ष यांचाच निष्काळजीपणा आहे हे तक्रारदाराने कागदोपत्री पुराव्याने सिध्द केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. याकरिता आम्ही मा.राष्ट्रीय आयोग, न्यू दिल्ली - I (2016) CPJ 383 (NC) Ankush & Others V/s Superintending Engineer & Others या निवाडयाचा आधार घेत आहोत.
18) मुद्दा क्रमांक 5 – तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीवरुन स्पार्कींग होऊन आंबा बाग जळून झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.19,57,000/- ची मागणी केली आहे. त्यापुष्टयर्थ त्यांनी शपथपत्र दाखल केले. तसेच तालुका कृषी अधिकारी, देवगड यांचा दाखला नि.5/4 वर दिलेला आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी जळालेल्या आंबा कलमांचे भविष्यातील 5 वर्षापर्यंत सरासरी येणारे उत्पन्न हे 18,85,000/- दर्शविलेले आहे. आंब्याचे पिक हे एक वर्ष आड म्हणजेच ज्यावर्षी पीक येते त्याच्या पुढील वर्षी नाही अशाप्रमाणे येत असते. त्यामुळे आंबा कलमांचे नुकसानीपोटी रु.18,85,000/- चे निम्मी रक्कम रु.9,42,500/-, ठिबक सिंचनाची संचाची किंमत रु.72,000/- आणि तक्रारदार यांना सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.10,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामूळे तक्रारदार यांच्या आंबा बागेस आग लागून झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.9,42,500/-(रुपये नऊ लाख बेचाळीस हजार पाचशे मात्र) , ठिबक सिंचन संचाची नुकसानी रु.72,000/- (रुपये बाहत्तर हजार मात्र) मिळून एकूण रक्कम रु.10,14,500/-(दहा लाख चौदा हजार पाचशे मात्र) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस दयावेत.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस झालेल्या मानसिक त्रासापोटी, प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.10,000/- (दहा हजार मात्र) तक्रारदार यांस दयावेत.
- सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांत करावी अन्यथा तक्रारदार उपरोक्त आदेशीत रक्कमांवर दि.18/03/2016 पासून रक्कमेची पूर्ण वसूली होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याजासहित रक्कम मिळणेस पात्र राहतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.03/05/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 18/03/2016
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.