द्वारा- श्री. एस.के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 24 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांची अयोध्या बिल्डींग, निलांजली सोसायटी, कल्याणीनगर, पुणे येथे सदनिका होती. सदनिकेसाठी जाबदेणार यांनी सन 1993 मध्ये कन्झयुमर नं 170016838848 मिटर नं 9000026844 दिलेला होता. तक्रारदार विज बिले नियमित भरत होते. काही कारणांमुळे तक्रारदार तेथे रहात नव्हत्या. डिसेंबर 2002 मध्ये तक्रारदार सदनिके मध्ये गेल्या असता विज पुरवठा नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. जानेवारी 2003 मध्ये त्याच बिल्डींग मधील श्रीमती खान यांना 170016838821 व तक्रारदारांना एकच मिटर नंबर देण्यात आलेला होता, दोघांना एकाच मिटर साठी आकारणी करण्यात येत होती, हे तक्रारदारांच्या लक्षात आले. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. तक्रारदारांना गेल्या 10 वर्षापासून विज पुरवठा नसतांनाही आकारणी करण्यात आली, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जाबदेणार यांच्या खर्चाने नवीन मिटर बसवून मागतात, विज पुरवठा तात्काळ जोडून मागतात, 10 वर्षे विज नसतांना तक्रारदारांकडून दरमहा रुपये 150/- प्रमाणे जी आकारणी करण्यात आली त्यासंदर्भात रुपये 18,000/- परत मागतात, नुकसान भरपाई व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल करतांना व सध्या देखील तक्रारदार जाबदेणार यांच्या ग्राहक नाहीत. सन 2003 पासून अर्जात नमूद केलेल्या विद्युत पुरवठयाचा ग्राहक श्रीमती मंजुळा विश्वनाथ तट्टी आहेत. तक्रारदारांचा ग्राहक नंबर व श्रीमती फेहमिदा गफुर खान यांचा विज मिटर नंबर 26844 एकच असला तरी ग्राहक नंबर नुसार विज बिले देण्यात येत असल्यामुळे दोन्ही ग्राहकांना वापराप्रमाणेच विज बिले दिली जात होती. संगणकाला डाटा फिड करतांना झालेल्या चुकीमुळे मिटर नंबर बाबत चुक झाली होती. नंतर सदरहू चुक दुरुस्त करण्यात आली. श्रीमती फेहमिदा गफुर खान यांचा मिटर नंबर 26845 असा दुरुस्त करण्यात आला होता. तक्रारदारांनी विज बिले थकविल्यामुळे विज पुरवठा खंडित करण्यात आला होता. श्रीमती मंजुळा विश्वनाथ तट्टी यांनी थकबाकी भरल्यानंतर विज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कन्झयुमर नं 170016838848 Verification Report चे मंचाने अवलोकन केले असता त्यावर श्रीमती मंजुळा विश्वनाथ तट्टी यांचे नाव, घरगुती वापरासाठी विज पुरवठा, मिटर वर्किंग, चालू मिटर रिडींग व सदरहू ठिकाणची पहाणी केली असता त्या ठिकाणी तट्टी नावाच्या ग्राहकाचे घर असून त्यांनी ते घर भाडयाने दिले आहे असा शेरा नमूद केल्याचा उप कार्यकारी अभियंता यांच्या सहीचा अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. श्रीमती तट्टी यांच्या नावाची विज बिले मंचात दाखल करण्यात आलेली आहेत. विज पुरवठयासंदर्भातील आकारणी कन्झयुमर नंबर वरुन करण्यात येत असल्यामुळे व तक्रारदारांच्या नावे विज पुरवठा नसल्यामुळे, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयानुसार सद्यपरिस्थितीत तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, प्रस्तूत वाद ग्राहक वाद नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.